चाफा,मोगरा,जाई-जुई अन सदाफुलीने हातात हात गुंफून एकत्र बाहेर पडावे तशा या माझ्या मायभगिनी सकाळ झाली की घरातलं सगळं आवरून सावरून कामाला बाहेर पडतात. भल्या पहाटे उठून झाडलोट सारवण करून चुलीवर चहाचे आधण चढवीत न्हाणीत हजर होतात. घरातली जाणती माणसे जागी झाली की मग तान्हुले कुणी असतील तर त्यांना जागे केले जाते. काठवटीत पीठ मळून चुलीवर त्याच्या खमंग भाकऱ्या करून एखादे कालवण करून भांडी कुंडी आवरुन ह्या मोतियांच्या माळा घराबाहेर पडतात…
डोक्यावरची चुंबळ अन त्यावर ठेवलेली एखादी पिशवी वा टोपली सांभाळत सांभाळत चालत जाणारया या पाठमोऱ्या स्त्रियांच्या पाऊली येणारी माती स्वतःला धान्य मानते अन यांच्या हातातले विळे कोयते चिरा पडलेल्या हाताचा खरमरीत पण उबदार स्पर्श अनुभवून अगदी सुखावून जातात. या जेंव्हा एकमेकींशी बोलत चालत वाट तुडवत असतात तेंव्हा गवतफुले देखील कान टवकारून बसलेली असतात, झाडांच्या पानापानांनी आपले कान यांच्या बोलण्याकडे लावलेले असतात. याना हसताना बघून माळरानातली फुले देखील पाकळ्यांच्या गाली खुदकन हसतात, यांच्यातले कोणी लाजून ओठाला पदर लावत असेल तर दूर झाडांवरून न्याहाळणारे पक्षी देखील आपल्या चोची वेळावून बसतात ! यांची बातच काही और !!
जनसेवेपायी काया झिजवावी,घाव सोसुनिया मने रिझवावी ह्या उक्तीला त्या जागतात. संसाराचा गाडा हाकून आणि चालून चालून शरीर थकलेले. पण मन टवटवीत. एखादीच्या डोईवर केसांची चांदी झालेली तरी तिने हिम्मत हरलेली नसते. कपाळावर लालबुंद ठसठशीत गोलाकार कुंकू. एखादीचा पती नसेल तरी कपाळ बोडके नाही, तेथे बुक्का असणारच. टिकलीने अजून त्यांना शिवायची हिंमत केलेली नाही. मेणाची डबी आणि कुंकवाचा करंडा हेच काय ते सौंदर्यप्रसाधन. तोंडाला तरुणपणी काही लावलेले नाही आता काय लावले जाणे अशक्य. अंगावरच्या जीर्ण वस्त्रांची तमा नाही की त्याचा मनात कमीपणाही नाही. नवे लुगडे त्यांच्या अंगाला कधी लागले त्यांनाच आठवत नाही. सोन्याचा एखादा दागिना तर फार लांबची गोष्ट ! तरीदेखील एखादी नथ, दोन चार सोनेरी मण्याचे गळ्यातले डोरले अन पायातली कपचे उडालेली पांढुरकी जोडवी इतकी हक्काची 'दौलत' यांच्यापाशी असतेच ! गावात एखाद्या स्त्रीला आहेव मरण आले तर तिच्या दहनानंतर वाटले जाणारे सौभाग्याचे चुडे घेताना यांचे डोळे ओलेते असतात अन हात थरथरत असतात. यांच्या लेखी ह्या सौभाग्यलेण्यांचे फार महत्व, अगदी प्राणाहून प्रिय म्हटले तरी चालेल…
ग्रामीण महाराष्ट्रातील कोणत्याही महिलेची असतील अशीच यांची नावे कृष्णाबाई, सुभद्रा, धुरपा, यशोदा, मालन, कांता, मंडोदरी, सरस्वती, कालिंदी, गोदावरी, बकुळा अन शेवंता ! अशी ही नावे उच्चारली तरी मन प्रसन्न होऊन जाते. मुलींची ही नावे बहुतांशी फुले, नदया, देवता यांच्यापासून घेतलेली असतात. ह्या प्रत्येक नावाला एक वेगळा सुगन्ध असतो एक आगळे पावित्र्य असते. यांच्या नावातला गोडवा यांच्या स्वभावात शिगोशिग उतरलेला असतो. थरथरत्या हातांनी एकमेकीला सावरणारया या एकमेकीच्या सुखदुःखात देखील पूर्ण विरघळून गेलेल्या असतात. माहेरी असताना बालपणापासून शरीराला कामाचे वळण पडलेले असल्यामुळे किशोरवयापासून ते तारुण्यापर्यंत कामाला जुपून घेताना त्या न्हात्याधुत्या कधी झाल्या हे त्यांचे त्यांनाही ठाऊक नसते. घरातील भावंडे त्यांच्यामानाने जरा नशीबवानच म्हणायची कारण त्यांना (मुलांना) तुलनेत लहानपणापासून कामाला जुंपलेले नसते. सासरी आल्यावर तर कामाचा डोंगर आणखी वाढलेला असतो पण माहेरच्या संस्काराची शिदोरी त्यांना इथे पुरते अन त्या कामाला पुरून उरतात.
लहानपण ज्या अंगणात हसून खेळून काढलेले असते ते अंगण सोडून दुसऱ्याच अनोळखी अंगणात संसाराची उन्हे झेलत नव्याने मातीत रुजवून घ्यायचे म्हणजे जगातले सर्वात कठीण काम ! हे महाकठीण काम हळव्या मनाच्या स्त्रियांनादेखील हसत हसत पार पाडावे लागते अन या सारया जणी या अग्निदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. स्वतःच्या देहाचा पारिजातक त्या सासरच्या अंगणात उभा करतात, त्यांच्या फुलांनी सगळे अंगण घर भरून टाकतात, परसातल्या जाई जुईशी संधान बांधतात अन सगळे सासर सुगंधात मरवळतात. अंगणातल्या तुळशीला रोज पाणी घालताना आकाशातला कृष्णमेघ थेट त्यांच्या पुढ्यात येतो आणि त्यांना डोळ्यात साठवून ठेवतो. हे दृश्य या सगळ्यांच्या घरी रोज सकाळी पाहायला मिळते. तो सावळा कृष्ण त्यांच्याकडे पाहत असतो अन या सूर्याकडे बघत हात जोडतात, घरादाराच्या कल्याणासाठी रक्षणासाठी डोळे मिटून मोठ्या विश्वासाने देवापाशी त्या आपलं मागणं मांडतात.
संसारगाड्यात झालेली ससेहोलपट कधी यांच्या तोंडून बाहेर पडणार नाही की कधी माहेरी जाऊन आपल्या सासरचा कमीपणा या सांगणार नाहीत. मुकाट पणे सारं सोसत जातील अन आपल्या कर्माला सारा दोष देऊन मोकळ्या होतील. पोरेबाळे उपाशी राहू देणार नाहीत अन घरातल्या थकल्या झिझल्या हाताला काम पडू देणार नाहीत. सांजेला या काम करून दमून घरी येतील अन त्यांच्या पाठोपाठ कामावरून घरी आलेल्या श्रमलेल्या घरधन्यापुढे नेहमी हसतमुखाने उभ्या राहतील. गायीच्या तोंडी घास ठेवतील अन मग ताटावर बसतील, दारात आलेल्या भिक्षुकाला ताटातला घास वाढतील. सांजेला पुन्हा चूल अन सैपाक मांडतील.
रोज असाच दिवस येत जाईल अन त्या आनंदाने समाधानाने जगत राहतील. उभ्या आयुष्यात त्या कधी नव्या लुगडयासाठी वा दागदागिन्यांसाठी हट्ट धरून बसणार नाहीत. जे मिळेल त्यात सामाधान मानतील, वाटेला आलेल्या कणभर सुखाचा ख़ुशीचा त्या गावभर डांगोरा पिटतील अन मणभर दुःखाचा त्या चकार शब्ददेखील कुठे सांगणार नाहीत. यांची जीवनगाथाच न्यारी अन रसरशीत अशी आहे…
पांडुरंगाने माझ्या या माय भगिनींना बनवताना वेगळ्याच मुशीत बनवले असणार आहे अन त्या मुशीत माती बरोबर स्वतःचे अश्रू कालवले असणार आहेत त्यामुळेच की काय ह्या सगळ्या इतक्या सोशिक झाल्या असतील ! या मातीचे गुण ठाई ठाई भरून आहेत याची प्रचीती यांच्या जगण्यावरून येत राहते...
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा