![]() |
एक भारलेला काळ होता, जेव्हा देशभरातल्या बहुतांश घरात सर्व सदस्यांचं एकमेव करमणुकीचं साधन रेडीओ होता. त्या काळातली सकाळ भारलेल्या वातावरणाची असायची. तेंव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीने घराचे अंगण झाडून घेतलेले असायचे, हे अंगण कधीकधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेले असायचे. त्यामुळे अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख्ख स्वच्छ झालेला असायचा. अंगण झाडून झाले की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा. सडासंमार्जन होताच पांढऱ्या शुभ्र रांगोळीचे स्वस्तिक घराच्या उंबरठ्यावर अवतीर्ण होई, अंगणात एखादी सुबक ठिपक्यांची रांगोळी चितारली जाई. मग घरातली लहानगी चिमुरडी जागी केली जात असत, या सर्वांचं आवरून होईपर्यंत देवघरातील समईच्या मंद वाती तेवलेल्या असत, गाभाऱ्यातील निरंजनाचा पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तसबिरीवरून तरळत जात असे. अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिले जाई, पूर्वेच्या देवाला डोळे झाकून, हात जोडून नमन होई. मग माजघरात स्टोव्हचा बर्नर भडकून पेटलेला असला की त्याचा फर्रफर्रचा आवाज लक्ष वेधून घेत असे. त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चर्रचर्र आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असे.

















































