मंगळवार, १६ जून, २०१५

विस्कटलेली दुपार आणि आठवणींची साठवण ..


हातून निसटलेला पारा अस्ताव्यस्त कणा कणांत ओशाळलेल्या मुद्रेने भूमीवर निपचित पडून असतो आपण जसाच्या तसा पुन्हा त्याला गोळा करू शकत नाही...मात्र त्याच्याकडे पाहून त्याचे गतरूप आठवत राहतो...
आठवणींचा पाराही असाच असतो, मनाच्या गाभारयातल्या प्रत्येक अणुरेणूत सैरभैर मुद्रेने तो चिणलेला असतो...कधी तो अश्रूतून पाझरतो तर कधी एकट्याने बसून असताना ओठांची स्मितरेषा आखून जातो !
काही चित्रे काही प्रसंग काही माणसे या आठवणीच्या पारयात सदैव आपले प्रतिबिंब न्याहळत असतात अन स्मृतींच्या चैत्रबनात परत परत हरखून जाण्याचे अलौकिक सुख मिळवतात…

लोक मला म्हणतात की भूतकाळाकडे बघून वर्तमान जगण्यात काय हशील आहे ? भविष्याचा वेध घ्या अन वर्तमानाची दिशा ठरवा ! …. मान्य आहे पण येणाऱ्या काळाच्या हाताला धरून चालत असताना भूतकाळाच्या पाऊलखुणा निश्चितच पथदर्शी ठरतात हेही तितकेच खरे !
आठवणी आहेत म्हणून जगणे सुखद आहे ; आशेवर जग टिकून आहे हे जसं इच्छा अपेक्षांच्या ईप्सिताचे मानस व्यक्त करणारे विधान आहे तसंच सुखदुःखाच्या आठवणी ही आयुष्याची अशी चिरंतन शिदोरी आहे की आपण इतरांसोबत ही शिदोरी वाटू शकतो.
आपला इथला प्रवास संपला की आपल्या आशा अपेक्षा आपल्यासोबतच पंचत्वात विलीन होतात मात्र आपल्या आठवणी आपल्या पाठीमागेही अस्तित्व टिकवून असतात ! आठवणीत रमून जीवन जगणे हा शहाणपणा खचितच नाही मात्र आठवणींविनाचे जीवन अचेतन अन अपूर्ण होऊन जाते…
आपल्यापाठीमागे आपल्या आठवणी या इतरांच्या आठवणी होऊन जातात अन त्यातून आपण पुन्हा पुन्हा कीर्तीरूपाने जगत राहतो हे काय कमी आहे का ?

गतकाळाच्या आठवणी व्यक्तीसापेक्ष अनेक पदरांच्या असतात, सुखदुःखाची गाठोडी त्यात बांधून ठेवलेली असतात मात्र त्याचे ओझे वाटत नसते. आपण ठेवलेल्या आशा अपेक्षा याचे मात्र आपल्यावरच नव्हे तर इतरांवरही त्याचे ओझे निर्माण होत जाते. आशा अपेक्षा फलद्रूप झाल्या नाहीत तर मन शोकविव्हळ होऊन जाते, आठवणींचे तसे नसते ! आपण आठवू त्या आठवणी आपल्यासमोर येऊन उभ्या ठाकतात. आपण संकटात असू अन एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीची वा स्फूर्तीदायक घटनेची आठवण आपण केली तर आपण त्यातून निभावू शकतो. आपण सुखात असतानासुद्धा आपल्यापासून दूर गेलेल्या आपल्या आप्तेष्टांची आठवण काढली तरी डोळ्यात आनंदाश्रू येतात.

आठवणींचा सारीपाट फार मोठा आहे अन आपण हलवू त्याच सोंगट्या इथे जिंकतात कारण आपल्याविरुद्ध खेळणारा इथे कोणीच नसतो अगदी नियतीच काय ते आपल्या आठवणी हिरावून घेऊ शकते ! एखाद्या व्यक्तीचा अपघात होतो, मेंदूला मार लागतो, स्मृतींवर परिणाम होऊ शकतो असे डॉक्टर सांगतात अन ती व्यक्ती भलत्याच गोष्टी बरळू लागते. कधीकधी स्मृतिभ्रंश झालेला असतो, स्मृतींचा नाश झालेला असतो तर कधी मानसिक संतुलन बिघडलेले असते. वैद्यकीय परिभाषेत याच्या संज्ञा असतील मात्र ती व्यक्ती आठवणींच्या शृंखलेत बद्ध आहे की आठवणीत रममाण आहे हे ठोसपणे सांगता येत नाही.

आठवणी पुरत्या पुसल्या गेलेल्या आहेत की नाहीत हेही अचूक सांगणे अजूनही कठीणच आहे मात्र त्या व्यक्तीच्या आठवणी इतरांच्या मनात तशाच राहतात त्याचे काय करता येऊ शकते याचे शास्त्राकडेही उत्तर नाही. म्हणून आठवणी ह्या चिरंतन आहेत. मात्र त्या प्रेरणादायी असाव्यात की नैराश्याच्या गर्तेत घेऊन जाणाऱ्या असाव्यात याचे निर्धारण जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे हे मात्र नक्की. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगणारा व्यक्ती इहलोकातून केंव्हाही गेला तरी त्याच्या आठवणीही सकारात्मक उर्जेच्या रुपात इतरांच्या ठायी वास करतात.

आपल्याला येणाऱ्या आठवणी आणि इतरांच्या मनातील आपल्याबद्दलच्या आठवणी आपल्या विचारधारेशी नाळ जोडून राहतात हे इथे स्पष्ट होते. कधी कधी आपल्याला वाटते की जो माणूस भेटू नये असं वाटते तो आपल्यासमोर विनाकारण येत राहतो अन ज्याची भेट व्हावी असे प्रकर्षाने वाटत राहते ती व्यक्ती आपल्यानजरेस पडत नाही. आठवणींचे तसे नसते, आपण आठवणींपासून दूर जाऊ शकत नाही मात्र त्यांचे रिइंडेक्सिंग आपल्याला पाहिजे तसे आणि पाहिजे तेंव्हा करू शकतो. आपले अपयशाच्या खाणाखुणा पुसून आपण यशाच्या आठवणींचे रकाने भरगच्च ठेवू शकतो मात्र या सर्वासाठी आपल्याकडे हवी सजग,सृजन जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. ती बाजारात विकत मिळत नाही, जिद्द असली की इच्छाशक्ती असतेच. जिद्द ही संघर्षातून प्राप्त होत राहते, अन संघर्ष हा मानवी जीवनाचा मुलभूत पाया आहे.

म्हणून जो संघर्षापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल त्याचे जीवन सफल, संपूर्णही होणार नाही अन सत्कारणीही लागणार नाही. आजचा आपला संघर्ष उदयाच्या आठवणी असणार आहेत, तेंव्हा आपल्या आठवणी जेत्याच्या असाव्यात की पळपुट्याच्या असाव्यात हे आपणच ठरवू शकतो. ज्यातून आपले अन इतरांचे जगणे सुकर होऊ शकते.  अशाच एका हळव्या आठवणीचा हा लेख.  ही आठवण एका गाण्याशी आणि हे गाणं भूतकाळाशी निगडीत असल्याने त्यांची आपसूक सांगड घातली गेलीय.

दुपारच्या वेळी रेडीओ सिलोनवर ऐकलेलं ते गाणं होतं - 'ये दिल और उनकी, निगाहों के साये । मुझे घेर लेते, हैं बाहों के साये…' समोरील प्लास्टिकची पट्टी धुरकट झालेला, सुरकुत्या पडलेलं कापडी कव्हर घातलेला आणि कडेची, वरची गोलाकार बटणे ढिली झालेला तो रेडीओ कधीही विस्मरणात जाऊ शकत नाही. ती दुपारची निवांत वेळही तशीच होती, मेंदूचा यंत्रवत ताबा घेणारी तरीही मंत्रमुग्ध करणारी. तेंव्हा चिमण्यादेखील चिवचिव करून थकलेल्या असत, परसदारात आई डोईवर पदर घेऊन काही तरी काम करत असायची. झाडांच्या फांद्या एकमेकींच्या गळ्यात हात घालून सुस्त होऊन गेलेल्या असत. पानगळ सुद्धा दुपारी होत नसे. पाने फुले सगळी कशी आरामात मान वेळावून बसत ! झाडावरल्या घरट्यात देखील सामसूम असे, पाखरांना खाऊ आणायला गेलेले पक्षी अजून घरट्यात परतलेले नसत त्यांची वाट बघत ती इवलीशी पाखरे आपली चोच उघडी टाकून तशीच पेंगुळलेली असत !

जेवणे आटोपून आपल्या तान्हुल्याबरोबर खेळणाऱ्या आईचा काय तो नाजूक आवाज संगतीला असे, गल्लीच्या एखाद्या कोपरयात सकाळच्या शाळेतून आलेल्या पोरांनी लगोरीचा उनाड डाव मांडलेला असायचा अन त्याचा मधूनच येणारा आवाजाचा गलका दुपारचा सर्वात मोठा आवाज असे. घर-घरातल्या पोक्त बायकांनी पदराचा कोपरा ओठात पकडत माजघरातल्या चोरट्या आवाजातल्या गप्पांची बैठक बसवलेली असे. शेजारी कुठेतरी वाळवणातल्या वस्तू वरखाली करायचे काम चालू असे. आसपासच्या एखाद्या घरातून एखाद्या मुलाचा अभ्यास घेतानाचा एकसुरी आवाज येत असे.

रस्त्याच्या वरच्या कोपरयात असलेल्या हापशावर अधून मधून कोणी पाणी भरायला आले तर त्याचा हापसा मारण्याचा कडाक कडाक आवाज मात्र शांती भंग करत असे. दूर कोठून तरी ऐकू येणारा एखादा वाहनाचा आवाज एव्हढाच काय तो मोठा व्यत्यय. सगळ्या इमारती आपल्या मुक्या सावल्यात मश्गुल  होऊन गेलेल्या असत. इमारतींच्या आडोशाला, जिन्याखाली भटक्या कुत्र्यांनी मस्तपैकी अंगाचे वेटोळे करून ताणून दिलेली असे. एखाद दुसरा सायकलवाला अवखळ पोरगा ट्रिंग ट्रिंग आवाज करत जायचा त्याचा आवाज देखील मोठा वाटायचा.

सगळ्या आसमंतात एक अनामिक शिथिलता आलेली असे, निळ्या शार आकाशातले ढगदेखील एकाच जागी हट्टी मुलासारखे नुसते बसून राहत ! हवाच काय ती शीतल झुळका घेऊन शांत एका लयीत उनाडक्या करत फिरत असे. हवेच्या त्या मंद झुळका खिडक्यातून थेट घरभर फेर धरत. हवेच्या झुळका जशा बदलायच्या तशी टवटवीत अवीट गोडीची गाणी एकामागून एक कानावर येत राहत, थोडी खट्टी थोडी मिठी अशी चव असणारी ही गाणी कधी कधी एखाद्या दुपारी उगाच उदास करून जात तेंव्हा मात्र दुपार कधी टळून जाते असं वाटायचे ! मात्र बहुतांशी हा रेडीओ वरच्या फर्माईशी गाण्याचा कार्यक्रम त्यातल्या निवेदिकेच्या आवाजाइतका गोष्टीवेल्हाळ अन मधाळ असायचा. त्यावर माझा इतका जीव जडलेला की आता कधी कधी नुसत्या आठवणींचे आभाळ दाटले की डोळे ओले व्हायला वेळ लागत नाही. 

त्या मंतरलेल्या दुपारच्या काळात नुकतंच जेवण आटोपून वामकुक्षी करणारे बाबा हळूच निद्रादेवीच्या आधीन झालेले बघताना गंमत वाटायची. तेंव्हा भर दुपारचा सूर्य देखील फारसा छळत नसे, त्याची किरणे रेडीओवरची गाणी संपत जायची तशी दिशा बदलून घराच्या ह्या कोपरयातून सुरु होऊन त्या कोपऱ्यात विश्रांती घेत. कवडसे आपल्याच नादात उजेडाचा खेळ घरभर झिम्मा खेळत. फार शांत होते ते दिवस अन फार सुखी होते ते जीवन. कोठलीही रिंगटोन नव्हती की कोठला टीव्ही नव्हता. साधी सोपी पण निखालस ह्रदयात उतरत जाणारी निखळ करमणूक करणारी ती शांत अशी दुपार नजरेआडून जातच नाही.

दिवसभराची शाळा सुटल्यानंतर घरी येणारी मुलेच काय ती संध्याकाळ होत आल्याची खूण असायची. तोपर्यंत रेडीओवरची ती गाणी हातात हात गुंफून सोबतीला रहायची..अंगावरून मोरपीस फिरल्यासारखे वाटावे असे ते दिवस होते! 'ये दिल और उनकी निगाहोंके साये.' हे त्या सोनेरी आठवणीतले असे गाणे आहे की त्याचे मधुर नाद अजूनही कानात गुंजन करतात ! अगदी भारून टाकणारे ते सर्व क्षण होते.

गारगोटीतून निघणारया ठिणग्या जशा हळू हळू क्षीण होत जातात तसे ह्या दुपारच्या आठवणींचे झालेय. तशा तप्त ठिणग्याची आता ओढ नाही पण त्या गारगोट्या तशाच अजून दिवानखाण्यातल्या कपाटात मखमली कापडात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सुरेख आठवणी अनेक असतील पण निवांत अन अस्ताव्यस्त पहुडलेल्या अंगावर मायेची रजई घेऊन आपल्याला गुरफटून टाकणारया त्या दुपारच्या आठवणींनी नकळत डोळे ओले होतात . आताच्या ह्या कृत्रिम जगात सारीच दिनचर्या बेगडी झालीय, काय जगतोय आणि का जगतोय याचाच शोध घेत स्वतःला अजूनही शोधतो आहे. एकेकाळी मामा, मामी, काका, काकी, आत्या, आजोबा, आजी,  मावशी, दादा, ताई ही नाती सर्वांच्या वाट्याला असत. काही ठिकाणी आता यातील ताई आणि दादाच राहिलेत तेही नावापुरते. नातीच संपत चाललीत तिथे आठवणींची काय किंमत ?

आजकालच्या तरुणाईला तर गाण्यातलाच काय जीवनातला खरा आनंद आपल्या हातातून निसटत चाललाय याचीही पुसटशी कल्पनादेखील नाहीये अन हे सर्व माहित असूनही त्यावर काहीही करू न शकलेल्या पिढीतला एक शिलेदार म्हणून इतरांसोबत माझेही नाव नोंद होईल याची कधीकधी खंत वाटते. आज देखील एखाद्या हळव्या दुपारच्या उन्हात दुपारी हे गाणे माझ्या अंतर्मनाच्या पटलावर गुंजते. त्या आठवणींनी मन हळवे होऊन जाते अन खिशातला रुमाल डोळ्याजवळ कधी येतो काही कळतच नाही.

माझ्या आठवणी ह्या साध्या, सोप्या, प्रवाही अन उत्फुल्ल आहेत, त्या कस्तुरीसारख्या दरवळणाऱ्या अन निर्झरासारख्या वाहणाऱ्या आहेत. त्यात सागराची अथांगता आहे अन आकाशाची निरभ्रता आहे. त्यात   वैशाखवणव्याची दाहकताही आहे, वळवाच्या पावसाची शीतलता आहे. आठवणींच्या पानगळीचा शिशिर सुरु असताना वसंताची बहारही असते, श्रावणसरीत चिंब भिजूनही त्या कधी शुष्कच असतात तर रखरखीत चैत्रात देखील त्या ओलेत्या असतात. माझ्या आठवणी ह्या पोक्त स्त्रीच्या वेणीसारख्या ठाशीव आहेत अन उच्छृंखल तरुणीच्या मोकळया केसांतही गुंतलेल्या आहेत, त्यांना मयुरपंखी वर्ख आहेत अन इंद्रधनुष्यी रंग आहेत ! पुस्तकातल्या पानात दडवून ठेवेलेल्या गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांची दास्तान त्यात आहे अन भैरवीची सुरेल तानही त्यात आहे. आठवणींच्या मरुभूमीत अपूर्ण इच्छांची गतप्रभ तारांगणे मूर्च्छित होऊन पडली आहेत अन गळून पडलेल्या उल्कांचे उसासेही त्यात आहेत ! देहांचे स्पर्श त्यात कैद आहेत, नेत्रांचे कटाक्ष पडून आहेत अन अश्रूंची अनिवार फुले अजूनही तिथल्या फांदयांवरती खुलून आहेत. बाल्यावस्था ते जरठवयातील सर्व परिघांची विविध वर्तुळे अजूनही तशीच आहेत त्यतल्या बिंदूबिंदूत अजून चैतन्य तसेच आहे नवजात  बाळाच्या नाजूक गुलाबी हाताच्या हलकेच आवळलेल्या बंद मुठीसारखे ! आठवणींचे सरण मी कधी रचत नाही मात्र वासनाविकारांच्या कबरी तिथे दफन आहेत त्यावरची सुकलेली फुलांची चादर मात्र मी हटवत नाही. आठवणींच्या तसबिरीही कोरीव शिसवी लाकडात जतन करून ठेवतो जशा पूर्वजांच्या तसबिरी भिंतीला टांगून ठेवलेल्या असतात. सह्यकड्यावरचे वारे पिऊन आठवणींचे वारू कधी तांडव घालते तर आषाढात नुसत्याच दाटून आलेल्या मळभासारखे त्या पुढ्यात येऊन बसतात. मनाच्या कातळावर त्या कधी घसरून पडतात तर गोठ्यातल्या गायीच्या हंबरडयात विरून जातात. तुळशीवृंदावनासमोर बसलेल्या केसाची चांदी झालेल्या मातेच्या घट्टे पडलेल्या हातावरून हात फिरवताना त्या हळव्या होतात अन अखेरच्या काळात शून्यात डोळे लावून बसलेल्या वृद्ध वडिलांच्या थकल्या चरणी लीन होऊन जातात.

माझ्या आठवणी ह्या अशा अपार आहेत. त्यावर कितीही लिहिले तरी ते अपुरेच आहे. रसाळ आठवणींचा हा झरा माझ्या जगण्याचे स्फुर्तीस्रोत बनून गेला आहे त्यात नवल ते काय !

- समीर गायकवाड .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा