बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - अकराव्या लेनमधली सावित्री ..



अकराव्या लेनमधली सावित्री मेली
तिच्या तिरडीचे सामान आले आणि
जगाने रांडा ठरवलेल्या तिच्या सगळ्या पोरीबाळींनी एकच गलका केला.
बांबूंचे तुकडे बांधून त्यावर कडब्याचे पाचट अंथरले गेले.
सावित्रीची अखेरची अंघोळ सुरु झाली,
पारोशा अंगाने विटाळल्या हाताने तिच्यावर पाणी ओतले जात होते.
पाण्यासोबत बायकांचे अश्रू मिसळत होते.

सगळ्या खिडक्या दारं, सगळे सज्जे, सगळ्या आडोशात
जिकडं पाहावं तिकडं पाणावल्या डोळयाच्या धुरकट बायका उभ्या होत्या.

सावित्रीचे डोळे स्वच्छ चोळले गेले, तिच्या स्वप्नांना धक्का न लावता.
सावित्रीच्या डोळ्यात मासे राहत असावेत असे वाटे,
इतके ते मासुळी पाणीदार होते.

आयुष्यभर सुखाच्या प्रतिक्षेत झुरून थिजलेल्या दगडी डोळ्यांवर
आयलायनर लावताना तिच्या पापण्या हलल्याचा भास झाला.

कित्येकांनी चावलेल्या, कित्येकांनी कुरतडलेल्या
तिच्या चरबटून गेलेल्या ओठांवरून बोटं फिरवताना
बारा वर्षाची समरीन धाय मोकलून रडू लागली.
सलमाने तिला बाजूला घेताच ती पुन्हा सावित्रीकडे झेपावली.

छाती ओघळलेली, पदराचे पाच तुकडे झालेली म्हातारी करुणा पुढे झाली
थरथरत्या हाताने तिने सावित्रीच्या कपाळावर गोलाकार कुंकू लावले
मखमली केसांत सिंदूर भरला
उरलेलं कुंकू आपल्या भाळी लावत तिने छाती पिटून घेत सावित्रीचा पुकारा सुरु केला!

सावित्री मेकअप करून लायनीत उभी असतानाही कुंकू लावे,
आरसा न बघता एकदम आखीव रेखीव गोल!

शारदेने तिच्या मस्तकात हळदीचा मळवट भरला
आणि त्यावर आपलं कपाळ घासलं.
तिनं फोडलेला टाहो आभाळाला भेदून
कथित स्वर्गस्थ देवतांच्या कानात तप्त शिशासारखा घुसला.

सारी गल्ली शहारून गेली
रांडांनासुद्धा काळीज असतं याची अष्टौप्रहर अनुभूती घेणाऱ्या तडकल्या भितींवर शहारे आले.

मल्लव्वाने तिच्या बापाने दिलेलं चंदन उगाळून तिच्या तळपायाला लावलं,
थोडं तळहातालाही लावलं.
चंदनाची सहान आपल्या माथ्यावर बडवत ती मूक झाली.

सावित्रीच्या गळ्यात गिलटाचे गंठण अन हातात बिलवर चढवून झाले.
सावित्रीचा गळा गोड होता, यल्लम्माची आराधना असो वा ठुमरी ती जीव लावून गाई.
तिचे लांबसडक मऊ हात उशीसारखे वाटत.

मस्करा लावून झाला, रूज लावून झाले.
सावित्रीच्या दोन्ही नाकपुडयात कापसाचे बोळे घालून झाले.

तिच्या कानातून येणारे रक्त पुसतच बिल्किसने तिला झुबे घातले.
सावित्री दारापाशी उभी असली की,
ते झुबे असे काही हेलकावे खात की कलेजा खल्लास व्हावा!
आताही तिचे दर्शन घेताना बायांचा धक्का लागला की ते झुबे हलत
आणि सावित्री जिवंत असल्याचा भास होई.

सावित्रीच्या जबडयातून आता हलकेच रक्त वाहू लागले होते,
तिची लिपस्टीक अधिकच डार्क रेड वाटत होती.
बायकांच्या हालचालीमुळे जबडा हलला की
तिचे पुढेमागे असलेले पिवळेपांढरे दात मधूनच नजरेस पडत होते.
शेवटी चंद्रीने तिचा जबडा दोरीने मानेला बांधला
जबडा बांधून होताच आपल्या गालफटात मारून ती फरशीवरल्या पाण्यात लोळू लागली.

सावित्रीला हिरवी साडी नेसवून तिरडीवर झोपवले गेले.
हिरवा चुडा भरायचे तिचे स्वप्न तिच्या कलेवराने पुरे करून घेतलं!

तिच्या हाताची घडी घालताना सगळ्या नवख्या पोरींनी इतका आक्रोश केला की
गल्लीच्या कोपऱ्यावर असणाऱ्या पिंपळावरचे
सर्व कावळे आभाळात झेपावत कावकाव करू लागले.
तिची सळसळणारी बोटे एकमेकात गुंतवली गेली
हीच बोटे तलम केसातून फिरवी तेंव्हा ती जादुई वाटत
तिने नुसतं ओठावर बोट ठेवलं तरी 'ती' आग विझे !

शिव्या देणारं, भांडणारं, सवाल करणारं तोंड पानविडयांनी झाकलं गेलं.
"क्यों आता है इधर? रंडी का कोई भाई नही होता है ?"
असं म्हणत राखी देणारं आता कुणी उरलं नव्हतं.

भेगाळल्या पायांच्या थकल्या बोटांत जोडवी चढवली गेली,
घुंगरांचे पैंजण घातले गेले.
सावित्री नाचायची फार छान; तिचे चाळ ठसक्यात वाजायचे
तिचे पाय दुमडून ठेवले गेले.
पायाचे अंगठे बांधले गेले, पावलांवर कुंकवाची नक्षी आरेखली.

शववाहिकेचा ड्रायव्हर नाकाला रुमाल लावून घाई करू लागला होता.
अचेतन सावित्री निपचित पडून होती.
तिच्या तिरडीतून आता रक्त ठिबकू लागले होते.

तिची अखेरची आरती झाली, सर्वांनी तिचे दर्शन घेतले,
चुरगाळलेल्या सावित्रीवर मुरगळलेली फुले अर्पिली

आणि बायकांनीच तिची तिरडी शववाहिकेत उचलून ठेवली.
सगळीकडे हुंदक्यांचा आक्रोश सुरु होता.
शववाहिकेच्या मागे रडणाऱ्या बायकांचा लवाजमा घेऊन तिचा अखेरचा प्रवास सुरु झाला.
रस्त्यावरच्या रहदारीतले बेजान लोक अवाक होऊन हे दृश्य पाहत होते.

त्यातही कुणी अधाशी नजरेने बायकांना न्याहाळत होते,
पदराआडचे काही दिसते का यासाठी तडफडत होते !

वेदनांचा तो जथ्था स्मशानात पोहोचला.
प्रेत सरणावर ठेवण्याआधी तांत्रिकाने विचारले,
"मयताचे पाय, डोके फिरवायचे काय ?"

एकजात साऱ्या किंचाळल्या, "नाही !
तिला परत येऊ द्यात,
आमच्यावर 'चढणाऱ्यांवर' ती चढेल !
ती फार लढाऊ होती, तिच्या स्वाभिमानानेच तिचा जीव गेलाय.
तिच्या प्रत्येक जखमांचा हिशोब घेण्याची ताकद आमच्यात तर नाही किमान
मेल्यावर तिला ते करता आले तरी चालेल."

अंगावरच्या खऱ्याखोटया दागिन्यांसह सावित्रीचे सरण धडाडून पेटले..

त्या दिवशी गल्लीतल्या सगळ्या बायका उपाशी राहिल्या,
कुणीही लेप चढवले नाहीत की शृंगार केले नाहीत.

सावित्रीच्या जन्म-मरणाचे साळसूद गुन्हेगार पावलोपावली आहेत,
गल्लोगल्ली आहेत
घराघरात आहेत
षंढ व्यवस्थेत आहेत
बेगुमान जनमानसातही आहेत
गीतेत आहेत, कुराणात आहेत
बायबलमध्ये आहेत, ग्रंथसाहिबमध्ये आहेत
मुकाट राहणाऱ्या भयग्रस्त पांढरपेशी बायकांच्या झापडबंद काळजात आहेत
पुरुषी वर्चस्वाच्या पशूतुल्य लिंगपिसाट समाजात आहेत
तुमच्यात आहेत
माझ्यात आहेत
तमाम मानवी नरांच्या लूत भरलेल्या जननेंद्रियात आहेत
इथल्या अणूरेणूत आहेत
आणि
आदिमायेच्या थिजलेल्या मुठीत आणि शिवलेल्या ओठांतही आहेत.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा