आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
अरे यार, आयपीएल मध्ये कसला ड्रामा आहे त्यावरच मस्त बोलायचं का ?
फोर-जीच्या फुकट स्ट्रीमींगमध्येच रुतत जायचं का ?
पूर्वी तुला नोकरी नव्हती, महागाई वाटायची तेंव्हा तर तू रस्त्यावर यायचास ना ?
आता तुला स्वतःतून बाहेर पाहायला वेळ मिळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आहे. तू आंदोलनेही आता ऑनलाईनच करतोस का ?
तुला खऱ्या खोट्यातला म्हणे फरक कळत नाही कारण ते जे काही दाखवतील तेच तर तू वाचतो आहेस, पाहतो आहेस. हे खरं आहे का ?
आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
तू खूप बोलतोस यार, 'त्यांच्या लफड्यात काय को पडने का यार ?'
खूप झमेला होतो, पोलिस लगेच दारी येतात, नोटीस चिटकवून जातात.
'तुमच्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होते आहे' असा आरोप लावतात.
फोडल्या काही मूर्त्या अन स्मारके, झाली जरी विटंबना तरी आपण मुकाट राहिलेलंच बरं ! हेच खरे का ?
तुला आरक्षण हवंय, संरक्षण हवंय. त्यांना तू नकोयस पण तुझं मत हवंय.
तू धमन्यातलं रक्त तापवत बोलायचास, 'यांना भिडायचं का ?'
तू आणि ते दोघं भिडावेत हेच तर त्यांचे इप्सित असते, आपण आता हेच विसरायचं का ?
म्हणून म्हणतो, आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
खरं सांगू का, त्यांना मुसलमान आवडत नाहीत ; पण तसं ते स्पष्टपणे सांगत नाहीत.
मात्र राजरोसपणे आडवळणाने त्यांचे निर्देश त्याच दिशेने आहेत.
'रक्ताचा रंगही त्यांनी भगवा करावा आणि हिरव्याची इतकीच उबळ असेल तर पालेभाज्या खाणंही त्यांनी बंद करावं' असं म्हणलास तर तू जिवंत राहशील का ?
त्यापेक्षा हे बघ. तुझ्या मंदिरांचे तू गोडवे गावेस, यांना मदरशात गोडी लाभू द्यावी.
आपल्याला खऱ्या प्रश्नांचा विसर पडावा यासाठीच त्यांनी दिलेले हे लॉलीपॉप नव्हेत का ?
'ते स्वातंत्र्याच्या जनकासही सोडत नाहीत, तेंव्हा आपली काय कथा' असं म्हणत आता आपणही गप्प बसायचं का ?
मित्रा, मनापासून सांग आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
त्यापेक्षा तू तुझ्या कोषात दंग राहा, मी माझ्या कोषात दंग राहतो.
आपआपल्या जातींच्या मोर्चातच आता आपणही अस्मिता शोधायची का ?
कुणावर बलात्कार झाला, कुणाचा खून झाला तर आपणही आता आधी त्याची जात बघायची का ?
आपल्या जातीधर्माचाच असला की जहरी मौन घ्यायचं आणि विरोधी जातीधर्मातला असला की विखारी कोलाहल करायचं का ?
आपली चौफेर प्रगती झाली आहे, विकासाच्या शिखरांना आपण केंव्हाच सर केलंय असे दावे आता आपणही सुरु करायचे का ?
मागच्या लोकांनी काहीच केलं नाही, सगळी दलदल माजवली म्हणूनच तर कमळ जोमानं खुललं हेच फक्त ध्यानात ठेवायचं का ?
म्हणूनच विचारतो. मित्रा, आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
बघ. नीट लक्ष देऊन ऐक, त्यांची तळी उचलली तर आपण तत्काळ राष्ट्रभक्ताच्या यादीत जाऊ, कारण आजकाल हे ठरवण्याचे घाऊक अधिकार त्यांचेच तर आहेत !
आपल्याला कुठे अडचण येणार नाही, खोट्या का होईना पण समाधानात जगता येईल.
छान छान गुलछबू लिहिल्याबद्दल मला एखादा पुरस्कार मिळेल आणि त्यांच्या मोहिमेचा घटक झाल्याने तुझ्याकडे संशयाने बघणं बंद होईल.
व्यवस्थेविरुद्ध जाऊ नये म्हणे, दगडावर डोकं आपटू नये म्हणे ;
त्यांच्या लेखी तर तू सच्चा हिंदूही नाहीस आणि देशप्रेमी तर मुळीच नाहीस.
त्यांना तर विरोधी पक्षही नकोय मग विरोधी बोलणारे कसे चालतील,
पूर्वीही आपण सत्ताधीशांवर तुटून पडायचो तेंव्हा यांनीच तर आपल्याला कवेत घेतले होते.
आता यांनाच आपण रुचत नाही.
यात दोष त्यांचा नाही मित्रा दोष आपला आहे, हीच वेळ आहे स्वतःला भुलवायची. सांग आता तरी तू माझे ऐकणार का ?
मित्रा तू जर मुसलमान असशील तर तू आता काही पर्याय शोध. नाहीतर दोस्ता तुझे काही खरे नाही !
तू मित्र आहेस माझा, पण तुझी जात मी कधी पाहिली नव्हती,
तुझा धर्मही मी कधी बघितलाच नव्हता.
आता असं ऑफलाईन रीलिजीअस होऊन चालत नाही म्हणे !
एक शॉर्टकट बेस्ट आहे म्हणे, आवाज उठवायचा नाही, त्यांच्याविरुद्ध द्रोहपर्व उभं करायचं नाही.
बिन चेहऱ्याच्या गर्दीचा एक भाग होऊन जायचं,
मग बघ सगळं कसं स्वांत सुखाय ! बोनस म्हणून सगळे गुन्हे माफ !
इतकं सारं खुल्लमखुल्ला लिहून आत गेलेल्या पोटासाठी एक प्रश्न विचारू का ?
भाटांची अखंड भरती सुरु आहे, यादीत आता नाव नोंदवायचे का ?
जगणं स्वस्त हवं असेल, सगळं कसं टुमटुमीत हवं असेल तर तत्वांना कुरवाळणं बंद करायला हवं.
अरे खुल्या दिलाने सांग, माझं म्हणणं तुला पटतंय का ?
त्यासाठी जिभा कापाव्या लागत नाहीत, फक्त नंदीबैल व्हावं लागेल !
नुसती मान डोलवायची, मानाने जगण्याचा अर्थ जिथे नेस्तनाबूत होतो असेल तिथे माना असल्या काय आणि नसल्या काय ?
कान बंद करून घ्यायचे, डोळे झाकून प्रकाश समजून अंधाराकडे बघत राहायचं, यांनी इशारा करताच 'दक्ष' व्हायचं !
आरामात जगण्यासाठी ही काही फार मोठी किंमत नाही, म्हणून अखेरचं विचारतो मित्रा, आवाज उठवणं आपण थांबवायचं का ?
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा