Wednesday, January 11, 2017

युगप्रवर्तक कवी - केशवसुत ...


'शून्यामाजी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे

पृथ्वीला सुरलोकसाम्य झटती आणावया कोण ते ?..
..आम्हाला वगळा, गतप्रभी झणी होतील तारांगणे
आम्हाला वगळा, विकेल कवडीमोलावरी हे जिणे !'
असं म्हणायला दुर्दम्य दृढ आत्मविश्वास असावा लागतो, तसं उत्तुंग आयुष्य जगावं लागतं अन कालातीत कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. कवी केशवसुत या वर्णनास चपखल बसणारे व्यक्ती होते म्हणून त्यांनी केलेलं हे काव्य अजरामर झाले अन मराठी कवितेचं दालन भरून पावलं.

माझ्या दुर्मुखलेल्या मुखामधुनिया,चालावयाचा पुढे 
आहे सुंदर तो सदा सरसवांङनिष्यंद चोहिकडे !"..
केशवसुतांच्या वर्गशिक्षकांने त्यांना दुर्मुखलेला म्हंटले त्यावरून ही रचना सुचली. या ओळींतून केशवसुतांना स्वसामर्थ्य अल्पवयातच उमगले होते याचा प्रत्यय येतो. केशवसुतांच्या सुरवातीच्या रचनांमधून त्यांची उदासीनवृत्ती - भिडस्त स्वभाव - एककल्लीपणा अनुभवायला मिळतो. कवीची बेताची आर्थिक परिस्थिती, रखडत झालेले शिक्षण , संकोची व मानी स्वभाव , अर्थाजनासाठी तात्पुरती नोकरी यामुळे जीवनात स्थैर्य नव्हते.या अस्थिरतेमुळे एक उदासीनता व अंतर्मुखवृत्ती त्यांना कायम घेरून होती.
केशवसुतांचा इंग्रजी साहित्याचा अभ्यास व्यापक होता, हे त्यांच्या भाषांतरीत व अनुकरण काव्यातून
प्रचितीस येतो. त्यांच्या उल्लेखनीय अनुकरण रचनांमधे घुबड ही रचना पो या कवीच्या रेव्हन या रचने च्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आहे, तर दोन बाजी ही रचना व्हिक्टर ह्यूगो यांची नेपोअन् पॅटीट या धर्तीवरची असून यात केशवसुतांनी व्यक्त केलेला आवेश आणि संताप मनाला चटका लावून जातो.
त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला
निजराष्ट्राचे वैभव नेले एकसाएखे बढतीला.........
आणि तुवा रे ! त्वां नीचाने पाठ आपुली दावुनिया
रणातुनी पौबारा केला, शेपुट भ्याडा वळवुनिया !"
ही रचना त्यांनी १६-०२-१८९५ रोजी लिहिली. आज इतक्या वर्षांनंतरही या ओळींतील आशय बोथट जाणीवा जागृत करून जातो.काळ लोटला, चेहरे बदलले,मात्र माणसाची वृत्ती तीळमात्र ही बदलली नाही.वर्षातून दोन दिवस ध्वजवंदन करण्यापलीकडे आपण देशासाठी काय करतो ? म्हणूनच ‘नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे’ असं केशवसुत ‘नवा शिपाई’ या कवितेत स्वत:बद्दल म्हणतात.
 'हरपलें श्रेय' या कविते बद्दल ते लिहितात की, उदात्त बुद्धीला संसारात राम नाही. अलौकिक असे जे काही तिला पाहिजे असते, ते तिच्या हक्काचे असून देखील, त्याच्या प्राप्तीकरिता तिला झुरत पडावे लागत नाही काय? या कवितेत त्यांनी  मनातील उदासीन अवस्थेतील अस्वस्थ अशी उत्सुकता व्यक्त केली आहे. या रचनेतील निराशेचा सूर अधिक तीव्र असून या संवेदनशील रचनेत विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसतात. केशवसुतांच्या कवितेत भावनांपेक्षा विचारांना श्रेष्ठत्व दिल्यामुळे त्या तात्विक ठरतात. म्हणूनच तत्कालीन समीक्षकांनी त्यांना तत्वज्ञ कवी असे संबोधिले. केशवसुतांच्या प्रेम कविता आणि निसर्ग कविता म्हणजे आधुनिक कवितेला वरदान आहे. प्राचीन साहित्यात प्रासंगिक वर्णनांखेरीज स्वतंत्र असे प्रेमकाव्य व निसर्गकाव्य कुठेच आढळत नाही. या काव्याची सहज सोप्या भाषेत अनुभुती प्रथम केशवसुतांनी व्यक्त केली.
'विसर तर झणी व्यवहाराला विसर शहाणपणाला
आणिक वेडी होऊनि वद जे व्हावे या वेड्याला...'

झपूर्झा या कवितेत केशवसुत म्हणतात, हजारो लोकांतून एखादाच प्रतिभावंत निर्माण होतो. जा पोरी जा या
शब्दांचा द्रुतउच्चार म्हणजे झपूर्झा. वरून दुर्बोध परंतु मर्मभेद सांगणारी अवस्था या कवितेत व्यक्त होते. अंधारून आलेल्या स्थितीत मनी मळभ दाटते अन खिन्नता येते मात्र त्यातूनही एखादा ध्येयवादी माणूस मार्ग काढतोच हे या कवितेचे गमक आहे. 
हर्षखेद ते मावळते,
हास्य निवालें अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला, तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

"अढळ सौंदर्य' कवितेत ते सृष्टीची ओळख पटवून देत म्हणतात - 'म्हणुनी कथितो निःशंक मी तुम्हाते, असे सुंदरता अढळ जरी कोठे,  तर करी ती सृष्टीत मात्र वास, पहा, मोहिल सर्वदा ती तुम्हास !'
 केशवसुतांच्या कवितांची नावेच आपल्याला त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात थेट घेऊन जातात. "खिडकीकडे मौज पहावयास', "उगवत असलेल्या सूर्यास', "प्रियेचे ध्यान', "कविता आणि कवी', "दुर्मुखलेला', "मुळा-मुठेच्या तीरावर', "मजुरावर उपासमारीची पाळी', "दिवा आणि तारा', "स्वप्नामध्ये स्वप्न', "रुष्ट सुंदरीस', "सुंदरी दर्शन', "नवा शिपाई', "उत्तेजनाचे दोन शब्द', "एका विद्यार्थ्याप्रत', "स्फूर्ती' आणि "तुतारी' ही काही शीर्षकेच जणू त्यांच्या कवितांची झलक सांगून जातात. त्यांच्या " प्रणयकथन " या रचनेत प्रणय धुंद असला तरी तो आसक्त नाही. त्यात कुठलाही उन्माद जाणवत नाही. हे काव्य सन१८९७-९८ च्या सुमारातील आहे. तो काळ स्त्रियांनी प्रेम व्यक्त करण्याचा नव्हता मात्र कवीला आपल्या मधुरे कडून या धिटाईची अपेक्षा आहे.या वरून कवीच्या प्रगत विचारांची वृत्ती लक्षात येते. त्यांच्या "प्रियेचे ध्यान", "नाहि ज्या परि डोंगळा", "प्रयाणगीत" रचना पत्नीला उद्देशून लिहिल्या आहेत.

लॉंगफेलो च्या कवितेचे 'घडयाळ' हे अनुकरण एक नवा रचनात्मक प्रयोग आणि मोजक्या शब्दातले प्रबोधन ठरले. "वार्धक्य जर सौख्यात जावया, व्हावे पश्चाताप नुरूनिया , तर तरूणारे! मला वाटते, ध्यानी आपुल्या आण ,घडयाळ हे जे अविरत वदते, आला क्षण गेला क्षण. तर कवीची "सतारीचे बोल" ही ड्रायडन कवी च्या अलेक्झेंड्र फीस्ट ऑफ द पॉवर ऑफ द म्युझिक् या रचनेच्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आहे. कवितेत व्यक्त कवीच्या कल्पना जरी परकिय असल्या तरी त्यात व्यक्त शब्दसंपदा-लय-ताल-आशय-अभिव्यक्ती ही सर्वस्वी केशवसुतांची आहे.

केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी रत्नागिरीजवळील मालगुंड या गावी झाला. केशवपंत दामले मूळ दापोलीचे. ते शिक्षक म्हणून मालगुंडच्या शाळेत दाखल झाले आणि फडके कुटुंबीयांच्या घरात भाडयाने वास्तव्यास राहिले. याच घरात १५ मार्च १८६६ साली केशवसुतांचा जन्म झाला. त्यांना एकूण बारा अपत्य,सहा मुले व सहा मुली. कृष्णाजी हे त्यांचे चवथे अपत्य. कोकणात खेड गावी प्रार्थमिक शिक्षण घेत असतांना कृष्णाजींना  प्राचीन साहित्य वाचण्याचा छंद लागला.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १८८४ला त्यांनी दाखल केले होते. तेव्हा देशभक्त बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश
आगरकर शिक्षक असलेली ही शाळा आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र देशसेवेचे बाळकडू इथेच त्यांना मिळाले. सामाजिक अन्यायावर आपल्या कवितांमधून घणाघाती प्रहार करताना त्यांच्यातील ‘आगरकरांचा शिष्य ’आपणास ठायी ठायी जाणवतो. आपल्या ‘तुतारी’या कवितेत त्यांनी -
"एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारीदया मजलागुनी..’
असा एल्गार करणारा संदेश नव्या पिढीला दिला .जुन्या गोष्टीना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेतअसे त्यांनी सांगितले .

मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचा अभ्यास चांगला असला तरी गणिताचे अगदी वावडे म्हणून तिस-या प्रयत्नात वयाच्या २३ वर्षी ते मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाले आणि आपले औपचारिक शिक्षण थांबवून त्यांनी जीवनाच्या शाळेत प्रवेश घेतला. आपल्या चरितार्थासाठी उत्पन्नाची साधने निर्माण केली.
सन १८८९ साली ते मॅट्रीक झाले. त्या काळाच्या परंपरेनुसार वयाच्या १५व्या वर्षी त्यांचा विवाह श्री.केशव चितळे यांच्या कन्येशी झाला. नंतर केशवसुत मुंबई येथे नोकरी साठी गेले.तिथे त्यांनी "न्यू इंग्लिश स्कुल","मिशनरी स्कुल","ज्ञानोदय"अशा अनेक ठिकाणी तात्पुरत्या नोकया केल्या. मुंबईच्या वास्तव्यात त्यांचा अनेक साहित्यिकांशी परिचय झाला. त्यांच्या सुरवातीच्या कविता " कृ.के.दामले ", " कुणी तरी ", " कोणी एक कवी " अश्या नावे प्रसिध्द झाल्यात, त्यामुळे ही केशवसुतांची कविता आहे अशी ओळख लोकांत झाली नव्हती. नंतर काव्यरत्नावलीकार यांनी केशवसुत हे काव्यनाम छापण्यास सुरू केले, सन् १९०० पासून मासिक मनोरंजन यांनी ही केशवसुत असा उल्लेख करण्यास सुरवात केली. काव्यलेखन सुरू केल्यानंतर जवळ जवळ एक तपानंतर केशवसुत हे नाव प्रचलित झाले . 
"मनोरंजन"मासिकाचे श्री.रघुनाथ मित्र यांनी केशवसुतांची कविता उचलुन धरली. सन १८९० सालापासून
ह.ना.आपटे यांच्या "करमणूक" मासिकात कवीच्या रचना प्रसिध्द झाल्या. केशवसुतांचे साहित्यस्नेही म्हणजे ना.वा.टिळक,वासुदेव बळवंत फडके,कवि गोविंद,माधवानुज अर्थात हरि मोडक,कवि किरात अर्थात कृष्णाजी लक्ष्मण सोमण,कवि विनायक,"प्रभाकर"मासिकाचे जगन्नाथ भांगले यांचा परिचय मुंबईच्या सन१८९० ते १८९६ या वास्तवात झाला. पुढे सन १८९७ ते१९०४ पर्यंत त्यांचा मुक्काम खानदेशात होता. केशवसुतांच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी म्हणजे इ. स. १९१७ मध्ये सुप्रसिद्ध कादंबरीकार हरी नारायण आपटे यांनी त्यांचा कवितासंग्रह ‘केशवसुत यांची कविता’ या नावाने प्रसिद्ध केला.

केशवसुत म्हणजे आधुनिक कवितेचा उदयबिंदू. त्यांच्या काव्याचे आजवर जेवढे अवलोकन झाले, तेवढे कोणाच्या काव्याचे झाले नसावे. ते नि:संदेह युगप्रवर्तक होते, पण ते युगप्रवर्तक का ठरलेत? सन १८८५ च्या सुमारास केशवसुतांनी इंग्रजी कवितांच्या भाषांतराने काव्यलेखनास आरंभ केला. त्या वेळी कविता लोकजीवनापासून दुरावली होती आणि नव्या-जुन्या वळणावर बराच वेळ घुटमळत होती. त्यांनी पारंपारिक विषय, ठराविक वृत्त, क्लिष्ट व अलंकारिक भाषा या बंधनात गुंतलेल्या कवितेला मुक्त केले. व्यवहारी व रोजच्या जगण्यात मोठा कवितेचा आशय दडलेला असतो तसेच वैयक्तिकतेचा आविष्कार काव्याची सहज - स्वाभाविक वृत्ती आहे हे विचार रुजवून इंग्रजी वळणाची नवी मराठी कविता सर्वसामान्यांपुढे प्रस्तूत केली. केशवसुतांच्या प्रयत्नांमूळे कविता पुन्हा जनमानसात रूळू लागली. म्हणुनच तत्कालीन समीक्षांनी त्यांना "आधुनिक काव्याचे जनक " आणि " युगप्रवर्तक " कवी म्हणून संबोधिले.
सारेच त्यांना ह्या उपाधीने संबोधतात याचे कारणही तसेच आहे. त्यांनी एकोणिसाव्या शतकाचा मनोधर्म जाणला होता, आत्मसातही केला होता. म्हणूनच ते कवितेचे युगपरीवर्तन करू शकले. 'नव्या शिपायाचा' बाणा पत्करून त्यांच्या कवितेने व्यक्तिस्वातंत्र्याची, समतेची, क्रांतीची, नव्या मनूची "तुतारी" फुंकली. आधुनिक मराठी कवितेत केशवसुतांचा मान पहिला का आहे, तर त्यांनी रूढी-परंपराग्रस्त जग उलथून टाकण्याचा, समानतेची वागणूक देण्याचा आपल्या कवितेचा युगधर्मच आहे असे मानले. केशवसुतांनी इंग्रजी कवितांचे अवलोकन करून कवितेविषयी नवी दृष्टी स्वीकारली व ती मराठीमध्ये रूजवली.

त्यांच्या जीवनात अशा घडामोडी घडत असताना त्यांचे काव्यलेखन अव्याहतपणे सुरु होते. कवी-काव्यविषयक जाणिवा, कवीचं स्वातंत्र्य, काव्यविचार, कवीच्या अधिकाराबद्दल वाटणारा दुर्दम्य विश्‍वास आणि शून्यातून वसाहती निर्माण करण्याची शक्ती कवीच्या ठिकाणी असते, या वैशिष्ट्यांनी युक्त त्यांच्या काव्यविषयक कविता आहेत. ‘आम्ही कोण’ या सुनीत रचनेत त्यांनी कवीचं अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिलं, तर कलावंताच्या मानसिक सुखदु:खाचं वर्णन ‘झपूर्झा’ व ‘हरपले श्रेय’ या कवितांत येतं. ‘जेथे ओढे वनराजी, वृत्ती रमे तेथे माझी’ अशा साध्या शब्दांत त्यांनी आपलं निसर्गप्रेम व्यक्त केलं.
केशवसुतांच्या काव्यलेखनाचा कालखंड हा १८८५ ते १९०५ हा होता. त्यांच्या कवितेमागे मराठी कवितेची
संत-पंत आणि तंत वाङ्मयाची (संत वाङ्मय, पंडिती वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय) दीर्घ परंपरा होती. या सहा-सात शतकांच्या पारंपरिक संस्कारांतून मराठी कवितेला आधुनिक चेहरा देण्याचं मोलाचं काम कवी केशवसुतांनी केलं, म्हणून त्यांच्या मागून येणार्‍या कवींनी ‘त्यांच्यामागे कविता करणं म्हणजे पायरीला पाय लावण्याचा प्रकार आहे’ असं नम्रतेने म्हटलं आहे. कवी गोविंदाग्रज गौरवाने आणि कौतुकाने म्हणतात, ‘शिवरायाच्या मागे आम्ही लाल महाली फिरणे. तसेच तुमच्या मागे आम्ही नवीन कविता करणे.’ 
केशवसुतांनी सृष्टी आणि काव्य यांचा परस्परसंबंध त्यांनी जोडला, पण हा संबंध जोडताना त्यांची दृष्टी पूर्वपरंपरेहून वेगळी होती. निसर्गातील चैतन्याचा शोध घेताना तत्त्वचिंतनही होतं. ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’ या कवितांतून निसर्गातील वस्तुजात आणि मानव यातील अंतर्विरोध त्यांनी प्रकट केला आहे. उत्कट प्रेमाचं तत्त्वज्ञान आविष्कृत करणार्‍या प्रेमकविता लिहिताना केशवसुतांनी त्या काळात संकोचापायी दडपलं गेलेलं स्त्री-पुरुषसंबंधाचं सनातन अनुभवविश्‍व प्रकट करण्याचा प्रयत्न केला. 
 केशवसुतांनी इंग्रजीतून मराठीत भाषांतरे आणि अनुकरणे करतांना कवीने अनेक काव्य प्रयोग केले, मराठी
व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाच्या अभ्यासातून नव नवे वृत्त प्रयोग करत शार्दुलविक्रिडीत या  अक्षरगणवृत्तात १४ ओळींचा सुनीत हा काव्यप्रकार निश्चित केला. या वृत्तात पूर्वार्धात कल्पना योजुन उत्तराधार्त विचांरांचे आरोह अवरोह मांडले. कवीने शेक्सपीअर् सॉनेट व मिल्टन सॉनेट यांचा संयोग साधत विचार आणि कल्पना असा द्विप्रधान सुनीत काव्यप्रकार मराठीत रूजवला. आणि इथेच नव्या जुन्या वळणांवर घुटमळणारया कवितेला एक दिशा मिळाली. पुढे सुनीत हा प्रकार रविकिरणमंडळाने समर्थपणे हाताळला.
केशवसुतांनी शैलीसंपादनासाठीही खूप प्रयत्न केले. अक्षरगणवृत्ताकडून मात्रावृत्ताकडे केलेली वाटचाल, वृत्तसंकर, यमक-प्रतिमांचा केलेला पुनर्विचार, स्फुट कवितेच्या आविष्काराकडे दिलेलं लक्ष, चरणाच्या ओळीत बदल करून आणलेलं वैचित्र्य आजही टिकून आहे. मोठ्या निग्रहाने, अनन्य काव्यनिष्ठेने आणि तरल संवेदनक्षमतेने त्यांनी काव्याचं शैलीशिखर गाठलं. केशवसुतांचं मराठी कवितेतील स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कवितेचा प्रभाव पुढे अनेक वर्षं टिकला. त्यातून ‘केशवसुत संप्रदाय’ निर्माण  झाला.
मराठी काव्यसाहित्यातल्या जवळ-जवळ सर्व प्रकारच्या वृत्तांमध्ये केशवसुतांनी काव्य रचले. शार्दुल विक्रीडित, भुजंगप्रयात, सुनीत, दिंडी, ओवी, श्लोक, शिखरिणी, मालिनी, साकी वसंततिलका व मंदाक्रांता या सर्व वृत्तांमधुन आशयपूर्ण कविता त्यांनी मराठी साहित्याला दिल्या. मानवतावाद, समता, विश्वबंधुत्व, रूढी भंजन, स्वातंत्र्य प्रेम, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार या मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या चिरंतन मुल्यांचा त्यांनी कवितेतून उद्घोष केला.
केशवसुतांच्या काव्य जाणिवा कशा समृद्ध होत गेल्या याचा विचार करता इंग्रजी कवींचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव पडल्याचे आढळते. केशवसुतांनी बायरन, वर्डस्वर्थ, ब्राउनिंग, टेनिसन या इंग्रजी कवींच्या आणि इमर्सन, लाँगफेलो, वॉल्ट व्हिटमन या अमेरिकन कवींच्या काव्याचा आस्वाद घेतला होता. त्यातून एक नवी दृष्टी त्यांना प्राप्त झाली होती. एकोणिसाव्या शतकात ज्या विविध सामाजिक आणि राजकीय घडामोडी घडत होत्या त्यांच्याशी स्वत:ला बांधून घेणार्‍यांपैकी केशवसुत होते.  पाश्‍चात्त्य कवींचे पचवलेले संस्कार आणि एतद्देशीय बांधिलकी यातून त्यांची स्वतःची शैली असणारी कविता निर्माण झाली.
मूठभर मानवाने आपल्या क्षुद्र स्वार्थापायी विशाल मानवजातीला हीनदीन बनवल्याची प्रखर जाणीव त्यांच्या सामाजिक कवितांतून दिसते. सामाजिक विषमतेतून येणारी आर्थिक विषमता पाहून त्यांचं हृदय विंधलं होतं, याचं चित्रण त्यांच्या ‘मजुरावर उपासमारीची पाळी’ किंवा ‘अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न’ या कवितांतून व्यक्त होते. जीवनातील गूढतेच्या गाभार्‍यास हात घालणार्‍या, स्वत:च्या सुखदु:खांना शब्दरूप देणार्‍या आणि काही स्फुट भावनांचं चित्रण करणार्‍या अशा सर्व पातळींवरच्या कविता त्यांनी लिहिल्या. मात्र केशवसुतांना काव्यलेखनातून फारसा आर्थिक लाभ झाला नाही.

चरितार्थासाठी नोकरी करताना ते आधी १९०१ मध्ये फैजपूर येथे शाळेत हेडमास्तर म्हणून रुजू झाले.  तर
एप्रिल १९०३ पासून धारवाड येथील सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून काम पाहिलं. १९०५ मध्ये हुबळी इथे चुलते हरी सदाशिव दामले यांच्याकडे गेले असता प्लेगच्या साथीत त्यांना व त्यांच्या पत्नीला संसर्ग झाला.  त्यातच  ७ नोव्हेंबर १९०५ रोजी केशवसुतांचे व आठ दिवसांनी १५ नोव्हेंबर १९०५ रोजी त्यांच्या पत्नी रखमाबाई यांचे निधन झाले. अवघ्या ३९ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांच्या पश्चात त्यांच्या तिन्ही मुलींचे पालन त्यांचे वडिल बंधु चिंतोपंत व सीतारामपंत यांनी केले. केशवसुत व त्यांच्या काव्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. ते एक तेजस्वी व्यक्तिमत्वाचे ओजस्वी कवि होते. 
‘कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा ९९ आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा ९९वांपैकीच आहे’ अशी त्यांची भूमिका होती. ही आकाशीची वीज पृथ्वीवर आणण्याचं विलक्षण सामर्थ्य त्यांच्या प्रतिभेत होतं. याचा प्रत्यय त्यांच्या ‘स्फूर्ती’, ‘तुतारी’, ‘हरपले श्रेय’, ‘झपूर्झा’, ‘सतारीचे बोल’, ‘आम्ही कोण’ इत्यादी कवितांमधून येतो. भव्य आकांक्षा, उत्कट भावना, सखोल चिंतन, प्रतिभेच्या अलौकिक सामर्थ्याच्या यथार्थ जाणिवा आणि स्वच्छंदवादाचा उत्कट आविष्कार या वैशिष्ट्यांनी त्यांची कविता समृद्ध आणि संपन्न आहे. आजही मराठी साहित्यात कवी केशवसुतांचे स्थान ध्रुवतारयासारखे आहे.  
केशवसुतांच्या मागे मराठी रसिक आणि मायबाप सरकारने त्यांचे सदैव स्मरण राखिले ही उल्लेखनीय बाब आहे. सरकारी पुढाकाराने १९६६ साली केशवसुतांच्या जन्मशताब्दीचा सोहळा झाला होता. केशवसुतांच्या जन्मग्रामी ‘मालगुंड’ येथे झालेल्या समारंभात तेथील ग्रामस्थांनी केशवसुतांच्या कीर्तीला साजेसे स्मारक या ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. पण केशवसुतांच्या जन्मशताब्दीच्या या समारंभानंतर पंचवीस वर्षे उलटल्यानंतरही केशवसुतांच्या स्मारकाच्या दृष्टीने काही घडले नव्हते. १९९० साली रत्नागिरी येथे चौसष्टावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. अध्यक्षस्थानी मधु मंगेश कर्णिक यांची निवड झाली होती. त्यांनी संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात केशवसुत स्मारकाची कल्पना मांडली. स्मारकासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन त्या सभेतील श्रोत्यांना केले.

मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिका-यांनी काही अटींवर केशवसुतांचे जन्मघर आणि त्यालगतची
एक एकर जमीन कोकण मराठी साहित्य परिषदेला विनामूल्य दिली. महाराष्ट्र राज्याचे त्या वेळचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी तत्काळ पाच लाख रुपयांचा धनादेश मधु मंगेश कर्णिक यांना दिला. अनेक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी याकामी मदत केली.  १९९२ ते ९५ या काळात मधु मंगेश कर्णिक यांनी यासाठी २०-२२ लाख रुपये जमवले. त्यांनी आराखडयाप्रमाणे काम पूर्ण करून घेतले आणि ८ मे १९९४ रोजी या स्मारकाचे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येऊन ते महाराष्ट्राला अर्पण करण्यात आले. अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकाचे ते सुंदर चिरस्मरणीय स्मारक गणपतीपुळे या निसर्गरम्य देवस्थानापासून दोन कि. मी. अंतरावर आहे.

त्यांच्या जन्मस्थानच्या अंगणातील या स्मारकात 'केशवसुत काव्यशिल्प' स्फटिकाच्या फलकांवर कोरून लिहिण्यात आले आहे. वडिलांची सतत होणारी बदली म्हणूनच बाळपणीचा काळ वगळता अगदी अल्पकाळच मालगुंडमध्येच केशवसुतांचे  वास्तव्य होते. मात्र या घराशी जोडलेली नाळ कधी तुटता तुटली नाही. ‘गोष्टी घराकडील मी दता गडया रे’ सारख्या कविता याची साक्ष आहेत. त्यांचे स्मारक म्हणून या घराला आज वेगळे महत्त्व आले आहे. गणपतीपुळे येथे दररोज हजारो लोक येतात. त्यातील मोजकीच माणसे मालगुंडला भेट देतात. वास्तू कशी आहे त्यापेक्षा त्या वास्तूत वास्तव्य कोणी केले हेच महत्त्वाचे!

केशवसुतांचे हे जन्मस्थान वैशिष्टयपूर्णच आहे. खरे तर कोकणातील इतर अनेक घरांसारखेच वाटणारे हे घर 
केशवसुतांचे जन्मस्थान
अगदी वेगळे आहे. पाच खोल्यांची ही वास्तू जांभ्या दगडाची असून साग लाकडाचे, कौलारू छप्पर असलेली.
प्रशस्त दोन्ही अंगास बिलगलेली लंबाकृती पडवी, प्रशस्त ओटी, कोनाडी, खुर्ची, आरामखुर्ची, ओटीच्या पाय-यांलगतचे नक्षीदार खांब, कवी केशवसुतांची प्रतिमा, नवा शिपाई आणि इतर कविता, तत्कालीन वस्तूंचे प्रदर्शन – पिकदानी, चरखा, डेस्क, दौत-टाक इ. कालबाहय झालेल्या वस्तू आजही तेथे पाहावयास मिळतात.
या वास्तूचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आज घरात उजव्या हातास असलेली केशवसुतांची जन्मखोली. आकाराने लांब, एकच कोनाडा, लहान खिडकी असलेली उबदार खोली पाहताना या खोलीत जन्मलेल्या बालकाने १९व्या शतकाच्या उंबरठयावर उत्तमोत्तम कविता लिहून केलेली क्रांती आठवल्यावाचून राहत नाही. केशवसुतांच्या या वास्तूमागेच ‘स्मृतिदालन’ दिसते. येथे प्रवेश करताच केशवसुतांच्या सतारीचे बोल, झपुर्झा, संध्याकाळ, तुतारी इ. अजरामर काव्यशिल्पे दृष्टीस पडतात.
त्यांच्या लोकप्रिय झालेल्या कविता तेथे वाचायला मिळतात. "केशवसुतांची कविता' या काव्य-संग्रहाची
"केशवसुतांची कविता'हस्तलिखित यथामूल आवृत्ती
हस्तलिखित यथामूल आवृत्ती जतन करून ठेवण्यात आली आहे . या संग्रहात एकूण १०३ कविता आहेत. जवळ जवळ सव्वाशे वर्षांपूर्वीचे लिहिलेले स्वयं केशवसुतांच्या हस्ताक्षरातले काव्य या संग्रहात आहे. शेवटच्या पानावर "मोडी' लिपीत त्यांनी लिहिलेली यादी देखील आहे. केशवसुतांच्या हस्तलिखितात आणखी एक गोष्ट लक्ष्यात येते ती म्हणजे त्यांचे इंग्रजी हस्ताक्षर ! अत्यंत सुरेख इंग्रजी हस्ताक्षरात त्यांनी काही कविता लिहिल्या आहेत. शेक्स्पिअर व इतर काही इंग्रजी कवींचा उल्लेखही आपल्याला त्यात सापडतो.
खरे तर  आपल्या लहानपणी शाळेत पाठ्यक्रमात व बालभारती, कुमारभारतीतल्या त्यांच्या कवितांशी आपण 
केशवसुत काव्यशिल्प
सारे परिचित आहोतच. तरीही काही  विषय अथवा साधे प्रसंग कसे केशवसुतांना काव्य लिहिण्यास प्रेरित करून गेले हे शेवटी सांगावेसे वाटते. शाळेत एका "मुलास झोडपणाऱ्या पंतोजीस' ते रोष युक्त कवितेने झोडपतात, रस्त्यावरून चालताना खिडकीतून ऐकू आलेले सतार वादन ऐकून ते "सतारीचे बोल' ही कविता लिहितात. "मयुरासन आणि ताज महाल' अशी एक कविताही त्यांनी लिहिली. धुमकेतूबरोबर कवीची तुलना करीत "धुमकेतू आणि महाकवी' लिहिली. मास्तरांनी वर्गात दुर्मुखलेला म्हटले म्हणून खिन्न होऊन "दुर्मुखलेला' ही कविता लिहिली. आणखी अशा खूप काही कविता. वयाच्या ३९ व्या वर्षीच केशवसुतांना देवाज्ञा झाली, पण या अवधीतच त्यांनी इतके अमर काव्य रचले. अजून दीर्घ आयुष्य लाभले असते तर आणखी किती लेखन आपल्याला लाभले असते हा विचार मनात तरळून जातो. 

'जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनीया' 
असा महान काव्यसंदेश देणाऱ्या या युगप्रवर्तकाला कोटी कोटी दंडवत.

- समीर गायकवाड .