शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

'अमृततुल्य'....



चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच! नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय! चहा म्हणजे भारतीय जनतेचा हळवा कोपराच जणू! हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत. त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणाऱ्या गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच! त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असे. शेजारी ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या पातेल्यातलं पाणी, चहाच्या ऑर्डरनुसार एका ओगराळयाने त्या पातेल्यात आधणासाठी ओतत असे. झाकणं काढून ठेवलेल्या डब्यातली चहा साखर, चमचाने काढून डाव्या हाताच्या तळहातावर खोलगा करून ओतून घेई आणि फक्कन पातेल्यात टाकत असे. बऱ्याचवेळा त्या पातेल्यात चहा पावडरीची पखरण होत असताना तिचा तरतरीत वास डोक्यात असा काही घुमे की, काही क्षणासाठी दार्जिलिंगमधल्या चहाच्या मळ्यात उभं राहिल्यागत वाटावं.

त्याच्या चहा पावडरचे ब्लेंड कुठले हे त्याने कधी सांगितले नाही. त्याला गावातल्या वाण्याच्या दुकानात चहा पावडर खरेदी करताना देखील कुणी पाहिले नव्हते. त्यामुळे तो नेमका कोणता चहा वापरतो हा एका 'चहापार्टीचा' विषय असे! त्याने टाकलेली चहा पावडर काही वेळ आधणलेल्या पाण्यावर तरंगत राही, मग त्यातून एकेक रेष सुटून पाण्यात विरघळावी तसे काळपट चॉकलेटी धागे निसटत जात. चहाच्या कणांच्या रेषा रेषा अलगद बाजूला होऊ लागत असत आणि पाण्यात आपलं सत्व अर्पण करत असत. धुराची वलये हवेत तरंगावी तशी ही वलये पाण्यात दिसत. आपला रंगाचा, वासाचा, चवीचा अहंकार त्या कणांनी हलकेच सोडून दयावा आणि पाण्याने तो मोठ्या अप्पलपोटेपणाने आपल्यात साठवावा असं हे चहाकाम चाले! असो. त्याच्या चहा साखरेची घुसळण होताच, हळूहळू ते मिश्रण तापायला सुरुवात होई. एकीकडे पितळी पातेल्यात गुडगुड आवाज करत चहाला उकळी येई; दरम्यान त्याचवेळी त्याच्या तोंडाची टकळी चालू असे. चहाला उकळी येत असताना जर्मनच्या एका लांब पट्टीने पातेल्याच्या कडेला चिटकून राहिलेल्या चहा पावडरीचा त्या उकळत्या मिश्रणात कडेलोट करून टाके. त्याच्या लोभस कृतीचा मोह पडून मीही घरी जर्मनची पट्टी आणून पाहिली होती आणि चहा पावडरीशी खेळ केला होता, माझा सारा चहाच पातेल्यासकट पालथा झाला होता! चहा घुसळण्याच्या या पट्टीचे नेमके कार्य काय हे विचारण्याचे धारिष्ट्य मी एकदोन वेळा दाखवले होते पण एखाद्या मुरलेल्या न्यायाधीशाने एखादी चिल्लर 'जनहित याचिका' निकालात काढावी तशी त्याने माझी उत्सुकता 'पट्टीवर' मारली होती!

त्याच्याजवळ चहाची तलफ आली म्हणून आपण गेलेलो असलो की, त्यादरम्यान हमखास आपल्या ओळखीचा कुणी ना कुणी सोम्या गोम्या आपल्याला हटकून शोधत तिथं आलेला असे. त्याला देखील तिथल्या तरल चहामय वातावरणात 'फुकटच्या' चहाची उत्कट तलफ न आल्यास त्यात नवल ते काय?
मग गणूला 'आणखी दोन कप टाक रे' असं फर्मान निघे, तो हसत हसत बोले - 'बाप्पू, मला आधीच माहितीय... मी चार कप जास्तीच टाकलेय!"
त्याने असा म्हणायचा अवकाश की "काय चाललंय मंडळी! जरा आमाला पण बोलवत जावा की!" असं म्हणत म्हणत आणखी दोघे तिघे 'घुसगेम' करत असत! आता गणूचे लक्ष्य आमच्यावरून हटलेले असे. त्याच्या पुढ्यात येऊन उभ्या असलेल्या दुसऱ्या 'पार्टी'ची तो आस्थेवाईकपणे चौकशी सुरु करे. त्याचे प्रश्न ठरलेले असत पण त्यात मायेचा ओलावा असे, धंद्याची लाचारी त्यात नसे. एखाद्या रक्ताच्या नात्यातल्या माणसाचे क्षेमकुशल जाणून घ्यावे तसे त्याचे हे संभाषण चाललेले असे.
"ताई गावावारून आली का? कसं चाललंय तिचं? आण्णा लई दिस झालं भायेर दिसलं न्हाईत, समदं ठीक हाये ना? काकू काय म्हणत्येत? त्यांनी माज्या हातचा च्या पिऊन माइंदळ वखत झालाय, लक्कनची शाळा कशी चालू आहे? मंदी दिसभर घरात काय करती? किती दिसाची रजा काढलीय? तब्येत वाईच वंगाळ झाल्यागत वाटतीय, खानावळवाल्याला आपल्या गावाकडचं माळवं घेऊन जावा मग बघा त्येच्याच तोंडाला पाणी सुटंल! आपल्या मंडोदरीची वेत झाली का? काय झालं वासरू का रेडी? ....... "
या संभाषणातील त्या कथित ताईने गणूच्या लहानपणी एखादी शेवकांडी हाती दिलेली असे, तिची माया अजूनही याच्या काळजात तशीच टिकून असे. तर अण्णा म्हणजे त्याच्या वडिलांचे मैत्र ज्यांनी त्यांना कधी काळी खूप मदत केली होती, काकू म्हणजे वरच्या गल्लीतली पाठीला बाक आलेली खाष्ट म्हतारी जी सगळ्या गावाच्या पोटपाण्याची चिंता करी, लक्कन उर्फ लखन हा त्याचा शाळेतला बालमित्र, तर मंदी उर्फ मंदा म्हणजे कधी काळी जिच्यासाठी त्याच्या जीवाला पिसं लागत, मंडोदरी म्हणजे अण्णाची जुनी म्हैस जिचं निरसं दुध टपरीवर पोहोच होत असे! पुनश्च असो!

सरतेशेवटी त्याच्या समोरच्या गप्पिष्ट माणसाला दोनेक कुळांनी गाठलं की तो तिसरीकडे वळे. अशा प्रकारे दिवसभरात अनेक लोकांची सुखदुःखे जाणून घेत राही, त्यांच्या भावभावनांत सामील होत राही. ते हसले की याच्या गालावर खळी पडे आणि त्यांचे चेहरे रडवेले असले की याचे डोळे भरून येत.
एव्हाना त्याने चहात आणखी चार कप पाणी ओतलेले असे. चहाला जोरात उकळ्या फुटलेल्या असत. म्हादबाने दिलेल्या निरशा दुधाचे पातेले तो हातात घेऊन हलवत राहायचा. तो दुध का हलवत असे ते नेमकं कधी उमगलं नाही, त्याचे पातेले हलवणे एका हाताने सुरु असे. दुसऱ्या हाताने गाळणी चहात बुडवून उकळ्यांना खाली ढकलण्याचे काम सुरु असे.
चहाच्या तलफेने, तिथल्या घमघमाटाने समोरचा माणूस एव्हाना हैराण होऊन गेलेला असे -
"आरं दे की लेका, कपभर चहासाठी दिसभर थांबवतो का काय?"
असं म्हणायचा अवकाश की कधी काळच्या पांढऱ्या रंगातल्या नि आताच्या विटकरी रंगात विरून गेलेल्या एका ओलेत्या फडक्याने तो ते पातेले स्टोव्ह वरून खाली उतरवी. पालथे घालून ठेवलेले छोटे काचेचे ग्लास सरळ करून ठेवी. पातेल्यातला चहा शेजारी ठेवलेल्या किटलीत ओतला जाई, या किटलीचे तोंड एका चॉकलेटी कपड्याने किंचित गच्च बांधून ठेवेलेले असे, हळूहळू पातेल्यातला चहा किटलीच्या पोटात जाऊन विसावा घेई! किटलीचे निमुळते होत जाणारे तोंड आणि हत्तीची सोंड मला लहानपणा पासून सारखीच वाटत आलीय, असं का वाटायचं ते मात्र माहिती नाही!

देवापुढे उदबत्ती लावताना चेहऱ्यावर जे तन्मयतेचे भाव असतात तेच भाव गणूच्या चेहऱ्यावर किटलीतला चहा ग्लासात ओतताना असत. नाही म्हणायला त्याच्या दुकानात देवांच्या एकदोन तसबिरी आणि दर्शनी भागात शिवाजी महाराजांची एक फ्रेम होती, या सर्वांना तजेलदार फुलांचा हार घातलेला असे. एका कोपऱ्यात काळे पडलेले कॅलेंडर दीनवाण्या तोंडाने लटकत असे. आत काटकोनात ठेवलेली दोन बाकडी, एक पाय तुटलेला लाकडी स्टूल आणि लाल रंगाचा विटून तपकिरी रंगाचा झालेला मळकट प्लास्टिकचा स्टूल हे त्याचे फर्निचर!
टपरीबाहेरच्या बाकड्याचे पोट मधोमध खोल गेलेले होते. खेरीज एका कोपऱ्यात त्याला बाक आला होता. त्याला लागून झाडाचा भलामोठा बुंधा टेबलागत ठेवलेला असे! त्याला बघितलं की हटकून खाटकाच्या दुकानातलं खोड आठवायचं ज्यावर सत्तूरच्या असंख्य रेघा उमटलेल्या असत.

गणूच्या टपरीत चहा पिणारी माणसंच बसत असे काही नव्हतं, चकाट्या पिटणारी माणसं देखील तिथं बसून जगाच्या पाठीवरच्या तमाम विषयाच्या कंडया पिकवत असत. गणू जेव्हा चहाचे ग्लास हातात देई तेव्हा त्याच्या समोरच्या काचेच्या बरण्यात ठेवलेली गोल चौकोनी चपटी बिस्किटे, पाण्याची बाटली यावर साऱ्यांची नजर जाई. चारेक बिस्किटे चहाबरोबर कधी फस्त होऊन जात काही कळत नसे. 'चहा'बरोबर 'अटळ' असणाऱ्या या गप्पाष्टकामुळेच कदाचित 'चहाटळ' शब्द आला असावा असं मला राहून राहुन वाटतं. गणूच्या बडबडया स्वभावामुळे तो दिवसभर एकाच जागी असूनही त्याला सगळ्या गावाची खबरबात असे. पण तो कधी ह्या कानाची चुगली त्या कानाला करत नसे. दुपारी वर्दळ कमी झाली की तिथंच बसून चार घास खाऊन घ्यायचा, सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्रीचे सात आठ वाजेपर्यंत उभं राहून त्याचे पाय कसे दुखत नसत ह्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच गवसले नव्हते.

गणूच्या टपरीपाशी उभं राहून अनेकांनी जमिनीचे सौदे निश्चित केले, काहींनी भांडणे मिटवली, काहींची 'स्थळे' तिथं जमली, तर एखादी माहेरवाशिन सासरी जाताना त्याला सांगून गेली की 'गणू माझ्या आबांकडे लक्ष दे बाबा, त्यांना आता सुधरत न्हाई न मायचं वय झालंय", कुणी तरी तालुक्याच्या गावात शिकायला असणाऱ्या मुलाचा जेवणाचा डबा तिथं आणून ठेवलेला असे, कुणाचं तरी खताचं चुंगडं येऊन पडलेलं असे, कुणी तरी सोयऱ्या धायऱ्याना देण्यासाठी तिथं पत्रिका आणून ठेवलेल्या असत, कुणाच्या तरी बस्त्याला जाताना तिथं जमायचा सांगावा कुणी तरी दिलेला असे, कधी एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी तिथं गावातली म्होरके लोकं गोळा झालेली असत तर कधी पुढारी लोकं 'आपली माणसं' घेऊन आलेली असत. तर कधी कधी कुणाची मयत झाली तर त्याची आठवण काढता काढता डोळ्यातल्या पाण्याबरोबरच इथला चहा खारट होऊन जाई कारण त्यात गणूचेही अश्रूभाव सामील असत!

गणू आठ वर्षाचा असताना त्याचे वडील चहाच्या टपरीकडे येताना एसटीखाली आले आणि त्यातच त्यांचे श्वास थांबले. गणूने शाळा सोडली, आईचे डोळे पुसले. कुटुंबाचं सारं ओझं आपल्या चिमुरड्या खांद्यावर घेतले. त्याच्या भावकीने आधी त्याची टिंगल उडवली पण त्याने नेटाने आपली टपरी सुरु ठेवली. त्याची शाळा अर्ध्यातच सुटली पण त्याने लहान भावाला मात्र शाळेच्या ओढीत गुंतवून ठेवले. सगळ्या गावाला त्याच्या टपरीचं नि त्याचं इतकं अप्रूप होतं की गावात सगळे धंदे व्यवसाय दोनाचे दहा झाले पण लोकांनी दुसरी चहाची टपरी होऊ दिली नाही! लोकांचे त्याच्यावर प्रेम होते आणि आहे! त्याचेही गावातल्या तमाम लोकांवर अपार प्रेम आहे म्हणूनच त्याच्या चहात या अमृताहून गोड अशा प्रेमाची चव उतरली असावी.

त्याच्या सदोदित हसमुख चेहऱ्याकडे बघताना कधी जर कुणी आपल्या तथाकथित अफाट भौतिक सुखांची त्याच्या तोकड्या साधनसंपत्तीशी तुलना केली तर या मोजदादीत त्याच्यापुढे तो सपशेल हारत असे! याचं रहस्य गणूच्या अवीट गोडीच्या स्नेहार्द्र चहाच्या व्यवसायात नव्हतं, तर त्याच्या वाणीतील अमृतात होतं, त्याच्या हृदयातील अमृताहूनी गोड अशा मधाळ ममतेत होतं, त्याच्या अद्वितीय संवेदनशीलतेत होतं आणि त्याच्या मनाच्या अतुलनीय श्रीमंतीत होतं. मानवी चैतन्यशीलतेतील हा 'अमृततुल्य' मर्मबंध खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. आजकाल चहा सर्वत्र मिळतो मात्र गणूसारखी माणसं दुर्मिळ झालीत!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा