सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

दिखाई दिये यूं कि बेखुद किया - 'बाजार'च्या काही नोंदी

काही इच्छा असतात अर्ध्या राहिलेल्या, काही व्यथा असतात ज्यांना कुणी जाणलेलं नसतं. काही चेहरे असतात ज्यांना कुणी वाचलेलं नसतं, काही पुस्तके अशीच मिटलेली राहून जातात ज्यांची पाने कुणी उघडलेलीच नसतात आणि काही स्वप्ने असतात आयुष्याच्या अर्ध्यामुर्ध्या टप्प्यावर अवेळी आलेल्या पावसातल्या पाण्यात कागदी नावेबरोबर सोडून दिलेली!

हरेकाच्या आयुष्यात खूप काही निसटून गेलेलं असतं, आयुष्य संपत आलं तरी जगणं खऱ्या अर्थाने बरंचसं बाकी असतं!

साधीसुधी माणसं कथाविषय होती. त्यांचे सरळसाधे गुंते होते. निरलस मने आणि नितळ संघर्ष. लेपविरहित चेहरे, ओढाळ गाणी. शांत रात्री नि बेजान दिवस यांचं कॉम्बीनेशन असणारी तरल आयुष्ये. डामडौल नसणारा भवताल आणि डोळ्यांची भाषा बोलणारी कॅरेक्टर्स, न कसला कोलाहल ना कुठला प्रबोधनाचा बाज, सरळसुबक मांडणी! यांची गुंफण असणाऱ्या निव्वळ सरस जीवनकथा! केवळ उत्तुंग हिमशिखरांना पाहूनच छाती भरून येते असं काही नसतं काही गवताची पातीही अशी टोकदार नि चिवट असतात की त्यांनीही मन भरून येतं.





ग्लॅमर नसलेले चेहरे, अनपॉलिश्ड कथा रोजच्या जगण्यातल्या काही सुलभ काही कठीण गोष्टी असंही एक विश्व बॉलिवूडमध्ये होतं. यांच्या जोडीला अर्थपूर्ण सुरेल गाणी होती, सुश्राव्य संगीत होतं, खटकेबाज संवाद होते, स्वतःची वेगळी स्टाईल असणारे भलेबुरे नायक नायिका होत्या, दिलखुलास हसवणारे हास्य अभिनेते होते आणि मस्तकात तिडीक आणणारे खलनायक होते, हेलावून टाकणाऱ्या काळीजकथा होत्या नि हलक्या फुलक्या आनंदकथाही होत्या!

मात्र अतिवास्तववाद, उठसूठचा राष्ट्रवाद नि पराकोटीचा इतिहासाचा हव्यास यांच्या गर्दीत हे विश्व गुदमरून गेलं.
ऋषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी यांच्या सिनेमांचा एक देखणा हवाहवासा परीघ होता आणि त्याला छेद देणारा मणिरत्नम, गोविंद निहलानी आदींचा एक टोकदार परीघ होता. ही दोन्ही वर्तुळे जीवनदायी होती त्यांचे एकेक बिंदू आताच्या उन्मादाने उखडून काढले जाताहेत. बघता बघता चित्रपटाचा रुपेरी पडदा करपत चाललाय आणि सिनेमा घायाळ झालाय. आयुष्याच्या विविध वळणवाटांवर नवनवे जीवनार्थ शिकवणाऱ्या नि रोजच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटका मनोरंजनाचे हक्काचे साधन असणाऱ्या सिनेमाने अशी मान टाकणं हे वेदनादायी आहे.

गाण्याविषयी.. आवडता चित्रपट 'बाजार'.
गीत - मीर तकी मीर. संगीत - खय्याम, गायिका अर्थातच लता मंगेशकर.
बाकी यातली फिल्मी मंडळी तुमच्या माझ्या परिचयाची.

काही नोंदी -
'बाजार'चं चित्रीकरण सुरू होतं तेंव्हा स्मिता पाटील उद्ध्वस्त झालेल्या मानसिकतेत होती. राज बब्बरने आपल्याला फसवल्याची भावना दृढ झाली होती. 21 मे 1982 रोजी बाजार रिलीज झाला आणि 13 डिसेंबर1986 च्या दिवशी स्मिता गेली. बाजारच्या सेटवर ती अस्वस्थ असायची. यातल्या कथेने भेदरून जावं असं आयुष्य ती जगत होती. तरीही सिनेमामध्ये तिचा वावर सर्वाधिक सफाईदार होता.

कवी मीर तकी मीर यांचा कालखंड अठराव्या शतकातला. मुघलांच्या कदरदानीवर अनेकांनी उदरनिर्वाह केला मात्र मीर अपवाद होते. त्यांची अप्रतिम रचना बाजारमध्ये सुरेल सजावटीत पेश केली गेली आणि एक अवीट गोडीचं गाणं जन्माला आलं.

1933 मध्ये तेंव्हाच्या ब्रिटिशकालीन पाकिस्तानमधील बफ्फा शहरात जन्मलेल्या सागर सरहदी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. शॉर्टफिल्म्स आणि नाटकं यात रमणाऱ्या सरहदींना व्यावसायिक गणिते जमली नाहीत पण माणसांच्या मनाचा तळ शोधता आला जो त्यांच्या सिनेमात स्पष्ट दिसतो! आता सरहदी जिवंत असते तर कदाचित त्यांच्या सिनेमांना बॉयकॉट केलं गेलं असतं, पाकिस्तानला परत जा असं सुनवलं गेलं असतं.

बाजार मधल्या शबनमच्या आईची भूमिका केली होती सुलभा देशपांडे यांनी. आपल्या लेकीचं लग्न जमावं म्हणून जीवाचा आटापिटा करणारी आई त्यांनी अगदी नेमकी निभावली होती. सुलभाताईंची भूमिका छोटी होती मात्र तरीही ती लक्षात राहिली. मुंबई आणि हैदराबाद या दोन शहरांतली भिन्न संस्कृती नकळत समोर येते जे आपल्याला अगदी अखेरीस जाणवतं!

खय्यामजींचं संगीत मोठ्या वाद्यवृंदांसह क्वचितच असायचं. सुरेख वाद्यमेळ आणि तरल संगीत असे. कोलाहल कधीच नसायचा. कभी कभी, उमराव जान, थोडीसी बेवफाई, रजिया सुलतान ही काही मुख्य नावे ज्यांना त्यांनी संगीत दिलेलं! नावं वाचताच शांत धीरगंभीर नि सुश्राव्य गाणी समोर येतात! हरवलं आहे हे सर्व!

1995 साली गायक भूपेंदरसिंग यांनी सादगी हा म्युझिक अल्बम रिलीज केला. त्यात 'करोगे याद तो, हर बात याद आयेगी' हे गीत होतं जे मूलतः बाजार सिनेमामध्ये होतं. बाजारशी जोडल्या गेलेल्या नावांमध्ये अनेक दिग्गज नावं होती. दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन मधले भूपेंदर घनगंभीर वाटतात तर बाजारमध्ये त्यांचा स्वर आर्त कातर वाटतो. बाजारमधली सगळीच गाणी ऑफबीट होती.

स्मिता पाटील, सुप्रिया पाठक आणि निशा सिंग या तिघीजणी 'दिखाई दिये यूं कि बेखुद किया..' मध्ये दिसतात. त्यांची सलवार ओढणी, कपड्यांचे टेक्श्चर कलर्स, त्याला साजेशी रंगभूषा आणि मधाळ गजरे. भारतीय बैठकीत सजलेली मैफल आणि स्वर्गीय स्वर! तिन्ही नायिकांच्या चेहऱ्याची ठेवण भिन्न आहे, त्यांच्या पुढ्यातले प्रश्न वेगळे आहेत, यात सर्वाधिक कश्मकश झेलतेय ती नजमा, जी आपल्याला नवऱ्याची मारहाण देखील सहन करते! बाजारने मनांतल्या कोंडवाड्यातल्या अनेक गोष्टींना मोकाट रस्ता दाखवून दिला होता.

अनेक डान्सबारमध्ये हे गाणं रात्री उशिरा ऐकलेलं आहे. बार सुरू झाल्याबरोबर जे पब्लिक यायचं ते आयटेम नंबरसाठी आग्रही असायचं. त्यांना मस्ती हवी असायची, बारबालांचा डान्स(?) हवासा वाटे, त्यांचे इशारे नि नखरे अनुभवावेसे वाटत. मात्र बार बाहेर रात्र सरून उत्तररात्रीच्या घनदाट मंद अंधाराचा कैफ चढू लागताच बारमध्ये एक स्थिर शिथिलता येई अशा गाफील वेळी नशा जास्ती झालेल्या मंडळींची दुःखे उफाळून येत. त्यातून वेगळीच फर्माईश समोर येई. हरेक डान्सबारमध्ये सोलो गाणं गाणारी किमान एक गायिका असायचीच, तिच्यासाठी या फर्माईशी जीव की प्राण असत. तिची वेळ येईपर्यंत कित्येक तास ती इस्त्री केलेल्या चेहऱ्याने बसून राहायची मात्र अशी गाणी टिश्यूपेपरवर लिहून आली की तो कागद नकळत तिच्या समोर पेश केला जाई. मग ती आणि तिचं गाणं यात तो बुडून गेलेला असे. 'दिखाई दिये यूं कि बेखुद किया'चा जमाना बेहद्द रसिला आणि रसरशीत होता ज्यात समग्र मानवी भावभावनांचं एकजिनसी तादाम्य होतं. सर्वच गोष्टी शब्दांतून सांगता आल्या असत्या तर किती बरे झाले असते ना!

आर्थिक, राजकीय नि जातधर्मीय गणिते पाहून हिंदी चित्रपटाच्या अभिरुची विषयीची भूमिका ठरवणाऱ्या वर्गास जेंव्हा यातून झालेल्या भावनिक नि जडणघडणीच्या ऱ्हासाचा अंदाज येईल तेंव्हा उशीर झालेला नसावा हेच काय ते मागणं....

- समीर गायकवाड

1 टिप्पणी:

  1. व्वा. मजा आली वाचतांना. चित्रपट चांगला होता. पण हे गाणं तितकसं नाही भावलं. कंटाळवाण आहे. ना त्यांचं मिलन होतं, ना फार काही घडतं. बाकी आपण दिलेला परिचय आवडला.

    उत्तर द्याहटवा