पुष्प की अभिलाषा... आवर्जुन वाचावे असे.....
चाह नहीं, मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ,
चाह नहीं प्रेमी-माला में बिंध प्यारी को ललचाऊँ,
चाह नहीं सम्राटों के शव पर, हे हरि डाला जाऊँ,
चाह नहीं देवों के सिर पर चढूँ भाग्य पर इठलाऊँ,
मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर देना तुम फेंक!
मातृ-भूमि पर शीश- चढ़ाने, जिस पथ पर जावें वीर अनेक !
हिंदीतील प्रसिद्ध कवी माखनलाल चतुर्वेदी फुलांची मनीषा काय हे सांगताना आपल्याला नकळत विचार करायला भाग पाडते.
सोप्या आणि सुटसुटीत शब्दात अत्यंत प्रभावी विचार हळव्या प्रवाही शैलीत कसे व्यक्त करावेत याचा आदर्श म्हणजे ही कविता आहे...
लहान असताना दूरदर्शनवर दोन रटाळ कार्यक्रमाच्या मध्ये जाहिरातींऐवजी कधी स्लोगन्स वा सरकारी योजना- उपक्रम यांची माहिती सांगणाऱ्या एकदोन मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या जायच्या, त्यात मधूनच सुखद धक्का म्हणून काही हिंदी कवितांवर आधारित व्हिडीओ क्लिप्स यायच्या. त्यात या कवितेचा समावेश होता. त्याकाळी संस्कारक्षम वयात हिंदी कवितेची ओढ लावण्यास 'पुष्प की अभिलाषा'चे योगदान महत्वाचे आहे.
बहारदार बागेतल्या रंगीबेरंगी फुलांनी लगडलेल्या फुलझाडावर वारयाच्या हिंदोळ्यावर नाचणाऱ्या, आपल्याच सुगंधात न्हाऊन निघालेल्या फुलाची अंतिम इच्छा काय असावी अशा अनोख्या आशयाची ही कविता मनाचा ठाव घेते.
नाजूक पाकळ्यांनी डवरलेल्या. लालपिवळ्या - पांढरया हिरव्या नानाविध रंगाचे इंद्रधनुष्य अंगी ल्यालेल्या या फुलांना माहिती आहे की एक तर आपण या झाडावर सुकून जाऊ अन एके दिवशी मातीत गळून पडणार ! आपले कळीचे फुल होताना पासून अन आता फुलल्यावरही आपली काळजी घेणारा एक माणूस या जगात आहे, तो म्हणजे या बागेचा माळी ! त्यामुळे आपली अभिलाषा ज्याच्याजवळ व्यक्त करावी, आपल्या मनातले हितगुज सांगावे असा हा एकच माणूस या फुलांना जवळचा वाटतो.
आपला जन्म किती दिवसाचा असणार आहे, आपले कळी उमलण्यापासून ते जमिनीवर गळून पडण्यापर्यंतचे आयुष्य किती तास वा दिवसांचे आहे हे या फुलांना ठाऊक आहे, एक कळी उमलत असते तेंव्हा आपले क्षणभंगुर आयुष्य पूर्ण झालेले दुसरे फुल कोमेजून जात असते, तर कोणी एक आपला जीवनप्रवास संपवताना मातीच्या कुशीत जाऊन पडते !
मात्र कवितेतील फुलांना असं मातीमोल आयुष्य जगायचं नाही तर त्यांना आपलं जीवन सत्कारणी लावूनच आपला सुखांत पहायचा आहे. आपला शेवट कसा असावा याचं डोळ्यात पाणी आणणारं फुलांचं वर्णन कवी करतात. सामान्य माणसाला आपलं जीवन आपलं आयुष्य पूर्ण काळ, भरपूर कालासाठी जगायाला मिळावं असं वाटत असतं. आपल्या आयुष्याचा आपल्याशी मतलब असणारी अनेक माणसे जगात आपल्याला ठायी ठायी भेटतात मात्र आपले आयुष्य जगाच्या कारणी लागावे असा विचार करणारे लोक फार दुर्मिळ असतात ! ही फुले अशा दुर्मिळ लोकांपैकी आहेत, त्यांना आपले आयुष्य सत्कारणी लावायचे आहे !
कंच हिरव्यागार पानापानांत फुलांचा गुच्छ जन्माला येतो, कळ्यांची फुले होतात अन त्यांचे आयुष्य सरल्यावर हळूहळू कोमेजून जातात अन एका क्षणी गळून पडतात, हा फुलांचा साधा सरळ जीवनक्रम आहे. या पलीकडे जाऊन काही फुले विचार करत असतील तर ते केवळ कवीमनाचा माणूसच शब्दात मांडू शकेल ! इथेही हे प्रकटन त्यामुळेच उत्कट झाले आहे.
ही रंगतदार, सुगंधी, देखणी फुले इच्छा व्यक्त करतात की -
कोण्या सौंदर्यवती गायिकेच्या दागिन्यात मला गुंफले जावे अशी माझी इच्छा नाही. (कारण ते सौंदर्य नश्वर अन तात्कालिक आहे, सौंदर्य नैसर्गिक अन शालीन असेल तर त्याला मुळात दागिन्यांची गरजच पडणार नाही त्यामुळे अशा बेगडी जागी आम्हाला गुंतवू नकोस ),
कोण्या एका प्रेमी जोडप्यातील त्या सखीच्या काळ्याभोर केसांतील गजऱ्यात देखील माळले जावे अशीही फुलांची इच्छा नाही, ( कारण शृंगारापुरतेच या गजऱ्याला महत्व आहे, एकदा का शृंगारभाव ओसरला की हा गजरा फेकून दिला जाणार आहे. केवळ भावना उद्दीप्त होण्यासाठी आमचा वापर होऊ नये ही फुलांची यामागची भावना आहे ! )
पुढे जाऊन ही फुले थेट देवाला साकडे घालतात अन म्हणतात, 'हे हरी, आमची मुळीच इच्छा नाहीये की एखाद्या सम्राटाच्या पार्थिवावर आम्हाला वाहिले जावे ! ( सम्राटाने त्याचे आयुष्य जगताना अनेकांच्या भावनांचे, इच्छांचे दमण केले असणार आहे, कदाचित शोषण देखील केले असेल मग त्याच्या कलेवरावर पुष्प अर्पण करणारया जनतेच्या मनात गौरवाच्या भावना असतील की नाही हे सांगता येत नाही, शिवाय सम्राटाला गर्व अहंकार हा असणार आहे. त्यामुळे अशा सम्राटांच्या शवावर वाहिले जाणे हा अपव्यय आहे)
इतकेच नव्हे तर देवाच्या मस्तकावर चढवल्यानंतर आत्मप्रौढीने आम्ही मिरवावे असेही काही करू नकोस ( कारण देवाच्या मस्तकी काही क्षण राहून लगेच त्याचे निर्माल्यात रुपांतर होणार आहे त्यामुळे तिथेही आमचे जीवन सार्थकी लागणार नाही)
मात्र आमची एकच इच्छा आहे की, 'हे वनमाळी (हे पालनहारी, हे निर्मिका) तू आम्हाला या फांदीवरून तोडून घे आणि त्या मार्गी टाकून दे ज्या मार्गावरून अनेक वीर आपल्या मातृभूमीला नमन करण्यास जाणार आहेत !'
फुलांच्या ह्या मागणीत अप्रत्यक्षरित्या सर्वोच्च त्यागाचा गर्भितार्थ दडला आहे आणि तो जीवनाला नव्या दिशा देणारा, प्रेरणा देणारा आहे.
वरवर साधी वाटणारी ही कविता किती आशयघन आहे हे एकाग्र होऊन वाचल्यावर लगेच लक्षात येते.
"या अनाम वीरांच्यासाठी आपल्या जीवनाचा देखील काही अंशी जरी कामी आला तरी आपणही धन्य होऊन जाऊ.... !! "
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा