शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

वो जो हम में तुम में क़रार था .. - मोमीनची भळभळती जखम
अनेकदा असे वाटते की अंतःकरणापासून लिहिलेल्या हरेक कवितेला, गझलेला एक पार्श्वभूमी असावी.
'वो जो हम हम में तुम में करार बाकी था..'या गझलेविषयी असेच काही वाटत आलेय.
ही गझल लिहिलीय मोमीन ख़ान मोमीन यांनी.
 
मोमीन यांचे वडील गुलाम नबी खान हे पेशाने हकीम होते. कोवळ्या वयातच मोमीनला आपल्या कौटुंबिक व्यवसायाचे बाळकडू मिळाले. तारुण्यात पदार्पण करताच त्यांनी आपला पारपांरिक पेशा स्वीकारला. मात्र त्यांचे मन त्यात लागत नव्हते.
तो काळ ग़ालिब आणि ज़ौक़ यांचा होता. युवा मोमीनचे मन त्यांच्या शायरीकडे ओढ घेई. त्याचा ओढा कवितेकडे अधिक होता.
अस्सल प्रेम अनुभवल्याशिवाय वा प्रेमात धोका खाल्ल्याशिवाय शायरीला खऱ्या अर्थाने वजन प्राप्त होत नाही असं आजही मानलं जातं. मोमीनच्या मनातले प्रेमपाखरू भिरभिरण्याआधीच त्यांचा निकाह झाला.
 
एका बलाढ्य जमीनदाराच्या मुलीशी १८२३ मध्ये त्यांचा निकाह झाला. त्या मुलीवर त्यांनी असीम प्रेम केलं, अनपेक्षितपणे ती त्यांच्या आयुष्यात आली आणि त्यांची होऊन गेली. त्यांच्या प्रेमाच्या जाणिवा तिच्या अकस्मात लाभलेल्या सहवासाने अतिव बहरून आल्या.
 
मात्र कुटुंबात अनबन झाल्याने काही वर्षांतच त्यांचा तलाक झाला. ती त्यांच्या आयुष्यातून दूर निघून गेली.
मोमीन एकटे पडले. हा एकांतवास त्यांना खूप काही शिकवून गेला, त्यांच्या जाणिवांना सशक्त करून गेला.
त्यांच्या मातापित्याना त्यांची काळजी लागून राहिली. त्यांनी मोमीनचे दुसरे लग्न करायचे ठरवले. या खेपेस मोठ्या घरची मुलगी त्यांनी सून म्हणून आणली नाही.
 
विख्यात कवी, सुफ़ी संत ख़्वाजा मीर दर्द यांच्या नात्यातील मुलीशी मोमीन यांचा दुसरा निकाह झाला.
दुसऱ्या पत्नीपासून त्यांना संतती झाली, पण त्यांचं मन संसारात रमत नव्हतं. त्यांचा सगळा जीव शायरीत गुंतलेला!

मोमीन यांचं कुटुंब शाही होतं. बादशहा शहा आलम याच्या काळात त्यांचं कुटुंब दिल्लीत स्थिरावलं होतं. त्यांना बादशहाने जहागिरी देऊ केली होती. मात्र नंतरच्या काळात नवाब फ़ैज़ ख़ान याने ती जहागिरी जप्त केली आणि मोमीन यांच्या कुटुंबास प्रतिवर्षी एक हजार रुपयाची पेशगी देऊ केली. मात्र ही रक्कमदेखील पूर्ण मिळत नसे.
तरीही खानदानी आब राखून असलेल्या मोमीन यांचा कल जसा शायरीकडे होता तसाच धार्मिकतेकडेही ओढा होता. मात्र या सर्वांवर मात केली त्यांच्यातल्या प्रेमासक्त मनाने.
 
दिल्लीतील उम्मत-उल-फ़ातिमा या अत्यंत देखण्या तवायफकडे त्यांचं येणं जाणं वाढलं. जे मोमीन इतरांच्या नाडीवरून आजार ओळखत असत त्यांची दुखती नस फ़ातिमाने अलगद पकडली आणि तिथेच मोमीन स्वत्व विसरले. त्यांनी प्रेमाच्या, विरक्तीच्या आणि विरहाच्या ज्या रचना केल्यात त्यात त्यांच्या प्रेमासक्त मनाची तगमग इतक्या तीव्रतेने जाणवते की ऐकणाऱ्याचे काळीज पोळावे!

आपली पहिली पत्नी जिला ते कधीच विसरू शकले नाहीत, फ़ातिमाला कधीच आपलं नाव देऊ शकले नाहीत आणि त्याचवेळी आपल्या पत्नीलाही स्वतःपासून विलग करू शकले नाहीत.
एक अजब कश्मकशमध्ये त्यांचं काळीज गुरफटत गेलं. याच घालमेलीतून वो जो हम हम में तुम में करार बाकी था.. या अजरामर गझलेचा जन्म झाला असावा.
 
मला नेहमीच वाटत आलेय की ही गझल त्यांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या पहिल्या पत्नीला उद्देशून लिहिली असावी, ज्याची अनुभूती त्यांना फ़ातिमाच्या सहवासात अधिक आली असावी. नि आपल्या संसारात आपल्या हातून होत असलेल्या बेवफाईचेही शल्य त्यांना डाचत असावे.

माणूस काही गोष्टींपासून आपला पिच्छा सुटावा म्हणून मनापासून प्रयत्न करतो मात्र नियती त्याला पुन्हा पुन्हा त्याच वळणांवर आणून उभी करते. मोमीन यांनी आपल्या कवितेमधून कुणाच्या स्तुतीसाठी कसिदे लिहिले नाहीत मात्र राहून राहून प्रेमच त्यांच्या लेखणीतून पाझरत गेलं. काही गोष्टी टाळता येत नाहीत आणि काही गोष्टी निवडता येत नाहीत!

तवायफकडे, वेश्येकडे जाणारा हरेक पुरुष कामासक्तच असतो असे काही नाही. आयुष्यातल्या सर्वात खचलेल्या अवस्थेत काहींना इथे येताना पाहिलेय तर काहींना शोध असतो, आसक्ती असते मात्र इथे ती पुरी होईलच याची कसलीच शाश्वती देता येत नाही. कारण रूढार्थाने हा एक बाजार असतो आणि पुरुष इथला ग्राहक! त्यामुळे दोन सच्चे प्रेमी जीव इथे एकजान होणं अत्यंत दुर्मिळ ठरतं. मोमीन देखील याला अपवाद नव्हते. निदान त्या काळी अशा गोष्टींसाठी उच्चपदस्थांना नावे ठेवली जात नसत. नंतर मात्र सगळंच बदनामीचं जग आलं! प्रेमाच्या शोधात फिरलं की वाताहत ठरलेली असते, याला अपवाद असतील मात्र अपवाद म्हणजे सार्वत्रिक सत्य नव्हे!

'रेड लाईट डायरीज'च्या एका प्रकरणात साठीपार झालेल्या गिरिजाबाईच्या जिंदगानीवर काही आर्त लिहिलंय. नव्वदच्या दशकात ती भेटलेली. ब्रिटिशकाळातल्या कामाठीपुऱ्यात बच्चूच्या वाडीत गाणं बजावणं चाले तिथे ती गायची. वृद्धावस्थेत तिच्या आयुष्याची लक्तरे झाली. समाज कोणत्याही काळातला असो त्याने नेहमीच या स्त्रियांकडे येणाऱ्या पुरुषांची आणि त्यांच्या विदीर्ण झालेल्या काळीजकथांची नोंद ठेवलीय मात्र या बायकांचे पुढे काय झाले याची नोंद कोणालाच कशी घ्यावी वाटली नाही याचं विलक्षण दुःख वाटतं!

हा अत्यंत हळवा नि तरल मनाचा कवी वयाच्या पन्नाशीत गच्चीवरुन पडून मरण पावला अशी नोंद आहे. काय झालं असेल त्यांना? निद्रानाश वा झोपेत चालण्याचा आजार तर त्यांना नव्हता, अन्य काही दुखणं असतं तर त्याचाही त्यांनी इलाज केला असता कारण नावाजलेले हकीम होते ते. तोल ढासळून पडणाऱ्यापैकी ते नव्हते. की कुठल्या विचारात गर्क होत झोकून दिले त्यांनी? जगण्यातलं सत्व संपल्यावर जे आयुष्य जारी असतं ते म्हणजे निव्वळ श्वासांची यांत्रिक बेरीज असते!

स्त्रीच्या मनाचा तळ भल्याभल्यांना लागत नाही असं म्हणतात मात्र प्रेमाच्या शोधात फरफटत गेलेल्या पुरुषाच्या मनाचा थांग स्त्रीला लवकर लागत नाही, कारण त्याचे चित्तच थाऱ्यावर नसते. त्याचे शरीर एकीकडे असते आणि आत्मा दुसरीकडे! मोमीन यांच्या गझलांमधून हे टोकदारपणे जाणवते..
मी त्यांच्यावर फ़िदा आहे!

- समीर गायकवाड.

ते आपल्या मेहबूबला जी आर्त विचारणा करतात ती जीवघेणी आहे-
अनुवाद करून यातली जान हरवू इच्छित नाही.

वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो कि न याद हो
वही या'नी वा'दा निबाह का तुम्हें याद हो कि न याद हो

वो जो लुत्फ़ मुझ पे थे बेशतर वो करम कि था मिरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा ज़रा तुम्हें याद हो कि न याद हो

वो नए गिले वो शिकायतें वो मज़े मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो कि न याद हो

कभी बैठे सब में जो रू-ब-रू तो इशारतों ही से गुफ़्तुगू
वो बयान शौक़ का बरमला तुम्हें याद हो कि न याद हो

हुए इत्तिफ़ाक़ से गर बहम तो वफ़ा जताने को दम-ब-दम
गिला-ए-मलामत-ए-अक़रिबा तुम्हें याद हो कि न याद हो

कोई बात ऐसी अगर हुई कि तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयाँ से पहले ही भूलना तुम्हें याद हो कि न याद हो

कभी हम में तुम में भी चाह थी कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना तुम्हें याद हो कि न याद हो

सुनो ज़िक्र है कई साल का कि किया इक आप ने वा'दा था
सो निबाहने का तो ज़िक्र क्या तुम्हें याद हो कि न याद हो

कहा मैं ने बात वो कोठे की मिरे दिल से साफ़ उतर गई
तो कहा कि जाने मिरी बला तुम्हें याद हो कि न याद हो

वो बिगड़ना वस्ल की रात का वो न मानना किसी बात का
वो नहीं नहीं की हर आन अदा तुम्हें याद हो कि न याद हो

जिसे आप गिनते थे आश्ना जिसे आप कहते थे बा-वफ़ा
मैं वही हूँ 'मोमिन'-ए-मुब्तला तुम्हें याद हो कि न याद हो

1 टिप्पणी: