गुरुवार, ४ जून, २०१५

बगळ्यांची माळ फुले - वा. रा. कांत

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर पाच दशके इतक्या विस्तृत काळात अत्यंत देखणी, आशयसंपन्न अशी कविता ज्यांनी काव्यशारदेच्या चरणी अर्पित केली अशा कवींमध्ये कवी वा. रा. कांत यांचे नाव घेतले जाते. वा.रा. कांत एक विलक्षण प्रतिभाशाली कवी होते याचा प्रत्यय त्यांच्या काव्यात सातत्याने जाणवत राहतो. स्वतःचा मृत्यू आणि मृत्युपत्र हा कवितेचा विषय असू शकतो हे त्यांनी अत्यंत टोकदार संवेदनशील रीतीने प्रसूत केलं. एक वेगळाच विस्मयकारक अनुभव त्यांच्या  'मृत्युपत्र' कवितेत येतो.

या रचनेद्वारे आत्मसंवादी कविता लिहीत असताना कांत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या कवितेतही एक हृदयस्पर्शी व्यक्तता साधतात. इस्पितळात रुग्णशय्येवर असताना कांतांनी आपल्या मुलाला ही कविता लिहायला लावली होती. ही त्यांची अखेरची कविता ठरली. मालाड येथील एव्हरशाइन नर्सिग होममध्ये रुग्णशय्येवर असताना कांतांनी त्यांच्या मुलाकडून लिहून घेतलेली ही अखेरची कविता ! या कवितेवर काही संस्कार करायचे त्यांच्याकडून राहून गेले असण्याची शक्यता आहे. परंतु अर्धागवायूच्या आजारामुळे पुढे या कवितेसंबंधी ते कोणाशीही काही बोलले नाहीत.

मृत्युपत्र -
अंतकाळी मजजवळ नसावी आप्तजनांची छाया
नकोत कोणी मित्र-सखेही शोकाश्रू ढाळाया
फुले साजिरी समोर असू द्या खिडकीमधि हसणारी
उन्हे येऊ द्या सदने, वदने, गगने उजळविणारी
किरणांच्या पालखीत बसूनी दिगंतात जाइन

सूर्यासनिच्या महातेजास छायेपरी वंदीन
पवनभोवरे वाहटूळीचे उंच नभी उठतील
तनकाडय़ा मनमाडय़ा त्यातून सनकाडय़ा उडतील
अरुणतरुणसे कोंभ नवे मग फुटतील श्वासोच्छवासी
विश्वसतील अन् कविता त्यातून शब्द जसे आकाशी
चैतन्याची, आनंदाची इतुकी पुरे मिरास
पैल पृथ्वीच्या जाता-जाता अर्पिन मी तुम्हास
शब्द-सूर ओलांडूनी
स्वरगंगा तीराहुनी 
मी करीन तुम्हा विनवणी
कुठेही गेलो नक्षत्रांच्या जरी दूर देशात
तरुवेलीपरी जपेन आंतरी बहर शुष्क शाखांत
फुलेल कधितरी कविता फिरूनी तप्त दग्ध हृदयात
आत्म्याचा कधि वसंत येता फुलावया गाण्यात..

२६ एप्रिल १९८८ रोजी ही कविता त्यांनी लिहिली आहे. मृत्युपत्र म्हणजे भौतिक सुखसाधने, स्थावर मालमत्ता वा संपत्तीचे, चीजवस्तूंचे आपल्या नातेवाईकांमध्ये रीतसर एकट्याने वा सर्वांच्या साक्षीने स्वेच्छेने केलेली वाटणी. प्रत्येकाला दिलेल्या वाट्याची तपशीलवार नोंद म्हणजे मृत्युपत्र ! व्यक्तीच्या जीवनात त्याने कमावलेले वा वडिलोपार्जित मिळालेले सर्व काही आप्तेष्टांच्या हवाली लिखित करणे म्हणजे मृत्यूपत्र होय. पण कांतांच्या या कवितेतील आशयभाव आणि सामान्य जनांच्या मृत्युपत्रातला आशयभाव यात प्रचंड तफावत आहे. एका काव्यान्वयी शब्दवेड्या कवीच्या मनातले कल्लोळ त्यांनी अगदी सहजतेने व्यक्त केले आहेत. वरवर पाहता या कवितेत कांतांनी कुठली अखेरची इच्छा प्रकट केली आहे याचा ठाव लागला की त्यांच्यातल्या संवेदनशील मनाचा प्रत्यय येतो. त्यांनी स्वतःकडे देवत्व न घेता स्वतःला सामान्य लेखत विश्वकल्याणाची कोणतेही अवडंबर मांडलेले नाही, कल्याणकारी निरुपणकाराचे कोणतेही भाव ओढून ताणून आणत नाहीत. त्यांनी कवी आणि त्याचे आशयघन शब्दप्रेम यावरच भाष्य केले आहे, हे करतानाचा त्यांचा बाज प्रेषिताचा नसून एका हळव्या कवीचा आहे. एखाद्या राजकीय नेत्यागत त्यांनी वंचितांचे दुःख हलके करण्याची कोणतीही भूमिका यात मांडलेली नाही.

कवी लिहितात माझ्या मृत्युसमयी बेगडी दु:खाचे प्रदर्शन करून खोटे अश्रू ढाळणारे मित्रच काय; पण नक्राश्रू ढाळणारे आप्तेष्ठसुद्धा जवळ नसावेत. ते केवळ जवळ नसावेत असे नसून त्यांची ती वरकरणी प्रेमाची वाटणारी कृत्रिमतेची सावली देखील माझ्यावर पडू देऊ नका. त्या ऐवजी माझा अचल देह जिथे ठेवला जाईल तिथे समोरच्या खिडकीत प्रसन्नतेची अन नैसर्गिक प्रेमाची प्रतीके असणारी फुले मात्र समोर असू द्यावीत. त्या खिडकीतून येणाऱ्या सर्वप्रकाशी विश्वव्यापी अशा सूर्याच्या किरणांनी घरात प्रवेश केल्यावर त्या किरणांसवे माझा आत्मा हवेच्या अणूरेणूतून पंचमहाभूतात विलीन होईल. यामुळे अरुणतरुण असे भासणारे प्रतिभेचे नवे अंकुर फुलतील, नव्या उन्मेषाचा जन्म होईल ! माझ्यासाठी चैतन्याची आनंदाची इतकी मिरास पुरेशी आहे. दिगंताच्या पार गेल्या वरही मी मनामनामध्ये कवितेच्या समृद्धीचे ध्येय उरी बाळगेन. इतकेच नव्हे तर दूर नक्षत्रांच्या देशी मी कुठेही गेलो तरी फुलांच्या वेलीसमान मी माझ्या अंतरात्म्याचे चैतन्य काव्याच्या पाना फुलांमध्ये तेवते ठेवीन, त्यात शुष्कता येऊ देणार नाही. शोकमग्न न राहता सद्गदित झालेल्या या हृदयीचे भाव त्या ह्रदयी होतील असे माझ्या प्रतिभेचे बहर गीतांमधून प्रसवत राहतील. अत्यंत अलौकिक असं त्यांचं हे मागणं आहे, जे त्यांनी देखण्या प्रवाही शब्दातून मांडले आहे.

६ ऑक्टोबर १९१३ रोजी वा. रा. कांत यांचा जन्म मराठवाडय़ातील नांदेड मुक्कामी झाला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. वा. रा. कांतांचे वडील रामराव कांत हे निजाम दरबारी पोलीस अंमलदार होते. घरामध्ये कर्मठ शिस्त. कवी कांतांच्या मातोश्री जानकीबाई या हरिपाठ, पूजाअर्चा, भजन-कीर्तन इत्यादीत रममाण असायच्या. आईच्या या संस्कारांमुळेच कांतांमध्ये कवितालेखनाचे बीज आले असावे. पण वडिलांच्या शिस्तप्रिय, कडक स्वभावामुळे आणि त्याकाळी भोगलेल्या निजामाच्या अन् इंग्रजांच्या पारतंत्र्यामुळे कांतांच्या स्वातंत्र्यपूर्व काव्यप्रतिभेत बंडखोरीचे स्थिर प्रकटीककरणाचे भाव आढळतात.

कांतांच्या अनेक रचना लोकप्रिय झाल्या पण ते मराठी काव्यात अजरामर झाले ते त्यांच्या 'बगळ्यांची माळ फुले…. ' या कवितेने. ही म्हटले तर एक विराणी आहे नाही तर विरहाची एक कैफियत आहे. प्रेमी युगुलाचे हे अक्षय प्रेमगीत आहे.

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ?

छेडिति पानात बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली !
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात ?

हातांसह सोन्याची सांज गुंफताना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनि मोजताना,
कमलापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यात.

तू गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?

ही कविता एका युगुलाच्या विरहाची कैफियत आहे, यात एक सलणारा प्रश्न आहे. कवितेच्या सुरुवातीला ‘तो’ ‘तिला’ प्रश्न करतो - आपण दोघे जेंव्हा फिरायला - भटकन्ती करायला बाहेर पडत असू तेंव्हा त्या रम्य संध्याकाळी बगळ्यांचे जे थवे एखाद्या माळेसारखे दिसताहेत ते मला अजून आठवतात. ती आपली अधीर भेट ज्याचे साक्षीदार बगळ्यांची ही फुलणारी माळ होती, ती जीवाला ओढ लावणारी भेट तुला स्मरते का ? का तु सगळं विसरून गेलीस ?

पुढे तो सांगतो की आपण जेंव्हा धुंद मोहरल्या आकाशात बाहेर पडत असू, मस्त शाममेघ दाटून यायचे, पाऊस यायचा. पाऊसही रसिकच ! त्याचे धुंद थेंब झाडांच्या पानात बीन वाजवायचे आणि ती पाने त्या तालावर डुलायची !! पाऊस पडत असतानाचे ऊनसुद्धा कसे तांबूसवाणे असायचे जणू ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे. कधीकधी तू जवळ नसलीस तर हा पाऊस इथे कोसळत असला तरी मनकवडा ढग माझ्या मनीचे भाव ओळखून दूर डोंगरात तुझ्या शोधात फिरत रहायचा अन मी इथे भिजत त्याची आठवणीत रमायचो. डोंगराच्या कड्या कपारात घुमणारे ते घन म्हणजे उदास पारवेच जणू ! ते मनकवडे ढग अजूनही शोधत शोधत तुझ्याकडे येतात पण ते तुला दिसतात का ?

आपल्या दोघांच्या त्या विशुद्ध प्रेमाच्या गाठीभेटी, भेटीत झालेल्या गुजगोष्टी. आकंठ प्रेमात बुडालेल्या नारळीच्या झाडांखालच्या आपण एकेमकाला बिलगून केलेल्या कानगोष्टी अशा काही धुंद होत्या की, जणू पौर्णिमेचे चांदणेच लखलखावे इतके तेज तुझ्या डोळ्यात यायचे अन अर्थातच लाल गाल लाजून चूर व्हायचे. ते प्रेमाच्या दिगंत भेटीचे रसाळ अमृत तुझ्या अंतरंगात अजुनही रिमझिम झिरपते का नाही ? मी त्या अमृतावरच जगतो आहे असे तर सुचवायचे नसेल ना !

आपल्या भेटींची ती सांजवेळ अशी काही मोहक असायची की नदीच्या शांत प्रवाहात आपल्या प्रेमावर आसक्त झालेला सूर्य लाजून लाल होऊन क्षिताजासमीप यायचा आणि लालिमा त्या पश्चिमेला चढायचा. आपले हात उभयतांच्या हातात गुंफलेले नसत तर सोनेरी सांज देखील आपुल्याच दोहाती स्वतःला गुंफून घेत असावी, इतकी ती सायंकाळ धुंद असे. ते दिवस असे निघून गेले, जणू हातातला पारा सरकला. सांज झाली तरी आपल्याप्रमाणेच मागे रेंगाळणाऱ्या त्या बगळ्यांच्या माळफुलांची मोजदाद करत करत त्या अनेक सांजवेळा जीवाला वेड लावून कधी निघून गेल्या काही कळलेच नाही, जणू कमळाच्या पाकळ्यांची उघडझाप व्हावी इतक्या कोमलतेने ते दिवस सरून गेले. ते दिवस तुला आठवतात का ?

कवितेतले शेवटच्या कडव्यात ते अगदी अंतकरणापासून तळमळून व्यक्त होताना दिसतात. जीवाची तगमग, वेदनांचा सल आणि आर्त विरहभाव अगदी ताकदीने जिवंत झाले आहेत. उत्कट प्रेमाचे इतके गहिरे रंग विरहाचे खोल सल देऊन जातो त्याचे वर्णन शेवटच्या कडव्यात अगदी अप्रतिम अशा शब्दात कवीने केले आहे. प्रेमाचे ते अल्वार रेशीमबंध, दिल्या घेतल्या शब्दाच्या त्या आणाभाका तु तशाच टाकून गेलीस. जाताना त्या बगळ्यांची माळसुद्धा तू घेऊन गेलीस कारण तू गेल्यानंतर तिथे आता बगळ्यांची ती माळ फुलत नाही. सर्वच गोष्टी बदलून गेल्यात. आता फक्त आठवणीतल्या माझ्या प्रेमाचे धडधडणे माझ्या मनात उरले आहे. त्या धुंद साजवेळेच्या साक्षीदार असणाऱ्या बगळ्याच्या शुभ्र पंखासारखा सतत फडफडत असणारा हा माझा सल अजूनही बाकी आहे, आता तू एव्हढे तरी सांग की ती फडफड तुझ्याही उरात कधी सलते का गं ?

शब्दबंबाळ न होता हळुवारपणे आधी प्रेमातल्या नवखेपणाचे, नंतर अधूऱ्या मिलनाचे आणि अखेरीस  टोकदार प्रतारणेच्या विरहाचे अत्यंत अप्रतिम असे वर्णन या कवितेत आहे. कविवर्य वा. रा. कांत यांच्या या नितांतसुंदर कवितेला श्रीनिवास खळेनी संगीतबद्ध केले आणि एक अजरामर भावगीत जन्मास आले. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अमृतानुभवी आवाजातले हे गाणे आजही श्रवणीय आहे. ही कविता प्रेमाच्या मृगजळातील मनाच्या समाधीचे दार्शनिक आहे. जोवर प्रेम आणि विरह या भावना आहेत तोवर कवितेतले भाव अजरामर आहेत...

कांतांचं स्वत:च्याच कवितेशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं. कांतांनी विपुल कवितालेखन केले. स्वत:च्याच कवितेवर प्रयोग करीत असताना आपल्या सहा दशकांच्या साहित्यसेवेत कांतांनी नाटय़काव्य- द्विदलार्थी कविता दोनूलीहा नवा काव्यप्रकार मराठी साहित्यात आणला. या सहा दशकांच्या काव्यप्रवासात कांतांच्या कवितेनं आपली अनेक रूपं मराठी रसिकांसमोर सादर केली.

आपल्या कवितेवर प्रेम असलं की कवी तिच्याशीच संवाद करू लागतो, अन तिच्यापाशी मनातले भाव व्यक्त करतो. कांतांचं आपल्या कवितेवर प्रेम असल्याने ते देखील आपल्या कवितेशी संवाद साधताना ते लिहितात,
'पन्नास वर्षांची आपुली सोबत
चाललो ही वाट तेढीमेढी
एकांती गर्दीत, फुलांत, काटय़ांत
तुझी माझी साथ सदोदित
गोळा झाली नाती सर्व तुझ्या ठायी
कांता कन्यकाही मला तूच
सहचारिणी तू, अनुरागिणी तू
कादंबिनी तू तप्त जीवा
अमृतवर्षी तू कुंडलिनी जागी
असा भोगी-योगी तुजमुळे..'

'दोनुली',’पहाटतारा’,’बगळ्यांची माळ','मरणगंध' (नाट्यकाव्य),'मावळतेशब्द','रुद्रवीणा', 'वाजली विजेची टाळी', 'वेलांटी', ’शततारका’, ’सहज लिहिता लिहिताहे त्यांचे काव्यसंग्रह होत. कृ.मु. उजळंबकर यांनी त्यांचे कविवर्य वा.रा.कांतहे चरित्र लिहिले आहे. कांतांना महाराष्ट्र शासनाचे विशेष पुरस्कार आणि कवी 'केशवसुत ' पुरस्कार मिळाले होते. मसापच्या पुणे आणि हैदराबाद शाखांकडून त्यांना उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान देऊन गौरवण्यात आले होते. १९८९ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कविता हे सर्वस्व मानून जगणारे कांत आपल्या आत्म्याचा बहर दिगंतापलीकडे फुलविण्यासाठी किरणांच्या पालखीत बसून गेले खरे पण त्यांचे काव्य आजही रसिकांच्या मनामनात रुंजी घालते आहे. ते जाताना नव निर्मितीचे शब्द देऊन अनंताकडे जाईपर्यंत केवळ कवितेच्या साचेबद्ध प्रकाराविषयी आसक्त न राहता साहित्याच्या इतरही प्रकारांच्या सृजनवेळांमध्ये लीन असायचे त्यातून निर्माण होणारी रचना मनाजोगती होईतोपावे ते अस्वस्थ राहायचे. ही आसक्ती अन शब्दतल्लीनता त्यांच्या सर्वंकष साहित्यनिर्मितीचा व प्रतिभेचा आत्मा होता. कांतांच्या टेबलावर एक फ्रेम सदोदित ठेवलेली असायची. तीत त्यांनी लिहिलं होतं-
'शब्द माझा धर्म
शब्द माझे कर्म
शब्द हेच वर्म
ईश्वराचे.'

या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवीची जन्मशताब्दी दोन वर्षापूर्वी २०१३ मध्ये साजरी झाली काही अपवाद वगळता ज्या स्तरावर अन मोठ्या जोमाने ती साजरी करायला पाहिजे होती तितके भव्य स्वरूप या सोहळ्याला येऊ शकले नाही. पण कांतांवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी मात्र भरभरून कार्यक्रम केले अन त्यांच्या स्मृती जागविण्याचे नानाविध प्रण केले. आज कांत आपल्यात नसले तरी त्यांनी जे मनामनामध्ये प्रतिभेचे वसंत फुलविण्याची ध्येयासक्ती व्यक्त केली होती ती मात्र आकारास येताना दिसते आहे.म्हणून त्यांना 'मराठी काव्यप्रतिभेचे कांत' म्हणणे उचित ठरते.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा