गुरुवार, १८ जून, २०१५

मराठी कवितेचे राजहंस - गोविंदाग्रज !....



'मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा
भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
जे ध्येय तुझ्या अंतरी निशाणावरी,
नाचते करीजोडी इहपर लोकांसी
व्यवहारा परमार्थासी वैभवासी वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा

महाराष्ट्राचे वर्णन करणाऱ्या बऱ्याच कविता येऊन गेल्या आणि भविष्यात देखील त्या येत राहतील. आपण ज्या भूमीत जगतो, लहानाचे मोठे होतो तिचे ऋण व्यक्त होण्यासाठी आपल्या मातीवर प्रेम करणारी, तिचे गुणगान करणारी कविता लिहावी अशी भावना कविमनात उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. तदोदभवित हेतूने आजपावेतो अनेक नामवंत कवींनी मराठी माती आणि मराठी माणसांचा गौरव करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत पण कवी गोविंदाग्रजांच्या या कवितेतला जोश काही औरच आहे.

आपल्या मायमहाराष्ट्राचे कौतुक करताना त्यांनी मुक्तहस्ते आपल्या प्रतिभेचा वापर केला आहे, शब्दांची बहारदार उधळण केली आहे. आपल्या मंगल, पवित्र देशाला प्रणाम करून ते कवितेची सुरुवात करतात अन कवितेच्या शेवटच्या शब्दाअखेर अंगावर सरसरता काटा उभा करतात. देशप्रेमाचे रसरशीत शब्दाभिषेक ते आपल्यावर या कवितेत करतात. आपली भूमी जशी नाजूक आहे, तशी कोमलही आहे अन फुलांनी डवरलेली देखील आहे ; तशीच ती राकट देखील आहे, नुसतीच राकट नसून ती प्रसंगी कणखर आहे अन भक्कम वज्रांचीही आहे. कवी इथे दगडांचा उल्लेख करतात कारण दगड हाच कोणत्याही इमारतीचा पाया असतात, त्याशिवाय मजबूत इमारती उभ्या राहू शकत नाहीत. इथल्या मातीत मात्र हा गुणधर्म आहे.

कवितेला एक चढता सूर ताल लाभतो तो 'अंजनकांचन करवंदीच्या काटेरी देशा , बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा' या पंक्तीच्या अलौकिक शब्दरचनेमुळे !

करवंदीच्या काटेरी जाळ्याही इथे आहेत. इथल्या प्रत्येक दारी बकुळफुलांच्या राशी, प्राजक्ताची दले आहेत असं रम्य वर्णन ते खुबीने करतात. महाराष्ट्राच्या मातीपासून ते इथल्या मातीतल्या माणसांचे गुणधर्म राकटपणा, कणखरता अन भक्कम ध्येयनिष्ठतेचे गुण ते आधी गौरवतात, तर पुढे जाऊन इथल्या पानाफुलांचे सुगंधित वर्णन करतात. पुढच्या कडव्यात ते म्हणतात की आपला महाराष्ट्र हा नुसता इतुकाच नसून तो एकाच वेळी भावभक्तीने भरलेला आहे अन प्रगल्भ बुद्धीने भारित देखील झालेला आहे ! या पुढच्या पंक्ती वीररसात न्हाऊन निघालेल्या आहेत. हा शाहिरांचा देश आहे, मर्दानी व्यक्तीमत्वांची ही भूमी आहे. या मातीचे जे ध्येय आहे तेच ध्येय इथल्या हाती असलेल्या निशाणात आहे. त्यात दुजाभाव नाही. जे पिंडी ते ब्रम्हांडी असं ते मार्मिकरीत्या सुचवतात.

आपल्या जन्मभूचे कौतुक त्यांना अशासाठीही आहे की इथली माती वसुंधरेपासून ते इंद्रलोकांपर्यंतच्या स्वर्गस्थ आत्म्या परमात्म्यांचे अनुष्ठान घडवून आणते, ती इहलोक आणि परलोक यांत सेतू बांधते. सांसारिक व्यवहारधर्म आणि अध्यात्मिक परमार्थ यांचा मेळ इथली माती घालते. इतकेच नव्हे तर इथे वैभव आणि वैराग्य एकाच वेळी हातात हात घालून जीवन व्यतित करतात ! अत्यंत उदात्त आणि उत्कट शब्दात ते महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे सकल गुण इथे वर्णितात. शेवटच्या पंक्तीत त्यांनी कमाल केली आहे, वारकरी सांप्रदायाचा देश आणि शिवबांचा व त्यांच्या मर्द मावळ्यांचा देश अशी जी महाराष्ट्राची मूळ ओळख गेल्या कित्येक शतकांपासून आहे ती त्यांनी केवळ पाच शब्दांत गुंफली आहे ! जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा असे अभूतपूर्व वर्णन ते या भावनेतूनच करतात. अशा या विविधतेने नटलेल्या, सर्वगुणसंपन्न, पराक्रमी, वैभवशाली परंपरांचा पाईक राहून मातीशी इमान राखणाऱ्या इथल्या परिपक्व विचारधारणांचा गौरव ते करतात आणि शेवटी महाराष्ट्राच्या मातीशी नतमस्तक होऊन आपला प्रणाम स्वीकारावा असे आर्जव करतात.

शालेय जीवनात शिकलेली गोविंदाग्रजांची ही कविता मनावर कोरली जाते ती यातल्या रसरशीत शब्दरचनेने, कसदार आशयाने, उत्कट भावना आस्थेने ! आजही ही कविता कुठे वाचली वा ऐकली तरी प्रत्येक मराठी माणसाची छाती फुलून येते.....

‘वाग्वैजयंती’ हा राम गणेश गडकरी यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्यातील कवितांचे वैविध्य लक्ष वेधून घेणारे आहे. मुक्तच्छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करण्याची त्यांची पद्धत वाचकाच्या मनात कवितेला अधिक खोलवर नेते. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती 'राजहंस माझा निजला' ह्या कवितेत गडकऱ्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव धारण केले होते. ही कविता साध्या शब्दात मोठा आशय व्यक्त करते, विषमतेवर बोट ठेवताना कोणाच्या वाट्याला काय येईल ते भाग्य ठरवेल असा भाबडा युक्तिवाद ते या कवितेत करतात.

काही गोड फुले सदा विहरती स्वगागनांच्या शिरी,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरी ;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि ते ;
एकादें फुटके नशीब म्हणुन प्रेतास शृंगारिते !
कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हेमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला ;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !
झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !
चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवी
यापरीपाही कोण अशा हताश हृदया?
जो तो असे आपला,देवा !
तू तरि टाकि अश्रु वरुनी, त्यासाठी तो तापला !

त्यांच्या सर्वच कविता शब्दार्थ रंजकाच्या फुटपट्टीत मोजणं योग्य नव्हे. वेगळ्या धाटणीच्या कविताही त्यांनी लिहिल्या आहेत.
‘काय करावे’ ही त्यांची कविता जगण्याच्या सोप्या युक्त्या शिकवते, हीचा बाज चारोळ्यांसारखा आहे हे विशेष होय -

काय करावे?
उन्हाळ्यासाठी पाणी न ठेवून | नदी वेगे जाता पळून |
भक्कम दगडांचे धरण बांधून | तिला अडवता येतसे ||
अगदी आपला नेम धरून | तोफ सुटता धडधडून |
हळुच बाजूला सरून | मारा चुकविता येतसे ||
अंतराळी कडकडून | वीज घरावरी पडता तुटून |
उंच खांबांत बांधून | पाताळी सोडिता येतसे ||
सावकारांनी वैर धरून | जप्ती आणिता दावा करून |
मागील बाकी देऊन | तिला उठविता येतसे ||
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून |
एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे ||
जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |
कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||
सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून |
तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे? ||एकच मागणे !

या कवितेत ते विधात्याकडे फार काही न मागता धैर्य आणि सहनशक्ती मागतात. इथला भोग तळणार नाही मात्र त्यापुढे हरणार देखील नाही असा त्यांचा धीरोदात्त बाणा इथे दिसतो. आशा निराशा यांचे गडद रंग या कवितेवर आहेत अन दैववादही आहे.

आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥
आहे जो सुखदु:खभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥
आहे जीवित हा हिशेब सगळा - हा बोध चित्तीं ठसे ।
देणें हें गतकालिचे सकळही सव्याज देणें असे ॥1 ॥
आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्बंध नानापरी ।
इच्छा केवळ दु:खदा, अनुभवें हें बाणलें अंतरी ॥
आतां एकच मागणें तव पदी, देवा, असे एवढें ।
संसारी मिळता न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥2 ॥
आतां दु:ख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।
इच्छा वावरती मनांत, तरि हीं केली मुकी तन्मुखे ॥
जें कांही घडते सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे
ऐसें जाणुनि सोसण्यास मज ते सध्दैर्य दे तेवढे ॥3॥

अकाली मृत्युमुखी पडलेल्या आपल्या मुलाकडे पाहून त्यांनी केलेली कविता कोणाच्याही हृदयाला पीळ पाडून जाते. अत्यंत आर्त आणि करुण भाव या कवितेच्या ठायी आहेत. नकळत वाचकाचे डोळे ओले व्हावेत इतकी करुणा, ममता, प्रेम या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.

राजहंस माझा निजला -
हें कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला!'

दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!
तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।
जें आनंदेही रडतें । दु:खांत कसें तें होइ--

हें कुणी कुणां सांगावें!
आईच्या बाळा ठावें !
प्रेमाच्या गांवा जावें--
मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला!"

मांडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।
होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।
मग हृदय बधिरची झलें । अति दुःख तिजवि चित्ताला ।

तें तिच्या जिवाचें फूल ।
मांडीवर होत मलूल!
तरि शोकें पडुनी भूल--
वाटतची होतें तिजला। 'राजहंस माझा निजला!'

जन चार भोंवतीं जमले। मृत बाळा उचलायाला।
तो काळ नाथनिधनाचा। हतभागि मना आठवला।
तो प्रसंग पहिला तसला। हा दुसरा आतां असला!

तें चित्र दिसे चित्ताला!
हें चित्र दिसे डोळ्यांला!
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां। 'राजहंस माझा निजला!'

करुं नका गलबला अगदीं। लागली झोंप मम बाळा!
आधींच झोंप त्या नाहीं। खेळाचा एकच चाळा!
जागतांच वाऱ्यासरसा। खेळाचा घेइल आळा!

वाजवूं नका पाऊल!
लागेल तया चाहूल!
झोंपेचा हलका फूल!
मग झोपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!

हें दूध जरासा प्याला। आतांसा कोठें निजला!
डोळ्याला लागे डोळा। कां तोंच भोवतीं जमलां?
जा! नका उठवुं वेल्हाळा। मी ओळखतें हो सकलां!

तो हिराच तेव्हा नेला!
हिरकणीस आतां टपलां!
परि जिवापलिकडे याला--
लपवीन! एकच मजला! राजहंस माझा निजला!

कां असलें भलतें सलतें। बोलतां अमंगळ याला!
छबकड्यावरुनि माझ्या या। ओवाळुनि टाकिन सकलां!
घेतें मी पदराखालीं। पाहूंच नका लडिवाळा!

मी गरीब कितिही असलें।
जरि कपाळ माझें फ़ूटलें।
बोलणें तरी हें असलें--
खपणार नाहिं हो मजला! राजहंस माझा निजला!

हें असेच सांगुनि मागें। नेलात जिवाचा राजा।
दाखविलाहि फिरुनी नाहीं। नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां। राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा--
पाहुनी गरिब कोणाला। राजहंस माझा निजला!

या कवितेने कविवर्य सुरेश भट यांच्या 'तरुण आहे रात्र अजुनी,राजसा निजलास का रे ?’ ह्या गझलेची आणि कवी अनिल यांच्या 'अजुनि रूसून आहे, खुलता कळी खुलेना' या प्रसिद्ध कवितेची आठवण होते.

गोविंदाग्रजांचा जन्म १८८७ सालचा आणि मृत्यू १९१९ सालचा. 'प्रेम आणि मरण' ही गोविंदाग्रजांची अतिशय गाजलेली कविता त्यांनी १९१६ साली लिहिलेली.
या कवितेमधला नायक आहे एक वृक्ष. तो वृक्ष तरी कसा, तर अवती भवतीच्या "खुरट्या, इवलाल्या झुडुपांहून, गुडघाभर जगापासून आणि माजलेल्या वेलींहून खूप खूप उंच, उत्तुंग - शरीराने आणि व्यक्तिमत्त्वानेही. आजूबाजूला त्याच्या अनेक वेली अहेत, ज्या त्याच्यासाठी झुरत आहेत. पण त्याची ओढ कोणत्याशा भव्यदिव्याची ! या वेलींचे त्याला आकर्षण वाटत नाही. आणि कोणत्या एका मूहूर्तावर ती वीज त्याच्या आयुष्यात आली, आणि तिथे गवसले त्याला त्याच्या आयुष्याचे ध्येय. ती तर आकाशीची वीज- तेजाचेच साक्षात् रूप! तिचा का कोणी हट्ट धरतो? पण आदर्शांची पूजा करणा-यांना असले प्रश्न पडत नाहीत. तो वेडा त्या वीजेवरच प्रेम करु लागतो. झुरु लागतो, अगदी पार फ़कीर होऊन जातो. जग त्याला वेडे ठरवते, क्वचित् कोणी खरा हितचिंतक त्याच्याबद्दल काळजीही करतो.....पण हा सगळ्याच्या पलिकडे गेलेला...

इश्काचा जहरी प्याला।
नशिबाला ज्याच्या आला॥ हा असा॥
टोकाविण चालु मरणे।ते त्याचे होते जगणे॥ सारखे॥

देवाच्या मूर्तीमधले देवपण जाऊन नुसताच दगड उरल्यासारखं, उगाचच, लौकिकापुरतं असं त्याचं जगणं ! आणि मग त्यानी घोर तपश्चर्या करून देवीला प्राप्त करून घेतले. आणि तिला वर मागितला, की मला त्या असमंतातल्या त्या "जीवाच्या बालेला" एकदाच भेटव...हा भलता राक्षसी वर ऐकून देवीही चक्रावली, असला घातकी वर का मागतोस? तुला अमरत्व देते, कल्पवृक्ष्त्व बहाल करेन म्हणली.

मात्र वृक्षाला असे "निष्प्रेम चिरंजीवन" नको होते. त्याचे म्हणणे एकच:क्षण एक पुरे प्रेमाचा।वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे॥"काय करणार ? देवतेने त्याचे मागणे पूर्ण केले. आणि ज्या क्षणी त्याचे ते स्वप्न पूर्ण झाले, त्याच क्षणी तो दुभंगून कोसळून गेला. पण कोसळतानाही त्याला समाधान होते, की त्याची जीवाची सखी त्याला भेटली. तसे म्हणावे, तर हे आदर्श वेडे प्रेम. गोविंदाग्रजांनी जरी इथे झाड आणि वीज हे स्त्री पुरुषांसाठी रूपक वापरले असले, तरी त्यामध्ये त्याहून मोठे भव्य आदर्शांबद्दलचे आणि मूल्याबद्दलचे प्रेमही दिसून येते. आणि स्त्री-पुरुष पातळी वरचे प्रेमही उदात्त उच्च बनते.

कुठल्याशा जागी देख ।
मैदान मोकळे एक ॥ पसरले ॥
वृक्ष थोर एकच त्यात ।
वाढला पुऱ्या जोमात ॥ सारखा ॥
चहुकडेच त्याच्या भवते ।

गुडघाभर सारे जग ते ॥तेथले ॥
झुडुपेच खुरट इवलाली ।
मातीत पसरल्या वेली ॥ माजती ॥
रोज ती । कैक उपजती । आणखी मरती ।
नाहि त्या गणती । दादही अशांची नव्हती ॥ त्याप्रती ॥

त्यासाठी मैदानात ।
किति वेली तळमळतात ॥ सारख्या ॥
परि कर्माचे विंदान ।
काहीं तरि असते आन ॥ चहुकडे ॥
कोणत्या मुहूर्तावरती ।
मेघात वीज लखलखती । नाचली ॥
त्या क्षणी । त्याचिया मनी ।तरंगति झणी ।
गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ॥ न कळता ॥

तो ठसा मनावर ठसला ।
तो घाव जिव्हारी बसला ॥ प्रीतिचा ॥
वेड पुरे लावी त्याला ।
गगनातिल चंचल बाला ।। त्यावरी ॥
जातिधर्म त्याचा सुटला ।
संबंध जगशी तुटला ॥ त्यापुढे ॥
आशाहि । कोठली काहि । राहिली नाहि ।
सारखा जाळी । ध्यास त्यास तीन्ही काळी ॥ एक तो ॥

मुसळधार पाउस पडला ।
तरि कधी टवटवी त्याला ॥ येइना ॥
जरि वारा करि थैमान ।
तरि हले न याचे पान ॥ एकही ॥
कैकदा कळ्याही आल्या ।
नच फुलल्या काही केल्या ॥ परि कधी ॥
तो योग । खरा हटयोग । प्रीतिचा रोग ।
लागला ज्याला । – लागतें जगावे त्याला ॥ हे असे! ॥

ही त्याची स्थिति पाहुनिया ।
ती दीड वितीची दुनिया ॥ बडबडे ॥
कुणी हंसे कुणी करि कीव ।
तडफडे कुणाचा जीव ॥ त्यास्तव ॥
कुणि दयाहि त्यावरि करिती ।
स्वर्गस्थ देव मनि हसती ॥ त्याप्रती ॥
निंदिती । कुणी त्याप्रती । नजर चुकविती ।
भीतिही कोणी । जड जगास अवघड गोणी ॥ होइ तो ॥

इष्काचा जहरी प्याला ।
नशिबाच्या ज्याच्या आला ॥ हा असा ॥
टोकाविण चालू मरणे ।
ते त्याचे होते जगणे ॥ सारखे ॥
ह्रदयाला फसवुनि हसणे ।
जीवाला न कळत जगणे ॥ वरिवरी ॥
पटत ना । जगी जगपणा । त्याचिया मना ॥
भाव त्या टाकी । देवातुनि दगडचि बाकी ॥ राहतो ॥

यापरी तपश्चर्या ती ।
किती झाली न तिला गणती ॥ राहिली ॥
इंद्राच्या इंद्रपदाला ।
थरकाप सारखा सुटला ॥ भीतिने ॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे ।
ध्रुवबाळा मत्सर वाटे ॥ पाहुनी ॥
तो स्वता । तपोदेवता । काल संपता ।
प्रकटली अंती । “वरं ब्रूहि” झाली वदती ॥ त्याप्रती ॥

तप फळास आले पाही ।
माग जे मनोगत काही ॥ यावरी ॥
हो चिरंजीव लवलाही ।
कल्पवृक्ष दुसरा होई ॥ नंदनी ॥
प्रळयीच्या वटवृक्षाचे ।
तुज मिळेल पद भाग्याचे । तरुवरा ॥”
तो वदे । “देवि सर्व-दे, । हेच एक दे- ।
भेटवी मजला । जीविच्या जिवाची बाला ॥ एकदा ॥

सांगती हिताच्या गोष्टी ।
देवांच्या तेतिस कोटी ॥ मग तया ॥
“ही भलती आशा बा रे ॥
सोडि तू वेड हे सारे ॥ घातकी ॥
स्पर्शासह मरणहि आणी ।
ती तुझ्या जिवाची राणी ॥ त्या क्षणी ॥
ही अशी शुध्द राक्षसी । काय मागसी ।
माग तू काही । लाभले कुणाला नाही ॥ जे कधी ॥”

तो हसे जरा उपहासे ।
मग सवेच वदला त्रासे ॥ त्याप्रती ॥
“निष्प्रेम चिरंजीवन ते ।
जगि दगडालाही मिळते ॥ धिक तया ॥
क्षण एक पुरे प्रेमाचा ।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढे ॥”
निग्रहे । वदुनि शब्द हे अधिक आग्रहे !
जीव आवरुनी । ध्यानस्थ बैसला फिरुनी ॥ वृक्ष तो ॥

तो निग्रह पाहुनि त्याचा ॥
निरुपाय सर्व देवांचा ॥ जाहला ॥
मग त्याला भेटायाला ।
गगनातिल चंचल बाला ॥ धाडिली ॥
धांवली उताविळ होत ।
प्रीतीची जळती ज्योत ॥ त्याकडे ॥
कडकडे । त्यावरी पडे । स्पर्श जो घडे ।
वृक्ष उन्मळला । दुभंगून खाली पडला ॥ त्या क्षणी ॥

दुभंगून खाली पडला ।
परि पडता पडता हसला ॥ एकदा ॥
हर्षाच्या येउनि लहरी ।
फडफडुनी पाने सारी ॥ हासली ॥
त्या कळ्या सर्वही फुलल्या ॥
खुलल्या त्या कायम खुलल्या ॥ अजुनिही ॥
तो योग । खरा हटयोग । प्रीतिचा रोग ।
लागला ज्याला । लाभते मरणही त्याला ॥ हे असे ॥

स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रानपालवी ।
मराठी रसिकांसाठी ‘गोविंदाग्रज’ पाठवी ॥

या कवितेत 'दीड वितींची दुनिया,क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा, इश्काचा जहरी प्याला। नशिबाला ज्याच्या आला, निष्प्रेम चिरंजीवन ते। जगि दगडालाही मिळते, जड जगास अवजड गोणी, खरा हटयोग। प्रीतीचा रोग, गुडघाभर सारे जग ते, देवातुनि दगडचि बाकी, तो घाव जिव्हारी बसला। प्रीतिचा.. अशी गोविंदाग्रजांच्या शैलीतली खास मंतरलेली अवतरणे प्रत्येक कडव्यात आढळतात.

गोविंदाग्रजांची ‘चिंतातूर जंतू’ नावाची प्रसिद्ध कविता आहे. या कवितेत गोविंदाग्रजांनी विनाकारण नको त्या गोष्टींची चिंता करून स्वत:सह जगाच्या डोक्याला ताप देणाऱ्या उपद्व्यापी ‘चिंतातूर जंतूं’ना काही मोलाचे (अन् शेलके) सल्ले दिले आहेत. त्यात चिंतातूर जंतू म्हणतो, ‘उगाच पाणी पहा पुराचे फूकट वाहते कितीतरी’ त्यावर गोविंदाग्रज म्हणतात ‘पहावत नसेल तुला जर ते उडी टाक तू त्या पुरात!’ चिंतातूर जंतू पुन्हा म्हणतो; ‘उगाच वाहते हवा मोकळी, वाया जाते फुकाच ती’ त्यावर गोविंदाग्रज म्हणतात ‘नाक दाबूनी जीव दे अन् कर बचत तूच हवा’ एवढे सांगूनही चिंतातूर जंतूची चिंता थांबतच नाही. अखेर गोविंदाग्रज वैतागून म्हणतात, ‘देवा तो विश्वसंभार राहूद्या, जरी राहिला तरी या चिंतातूर जंतूना, मुक्ती द्या आधी’ एक वेगळ्या धाटणीची अन आशयाची कविता म्हणून ही कविता आपोआप स्मरणात राहते.

संघर्ष कितीही करावा लागला तरी ज्याची धडका मारायची तयारी असते, जो वातीसारखा जळायला तयार असतो त्याला फरक पडत नाही हे त्यांनी अप्रतिम उपमा अलंकार वापरून 'पिंपळपान’ या कवितेत स्पष्ट केले आहे. जगण्यातला अर्थ बहरून येण्यासाठी मात्र आयुष्यातील आठवणी अन जुन्या गोष्टी यांचा विसर पडता कामा नये असेही ते सुचवतात.
'आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर
रानवाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....'
जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याच्या घटना अलीकडे सातत्याने घडत असतात तसेच गोविंदाग्रजांच्या घराच्या बाबतीत काही काळापूर्वी झाले. सुभाष इनामदार यांनी या कवितेची जी पार्श्वभूमी विशद केली आहे ती वेदनादायी आहे.

ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रजांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे. कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "१३६ कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. १९१९ मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली. आपल्या शासनाकडून व साहित्यप्रेमी मंडळीकडून एक अक्षम्य दुर्लक्ष इथे झाले. या कवितेच्या ओघाने ते नमूद करावेसे वाटते.

राम गणेश गडकरी यांचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी तत्कालीन मुंबई प्रांतातील नवसारी येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकऱ्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. ‘वेड्याचा बाजार’ आणि ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

केशवसुतांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला, अशा कवींत राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांचे नाव अग्रस्थानी आहे. गोविंदाग्रज स्वतःला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवीत. केशवसुतांच्या ‘तुतारी’ च्या प्रभावातून त्यांची ‘दसरा’ ही कविता त्यांनी लिहिली. तथापि गोविंदाग्रजांचा पिंड केशवसुतांपेक्षा भिन्न होता. विलक्षण कल्पनाशक्ती, अत्युत्कट भावना आणि त्यांना पेलणारी समर्थ शब्दकळा ह्यांनी गोविंदाग्रजांच्या कवितेला तिचे एक खास रूप दिले आहे. गोविंदाग्रजांनी तात्विक गूढगुंजनात्मक, आध्यात्मिक, सामाजिक, अशा विविध विषयांवर कविता लिहिली असली, तरी प्रीतीचा–विशेषत: विफल प्रीतीचा–प्रभावी आविष्कार त्यांच्या अनेक कवितांतून त्यांनी घडविला आहे.

बालकवींनी केशवसुतांच्या संस्कारांतून ‘धर्मवीर’ ही कविता लिहिली. तथापि त्यांची मूळ वृत्ती निसर्गकवीची असल्यामुळे ‘धर्मवीर ’ सारख्या त्यांच्या कविता यशस्वी झाल्या नाहीत. त्यांच्या निसर्गकवितेने मात्र एक वेगळी संवेदनशीलता आधुनिक मराठी कवितेत आणली. केशवसुतांच्या कवितेने गोविंदाग्रज आणि बालकवी हे दोघेही प्रभावित झालेले असले आणि केशवसुतांचे अनुकरण करण्याचा काही प्रयत्नही त्यांनी केला असला, तरी ते स्वतंत्रपणे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी होते. गोविंदाग्रजांची प्रेमकविता आणि बालकवींची निसर्गकविता मराठी कवितेला नवीन वळण लावणारी होती. पाश्चात्त्य समाजात औद्योगिक क्रांतीमुळे जे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले, त्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून निसर्गाकडे परतण्याचा उद्घोष पाश्चात्त्य रोमँटिक कवींनी केला. या वृत्तीत आदिम संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचा भाव होता व आदिमतेच्या आविष्कारावर भर होता. ही आदिमता मराठी स्वच्छंदतावादी काव्यात अभावानेच आढळते. गोविंदाग्रजांच्या प्रेमकवितेत इंग्रजी प्रभावातून आलेली ‘रोमँटिक’वृत्ती आणि मराठी शाहिरी परंपरेतील शृंगारिकता यांचेही सूर आढळतात.

महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये राम गणेश गडकरी हे नाव अग्रस्थानी आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. अनेक मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी त्यांना आपल्या गुरूस्थानी मानले. ऐन तारूण्यात कालवश झालेल्या राम गणेश गडकरी यांनी साहित्यातून आपली स्वत:ची अशी आगळी वेगळी ओळख निर्माण केली, स्वत:चे युग निर्माण केले. महाराष्ट्राने गडकऱ्यांवर भरभरून प्रेम केले, त्यांच्या साहित्यकृतींना अक्षरश: डोक्यावर घेतले. काव्य, नाटय, आणि विनोदी या परस्परविरोधी तीनही क्षेत्रात गडकरी सारख्याच वैभवाने व सारख्याच दिमाखाने तळपत राहिले. त्यापैकी गडकऱ्यांनी कोणताही एकच साहित्यप्रकार हाताळला असता तरी त्यांना निश्चितच इतकी प्रसिद्धी मिळली असती हे ही तितकेच खरे. मात्र या तीनही क्षेत्रात त्यांनी एकाचवेळी असामान्य प्रभुत्व मिळविले आणि अलौकिक यशाची श्रीमंती त्यांना लाभली. हे एवढे भव्य दिव्य यश त्यांनी केवळ आपल्या ३४ वर्षाच्या आयुष्यात प्रप्त केले. त्यांच्या दिव्य प्रतिभाशक्तीमुळेच ते काव्य राजहंस म्हणून मराठी काव्यसागरातगौरवले जातात ते अगदी यथार्थच होय.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा