Friday, August 11, 2017

'आई'ची कविता आणि महाकवी नामदेव ढसाळ....आई गेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते दुःख याचं आहे, की अज्ञानाच्या घोषा आत तिने आयुष्याच्या वाटाघाटी केल्या गाव सोडताना ती तिथेच ठेऊन आली मरीआईचा गाडा. विस्थापित होऊन बाप आगोदरच धडकला होता शहरात आई शहरात आली देहाचं झाडवान घेऊन ; कष्ट, खस्ता उपसल्या भोगल्या तिने तरीही तिचा अद्भुताचा शोध चालूच होता तिच्या देहातली वाद्य अशी झंकारत रहायची बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा ,रक्तबंबाळ व्हायचा चिक्कार पाहिलं भोगलं आईनेही शहरातही तिने तवली मध्ये अन्न शिजवलं पैठणीचे रंग न्याहाळता न्याहाळता जुनेराला ठिगळ लावलं बापाआधी मरून तिने असं अहेवपण जिंकलं बाप अजूनही खुरडत खुरडत मरणाची वाट पाहतो आहे आई आगोदर बाप मेला असता, तरी मला त्याचं काही वाटलं नसतं दुःख याचं आहे, तोही तिच्या करारात सामील होता दोघांनीही दारिद्र्याचे पाय झाकले लक्ष्मी पूजनाला दारिद्र्य पूजलं प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली स्वतःच्या छोट्या विश्वाचा उलगडा झाला नाही आईला आभाळाकडे हात करून ती म्हणायची, त्याच्याशिवाय साधं झाडाचं पानही हलत नाही...

आईच्या नातवाला पृथ्वीचा आकार तरी कळला आहे... विजा का चमकतात? पाउस का पडतो? तो सांगू पहायचा आजीला, माझ्या येडपटा, म्हणत ती त्याच्या पाठीत धपाटा टाकायची बाबा नियंत्याची अशी चेष्टा करू नये म्हणायची, तिला हे जग, गैबान्याची शाळा वाटायची ती म्हणायची, पृथ्वी म्हणजे त्याने अंथरलेली लांब चादर आहे तिला आदी नाही अंत नाही... उन - सावली सर्व त्याच्या इच्छेचाच खेळ म्हणायची आई मेली याचं दुःख नाही प्रत्येकाचीच आई कधी ना कधी मरते महाकवी नामदेव ढसाळ हे माझे आवडते कवी. त्यांच्या कवितांच्या ओढीने मला कवितेची गोडी लागली. त्यांच्या प्रत्येक कवितेत जगण्याचे नवे संदर्भ नव्या जोमाने समोर येत राहतात. त्यांची कविता मनाला झोंबाडून काढते, दुःख वेदनेचे हुंकार ते रडक्या तोंडाने कण्हत कुथत प्रकट करत नाहीत, ही त्यांच्या कवितेची जमेची बाजू ! विद्रोह विद्रोह म्हणजे तरी काय असतो, तर तो ढसाळांच्या कवितेतला तप्त लाव्हा असतो जो शोषितांचे गीत बनून त्यांच्या दग्ध ओठांतून बाहेर पडत असतो.

आपली आई गेली याच दुःख आपल्याला झाले नाही असं सांगणारे ढसाळ आपल्या नकळत त्यांच्या आईशी आपला परिचय करून देतात. तिची स्वभाववैशिष्ट्ये ते सांगतात, तिच्या गुणदोषावरही लिहितात. हे जग तिला गैबान्याची शाळा वाटायची असं ढसाळ सहज म्हणतात पण तिला तसं का वाटायचं याचं उत्तरही ते कवितेत देऊन टाकतात. तिच्या देवभोळेपणाची ते टिंगल उडवत नाहीत मात्र त्याचा उपहास करून त्यातले मर्म समोर आणतात. पृथ्वी म्हणजे देवाने अंथरलेली लांब चादर आहे असं सांगणारया आईचा भाबडेपणा ते आपल्या समोर आणतात असे नव्हे तर आईच्या मेंदूत घर करून राहिलेल्या खुळ्या कल्पनांच्या ठिकरया उडवतात. ईश्वराच्या मर्जीशिवाय पानही हलू शकत नाही या दांभिक वाक्याचा ते समाचार घेतात, ऊन सावली हा ईश्वरी इच्छेचा खेळ कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या मनात हळूच उपस्थित करतात. पृथ्वीला सुरुवात नाही, अंत नाही यातला फोलपणा ते दाखवतात. आपल्या चिमुरडया मुलाला कळते की वीजा का चमकतात, पाऊस का पडतो कारण त्याने शिक्षण घेतले आहे, विज्ञानाची कास धरली आहे. आई अशिक्षित आहे तिच्या डोक्यामध्ये अशा खुळचट कल्पनांनी ठाण त्यामुळेच मांडले आहे. तरीदेखील आई आपल्या नातवाचे खुलासे ऐकून घेत नाही कारण आपलं आयुष्य अशा विचारांच्या नादी लागून बर्बाद करून घेतलं आहे. याचा सल ढसाळांच्या मनात आहे त्यामुळेच उद्विग्न होऊन ते आई मेल्याचं दुःख नाही असं म्हणतात.

ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर…केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ ला पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

अशा या नामदेवाची माता शहरात राहायला येते मात्र तिच्या नसानसांत भिनलेले ग्राम्यत्व, दलितत्व, दैन्य, दास्यत्व काही बदलत नाही, 'ते जैसे थे'च राहतं ! ती अशी का राहिली याचं स्पष्टीकरण ढसाळ मोठ्या खुबीने देतात. 'अज्ञानाच्या घोषा'आड आई जगत गेली असं ते लिहितात. माणसे जयघोष करत असतात अन त्यावर दुसरेच कोणीतरी आपली पोळी भाजून घेत असतात, अनुल्लेखाने ढसाळ इथे पोथ्या पुराणांतील मंत्रोच्चारांना फटकारे मारतात. त्यातल्या तिने बरी केलेली गोष्ट म्हणजे मरीआईचा गाडा तिने गावाकडेच मागे ठेवला होता. मात्र यावरदेखील सूचक भाष्य करताना ढसाळ म्हणतात,"तरीही (शहरात येऊनही) तिचा (आईचा) अद्भुताचा शोध सुरूच होता !"

आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या आईच्या देहाचे चिपाड झाले होते हे सांगण्यासाठी ढसाळ आपल्या आईला झाडवानाची उपमा देतात तेंव्हा आपल्याही पोटात कालवते. 'इतकं होऊनही तिच्या देहातलं वाद्य ती झंकारायची' अशा प्रकारची काव्यपंक्ती केवळ ढसाळच रचू शकतात. कारण ते या सर्वांकडे तटस्थ नजरेने बघू शकतात, मग ते आपले आईबाप असले तरी बेहत्तर. मात्र सत्याची लक्तरे ते वेशीवर चिंध्या चिरगुटे करून लटकावतात, यासाठी आपली तथाकथित अब्रू वा नावलौकिक असल्या गोष्टींची तमा ते बाळगत नाहीत. आई आधी बाप मेला असता तरी काही फरक पडला नसता असं ढसाळ निराशेतून वा क्रोधांमुळे लिहितात असे नव्हे तर त्यांना आपल्या बापाबद्दलही तितकीच तिडीक आहे ज्याची ते लपवाछपवी करत नाहीत. 'अठरा विश्वे दारिद्र्यात काढणारया आईने कधी नवी लुगडी नेसली नाहीत की कधी पोटभर अन्नाचा घास तिला मिळाला' हे सांगताना ढसाळ खिन्न व मलूल होऊन जात नाहीत. 

त्यांचा आवेश हा प्रस्थापितांच्या दुबळ्या विचारांना उघडे करणारया निर्भीडतेचा आहे. 'आपला बाप तसा खाटीकखान्यातला कसाईच होता प्रत्येक रात्री जनावरांचे सोललेले देह वहायचा रक्तबंबाळ व्हायचा' असं मन सुन्न करणारं वर्णन ते करतात. आयुष्यभर केवळ नानाविध भोग भोगलेल्या आईने केवळ एकच गोष्ट जिंकली ती म्हणजे बापाआधी जाऊन तिने मिळवलेले अहेव मरण ! खोल काटा रुतावा असं हे वर्णन काळजात रुतत जातं.. खुरडत खुरडत जगणारा बाप मरणाची वाट बघत जगतोय असं अगदी निर्विकारपणे ढसाळ लिहितात कारण त्यांना बापाची चीड आहे. त्याची दया यावी असं काही घडलं नाही असं ते नमूद करताना म्हणतात की, "आईच्या अज्ञानाच्या करारात बाप सामील होता, त्याने कधी तिला त्यातून बाहेर काढले नाही अन स्वताःही त्यातून बाहेर निघाला नाही याची त्यांना चीड आहे. घरात दारिद्र्य असूनही तो लक्ष्मीपूजनच करत राहिला याचे शल्य त्यांच्या मनात डाचते.

आई गेली तेंव्हा दिवाळी होती अन बापाने कधी ज्ञानाचे दिवे लावलेच नाहीत या भावनेतून ढसाळ लिहितात की."प्रत्येक दिवाळी ही माझ्यासाठी अशी एक एक पणती विझवत गेली !" ढसाळ केवळ आपलं दुःख समोर मांडतात असे नव्हे तर त्यांच्या दुःखाशी आपल्याला अवगत करतात. त्यातला टोकदारपणा शब्दांची धार लावून आपल्या काळजाच्या आरपार करत राहतात. यामुळे ढसाळांच्या कविता वाचताना त्यांच्या भावभावनांशी आपण एकरूप होऊन जातो अन ढसाळ जे जगले त्याच्या दृकश्राव्य कल्पना करू लागतो. ढसाळांच्या कवितेचे हे आगळेवेगळे यश समीक्षक त्यांच्या पदरात मुक्तहस्ते टाकताना कधी आढळत नाहीत. आईच्या थोरवीची महती गाणाऱ्या, तिच्या चांगुलपणाच्या गुण गाणारया, तिच्या श्रेष्ठत्वाची गाथा सांगणारया अनेक कवितांना मराठी साहित्यात अफाट प्रसिद्धी मिळाली पण आई मेल्याचे दुःख वाटत नाही असं टोकदार नागडे सत्य मांडणारया ढसाळांच्या या कवितेस तितका लोकाश्रय मिळाला नाही. असे का झाले असावे ? याचे उत्तर कवितेच्या विद्रोही बाण्यात आहे.

बोजड, बोथट, निरुपयोगी अशा रूढी, परंपरा, संकेत यांची जीर्ण वस्त्रे फेकून देऊन ही कविता अंगावरच्या खोल भळभळणारया जखमा सार्वजनिक करते तेंव्हा अपराधी मनाला कुठे तरी टोचणी लागून राहते. टोचणारे विचार आपल्या पचनी कसे पडतील या न्यायानेच या कवितेला लोकप्रियतेचे तकलादू मापदंड लावून पाहिले की वरील प्रश्नाचे उत्तर मिळते. कारण आपल्याला आवडेल,पटेल असं लिहिलेलं वाचण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. गुलछबू गिर्रेबाज कबुतरे सर्वांनाच भुरळ पाडत असतात पण मरणाचे सत्य सांगणारी गिधाडे कोणाच्याही गावी नसतात ! ढसाळांच्या कवितांतील सत्याची गिधाडे आपला करकचून चावा घेतात तेंव्हा आपल्या संवेदना जिवंत आहेत की मर्त्य झाल्या आहेत याचा आपसूक अंदाज येतोच.... 

- समीर गायकवाड