दिलेल्या शब्दांसाठी एके काळी लोक स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेत असत, वाट्टेल ती किंमत मोजून शब्द पूर्ण करीत. कारण दिलेल्या शब्दाला तितकी किंमत असायची. 'चले जाव' हे दोनच शब्द होते पण ब्रिटीश महासत्तेला त्यांनी घाम फोडला होता, 'स्वराज्य' या एका शब्दाने अनेकांच्या हृदयात चैतन्याचे अग्निकुंड प्रदिप्त झाले होते. इतकेच नव्हे तर शब्दांची महती सांगताना तुकोबा म्हणतात "आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे । यत्नें करू ।" शब्द हे जीवनाच्या प्रारंभापासून आपली साथसोबत करतात ते थेट श्वासाची माळ तुटल्यावरच थबकतात. शब्द कधी चांदण्यासारखे शीतल असतात, तर कधी पाण्यासारखे निर्मळ असतात, तर कधी कस्तुरीसारखे गंधित असतात तर पाकळ्यांसारखे नाजूक असतात, निखाऱ्यांसारखे तप्त असतात तर कधी ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखे दग्ध असतात, तर कधी आईच्या मायेसारखे सोज्वळ असतात तर कधी गायीच्या डोळ्यासारखे दयाशील असतात तर कधी देव्हाऱ्यातील निरंजनाच्या ज्योतीसारखे मंगलमय असतात. शब्द आहेत म्हणून जीवन आहे आणि शब्द आहेत म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. ह्या सर्व शब्दकळांचे प्रकटन म्हणजे मानवी जीवनाचा जणू आत्मा बनून गेला असावा इतके महत्व या शब्दांना आहे.
"कळ्यांची फुले व्हावीत तसे शब्द उमलतात
खडकातून झरे फुटावेत तसे भाव झुळझुळतात
हाक यावी अज्ञातातून शब्द साद घालतात मला
माझ्या ओळीओळीतून नाजूक मोगरे फुलतात ...
..शब्द मनाचे आरसे ....शब्द ईश्वराचे दूत
माझ्या कवितांमधून मीच होतो आहे प्रसूत !"
शब्द आणि जीवन व शब्द आणि आत्मा यांचे परस्परसंबंध उधृत करणारी ही कविता आहे कवी दत्ता हलसगीकरांची ! ज्यातल्या शब्दकळां आपल्या मनाला स्पर्शून जातात व त्याचबरोबर कवीच्या काव्यप्रेरणांना उत्तुंग स्वरूप देऊन जातात.