‘द सिरियन ऑब्जर्वर’ या न्यूजपोर्टलवर या विषयीचे वृत्त सविस्तर आहे. स्वतः सिरिया हा देश गेल्या दीड दशकांपासून गृहयुद्धात होरपळून निघतोय. जगभरातील कट्टर मुलतत्ववाद्यांसाठी जणू कार्यशाळाच तिथे उघडली होती असे एकंदर स्वरूप सिरियन भूभागाला प्राप्त झाले होते. सिरियन राज्यसत्तेवर ताबा मिळवून असणारे राजे बशर अल असद, त्यांच्या विरोधात एल्गार पुकारलेले विद्रोही बंडखोर, राजे असद यांच्या जुलमी राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोरांना समर्थन देण्याच्या नावाखाली तिथल्या समृद्ध तेलसाठ्यांवर डोळा ठेवून असणारे अमेरिका आदी देश आणि बंडखोरांच्या पाठीमागे दडून इस्लामी मुलतत्ववाद रुजवू पाहणाऱ्या कडव्या अतिरेकी संघटना या सर्वांच्या कराल काळचक्रात सिरिय न जनता अक्षरशः पिसून निघाली. दुसऱ्या महायुद्धाहून भयंकर जीवहानी यात झाली. संपूर्ण सिरिया देश बकाल आणि उजाड झाला. लाखोच्या संख्येने सिरियन जनता विस्थापित झाली. वृद्ध, बालके आणि महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. लाखोंच्या संख्येत प्राणहानी झाली. लाखो जायबंदी झाले. कैक पिढ्यांचे आयुष्य बरबाद झाले. इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णतः संपुष्टात आले. देश मोठ्या प्रमाणात मुलतत्ववादाकडे झुकला, आर्थिक नाकेबंदीने लोक जेरीस आले. मग्रूर असद शेवटपर्यंत लवचिक झाले नाहीत, अतिरेकी संघटनांच्या नांग्या ठेचल्या जातानाच डोनल्ड ट्रम्प यांनी पायउतार होण्यापूर्वी सिरियाविषयक धोरणांत महत्वाचे बदल केले परिणामी असद यांच्या पारड्यातले वजन वाढले. मात्र सिरियन जनतेची परवड सुरूच राहिली. लोकांच्या हितांना बाधा आणणारं पाशवी दमणकारक धोरण बिनदिक्कत राबवणाऱ्या सीरियाला अरब देशांनी कधीच समर्थन दिलं नाही मात्र रशियाने असद यांच्या राजवटीला नेहमीच सक्रीय पाठिंबा दिला होता. जगभरासाठी स्लो वॉरचे मेल्टिंग पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरियन राजवटीने लोकशाही मुल्ये वा जनमानसासाठीचे निर्णय घेतले नाहीत नि कधी उदारमतवादी मानवतेस पूरक अशी भूमिकाही घेतली नाही. आतादेखील युक्रेनच्या निष्पाप जनतेचा नरसंहार सुरु असताना त्यांच्या दृष्टीकोनात तिळमात्र बदल झालेला आढळून येत नाही. रशियाला पाठींबा देताना असद राजवटीने युक्रेनलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेय.
युक्रेनची राजधानी किवमधील इंडिपेंडन्स स्क्वेअरवरची शांतता युद्धाच्या भयाणतेची ग्वाही देतेय. युक्रेनच्या राजधानीवर रशियन हल्ल्याचा धोका वाढल्याने शहरातील अनेक रहिवाशांनी त्यांच्या जवळील विविध बंकर आणि मेट्रो स्टेशनमध्ये आश्रय घेतला आहे. वास्तवात युक्रेन आणि सीरियाच्या शहरांत खूपच साम्य आहे. दोन्ही शहरांतील निष्पाप नागरिक रशियन विमानांच्या भीतीत जगतात. युक्रेनमध्ये जे घडतेय ते एका अर्थाने सीरियातील यादवी शक्तीशी संबंधित आहे. सॅम हमद हे राजकीय अभ्यासक आहेत ग्लासगो विद्यापीठात त्यांनी इतिहास विषयात पीएच.डी.केली आहे, त्यांनी असद यांच्या निरंकुश विचारसरणीचा सखोल अभ्यास करून पॅन-अरब वेबसाइट अशरक अल-अवसातच्या एका परिसंवादात असा युक्तिवाद केला होता की, सीरियन घडामोडींकडे दुर्लक्ष करण्याची किंमत जग आता युक्रेनमध्ये चुकवत आहे. हे स्पष्ट करताना हमद यांनी 2013 मध्ये रशिया आणि यूएस यांच्यातील सीरियावरील कराराची तुलना हिटलर आणि यूकेचे तत्कालीन पंतप्रधान चेंबरलेन यांच्यातील म्युनिक कराराशी केली. या करारामुळे संघर्ष हळूहळू कमजोर होत गेला. त्याहीआधी इतिहासात झेकोस्लाव्हाकियाला जर्मन हुकूमशहाच्या अधीन करणाऱ्या कराराकडे पश्चिम युरोपीय शक्तींनी हिटलरला शांत करण्यासाठी एक साधन म्हणून पाहिले होते मात्र वर्षांनंतर हिटलरने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसरे महायुद्ध सुरू केले. त्याचप्रमाणे पुतिन यांच्या कटकटीला वैतागून अप्रत्यक्षपणे सीरियाची सूत्रे त्यांच्या हवाली केली गेली. सॅम हमाद म्हणतात की, क्रेमलिनला संतुष्ट करत गेल्याने त्यांची भूक वाढतच राहीली. नाटोचे सदस्यत्व हा बहाणा आहे मूळ सोविएत महासंघीय रचनेचे पुनरुज्जीवन हाच पुतिन यांचा साम्राज्यवादी अजेंडा आहे. खरं तर व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील तुटलेल्या प्रदेशांचे स्वातंत्र्य ओळखल्यानंतर आणि "शांतता राखण्यासाठी" अशी मखलाशी करून कथितपणे तेथे सैन्य पाठवल्यानंतर, सीरियन राजवटीतील विरोधी युतीच्या मीडिया विभागाने युतीचे महासचिव हैथम रहमा यांचे एक विधान त्वरीत प्रकाशित केले होते. रहमा यांनी या निर्णयाला गुंडगिरी असे संबोधत म्हटले की, ‘पुतिन एकतर हव्या असलेल्या देशावर कब्जा करतात, तेथील लोकांना विस्थापित करतात, त्याची संसाधने हिसकावून घेतात किंवा बंडखोरांची गणती फुटीरतावादी कॅन्टन्समध्ये करतात आणि पुढे जाऊन त्यांना लोकप्रिय प्रजासत्ताक म्हणून मान्यता देतात. आपणच दिलेल्या या एकतर्फी आदेशांचे जगाने पालन करावे म्हणून आटापिटा करतात.” रहमा यांचे हे विधान पुतिन यांचे वखवखलेले परराष्ट्रधोरण नेमकेपणाने समोर आणते.
या दरम्यान सिरियन शासन वर्तुळातील स्थिती अपेक्षेप्रमाणे अगदी भिन्न होती. SANA या अधिकृत सिरियन शासकीय वृत्तसंस्थेनुसार सीरियाने पूर्व युक्रेनच्या फुटीरतावाद्यांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवून लुहान्स्क आणि डोनेत्स्क या प्रजासत्ताकांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याच्या रशियाच्या निर्णयाचे थेट समर्थन केले. भूतकाळात देखील सीरियाने अबखाझिया किंवा क्रिमियासारख्या मॉस्कसमर्थित असलेल्या खंडित प्रदेशांशी देखील उत्साहाने संवाद साधला होता. इतके होऊनही सिरियन परराष्ट्र व्यवहार उपमंत्री बशर अल-जाफारी यांनी दावा केलाय की, युक्रेनच्या संकटामुळे सीरियाची चिंता वाढलीय कारण जगात अमेरिकेची एकध्रुवीय जागतिक व्यवस्था लागू करता कामा नये, यासाठीच रशियाला समर्थन दिलेच पाहिजे. सिरिया टाईम्स या सरकारी वृत्तपत्रानुसार नाटोनेच रशियन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करून हे संकट निर्माण केले आहे. सिरियन मीडियामधील ही मल्लिनाथी असद यांच्या चाटूगिरीची प्रतीके होत. याच वेळी इस्राईली माध्यमे काय म्हणतात हे देखील महत्वाचे आहे, SY-24 या विरोधी वेबसाइटनुसार रशियावरील निर्बंधांमुळे सीरियासह दोन्ही देशांमधील सहकार्याला बाधा येईल अशी शंका इस्रायली सरकारला वाटत आहे. अमेरिका हा दीर्घकाळापासून इस्राईलचा सदैव सहयोगी राहिलाय हे वास्तव स्वीकारून 'तेल अवीव'ला मध्य पूर्वेतील तणावग्रस्त परिस्थितीमुळे रशियन हस्तक्षेपाची गरज अजूनही कायम आहे असे म्हटलेय. गतकाळात रशियाने इस्रायलला सीरियातील इराणी युद्धखोर क्षेत्रांवर हवाई हल्ले करण्याचे अधिकार दिले होते हे इथे नजरेआड करता येणार नाही. ज्या सिरियाने आणि तेथील अतिरेक्यांनी इस्राईलला दमात घेण्याचे प्रयत्न केले त्याच सिरियन भूमीचे हवाईक्षेत्र इस्राईलला केवळ रशियामुळेच खुले झाले होते हा इतिहास आहे. त्यामुळे इस्राईल इच्छा असूनही युक्रेनला मदत करत नाहीये, विशेष म्हणजे युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपण ज्यू असल्याची भावनिक साद देखील इस्राईलला घातली होती.
तुर्कीच्या वर्तमान धोरणाबद्दल कतारस्थित आंतरराष्ट्रीय मीडिया अल-जझीराने वृत्त दिलेलं की युक्रेनने अंकाराला रशियन जहाजांना अडवण्यासाठी बोस्फोरस आणि डार्डनेलेस सामुद्रधुनी बंद करण्यास सांगितले होते आणि नाटो देशाच्या अध्यक्षांना एक प्रकारे संकटातच टाकले होते. तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी युक्रेनच्या विनंतीस सहमती दिली असती तर उत्तर सीरियामध्ये रशिया आणि तुर्की यांच्यातील सहकार्य धोक्यात आले असते. वायव्येकडील सीरियन बंडखोरांना पाठिंबा देणारा अंकारा आणि सिरियन शासनाला पाठिंबा देणारा रशिया वाद विकोपाला जाऊ नये म्हणून वारंवार चर्चा करून सीरियन संकटातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग सुकर असताना युक्रेनवर केला गेलेला हल्ला हा मध्यपूर्वेतील देशांची मूक संमती घेऊनच केला गेला आहे असा निष्कर्ष काढण्यास इथे पुष्कळ वाव आहे. युक्रेनियन संकटामुळे सीरियात नांदत असलेली थोडीफार शांतता देखील नष्ट होऊ शकते असे सीरिया सरकारशी संलग्न असलेल्या अल-बाथ वृत्तपत्राने म्हटले आहे. युक्रेन रणनीतीच्या बदल्यात अमेरिका सीरियामधील गृहयुद्धास पुनरुज्जीवित करू शकते. या शक्यतेवर पुतिन यांचा विश्वास नाही. काहीच दिवसांपूर्वी राजे असद यांनी रशियन संरक्षण मंत्र्यांच्या भेटीत पश्चिम सीरियातील हेमीम लष्करी तळाच्या सामरिक महत्त्वाची प्रशंसा केली होती यावर या वृत्तात कटाक्ष टाकण्यात आलाय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा