
‘स्नेहगाथा’ या पुस्तकामधून बा. भ. बोरकर वेगळ्याच स्वरुपात वाचकांसमोर आले होते. त्यास अनुसरून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी अनौपचारिक गप्पाष्टक साकारताना बोरकरांनी आपल्या लेखन प्रयोजनाबद्दल आणि लेखनप्रकृतीबद्दल भाष्य केलं होतं. अगदी तरल मनमोकळ्या शब्दांत ते व्यक्त झाले होते. बोरकर म्हणतात की, "त्याकाळी स्वत:च्या पत्नीशी आणि स्वत:च्या घरातदेखील पांढरपेशा माणसाला मनमोकळेपणानं शृंगार करता येत नसे. एवढंच काय, आपल्या मुलाचा मुकाही वडील माणसांसमोर घेता येत नसे. त्यामुळं या समाजाचा सारा शृंगार चोरूनच व्हायचा. शृंगार- मग तो घरातला असो की घराबाहेरचा असो, त्याबद्दल उघडपणं बोलणं हे अशिष्ट समजलं जात होतं. जो खालचा समाज म्हणून गणला गेलेला होता त्याचं जगणं-वागणं आमच्यासारखं दांभिक नीतीनं ग्रासलेलं नव्हतं. आमच्या मानानं तो समाज कितीतरी मोकळा आणि म्हणूनच धीटही होता. त्यामुळं त्यांच्या लावणी वाङ्मयातला जातिवंत जिवंतपणा आपणाला जिव्या सुपारीसारखा झोंबतो. आमची सुपारी वाळलेली आणि पुटं चढवून मऊ केलेली. त्यामुळं त्यावेळचा आमचा प्रेमकवी राधाकृष्णाचा आडोसा तरी घ्यायचा किंवा प्रेमाच्या शिष्टमान्य कल्पनांचा आपल्या खर्या भावनेवर साज चढवून तिचा तोंडवळा कवितेत लपवून टाकायचा. माझ्या विधानाची सत्यता तुम्हाला पडताळून पाहावयाची असेल तर आपल्यातील चांगल्या कवींनी आपल्या पत्नीवर जी मनापासून कवनं लिहिली, ती त्यामानानं किती खरी वाटतात पाहा.
मी फार काळ वाट चुकलो नाही, याला माझ्या मते दोन कारणं घडली. विसाव्या वर्षी माझं लग्न झालं. त्यामुळं प्रणयाचा प्रत्यक्ष अनुभव मिळून माझा संकोच बराचसा चेपला गेला. दुसरं- त्या कालावधीत ख्रिस्ती समाजातलं माझं दळणवळण वाढलं. गोव्यातला ख्रिस्ती समाज बव्हंशी लॅटिन संस्कृतीत वाढलेला असल्यामुळं शृंगाराच्या बाबतीत तो अधिक प्रांजल, सौंदर्यासक्त आणि प्रीतीतल्या धिटाईचं कौतुक करणारा आहे. स्त्रीच्या सहवासात योग्य वेळी चातुर्यानं तिला उद्देशून समुचित Gallantry फेकणं हे त्यांच्यात सुसंस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं. त्या समाजात वावरल्यामुळं माझी भीड चेपली आणि प्रेमभावना खरी असेल तर तिचा विमुक्त आविष्कार करण्यात कसलाच कमीपणा नसून, उलट पुरुषार्थच आहे असं मला वाटू लागलं. ‘प्रतिभा’ आणि ‘जीवनसंगीत’ यांच्या मधल्या काळातले माझे दोन छोटे हस्तलिखित कवितासंग्रह मी माझ्या गलथान व्यवहारात हरवून बसलो. ते आज हाताशी असते तर त्या काळात माझ्यात घडलेल्या या पालटाची काही प्रभावी प्रात्यक्षिकं तुम्हाला पाहायला सापडली असती."