मंगळवार, १५ मार्च, २०२२

प्रिस्टच्या बाहुपाशातले अखेरचे श्वास – एका अद्भुत फोटोची गोष्ट...


सोबतच्या छायाचित्रात अनेक भावनांची गुंतागुंत आहे. मृत्यूपूर्वीचे अंतिम श्वास आहेत, भय आहे, धीरोदात्त उदारता आहे, अफाट धाडस आहे, श्रद्धा आहे आणि हतबलताही आहे. मरणासन्न सैनिकास आपल्या बाहूपाशात घेणाऱ्या प्रिस्टचा हा फोटो आहे. याला १९६३ सालचा पुलित्झर पुरस्कार लाभला होता. या फोटोची कथा मोठी विलक्षण आणि कारुण्यपूर्ण आहे.

एल पोर्टेनाझो (२ जून १९६२ - ६ जून १९६२) हे 
सैनिकास आपल्या बाहुपाशात घेण्यासाठी ते त्याला खेचत होते,
तेंव्हा एक गोळी त्याच्या पाठीवर येऊन थडकली.
व्हेनेझुएलामधील रोम्युलो बेटान्कोर्टच्या सरकारविरुद्ध अल्पकालीन लष्करी बंड होते, ज्यामध्ये बंडखोरांनी प्यूर्तो कॅबेलो शहर आणि सोलानो किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. व्हेनेझुएलाचे संविधान तेंव्हा जेमतेम एका वर्षापूर्वीच अस्तित्वात आले होते. तरीही त्या आधीच सरकार उलथून टाकण्याचे दोन प्रयत्न झाले होते. व्हेनेझुएलामध्ये बंडखोर स्निपर सैनिकांच्या गोळीबारात जखमी झालेल्या सैनिकावर नेव्ही चॅपलन लुईस पॅडिला यांनी अंतिम संस्कार केले. स्निपर फायर दरम्यान रस्त्यावर असीम धाडस दाखवत, लुईस हे रस्त्याच्या मधोमध उभे राहिले. जखमी सैनिकाचा देह गलितगात्र झाला होता त्याला उभं राहता येत नव्हते. त्याने प्रिस्टच्या कॅसॉकला (बॉडी गाऊन) घसटून स्वतःला वर खेचले, कारण गोळ्यांनी त्याचे चिलखत चिघळले होते. या फोटोमध्ये प्रिस्ट ज्या दिशेला पाहत उभे आहेत त्या दिशेला विद्रोही स्निपर्स होते आणि त्यांचा अंदाधुंद गोळीबार सुरूच होता. त्यांच्या गोळ्यांच्या वर्षावास न घाबरता लुईस निडरपणे उभे राहिले आणि त्यांनी तिथे पडलेल्या सर्व मरणासन्न सैनिकांना अंतिम विदाई दिली.

छायाचित्रकार हेक्टर रॉन्डन लेव्हरा यांनी अक्षरशः 
जखमी सैनिक निष्प्राण झाला तेंव्हा
लुईसनी त्याला हलकेच जमीनीवर निजवले.
जीवावर खेळून हे फोटो टिपलेत. गोळी लागू नये म्हणून ते सडकेवर निपचित पडून होते. तब्बल पंचेचाळीस मिनिटे ही धुमश्चक्री सुरु होती. हेक्टर लेव्हरा हे त्या रस्त्याच्या कडेला भिंतीला खेटून पडून होते तेंव्हा हवेत उडणाऱ्या गोळ्या त्यांच्या नजरेसमोरून हटत नव्हत्या. घायाळ सैनिक लुईस पॅडिला यांच्या कुशीत विसावला तेंव्हाही त्याच्यावर गोळी झाडली जात होती.

प्यूर्तो कॅबेलोच्या रहिवाशांचा पाठिंबा असलेल्या नौदल 
विद्रोही सैनिकांविरोधात
त्या चौकात रणगाडे दाखल झाले.

तळावरील सरकारी सैन्य आणि गनिमी बंडखोर यांच्यातील रक्तरंजित संघर्ष आक्रमक होता. बंड शमवताना अधिकृत व्हेनेझुएलन सैन्याने त्वरीत शहराचा ताबा घेतला आणि दोन दिवसांहून अधिक काळ सोलानो किल्ला ताब्यात ठेवणाऱ्या बंडखोरांना ताब्यात घेतले. जे मूठभर सैनिक पकडले गेले नाहीत किंवा मारले गेले नाहीत ते शहरालगतच्या जंगलात पळून जाऊ शकले. 3 जूनपर्यंत बंडखोरी चिरडली गेली, 400 हून अधिक मरण पावले आणि 700 जखमी झाले आणि 6 जूनपर्यंत बंडखोरांचा सोलानो कॅसल (किल्ला) ताब्यात आला.

या छायाचित्रात आणखी एक टोकदार बिंदू आहे. याच्या 
तिथे गतप्राण झालेल्या हरेक सैनिकासाठी प्रिस्ट लुईस
यांनी प्रार्थना केलेली.... 'मनुष्य मेला विषय संपला..'
हेच खरे असते मात्र धर्मीय अधिष्ठानांच्या चौकटीत
हे तत्व असे स्वीकारले जात नाही. यात श्रद्धांची
गुंतागुन्त झाल्याने काही टीकाटिप्पणी करणे
 आजकाल कठीण झाले आहे...
पार्श्वभूमीत एक carnicería (कत्तलखाना) आहे. स्पॅनिशमध्ये, carnicería चा अर्थ "कसायाचे दुकान" आणि "कत्तल, नरसंहार" असा होतो. “fue una carnicería” (इंग्रजीत : “it was carnage”) हा वाक्यांश स्पॅनिश भाषेत खूप सामान्य आहे. फोटो पाहता क्षणी पार्श्वभूमीमधले हे सबटेक्स्ट लक्ष वेधून घेते आणि या दृश्याची भीषणता आणखीनच तीव्र करते.

व्हेनेझुएलाच्या “ला रिपब्लिका” या वृत्तपत्रासाठी कॅराकसचे छायाचित्रकार हेक्टर रॉन्डॉन लेव्हरा यांनी 4 जून (1962) रोजी हा फोटो काढला होता. याने वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर आणि फोटोग्राफीसाठी 1963 चा पुलित्झर पुरस्कार जिंकला होता. या छायाचित्राचे मूळ शीर्षक होते “Aid From The Padre”.

मरणासन्न व्यक्तींच्या इच्छा काय असू शकतात ? त्यांना मुक्ती हवी असते का ? मुक्ती असं काही सत्व असतं का ? असे विचार जिता जागता आणि खुशाल माणूसच करू शकतो, मात्र ज्याचे अखेरचे श्वास सुरु असतात त्याच्या मनातले द्वंद्व कळणे कठीण आहे. लुईस यांनी त्यांच्या हातात प्राण सोडणाऱ्या सैनिकास मुक्ती दिली किंवा नाही हे कधीच सिद्ध होऊ शकणार नाही कारण त्याला कसलाच आधार नाही मात्र त्या सैनिकास थोडीशी का होईना मनःशांती दिली असेल हे नक्की ! वास्तवात धर्माचे अस्तित्व मनःशांतीपुरतेच बरे वाटते, अधिकची उंची त्याला बहाल केली गेली तर त्यावरून देखील मुडदे पडू लागतात !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा