Friday, November 3, 2017

ऋणानुबंधाच्या गाठी - बाळ कोल्हटकर आणि स्मरणरंजन...

ऋणानुबंधाच्या गाठीतली एक रम्य सकाळ 
एक भारलेला काळ होता, जेव्हा रेडीओ हा घरातील सर्वांचे एकमेव करमणुकीचे साधन होता. तेंव्हा भल्या पहाटे उठून घरातल्या माऊलीने घराचे अंगण झाडून घेतलेले असायचे, हे अंगण कधीकधी थेट रस्त्यापर्यंत खेटलेले असायचे. त्यामुळे अख्खा रस्ता भल्या पहाटेच लख्ख स्वच्छ झालेला असायचा. झाडून झाले की त्यावर बादलीभर पाण्याचा मस्त सडा टाकून झालेला असायचा. सडासंमार्जन झाले की पांढऱ्या शुभ्र रांगोळीचे स्वस्तिक घराच्या उंबरठ्यावर अवतीर्ण होई, अंगणात एखादी सुबक ठिपक्यांची रांगोळी चितारली जाई. अंगण झाडून झाले की घरातली लहानगी चिमुरडी जागी केली जात असत, या सर्वांचं आवरून होईपर्यंत देवघरातील समईच्या मंद वाती तेवलेल्या असत, गाभारयातील निरंजनाचा  पिवळसर प्रकाश देवदेवतांच्या तसबिरीवरून तरळत जात असे. अंगणातल्या तुळशीला पितळी तांब्यातून पाणी वाहिले जाई, पूर्वेच्या देवाला डोळे झाकून, हात जोडून नमन होई. मग माजघरात स्टोव्हचा बर्नर भडकून पेटलेला असला की त्याचा भर्रभर्रणारा आवाज लक्ष वेधून घेत असे. त्यावर चढवलेल्या पातेल्याचा चर्रचर्र आवाज आणि चहाचा दरवळणारा गंध एकच तलफ जागवत असे.

हे सर्व होत असतानाच रेडीओ सुरु होई आणि त्यावर आधी आकशवाणीचे संगीत लागे, मग वंदे मातरम आणि सकाळच्या सभेचं निवेदन होई. शेतकरयांसाठी आजचे हवामान आणि एखाद्या पिकाची कीड या विषयीची माहिती ऐकताना दात स्वच्छ घासण्याची उबळ आपोआप दाटून येत असे. इतक्यात वाफाळता चहा समोर आलेला असे, बाहेर रस्त्यावर झुन्झुमुन्जू होऊ लागायचे. पुर्वाईचे लाल रंग मेघातून थेट वसुंधरेवर उतरलेले असत. बाहेर एखाद दुसऱ्या वाहनाच्या हॉर्नचा आवाज येण्यास सुरुवात झालेली असे, बाकी सायकलची कार्रिंग असा आवाज करत वाजणारी घंटी मात्र भारी वाटत असे. दुधवाल्यांचे ओरडणे अन लांबून ऐकू येणारया पेपर वाल्या मुलांच्या 'पेपर..' अशा झोपाळू हाका या वातावरणास आणखी रंग चढवत असत. कुणाच्या तरी घरी वाजणारी कुकरची शिटी अन मस्त शिजलेल्या वरणभाताचा वास सकाळीच पोटात कावळे जागे करून जाई. कुठून तरी शाळेत जाणाऱ्या मुलांची गाऱ्हाणी अन रडगाणी कानावर ऐकू येत असत तर दुसऱ्या कुणाच्या तरी घरी आकाशवाणीच्या ऐवजी रेडीओ सिलोनवरून मस्त गाण्यांची मैफल सुरु झालेली असे. बाहेर झाडाझाडातून कावळ्यांची शाळा भरलेली असे अन अंगणातल्या पारिजातकावर चिमण्यांची उठबस सुरु झालेली असे. असं सगळं भारलेले वातावरण असताना रेडीओवर भावगीते सुरु झालेली असत, त्यात 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी ...'हे गीत ऐकलं की आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटायचं. अशी अप्रतिम एकापेक्षा एक सरस गीतं सादर होत अन भावगीते संपून तिथे मग बाजारभाव येई. लासलगावात कांदा कसा आहे येथपासून नंदूरबारच्या बाजारपेठेतले भाव काय आहेत हे ऐकायला मिळे. हे सर्व श्रवणसुख संपन्न झाले की सुधा नरवणे यांच्या आवाजातील 'आकाशवाणी पुणे..' हा रोजच्या सवईचा आवाज देखील हवाहवासा वाटायचा. गरजा कमी अन सुखाच्या कल्पना मोजक्याच पण आनंददायी अशा असणारया त्या काळात सुखाचे परिमाण संपत्तीत मोजले जात नसे. माणुसकीची महती असणाऱ्या त्या सुवर्णयुगात मोबाईल आणि टीव्ही नव्हते ही खरे तर फार सुखासमाधानाची बाब होती. तेंव्हा माणसे सकाळीच एकमेकांची विचारपूस करायची, सुखदुःखात सामील व्हायची, आपसातल्या नात्याला त्या काळात अपार महत्व होते. कदाचित म्हणूनच हा कालखंड भावगीतांचा सुवर्णकाळ ठरला असावा. भावगीतांच्या सुवर्णकाळातले चंदेरी अक्षरांचे अवीट गोडीचे प्रेमाच्या नात्याचे पदर हळुवार उलगडून दाखवणारे काव्य म्हणजे 'ऋणानुबंधाच्या जिथून...' हे गीत होय.

"ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तुष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती अधरी
त्या तिन्ही सांजाच्या आठवणी त्या प्रहरी
कितीदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मीच्या गाठी
कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधी धुसफ़ुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी."

भेटी-गाठी आणि नाती-गोती यांचे एक स्वर्गीय नाते असते, मात्र या नात्यातील वीण घट्ट असायला पाहिजे अन्यथा हे नातं अळवावरच्या पानावरील दवबिंदूसारखे अल्पायुष्यी अन क्षणिक तेजाचे ठरते. मात्र या नात्यातील आस्थेचे बंध ह्र्दयाच्या माळेतून गुंफलेले असतील तर ही नाती केवळ रक्ताची, मैत्रीची, प्रेमाची वा परिचयाची न राहता ती ऋणानुबंधाची नाती ठरतात. ज्याच्याशी आपले असे ऋणानुबंधाचे नातं असतं असा आपला माणूस जेव्हा आपल्याला भेटतो तेंव्हा तो आपल्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. भेटीची ती ठेव मर्मबंधाच्या कुपीत अलवारपणे प्रत्येक जण निश्चित जतन करतो, किंबहुना ऋणानुबंधाच्या ह्या भेटी आपल्याला आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत जीवनातील संकटाच्या हरेक घडीत आपलं जगणं सुसह्य करतात.

ऋणानुबंधाच्या गाठी कधीही कशाही पडल्या तरी त्यातील भेटीचा आनंद असीम, अवर्णनिय असतो. या भेटी हा जगण्याचा स्त्रोत होऊन जातात. पण याच आठवणी याच भेटी जर विरहात बदलल्या तर चित्त अस्थिर होते अन त्या भेटींची ओढ लागते, अशाच एका ऋणानुबंधाच्या भेटीची ओढ लागलेल्या अनामिक क्षणाचे अप्रतिम शब्दचित्र कवी बाळ कोल्हटकर यांनी रेखाटले आहे. या गोड भेटीच्या आठवणी रुसण्याच्या, हसण्याच्या, हसण्यातील रुसण्याच्या अन रुसण्यातील हसण्याच्या असतील वा सुखदुःखाच्या कोणत्याही क्षणाच्या असल्या तरी त्यात देखील एक विलक्षण सुख असतं असं हळवं प्रकटन कवी करतात ; त्याहीपुढे जाऊन ते म्हणतात की या आनंदाच्या क्षणावर, प्रेमाच्या रूसण्यावर, दुःखातही हसण्यावर प्रेम करण्यासाठीच जन्मजन्माच्या गाठी ठरून गेलेल्या असतात.

विशेषतः जर आपल्या जिवाभावाचा जन्माचा जोडीदार या ऋणानुबंधाच्या नात्याने गुंफला गेला असेल अन त्याची भेट एका तपानंतर होत असेल तर सर्व जुन्या आठवणी फेर धरून समोर उभ्या राहतात. कितीदा तरी आठवणींच्या या सागर किनारी आपण आपल्या नकळत ओढले जाऊन वाळूच्या त्या तटावर येऊन जातो, भेटीच्या त्या तिन्ही सांजेच्या रम्य आठवणीत मग मन कसे रमून जाते काही कळतच नाही. भले मग वास्तवातल्या भेटीगाठीत रुसण्यावाचून खचितच दुसऱ्या गुजगोष्टी घडल्या नसतील तरीही या भेटींच्या आठवणी सुखद वाटत राहतात, तिचं रुसणंदेखील मनोरम अन लाघवी वाटतं.

आठवणींच्या सागर तीरी बसून राहिले की प्रेमात गहिवरून गेलेल्या दग्ध क्षणांच्या भेटी वाळूत मारलेल्या रेघाप्रमाने विरून जातात. आपसातल्या दुराव्याचे, धुसफुशीचे, रुसव्यांचे क्षण नुसते आठवले तरी आपण त्यावर निरागसपणे हसतो. एकमेकावर प्रेम करण्यासाठीच आपण हे ऋणानुबंधाचे जन्म जन्मलेलो असतो अन त्यामुळेच कधी गट्टी जमली तरी हरकत नाही. कारण भेटींच्या त्या आठवणींची तृप्तता जीवन भर तृप्प्ती देत राहते. या भेटींची महिमाच अतीव अंतरहृदयीची आर्त मायेची अशी आहे. हे गाणं कोणीही कधीही कुठेही ऐकले तरी त्याच्या आठवणींची तार छेडली जावी इतकी आशयसंपन्नता यात आहे, शिवाय हे गाणं ज्या अप्रतिम गायकीने पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी पेश केले आहे त्याची जादूच काही और आहे. या गीताला वसंत देसाईजींनी संगीतबद्ध केलेलं आहे.

बाळ कोल्हटकरजी आणि वसंतराव देशपांडे  
बाळ कोल्हटकरांनी लिहिलेल्या या गीताला वसंत देसाई यांनी पहाडी रागात कुमार गंधर्वांच्या जादुई स्वरात गाऊन घेतले आणि मराठी शब्दसरस्वतीच्या चरणी एक अनमोल गीतरत्न अर्पण केले. हे गीत कोल्हटकरांनी देव दीनाघरी धावला या संगीत नाटकासाठी लिहिले होते. 'देव दीनाघरी…' हे नाटक चार दशकांपूर्वी रंगमंचावर आले आणि त्याला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, परंतु यातील गीतांनी जो इतिहास रचला त्याला सकल मराठी गीतांच्या विशेषतः भावगीतांच्या विश्वात कुठेच तोड नाही. ही गीते आजही तितक्याच तन्मयतेने ऐकली जातात. या गाण्यांवर आजही कानसेन मराठी श्रोत्यांचे तितकेच प्रेम आहे, ही गीते मराठी माणसाच्या नाळेशी जुळली आहेत असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण ते सत्य आहे. 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी' आणि 'उठी उठी गोपाळा… ' बाळ कोल्हटकरांची ही दोन्ही गीते या नाटकाने अजरामर झाली की या गीतांनी हे नाटक अजरामर झाले हे नेमके सांगता येत नाही, इतका एकजिनसीपणा या दोहोंचा एकमेकाशी झाला आहे.

वसंत देसाई 
'देव दीनाघरी धावला' जेंव्हा मंचावर आले नव्हते तेंव्हाच कोल्हटकरांनी वसंतराव देसाईंशी संपर्क करून ही गीते त्यांच्या हवाली करून टाकली. वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून ही दोन्ही गाणी अप्रतिम चाली लावून गाऊन घेतली. 'उठी उठी गोपाळा' ही भूपाळी भूप या रागातून गाऊन घेतली. 'अमरभूपाळी' या मराठी चित्रपटातली 'घनश्याम सुंदरा' ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. 'भूपाळी' म्हणजे 'घनश्याम सुंदरा' असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या 'उठी उठी गोपाळा' या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे. घनश्याम सुंदरा ही शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेली भूपाळी होती, आणि विशेष म्हणजे तिलाही वसंत देसाई यांनीच संगीत दिले होते. रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. 'केदार' रागातली 'हमको मन की शक्ती देना' ही त्यांची रचना ('गुड्डी' : वाणी जयराम आणि इतर) इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली होती. 'दो आँखे बारह हाथ' मधील त्यांनी संगीतबद्ध केलेल्या 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या प्रार्थना गीताला 'मालकंस' रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले. रागदारी संगीताला लोकाभिमुख करण्याबाबत वसंत देसाईंनी जे योगदान दिले आहे त्याची उचित गांभीर्याने दखल घ्यायला हवी. १९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकरांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. मुंबईतल्या एका अतिउंच इमारतीच्या लिफ्टच्या दारात अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

बाळकृष्ण हरी कोल्हटकर ऊर्फ बाळ कोल्हटकर (२५ सप्टेंबर १९२६ ते जून ३० जून १९९४) हे महाराष्ट्राचे लाडके नाटककार, कवी, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट, दिग्दर्शक होते. आजही ते मराठी नाटयसृष्टीतला एक मानबिंदू आहेत. बाळ कोल्हटकरांचा जन्म २५ सप्टेंबर रोजी सातारा येथे झाला. घरच्या परिस्थितीमुळे आणि शिक्षणाव्यतिरिक्त असणारया कलात्मक आवडींमुळे त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासूनच त्यांना नाटक पाहण्याची अतिशय आवड होती, या आवडीतूनच त्यांच्यावर नाट्यसंहितेचे अन काव्यात्मक लेखनाचे संस्कार झाले. नाटके पाहता पाहता त्यांच्यातला लेखक घडत गेला. यातून निर्माण झालेली आवड त्यांनी अखेरपर्यंत जोपासली. किशोरवयात त्यांनी लेखनास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.

चरितार्थासाठी १९४७ पर्यंत त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. त्या पश्चात मात्र त्यांनी लेखन हेच सर्वस्व ठरवून लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसायचे, त्यांची टिंगल करायचे पण बाळ कोल्हटकरांनी प्रेक्षकांची नस नेमकी ओळखलेली होती. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. बहुतांश वेळी त्यांची नाटके व काव्य हे शीतल, सौम्य व हळव्या अशा पद्धतीनेच प्रकट झालेले आहे.

त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्‍याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, 'मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. ज्येष्ठ गायक-अभिनेते उदयराज गोडबोले यांनीही देव दीनाघरी धावला'चे तब्बल तीनशे प्रयोग केले.

बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच 'सीमेवरुन परत जा', 'लहानपणा देगा देवा', 'देव दीनाघरी धावला', 'देणार्‍याचे हात हजार', 'उघडलं स्वर्गाचे दार' इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. पण नाटककर आणि अभिनेते या वलयातदेखील त्यांच्यातल्या कवीचे अस्तित्व टिकवून ठेवले. त्यामुळेच आजही त्यांची गीते मराठी रसिक आत्मीयतेने ऐकतात ही त्यांच्यावरील जनतेच्या प्रेमाची पावतीच होय.

ऋणानुबंधाच्या हे गाणं गाणारया वाणी जयराम या मुळच्या तामिळनाडूमधील वेल्लोरच्या. त्यांच्या मातोश्री पद्मावती ह्या रंगारामानुज अय्यंगार यांच्या शिष्या होत्या. पद्मावतींनी वाणीला सी.श्रीनिवास अय्यंगार, टी.आर.बालसुब्रमण्यम आणि आर.एस.मनी यांच्याकडे संगीत शिक्षणासाठी सुपूर्द केले. त्यांच्या गायकीने दक्षिण भारतीय भाषांसह उत्तर भारतीय भाषामधील गीते देखील सुखावली. वाणी जयराम ह्याना पाच बहिणी आणि तीन भाऊ होते, सहा बहिणींपैकी त्या पाचव्या होत. या मोठ्या कुटुंबाचे पालन पोषण त्यांच्या जन्मदात्यांनी कसे केले अन त्यांना जगन्मान्यता कशी मिळवून दिली हे देखील वाचण्याजोगे आहे. वाणी जयराम ह्यांचा पहिला कार्यक्रम मद्रास आकाशवाणीवर सादर झाला. त्यांनी हिंदुस्तानी गायकीसाठी उस्ताद अब्दुल रेहमान खान यांच्याकडे धडे घेतले होते.

'ऋणानुबंधाच्या...' या गाण्याचा उल्लेख यावा अन पंडित कुमार गंधर्व यांचा नामोल्लेख न व्हावा हे उचित नव्हे. पंडित कुमारगंधर्वांचे पूर्ण नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ असं होतं. ८ एप्रिल १९२४ रोजी जन्मलेल्या कुमारजींनी मराठी गीतसंगीताचा स्वतःचा अजरामर ठसा उमटवला आहे. पंडितजी हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते, त्यांनी विपुल प्रकारचे गायन केले आहे. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्याच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली. त्यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत. 'ऋणानुबंधाच्या.....' हे गाणं ऐकताना ऐकणारयाच्या मनचक्षुपुढे कुमारजींच्या तल्लीन झालेल्या भावमुद्रा डोळ्यापुढे तरळत राहतात, इतके ते या गाण्याशी एकजीव झालेले आहेत.

आजही कधी हे गाणं कुठे ऐकले की हरवलेलं ते बालपण अन ते रम्य दिवस डोळ्यापुढे तरळत राहतात अन नकळत पापण्या ओल्या होतात.

- समीर गायकवाड