सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

तो रडला तेंव्हा.. @रॉजर फेडरर
आपल्याकडे एक समज आहे की फक्त लहानगी चिमुरडीच हमसून हमसून रडतात. बहुत करून मोठ्यांचं रडणं हे रुमालाने डोळ्यांच्या कडा पुसून घेणारं असतं वा एखाद्या दुसऱ्याचा आवेग जास्तीचा असेल तर एखादा हुंदका येतो नि कढ सरतात.मात्र परवा त्याला रडताना पाहिलं आणि नकळत मीही रडलो!इतकं काय होतं त्याच्या अश्रुंमध्ये? त्यातली सच्चाई, त्यातलं नितळ प्रेम, शालीनता, नम्रता आणि वात्सल्य हे सारं थेट मनाला भिडणारं होतं. होय मी रॉजर फेडररबद्दलच बोलतोय!

फेडररने त्याची निवृत्ती १५ सप्टेंबरलाच जाहीर केली होती. निवृत्तीविषयीच्या घोषणेचा त्याचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांत जगभर व्हायरल झाला होता. आपल्या मोठेपणाचा कुठलाही अभिनिवेश त्यात जाणवत नव्हता. त्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नव्हता.

त्याची निवृत्ती रॉलें गॅरो वर किंवा विम्बल्डनसारख्या मोठ्या विख्यात मैदानांवर होईल असे वाटले होते. मात्र निवृत्तीसाठी त्याने निवडलेली स्पर्धाच मुळात तुलनेने काहीशा बारीक परिघाची होती!
रॉड लेव्हर कप स्पर्धेत त्याने निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.
चकचकाट आणि झगमगाट कमी असलेली ही स्पर्धा त्याने निवडली तेंव्हाच त्याचं हळवं मन ठळकपणे समोर आलं होतं. या स्पर्धेत जागतिक पातळीवरचे आताचे बिनीचे तरुण खेळाडू आणि आपला कट्टर पारंपारिक जुनाच प्रतिस्पर्धी हजर असणार होते.
शिवाय ज्या प्रेक्षकांनी त्याला दोन दशकाहुन अधिक काळासाठी सातत्याने पाठींबा दिला ते ही तिथं उपस्थित असणार होते.
याहून भारी गोष्ट त्याच्या अखेरच्या मॅचची आहे!

या स्पर्धेत तो डबल्स म्हणजे दुहेरी फॉर्ममध्ये खेळला. यावेळी त्याचा जोडीदार होता त्याचा नेहमीचा प्रतिस्पर्धी राफेल नदाल!
आपण ज्याच्या विरोधात अगदी कडवटपणे अनेकदा लढलो त्याला सोबतीस घेऊन दुसऱ्या संघाविरोधात लढून निवृत्त व्हायचं ही कल्पनाच मुळात किती ग्रेट आहे ना!
त्यानिमित्ताने त्यांचे काय शेअरिंग झाले असेल?
प्रत्येक व्हॉलीगणिक नि शॉटगणिक त्यांना काय वाटलॆ असेल?
आणखी काही अवधीनंतर आपण पुन्हा कुठली मॅच खेळणार नाही आणि ही मैदाने, हे प्रेक्षक, पंच आणि प्रतिस्पर्धी असं कुणी उरणार नाही ; उरतील त्या केवळ समृद्ध आणि देदीप्यमान आठवणी!

कसलं भारी फिलिंग असेल ते!

मॅच संपली.
त्याची निरोपाची वेळ जवळ आली.
तो अगदी भावूक होऊन गेला होता.
समालोचक त्याला एकेक प्रश्न विचारत गेले नि हरेक प्रश्नाला उत्तर देताना तो हमसून हमसून रडत गेला!

त्याचा हुंदका वाढला की प्रेक्षक त्याला चिअरअप करत होते, त्याला सपोर्ट करत होते.
बघता बघता त्याच्या आजवरच्या लढ्याचा बांध फुटला आणि तो निखळ रडू लागला. हाताने बाहीने डोळे पुसत बोलत राहिला!
त्याला ऐकणाऱ्यात त्याचे सहकारी होते. त्याचे कुटुंबिय, मित्र, आप्त होते. टेनिसशी संबंधित तज्ज्ञ, पंच होते आणि तरुण उमद्या खेळाडूंपासून ते राफेल नदाल पर्यन्त सगळेच होते. सगळ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. नकळत रदालचेही डोळे वाहू लागले!

गेली कित्येक वर्षे आमने सामने लढताना त्वेषाने तुटून पडणारे ते दोघे आता भिन्न उरलेच नव्हते हे चित्र अत्यंत सुंदर नि दिलासादायक होतं! आय लव्ह इट!

या दरम्यान त्याच्या मनात साठलेलं मळभ समोर आलं.

रॉजर सुरुवातीला चिडखोर, रागीट होता. त्याचा रागीट स्वभाव बदलण्यासाठी त्याच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. एकदा मॅच हरल्यावर रॉजर भयंकर संतापला होता आणि त्याने खूप कटकट सुरू केली. शेवटी, कारमधून बाहेर काढून वडलांनी रस्त्याकडील बर्फात अक्षरश: त्याचे डोके घासले जेणेकरून त्याच्या मस्तकातला क्रोधाग्नि विझावा!

लाईनमनने चुकीचा कॉल दिला तर तो चिडत असे. रेफ्रीने चुकीचा पॉईंट दिला तर तो रागावत असे. रॅकेट आपटणे आणि रागावून बोलणे, चिडणे हे नेहमीचे होते. मॅच हरली की रॉजर चेअर अंपायरच्या खुर्चीच्या मागे जाऊन ढसाढसा रडत असे.
त्याचा मूळचा रागीट स्वभाव जायला बराच काळ जावा लागला. एकदा बिएल अकादमीत टेनिस कोर्टांचे विभाजन करायला मोठा जाड पडदा लावला होता. त्याला वाटलं इतके जाड पडदे आहेत, ते फाटणार नाहीत. बिनधास्तपणे त्याने रॅकेट भिरकावली. ती भिरभिरत पडदा उभा चिरत गेली. अशा वर्तनामुळे अकादमीतील अधिकाऱ्यांनी त्याला ऑफिस व्हॅक्यूम क्लीन करण्याची आणि तेथील टॉयलेट्स स्वच्छ करायची शिक्षा दिली होती, हा देखील एक इतिहास आहे!

त्याच्या मातापित्यास त्याने सामना गमावल्याचे कधी दुःख वाटत नव्हते मात्र त्याच्या रडण्याचा संताप यायचा इतका तो रडत असे. त्याचा पराभव व्हायचा तेंव्हा वडील त्याला म्हणत की, "तू रागराग केलास तर तुला मी इथेच सोडून जाईन, घरी नेणार नाही. घरी कसं यायचं हे तुझं तुला पाहावे लागेल!"
त्याचे वडील केवळ इतकं बोलून थांबले नाहीत तर त्यांनी असं कित्येकदा केलं, घरी जाताना त्यांनी त्याला सोबत घेतलं नव्हतं! त्याची आई त्याला समजावत असे की अशा वर्तनाने विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंना तू आपसूक जिंकून देण्याचे काम करतोस! कालांतराने त्याला यातले सत्व उमगले.

त्याने कधीही रडीचा डाव खेळला नाही. प्रतिस्पर्ध्याला चुकीचा कॉल दिला असेल, तर तो पॉइंट परत बघायला सांगून त्याला तो मिळवून द्यायचा. त्याने ATP Fan’s Favorite अवॉर्ड सगळं १७ वर्षे जिंकलेलं. यातून त्याच्या समकालीन खेळाडूंमध्येही किती लोकप्रिय आहे याची कल्पना यावी.

रॉजर फेडरर (Roger Federer) अत्यंत कुटुंबवत्सल माणूस. प्रेमळ पती आणि पिता म्हणून त्याची सर्वत्र ओळख. पत्नी मिर्का, दोन जुळ्या मुली आणि दोन जुळे मुलगे यांनाही फेडरर आपल्या खेळाएवढाच वेळ देणारा अनोखा स्टार टेनिसपटू! आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर आक्रमकपणे खेळणारा रॉजर अत्यंत हळव्या मनाचा व्यक्ती होय.

टेनिसमधला हा दादा खेळाडू आपल्या खेळाबरोबर समाजसेवेमध्येही तेवढाच पुढे आहे. खेळातून त्याला प्रचंड संपत्ती मिळाली. पण समाजासाठी काहीतरी करायचं या भावनेने त्याने ‘रॉजर फेडरर फाउंडेशन’ स्थापन केलं. या फाऊंडेशनतर्फे दक्षिण आफ्रिकेतील गरीब मुलांना तो मदत करतो.

काल हा माणूस लहान मुलांसारखा रडत होता तेंव्हा त्याचं अख्खं कुटुंब त्याला सपोर्ट करत होतं पण त्यांना भरून आलं होतं, तिथले प्रेक्षक, त्याचे सहकारी, खेळाडू सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या!
मैदानालाही रडता आलं असतं तर ते ही रडलं असतं. घरातलं तान्हुलं कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या बाबाचे पाय धरून अडवू पाहतं तसं त्या मैदानाने त्याचे पाय धरले असते अन् तेही धाय मोकलून रडलं असतं..

तो रडला तेंव्हा मैदानही रडलं असतं हे खूप अभूतपूर्व नि प्रेमळ होतं जे क्वचित कुणा खेळाडूच्या वाट्यास येतं..

अलविदा किंग फेडरर..

- समीर गायकवाड.1 टिप्पणी: