माघ वारी झाली की पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो, माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. पीकपाण्यातून हाती काय आले याचा हिशोब हा महीना देऊन जातो. मग हळूहळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात. येणारा दिवस उन्ह वाढवतच राहतो त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुनासवे वसंताचे आगमन होते अन निसर्गाला उधाण येते, पानाफुलातील रंगांची, गंधाची उधळण मन मोहते ! फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हातही बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते, तिच्यातही वसंताचे उधाण दिसते. काहीसे सुसह्य ऊन, झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन होळी ! हल्ली पाण्याची ओढाताण वाढल्यामुळे सर्वत्र लहान मुले वगळता मोठी माणसे अपवादानेच रंगपंचमीचा आनंद लुटतात. होळीनंतर येणारी धुळवड मात्र बेजान गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते ! पीक हाती न आल्याचे दुःख माणसे धुळवडीच्या निमित्ताने विसरतात, विहिरी तळाकडे गाळात रुतत चालल्याचे शल्य बाजूला सारतात, मातीला पडत चाललेल्या भेगा नजरेआड करतात, कणगीतले धान्य खाली चालल्याची व्यथा आपल्या पोटात ठेवून मातीशी एकरूप होतात ! मातीने कितीही छळले, कितीही वेळा दुष्काळ आला तरीही हे भूमीपुत्र धूळवडीला मातीला अंगाखांद्यांवर खेळवून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात. तिच्यात न्हाल्याशिवाय वर्ष संपू शकत नाही अशा भावना धुळवडीतून प्रकटतात !
फाल्गुन संपला की उत्तरायण निम्मे सरते ! राहिलेले उत्तरायण चैत्र, वैशाख, ज्येष्ठाकडे डोळे लावून बसते ; तर वय झालेली, अंथरुणाला खिळून असलेली गावाकडची साधीभोळी माणसे मनातल्या मनात, 'राहिलेल्या उत्तरायणात तरी आपल्याला पांडुरंगाच्या चरणी लीन करावे'म्हणून प्रार्थना करू लागतात. चैत्राची सुरुवात गुढीपाडव्याने होते, पूर्वी या सणांत एक जोश होता तो आता लुप्त झालाय. आता एक परंपरा, रिवाज, औपचारिकता म्हणून हा सण साजरा होतो ! चैत्रात नवी पालवी फुटते, धुमारे फुटतात. नवनिर्मितीचा हा महिना बळीराजाला थोडंसं कोडयातही टाकतो. कारण यात पडणारे ऊन आणि सरत चाललेला पाणीसाठा याचा नेमका अंदाज बांधता येत नाही ! आडाखे बांधून पुढच्या कामांची दिशा ठरवावी लागते. या ठरवलेल्या बेतांवर वळवाचा एखादा पाऊस कधी पाणी फिरवतो तर कधी एखादी गारपीट पाठ सोलून काढते अन त्याचे वळ पोटावर उठतात. चैत्रातला बहर हाच काय तो थोडासा दिलासादायक असतो.
या धकाधकीत चैत्री एकादशी येते. बळीराजा पांडुरंगाला आपली हकीकत ऐकवतो. पंढरीतली गर्दी सरते, दरम्यान गावगाडा चालूच असतो, सृष्टीचक्रही सुरु असते. पुढे उन्ह आणखी वाढत जातात अन झाडांच्या पानोपानी सृष्टी नव्या पालवीचे गीत गाते. मंतरलेल्या चैत्रबनाची उभारी जगणं थोडंफार सुसह्य करते. चैत्र संपतो आणि शेतकरयाची अग्निपरीक्षा घेणारा वैशाख येतो. वैशाखात अंगाची लाहीलाही होत राहते आणि मातीच्याही देहाची होरपळ सुरु होते. जमीनीतले पाणी हळूहळू खोल जाते, डोळ्यातले पाणी मात्र सतत दाटू लागते. भर उन्हाळ्यात जगवलेली पिके कधी आधार देतात तर कधी देशोधडीला लावून जातात, शेतकरी सैरभैर होऊन जातो. कुणाचा उभा ऊस पाण्यावाचून करपून जाऊ लागतो तर कुणाची डाळींबाची बाग तेल्याच्या घशात जाते. पिके जळून जाऊ लागतात. तरीही बळीराजा आशा सोडत नाही, मनातल्या गाभाऱ्यात असणारया पांडुरंगाचा तो धावा सुरुच ठेवतो, विठूराया कधी ऐकतो तर कधी नवा धडा शिकवतो !
अखितीला आंब्याची पूजा होते, आमरसाची ओठावरची चव बळीराजाचे दुःख काही काळासाठी का होईना हलके करून जाते. आतातर पहिल्यासारखी झाडे आंब्यांनी लगडलेली नसतात. आंब्यांला आलेला भरगच्च मोहोर गारपीटीत तर कधी वारयावावधानात झडून जातो. थोडासा मोहोर राहतो तोही नीट अंग धरत नाही. अखिती झाली की वैशाखवणवा कधी संपेल याची सारी सृष्टी वाट बघत असते. जनावरांचा चारा संपू लागतो, घरातले धान्य तळाशी जाते अन मग सुरु होते जीवाची उपासमार ! मग माणसे मिळेल त्या कामावर जातात, पंचक्रोशीत कुठे जनावरांच्या छावण्या सुरु असल्या तर घरटी एखाद दुसरा माणूस त्या मुक्या जीवासंगे छावणीत जाऊन राहू लागतो.
ज्येष्ठ मास येतो अन अधूनमधून शिरवळ यायला सुरु होते. आपल्या शेत शिवारापासून दूर गेलेल्या शेतकऱ्याची पावले पुन्हा एकदा रानाकडे वळू लागतात. आपल्या घरधन्याची कुतरओढ घरातल्या बायका बघत असतात, त्याची आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी चाललेली जगण्याची लढाई बघून त्यांचा जीव हरखून जातो अन वटसावित्रीच्या पुनवेला ह्या भोळ्याभाबडया बायका आपल्याला जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून वडाच्या झाडाला पूजतात. बायका वडापाशी येऊन त्याच्या बुंध्याला धागा बांधताना आपलं हितगुज त्याच्या कानाशी करतात, आपल्या धन्याचे हाल सांगतात. काळजाच्या आतनं आलेल्या ह्या गोष्टी वडाला घायाळ करून जातात, भूमिपुत्राचे हाल वड आधी ढगांच्या कानी घालण्यासाठी आपल्या पानाफांदयातून वरपर्यंत घेऊन जातो, बेपर्वा झालेले ढग त्याला दाद देत नाहीत तेंव्हा वड नाराज होतो अन आपलं गाऱ्हाणं मातीपाशी करायचं ठरवतो. आपल्या पारंब्यातून मातीकडं सांगावा धाडतो. आपल्या भूमीपुत्राचे हाल ऐकून मातीचा जीव कासावीस होऊन जातो. माती तापत जाते, इतकी तापते की तिच्यावर पाय ठेवला तर भाजून निघावे. आपल्या पोराबाळांच्या आबाळीने संपप्त झालेल्या मातीचे हे रूप दुर्गेसारखे असते. सगळ्या आसमंतात असेल नसेल तितके बाष्प गोळा होते अन वळवाचा पाऊस चांगलीच हजेरी लावून जातो. आयाबायांच्या डोळ्यात बऱ्याच दिवसांनी आनंदाश्रू तरळून जातात. मातीला जरा हायसे वाटते. बळीराजालाही बरे वाटते. गावाकडची माणसं मात्र थोडीशी गोंधळूनही जातात. पावसाचा अंदाज बांधण्यास सुरुवात होते अन मनाचा हिय्या करून शेतकरी ज्येष्ठ महिन्याचा पहिला पंधरवडा संपला की काळजावर भला मोठा दगड ठेवून पुन्हा एकदा शेतीचा डाव मांडतो ! त्यासाठी आधी तो विठूरायाला आपलं साकडं घालतो. त्याची वारी चालू ठेवण्याचे अभिवचन देतो, त्याबदल्यात तो काही मागत नाही. मातीची कूस उज्वायसाठी त्याची करुणा भाकतो. पंढरीत विटेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा सारया चराचरात प्रकट होत राहतो. वारकऱ्यांना तो जाणवत राहतो, त्यांना कुठल्या न कुठल्या रुपानं भेटत राहतो. या भेटीचा बळीराजा काय तो अर्थ काढतो अन मातीचं देणं फेडण्यासाठी कामाला लागतो..
गावाकडे आजही 'मृगाची पेरणी...धनधान्य देई...' या परंपरागत समजुतीसोबत 'सत्ताविसातून नऊ वजा केले तर शून्य येते,' असंही म्हटलं जातं. यानुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे कोरडी गेली, तर दुष्काळ पडतो. ही नऊ नक्षत्रे व्यवस्थित बरसली, तर मात्र अन्नधान्याची संपन्नता येते. शेतकऱ्यांचे हे पारंपारिक गणित अगदी अचूक असते. मृगातच जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरण्या होतात. गावाकडे मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या पाहिल्या पंधरवड्यापर्यंत प्रत्येक गावात सुतार शेतीची अवजारे तयार करण्यात मग्न असतो. सुताराच्या दारात तिफण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसते. त्यासाठी लागणारे साहित्य लोहाराकडून आणले जाते. ही सगळी कामे फक्त मृगाच्या आगमनावर अवलंबून असतात. गावगाडा चालतो तो या पावसाच्या जोरावर आणि बळीराजाची धारणा असते की पंढरीचा आपला सावळा देव हे चक्र हाकत असतो. डोळ्यात साठवलेल्या विठूच्या रुपाची आता गावाकडच्या माणसांना ओढ लागून राहते. तो कामे पटापटा उरकू लागतो. बी-बियाणांसाठी खेडोपाडी भरणारे आठवडा बाजार गजबजून जातात. त्यामुळे बलुतेदारांसह, बाजारहाट, अलीकडे औषधांची- खतांची दुकानेही गजबजून जातात. दरम्यान शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळा साजरा करतो. मृगाच्या आगमनापासून ते हस्ताच्या रसरशीत कामगिरीवर पुढच्या वर्षीचे गणित अवलंबून असते ! जरतरचा हा पाठशिवणीचा खेळ बळीराजाची पाठ कधीच सोडत नाही त्यामुळे आपल्या मनातले हे मणामणाचे ओझे शेतकरी साहजिकच विठूच्या चरणी ठेवतात.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ यांच्या रानजाळात बळीराजा पुरता कातावून गेलेला असतो. त्याच्यापुढे सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन जेंव्हा आषाढ येतो, तेंव्हा आषाढाच्या मध्यात येते ती आषाढी वारी ! या वारीनंतरच रोरावणारा पाऊस येतो जो मातीच्या कुशीतल्या बीजांचे अंकुर फुलवून जातो. ऊनपावसाच्या खेळाच्या ऐन मध्यात आषाढी वारी येते अन या काळात घडणाऱ्या निसर्गचक्रावरच बळीराजाचा जीवनगाडा अवलंबून असल्याने या वारीला शेतकरी अनन्यसाधारण महत्व देतो. खरे तर तो चैत्री वारीपासूनच हवालदिल झालेला असतो पण चेहऱ्यावर तसे काही दाखवत नाही. त्यामुळे आषाढीची ओढ सर्वांच्या मनात असते, मशागत केलेलं शेतशिवार टाकून शेतकरी जेंव्हा विठूच्या भेटीस येतो तेंव्हा त्याला विठूच्या तृप्त चेहऱ्यात आपले हिरवेकंच झालेले शेतच दिसते. त्याचा जीव पुरता खुलून जातो अन वारीचे उधाण त्याच्या नसानसांत भिनते ! वारीच्या निमित्ताने आपली दुःखे हलकी करायला आलेल्या वारकऱ्यांचे समाधानाने फुललेले चेहरे पाहून पांडुरंग धन्य होतो, सुखावतो. विठूकडे आलेल्या या लेकरांचे त्याच्याशी असणारे हे नाते भावभक्तीपेक्षाही एक अनोख्या परस्परासक्तीचे असते. मायलेकराचे हे नाते असते म्हणूनच सगळी वारकरी मंडळी विठोबाला माऊली असं संबोधतात !
एकमेकाशी तादात्म्य पावलेलं हे नातं अधिकच घट्ट होत जातं, आषाढीला आलेला वारकरी तृप्त मनाने गावाकडे परतीच्या प्रवासाला निघतो तेंव्हा पंढरीतला विठ्ठल या सर्वांच्या शेतशिवारात नानाविध कामं करत असतो ; तो कधी वरुणराजाला दावणीला जुंपतो, वावटळीला मुठीत कोंडतो, कधी वाफ्यातल्या पाण्यात लोळतो, कधी दंडातल्या पाण्यासोबत वाहतो, विहिरींच्या झरयात झिरपतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात दाटतो तर कधी शेवरीसोबत रानभर फिरतो, उसाच्या फडात हरवतो, भाजीपाल्याच्या पेंडयात गुंतवून घेतो तर कधी नांगराच्या फाळाशी रुतून बसतो तर कधी पाभरीच्या तळातून ओघळत राहतो, बांधावरच्या झाडांच्या सावलीत ताणून देतो तर कारभारणीच्या डोईवरच्या दुरडीत डोकावून बघतो, पानाफुलांच्या आड लपतो, कधी गंमत म्हणून कुसळीच्या रूपाने तळपायात घुसतो ! चंद्रमौळी घराच्या पत्र्यातून ओलेत्या डोळ्याने आपल्या लेकरांचा संसारही न्याहाळतो, गावातल्या देवळात विराजमान असणारया आपल्या मुर्तीरुपास आलिंगनही देतो, तिथल्या शिखराभोवती रुंजी घालतो, गावकुसात वाऱ्याबरोबर सैर करून येतो, चावडीवरच्या सुखदुखाच्या गप्पा ऐकून येतो, पारावरच्या थकलेल्या तळहातांना आपल्या गाली लावून येतो, ऐन्यात न बघता कुंकू लावणाऱ्या सवाष्णीच्या कपाळाचे चुंबन घेऊन येतो, पोराबाळांच्या बरोबर आट्यापाट्या खेळतो, तो अंगात उधाण आल्यागत दिवसभर सर्वत्र घुमत राहतो, सांज होताच निळाईच्या पायथ्याशी बाजेवर पडून रुखमाईला सांगतो की, "मी इथे इतका खुश आहे की माझ्यासाठी हेच कैलास आहे, हेच वैकुंठ आहे, हाच स्वर्ग आहे, हेच तिन्ही लोक आहेत, इथली सारी लेकरं हीच आपली जन्मजन्माची आप्तं आहेत !" आषाढीची ओढ भाविकाच्याच नव्हे तर विठूच्या हृदयीसुद्धा गारुड करून गेलेली असते...
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा