"काय पारुबाई नात कुठं दिसत नाही?"
तिने मान हलवली नि कसनुसं हसली. तिचे उदास मौन पाहून सवितानेही तोच प्रश्न केला. मग ती बोलती झाली.
"काही नाही, तिला काल न्हाण आलंया. आता ती इथं यायची नाही."
पन्नाशी पार केलेली पारुबाई झोपडपट्टीत राहते. तिचा पोरगा नि सून यांच्याशी तिचे पटत नाही, ते बोरामणी भागात राहतात. पारुबाई लेकीकडे असते. तिच्या संसाराचा गाडा हाकते.
यार्डातून नाहीतर कमिशन एजंटकडून भाजी आणते, दिवसभर बसून पोटाचे खळगे भरते. इथे दुपारनंतर तिची नात तिच्यासोबत दिसायची.
चौथी पाचवीत असावी तिची नात. आता तिला इथं येऊन बसण्यास आणि आज्जीला मदत करण्यास मनाई होणार हे स्पष्ट दिसत होते.
"आजकाल टैम फार बेक्कार चाललाय, पोरीची जात. त्यात कवळी, लै जपायला लागंल." पारूबाईने कारण सांगितलं.
"आजूक दोन हायीत, जल्मल्याबरोबर हिरीत ढकलल्या असत्या तर माझी पोरगी सुटली तर असती! लोकं लाख म्हणत्येत पहिली बेटी धनाची पेटी, दुसरी बेटी तूप रोटी! कशाचं काय? आजच्या काळात पोरी सांभाळणं म्हणजे लै डेंजर काम!"
पदराने घाम पुसताना तिला वाटले की जरा जास्तच बोलून गेलो की काय!
"सगळ्याच घरी ही बोम्ब नसंल, पण ज्यांची पोटं हातावर हैत त्यांनी काय करायचं? कामधाम करायचं का पोरींवर लक्ष ठेवायचं की त्यांच्यावर घिरट्या घालणाऱ्या औलादीवर ध्यान ठेवायचं?"
ती अगदी तळतळून सांगत होती.
लिंबाच्या बुंध्यागत माझा नवरा होता, लै माया करायचा. जलमभर कष्ट केलं पर त्याची तक्रार नाही बघा असं तोंड भरून सांगणारी बाई आज उदास होती.
तिला समजावण्याच्या हेतूने सविताही बोलली - "नातीला आपल्या घरी पाठवा. मी लक्ष देईन आणि तिचा अभ्यासही होईल."
"समदं खरंय हो पण नेआण कोण करणार? तेव्हढ्यात कुणी कावा केला तर? अंगाने बारीकच राहू दे रे तिला पांडुरंगा!"
आभाळाकडे हात जोडत पारुबाई बोलली.
"मग आता इथं दिवसभर तुमच्या मदतीला कुणी तरी लागंलच की? त्याची काही सोय बघितली पाहिजे!"
क्षणाचीही उसंत न घेता पारुबाई उत्तरली- "इमल येणार हाय, माझी धाकली भैन. नवऱ्याने टाकून दिलंय तिला! काळीढुस्स फिंदरी हाय, तिला कोण काय करणार? आणि मी मेली रंडकी बोडखी थेरडी! सडल्या पानाच्या कोथिंबिरीला तरी भाव यील पण मला न्हाय!" बळेच हसतच ती बोलत होती!
तिच्या नातींचे लग्न होईपर्यंत तिला जगायचेय, पोरीचा संसार कडेपर्यंत लागेस्तोवर काम करायचेय.
पुढच्या वेळेस इथे आल्यावर पारूबाईसोबत तिची बहीण विमलचीही भेट होईल. विमलताई तुम्ही सुंदर दिसता असं मी आणि सविता आम्ही दोघंही तिला म्हणणार आहोत!
तिच्या कहाण्याही अशाच असतील काय?
- समीर गायकवाड
#ललित #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा