गुरुवार, २१ मे, २०१५

मातीचे पाईक - फ.मु.शिंदे



चंद्र थकला होता रात्रभर जागला होता,
रात्रभर एकटाच चंद्र जागला होता

मामा मामा म्हणणारे दिवस नव्हते ;
ढगात तोंड खूपसून चंद्रच रडत होता……

चंद्राचे चिमुकले गेले, मामाचे वाडे गेले,
पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले…

एक काळ देशभरात आढळणारी एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळात मात्र बहुतांश करून ग्रामीण भागातच अस्तित्वात आहे. त्यामानाने शहरात तिचा अस्त झाला आहे. पूर्वी प्रत्येकाला मामा, मावशी, काका, काकी ही नाती विपुल असायची. जोडीला चुलत, मावस भावंडे असायची. या नात्यांचे सुख काही और असायचे. दिवाळीच्या वा उन्हाळी सुट्टीत मुले आवर्जून मामाच्या गावाला जायची वाट बघायची. एक अनामिक प्रेमाची, मायेची ओढ त्यात असायची. नात्यांमधला आस्थेचा संस्कार घट्ट विणेचा असायचा. एखाद्या वर्षी आजोळी जाऊन मामा, मावशीला भेट झाली नाही तर जीवाची उलघाल व्हायची. आता परिस्थिती बदलली आहे. आता चंद्रच एकटा पडला आहे कारण त्याच्याकडे पाहून अंगाईगीत गाणारी आईदेखील लुप्त झाली आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन वा मातेचा अपत्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन यामुळे हा बदल झालेला नसून परिस्थितीने काळवेळ यांच्यावर नियंत्रण मिळवून माणसाला यंत्रवत बनवले आहे. परिणामी कुणाजवळही फुरसत नाही. आईकडे बाळासाठी नाही आणि बाबांकडे तर कुणासाठीच वेळ नाही ! मग निंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला गं बाई ही तर फार लांबची गोष्ट आहे.

हाच विचार घेऊन फमु लिहितात, ‘चंद्र थकला होता, चंद्र भागला होता, रात्रभर एकटाच चंद्र जागला होता... !’ एकेकाळी आई चंद्राकडे बघून अंगाईगीत गायची आता घराच्या बंद खिडकी दरवाजा पलीकडे दुसरे जगच उरले नाही. जरी कुणी दारे खिडक्या उघड्या ठेवल्या तरी आसपासचे सिमेंट काँक्रिटचे जंगल दृष्टीस पडते. साधे आकाश सुद्धा घरातून दिसत नाही अशी नौबत आता आली आहे ! मग चंद्र दिसणे जिथे दुरापास्त झाले असेल तिथे चंद्राकडे बघून अंगाईगीत गाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आताशा ही स्थिती भवतालात सर्वत्र समान असल्याने कवितेतील भाव मनाला भिडतात.

अलीकडील काळात एका कुटुंबात एक किंवा दोनच अपत्ये असण्यावर भर असतो. जिथे एक अपत्य असणार आहे त्या अपत्याच्या मुलाला तर मामा काका मावशी ही नातीच असणार नाहीत. काही ठिकाणी मुले पाळणाघरात आणि आईवडील दोघेही कामानिमित्त घराबाहेर असे चित्र असते. तिथे तर सगळाच आनंदी आनंद असणार ! एकटेपणातून पुढे नैराश्य येऊ शकते, प्रेम आस्था कमी होते. सारे काही औपचारिक होऊन जाते. या दुःखापायीच चंद्र ढगात तोंड खुपसून रडतो कारण त्याच्याकडे बघणारेही कोणी राहिले नाही, त्याच्यावर दोन प्रेमाचे शब्द लिहिणारे आणि त्याच्याकडे बघून गाणारे देखील उरले नाही याचे त्या चंद्राला विलक्षण दुःख वाटते. बालपणाच्या जडण घडणीतला चंद्र आणि तारुण्यातील प्रेमाच्या सहवासातला चंद्र यांची दखल कुणीच घेईनासे झाल्याने चंद्र हा केवळ एक उपग्रह या शास्त्रीय संज्ञेत उल्लेखिला जाईल. याचे क्लेश चंद्राला जाणवतात पण माणसांना जाणवत नाहीत. या वर्मावर बोट ठेवून कवी लिहितात की, ‘मामा मामा म्हणणारे दिवस नव्हते, ढगात तोंड खूपसून चंद्रच रडत होता..”

कवितेच्या अखेरीस फमु खंत व्यक्त करतात की तो काळ आता निघून गेला आहे. ती पिढी आता उरली नाहीने जिने हे नात्यांचे गहिरे अर्थ अनुभवले होते ! आता उरला आहे तो कृत्रिमपणा. कारण मामा, मामी, काका, काकी, मावशी, आत्या ही नाती राहिली नाहीत की त्यांची घरे असण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्यांच्याकडे जाण्याचा वा त्यांची ओढ असण्याचा मुद्दा आपोआप निकाली निघतो. आता असतो केविलवाणा विकेंड ज्यात जो तो आपल्याच विश्वात जगत असतो, एकमेकासाठी कुणीच जगतच नाही. मग अशावेळी चंद्राला आपल्या डोळ्यात साठवत झोपी जाणारे, आईच्या हळुवार कुशीत विसावून बंद मुठीत जग अनुभवणारे, पाळण्यात निजताना आईच्या स्वर्गीय आवाजात दंग होऊन निळ्याकाळ्या आकाशाला आपल्या कवेत घेऊन झोपी जाणारे ते चिमुरडेच आता राहिले नाहीत अशी वेदना समोर येते. मामाचे वाडे गेले आणि पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले या आशयसंपन्न पंक्तीने कवितेची उंची उत्तुंग होते.

एक काळ असा होता की पंतोजी पद्धतीचे शिक्षक शाळेत शिकवायला असायचे. शिकवण्या नसायच्या की कोचिंग क्लासचे पेव फुटलेले नसायचे ! जो तो आपापल्या घरीच काय तो अभ्यास करायचा. या अभ्यासाला देखील एक घोटीव आणि ठराविक स्वरूप असायचे. त्यात सतराशे साठ विषय अन अठराशे वह्या पुस्तके नसत. म्हणून काय त्या शिक्षणात ज्ञान कमी होते असे नव्हे. उलट त्यात एकाग्रता आणि अभ्यासाची गोडी लागत असे, ज्याचा आताच्या संगणकीय शिक्षणात पूर्णतः अभाव आहे. आता ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यात मात्र त्यात ती तादात्म्यता नाहीये, ती गोडी नाहीये अन ती आपुलकी सुद्धा नाहीये. काही ठिकाणी तर संगणकीय वर्ग सुरु झालेत. जिथे गुरुजीच निकालात निघालेत तिथे जुन्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झाले असणार आहे ? म्हणून ‘पाटीवर लिहून काढलेले रात्रीचे पाढे गेले’ या ओळीत एक हताशता दिसून येते जी संवेदनशील माणसाला निश्चित विचार करायला भाग पाडते.

फ.मु.शिंदे हे नानाविध आशयावर, विषयांवर लिहिणारे सिद्धहस्त कवी म्हणून महाराष्ट्रास परिचित आहेत. त्यांच्या कविता साध्या सोप्या शब्दात असतात, अगम्यतेचा लवलेशदेखील त्यांच्या कवितेत नसतो हे त्यांच्या कवितेचे मुख्य वैशिष्ट्य मानावे लागेल. आपल्या कवितांना ते निरूपणाचा वा उपदेशाचा बाज न देता केवळ व्यक्त होत जातात जे वाचकाला आपलेच शब्दांकन आहे असे वाटत जाते. गेयता आणि प्रवाहीपणा यात कविता गुंफताना तिला त्यांनी कोणतीही बंधने लादली नाहीत. ग्रामीण आणि शहरी दोन्ही वाचकाना जवळची व आपलीशी वाटावी अशी त्यांची लेखनशैली आहे. त्यांची कविता पांडित्याचे फाजील आव आणत नाही आणि भाष्यकाराच्या भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवते. कौटुंबिक, भावनिक, सामाजिक, राजकीय या विषयांवर लिहिताना देखील त्यांची कविता सामुहिक प्रकटन कसे सहज करता येईल यावर जास्त केंद्रित असते. फ.मु. शिंद्यांनी लिहिलेली कविता त्यांची न राहता ती आपल्या सर्वांचे विचार मांडणारी प्रातिनिधीक कविता आहे असं वाटत राहणं हे त्यांच्या कवितेचे मोठे यश म्हणावे लागेल.

कधी काय होईल याचा नेम नाही म्हणून आपण वर्तमानात जगायला हवे.दुर्घटना आपल्याला सांगून होणार नाही त्यामुळे आपण सदैव वर्तमानाशी नाळ टिकवून ठेवायला पाहिजे. दुर्घटना कुठेही होऊ शकते आणि आपण सगळेजण जमिनीत गुडुप होऊ शकतो. पापणीला वर्तमानाचे ओझे झाले तर आपल्याला नीट पाहता येणार नाही. आशावाद खोटा आणि निराशावाद खरा आहे. स्वातंत्र्यानंतर तर आपण त्याचाच अनुभव घेत आहोत. त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटणं साहजिक आहे. म्हणूनच ग्रामीण भागातील साहित्यिक अजूनही उपेक्षित आहेत. त्यांची नावेही आजच्या पिढीला माहीत नाहीत आणि ते मराठीची चिंता करू पाहताहेत. ज्यांना मराठी साहित्याचा आवाकाच कळला नाही, त्यांनी ही चिंता तरी कशी करावी ? हे विचार आहेत पुढे नेताना ते भोवताली घडणाऱ्या घटनांचा आधार घेतात. फ.मु.शिंदे सर ज्या परिसरात राहत तिथे म्हणजे किल्लारीला भूकंपाचा प्रत्यय आला. या भूकंपाने केवळ मोठय़ांनाच दुःखाची झळ पोहोचली नाही तर अज्ञान आणि अजान मुलांनाही दुःखाने कवटाळले होते. त्यांचे दुःख त्यांनी `मडके गेले फुटून’ या कविता संग्रहात केले आहे. खालील ओळी त्यातल्याच आहेत.

'मातीचे पाईक ।
मातीखाली गेले असे कसे गेले।
कष्टवंत खेड्याचेच कसे।
भाग्य असे खोटे सूर्यास्त पहाटे।
पाहण्याचे कोणती अशी ही।
धरतीची माया काळीकुट्ट छाया। मरणाची... '

फ.मु.शिंदे दुःखाचा फार विचार करतात. तरीही हे दुःख हलक्याफुलक्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला मोरपिस फार आवडते. आपण ते जपून ठेवतो. मोर जगाला दिसतो पिसाऱ्यापुरता. पण मोर नाचत असताना जेव्हा ते पीस गळते तेव्हा त्याच्या त्वचेवर जे छिद्र उरते त्याचा ते विचार करतात, म्हणून त्यांच्या तोंडी शब्द उमटतात –
'मेघ असो, मेघ नसो ; मोर नाचतोच आहे, पिसाऱ्यातल्या पिसांचा ढिग साचतो आहे' ..... सुखापेक्षा दुःख सदैव आणि सर्वत्र आढळते. दुःखानेच संकटाचे मार्जन होते. अश्रू हीच दुःखाची भाषा आहे आणि त्यानेच मन मोकळे होते व जगण्याला आधार मिळतो हे मोठया खुबीने ते सांगतात - कधी असे घडले नाही जिथे दुःख भेटले नाही स्वप्न असे पडले नाही जिथे दुःख भेटले नाही.......

फ.मु.शिंदे यांची ओळख बनून राहिलेल्या ‘आई’ या कवितेला तर स्पष्टीकरणाची देखील गरज नाही. कविता वाचणाऱ्या कोणत्याही सुहृद माणसाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय राहत नाहीत इतकी ताकद आणि आशयसंपन्नता या कवितेत आहे. मराठी साहित्याच्या शिरपेचात या कवितेने मानाचा तुरा रोवला आहे.
"आई असते जन्माची शिदोरी; सरतही नाही आणि उरतही नाही" असं फ.मु. कवितेत म्हणतात. ‘
आई आणि इतर कविता’ यासंग्रहात एकूण सत्तावीस कविता आहेत.
कवितासंग्रह आजकाल फारसे विकले जात नाहीत असं म्हटलं जातं.
पण हा कवितासंग्रह त्याला अपवाद आहे. आजपर्यंत या कवितासंग्रहाच्या सर्व आवृत्त्याना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक ठिकाणी सभा-समारंभात या पुस्तकाचा संदर्भ दिला जातो. या कवितांचं वाचन अनेक ठिकाणी केलं जातं.

'आई एक नाव असतं...
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही... आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही...
आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान
पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच
तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण
याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी ?
आई खरंच काय असते ?
लेकराची माय असते वासराची गाय असते
दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही उरतही नाही !'

कविवर्य फमु.शिंदे यांची 'आई' ही कविता माहीत नसणारा मराठी वाचक विरळच म्हणावा लागेल. इतकी रसिकमान्यता या कवितेलेला लाभली आहे. वाचणारयाच्या डोळ्याला पाणी आणणारे हे नादबद्ध शब्द मनावर मोहिनी करून जातात. अंतःकरणाला स्पर्श करणारी रचना आणि आईची महती व्यक्त करणारा काव्यार्थ विलक्षण ताकदीची आहे. 

आई या विषयावर ते जितक्या तन्मयतेने लिहितात तितक्याच सहजतेने राजकीय विषयांवर देखील लिहितात. मार्मिकतेने राजकारणातील अपरिहार्यता समोर आणतात –

लोकशाहीनं कायदा आहे
सुव्यवस्था आहे
मायबाप सरकारच्या मनात दरिद्र्याची आस्था आहे
दलितांच्या हत्येचा अहवाल सस्ता आहे
राजकारणाच्या रंगभूमीचा दिल्लीकडे रस्ता आहे..

फ.मु.शिंदे हे नाव आता सर्वमान्य झाले आहे. डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी फमुंवर लिहिलेल्या लेखात त्यांचं वर्णन अत्यंत नेमकं आणि नेटकं केलं आहे. ते लिहितात की, १९६० नंतरच्या काळात जागतिक वाङ्मयाच्या पटावर महाराष्ट्रातून जी साहित्यप्रवृत्ती उदयाला आलेली होती, त्यातील एक मुख्य प्रवृत्ती होती दलित साहित्य. दलित साहित्याच्या निर्मितीच्या या प्रारंभ काळात जे लेखक मूल्यजाणिवा आपल्या लेखनाच्या केंद्रवर्ती ठेवून लेखन करत होते त्यात फ. मुं. शिंद्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. साहित्यामध्ये ‘दलित’ ही संज्ञा जातिवाचक किंवा समूहवाचक नाही, ती प्रवृत्तिवाचक आहे. शोषण संस्थेच्या आणि विषमतेच्या व्यवस्थेविरुद्ध रचनात्मकतेसाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी जे झुंजणारे आहेत, समाजातील सगळ्याच दु:सह्य अशा व्यवस्थेची पुनर्रचना मागणारे आहेत अशा प्रवृत्तीला ‘दलित’ ही संज्ञा दिली गेली. फ. मुं. शिंदे हे काही जन्माने किंवा रूढार्थाने दलित नाहीत. मात्र, त्यांच्या लेखनात ज्या संवेदना प्रकट झालेल्या आहेत, त्या दलितत्वाची साक्ष देणा-या आहेत. 'भूक बदलली की भूमिका बदलते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले होते आणि जो हे दूध प्याला आहे, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, पण अलिकडे दलित नेत्यांचे गुरगुरणे कुठे गेले?'असा प्रश्न त्याना एकदा विचारण्यात आला होता. तेव्हा उत्तर देताना ते म्हणाले होते, "दूध, मग ते वाघिणीचे असावे की घराच्या दारावर येणारया गवळ्याचे असो. त्या दूधात भेसळ झाली की हे असेच होणार. म्हणून मी म्हणतो की चळवळीतून लेखक तयार होत नाही. एकवेळ लेखन होऊ शकेल. पण त्यासाठी आपल्या धारणा स्थीर असल्या पाहिजेत."फ.मु.शिंदे असे स्पष्टोक्ते बाण्याचे आहेत. आजच्या काळात देशात राजकीय आणि सामाजिक अराजकता माजलेली असताना त्यांची राज्य कुणाचे ही वात्रटीकेच्या बाजाची कविता सद्यस्थितीवर तंतोतंत लागू पडते. यातली शब्दांची निवड दाद देण्याजोगी आहे -

'राज्य म्हणे जनतेचे,
जो जो करील त्याचे कधी तरी लोकशाहीचे,
अन्यथा शाही लोकांचे
राज्य आहे उगारलेल्या फोकांचे आणि ठोकून गच्च बसवलेल्या ग्यानबाच्या मेखांचे !
निवडणूक एक चाल असते सत्तेसाठी ढाल असते,
रस्त्यावर फेकलेली केळीची साल असते
राज्य आहे टांगत्या तलवारीचे
आणि आतून बंद खोलीत तरीही मखमली सलवारीचे !
राज्य म्हणजे सत्तेवर निव्वळ बलात्कार आहे
आणि जे जे करतात त्यांचाच सत्कार आहे
राज्य म्हणे जनतेचे, जो जो करील त्याचे !!'

आपण बुद्ध आणि बौद्ध तत्त्वज्ञान हे अपार करुणेचं आणि मानव्याच्या प्रतिष्ठेचे तत्त्वज्ञान म्हणून मानतो. बुद्ध हे शांततेचं प्रतीक म्हणूनही आपण मानतो. बुद्ध हा कवीला भेटतो आणि मराठवाड्याचे हालहवाल विचारतो. कवीच बुद्धाला म्हणतो, ‘तथागत, तुम्हीच मराठवाड्यात फेरफटका मारून या.’ बुद्ध फेरफटका मारून येतो आणि कवीला भेटतो. कवी बुद्धाला प्रतिक्रिया विचारतो. ज्याचं तत्त्वज्ञान शांततेचा संदेश देणारं आहे त्या बुद्धाची प्रतिक्रिया फ. मुं. शिंदे अशी नोंदवतात, आता फुटेल शब्द नसणार शांत बुद्ध म्हणेल थांबलेले पेटवा पुन्हा युद्ध फ. मुं. शिंद्यांनी मूल्यजाणिवांचा शब्द दिला हे त्यांच्या लेखनाचं सामर्थ्य मानलं पाहिजे. दैव आणि जगण्यातली अगतिकता यावर त्यांनी कडेलोट या कवितेतून प्रकाश टाकला आहे. इथे कवींच्या मनातला विद्रोह स्पष्टपणे जाणवतो.

'कडेलोट' -
'दैवाशी चाललेला दगडाचा लढा आहे
देवासही पडलेला दगडातच तडा आहे
येतो जातो सदैव वारीतुन
सालोसाल जाणतो पांडुरंग,
भक्त किती भाबडा आहे
कळत कसे का नसावे
प्राजक्तासही फुललेल्या दुसऱ्याच अंगणात
की पडलेला सडा आहे जगणे अवघड हे भक्तीतलेली, रतीतलेही किल्ल्याकिल्ल्यावर पण कडेलोटाचा कडा आहे,,'

जो स्वतःशी संवाद साधू शकत नाही तो स्वतःला ओळखू शकत नाही आणि जो स्वतःला ओळखू शकत नाही त्याला समाजभान येत नाही या परखड सत्याचे प्रकटन त्यांनी साध्या उपमांमधून ‘संवादाचा सण’ या कवितेत केले आहे. माझ्याच मनातले कळते असे नव्हे तर मुंगीच्या कणातील देखील मी ओळखू शकतो असं मार्मिक विधान ते इथे करतात. हे आयुष्य मोरासारखं मुकं आहे आणि मौनातूनच संवाद घडू शकतो असं ते शेवटी लिहितात.

'संवादाचा सण'-
जिवास माझ्या मनातले कळते थोडे थोडे
मुंगीच्या पण कणातले कळते थोडे थोडे
कासारच मी घराघरात बांगड्या विकणारा
भरलेल्या कांकणातले कळते थोडे थोडे
कळतो तोही जळतो किति नित्य प्राण
निरंतर विरहातल्या विजनातले कळते थोडे थोडे
हे आयुष्य मुके मुके मोरासम
मौनातले संवादाच्या सणातले कळते थोडे थोडे

'मी सामील समूहात'या काव्य संग्रहाचा लोकसत्तामध्ये परिचय करून देताना गौतम यांनी लिहिलंय की या काव्यसंग्रहात समाजाची अगतिक अवस्था प्रकट झाली आहे. या कवितांत शून्यता आणि बेफिकिरी नाही, ही चांगली गोष्ट आहे. फमुंची वाणी रसिकांच्या समुदायाला हसवणारी आहे, तशीच ती सामाजिक कळवळा येणारीही आहे. कवी म्हणून फमुं राजकीय, सामाजिक घटितांवर सरळपणे काव्यविधान करतात. या संग्रहात अनेक दीर्घकविता आहेत. तीच कवीची जमेची बाजू आहे.

सासवड येथे झालेल्या सत्त्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी फ. मुं.शिंदे यांची निवड झाली होती आणि एकतिसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देखील त्यांचीच निवड झालीहोती. माणसाच्या विवेकशीलता आणि पुरोगामित्वाबद्दल ते म्हणतात की, 'माणसाची विवेकशीलता वाढीस लावणं हा पुरोगामी विचाराचा, साहित्याचा आणि पुरोगामी चळवळींचा प्रधान हेतू राहत आलेला आहे. त्या हेतूंचे संस्कार जाणिवेनं करावे लागतात. अंधश्रद्धेचं आक्रमण समूळ परतवणं, नाहीसं करणं सोपं नसतं. त्या गोष्टीचा मनावरचा पगडा आणि दृष्टीवरचा पडदा हटवणं निरंतर जागराचाच विषय असावा लागतो. पुरोगामी ही वठवायची नसून, निभवायची भूमिका असावी लागते, असं घडलं तरच बंद कवाडं काहीशी किलकिली होण्याचा संभव आहे. हे युद्ध म्हणून स्वतःशीही असतं, असं सांगणारा तुकाराम अतुलनीय विवेकशक्तीचा उद्‌गाता ठरतो. "बोले तैसा चाले‘ हे मावळतं की काय अशी आजची सामाजिक शोकांतिका दिसते. नाना असंतुलनाच्या अशा अनंत शोकांतिका पचवून, समाज आहे तसा पुन्हा उभाच आहे. त्याचं कुणालाच काही वाटू नये ही त्याहूनही मोठी शोकांतिका वाटते.'

आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिकाने कसे असावे यावर त्यांनी चांगला टोकदार सल्ला दिला होता. आपले विचार सडेतोडपणे मांडताना त्यांनी ते अमलातदेखील आणले आहेत. विचाराचे, विवेकाचे, वाङ्‌मयाचे उपासक म्हणून ज्यांच्या उंचीनं लोक दिपून जात, तेही आज पायथ्याशी कोसळून, तुडवणाऱ्या, लाथाडणाऱ्या पायाशी लोळण घेत आहेत याला काय म्हणायचं? लोकांचा दैवदुर्विलास की विचारवंताचं विलासाचं वेड ! धडका देण्याचं तत्त्वज्ञान मांडणारे मार्गदर्शक भलतीकडंच मार्गस्थ होऊ लागले तर, माणुसकी मागणारे कुणाच्या तोंडाकडं पाहत तळमळत राहणार ? विद्रोह विक्रीला काढून व्यवस्था कशी बदलणार ? स्वतःपुरता व्यवहार साधून हार पत्करायची हे पतन अनुयायांनी किती काळ पचवत राहायचं ? मेरू सोडून गेरू धरायचा हे नक्की कोणत्या रंगाचं धोरण ? धारणेहून धोरण हितावह वाटू लागलं की वाघनखं कधी पंजात तर कधी मुठीत मिटून जातात.... प्रकाश तिमिरात तल्लीन झाला, की आसवं ढाळणं एवढंच सूर्याचं प्राक्तन उरतं. असं असेल तर अवघड आहे. पुरोगामी साहित्याच्या, चळवळीच्या दृष्टीनं अनेक नवी आव्हानं उभी आहेत. खरं आव्हान आहे आत्मपरीक्षणाचं, तसंच आत्मटीकेचं. खरेपणाची कसोटी तिथं लागणार. सत्यशोधकालाही "पुरोगामी‘ हे विशेषण अगत्याचं, अनिवार्य ठरत असेल, तर "सत्य‘ देखील चिंतित करून सोडणारा शोधविषय मानावा लागेल. पुरोगामी हा पिंडच असावा लागतो. "पुरोगामी‘ ही त्या पिंडाची धार्मिकता असावी लागते. त्या प्रकृतीचं चिंतन हीच पुरोगामी परिवर्तनाची प्रक्रिया असते. ती कशी तोलून धरता येईल याचं निरूपण ही नव्या काळाची गरज आहे.

फ.मुं. शिंदे यांचे पूर्ण नाव फकीरराव मुंजाजी शिंदे असे आहे. महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील 'रुपूर' गावी १९४८ साली शिद्यांचा जन्म झाला. पेशाने ते मराठीचे प्राध्यापक आहेत. अवशेष (१९७९), आई आणि इतर कविता, आदिम (१९७५), आयुष्य वेचताना कबंध, कालमान (काव्यसमीक्षा), गणगौळण, गाथा, गौरवग्रंथ, जुलूस, दिल्ली ते दिल्ली, फकिराचे अभंग, निरंतर, निर्मिकाचं निरूपण, निर्वासित नक्षत्र, पाठभेद, प्रार्थना, फकिराचे अभंग, मिथक, मी सामील समूहात, मेणा, लाकडाची फुले, लोकगाणी, वृंदगान, सार्वमत, सूर्यमुद्रा, स्वान्त (१९७३), क्षेत्र इत्यादी ग्रंथसंपदा हे त्यांचे आजवरचे प्रकाशित साहित्य आहे. त्यांना अनेकविविध राज्य आणि राष्ट्रस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

सामान्य माणसाना समजेल अशा ढंगदार शैलीत कविता लिहिणाऱ्या या सिद्धहस्त कवींकडून आणखी लेखनसेवा व्हावी व त्या योगे आपल्याला अधिक समृद्ध होता यावे ही सर्वांचीच इच्छा असल्यास त्यात नवल ते काय ? 

- समीर गायकवाड

साभार संदर्भ नोंद - 
फमु शिंदे मूल्यजाणिवांचा शब्द देणारा कवी - ले. डॉ. ऋषिकेश कांबळे    

1 टिप्पणी: