Saturday, January 28, 2017

धोक्याचा नवा सायरन - तमिळनाडूटोकाचा भाषिक, प्रांतीय अस्मितावाद आणि भीषण परंपरावाद एकत्र आल्यावर त्यातून विघटनवाद जन्माला येतो, जो तमिळनाडूमध्ये आला आहे. काल तमिळनाडू विधानसभेत विरोधी पक्ष नेते एम.के. स्टॅलिन यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सरकारजवळील जी माहिती सभागृहासमोर मांडली आहे ती चक्रावून टाकणारी धोक्याचा मोठा सायरन वाजवणारी आहे. गुप्तचर यंत्रणांच्या कुंभकर्णी झोपेचा पर्दाफाश करणारी आहे. या आंदोलनात स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी झाली आहे ! लादेनचे फोटो तिथे झळकावले गेलेत, मोदींच्या नावाने शंख झालाय, आंदोलक पेट्रोल बॉम्बने सज्ज होते, तब्बल २००० फुटीरवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, आंदोलकांच्या नावाखाली निदर्शने करणाऱ्या अशा विघातक लोकांचे सीसीटीव्ही फुटेजही पन्नीरसेल्वम यांनी सभागृहाला दाखवले.
त्यात हे सर्व प्रताप पाहून डीएमकेची सुद्धा पाचावर धारण बसली. स्टॅलिन यांना खुर्चीवर बसण्याचे देखील भान राहिले नाही ! इतका हा धक्कादायक प्रकार होता. मरिना बीचवरील सुमारे १० हजार निदर्शकांना पोलिसांनी शांततापूर्ण मार्गाने बाजूला काढले तेंव्हा त्यांनी किती संयम बाळगला असेल याची या घटनावरून कल्पना यावी.

अनेक तमिळ प्रसारमाध्यमे, नियतकालिके, वर्तमानपत्रे, राजकारणी, विद्यार्थी संघटना आणि तमिळ अस्मितेची प्रतीके समजली जाणारी तमिळ चित्रपटसृष्टी या सर्वांनी जलीकट्ट आंदोलनाला जे खतपाणी घातले ते या विघातक लोकांना पूरक ठरले. भरीस भर म्हणजे जेंव्हा स्वतंत्र तमिळनाडूच्या घोषणा दिल्या जात होत्या तेंव्हा युवकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत होता. या आंदोलनात मोदी बघ्याची भूमिका घेऊन उभे आहेत तर शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्यात रोमान्स सूरु आहे, तर स्टालिन यांची अंत्ययात्रा निघाली आहे अशा अर्थाची पथनाट्ये सादर झाली याचा बोध सरकारने आवर्जून घ्यावा.

भारत हा हिंदू आणि हिंदीभाषिकांचा देश आहे, आम्हाला त्यांच्यासोबत राहायचे नाही, आमच्या राज्यात सार्वमत घ्या अशा अर्थाचे फलक अनेकांच्या हाती होते. विशेष बाब म्हणजे जलीकट्ट स्पर्धा सुरु झाल्यानंतरच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीही हजारोंच्या संख्येने जे निदर्शक मरीना बीचवर ठाण मांडून होते ते केवळ याच हेतूने पेटून उठले होते.

दक्षिणेकडील राज्ये मुख्य प्रवाहात नसतात आणि देशभरातील वृत्तवाहिन्या, प्रसारमाध्यमे केवळ दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यातील बातम्या, माहिती रंगवून सांगण्यात धन्यता मानतात, उत्तरेकडील राज्यातील किरकोळ शहरात छोटासा अपघात किंवा हाणामारी झाली तरी त्याची हेडलाईन केली जाते मात्र एका राज्यात देशापासून फुटून निघण्याचे विचार मांडले जातात आणि हजारो तरुण त्याला साथ देतात याचे गांभीर्य प्रसारमाध्यमांना असू नये याचे सखेद आश्चर्य वाटते.

गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ? गृहखात्याला परिस्थितीचा अंदाज कसा काय आला नाही ? तमिळ युवकांत काश्मिरी युवक सामील होते का ? पेरियार आंबेडकर सर्कलने जलीकट्टबद्दल काय भूमिका मांडली आणि युवकांनी त्याला काय प्रतिसाद दिला ? इतकं सर्व घडत असताना शेजारील अन्य राज्ये कर्नाटक, आंध्र, तेलंगणा व केरळ यांनी मुक्याची भूमिका का घेतली ? केरळमधील तरुणांनी जलीकट्टला पाठिंबा देताना कोणत्या वल्गना केल्या ? हे सर्व पूर्वनियोजित होते का ? या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणार किंवा याकडे एक आंदोलन म्हणून पाहणार ? परदेशातील आणि देशभरातील तमिळ युवक या आंदोलनात कसे आणि कोणत्या मोहिमेतून सक्रीय झाले ? या मागणीचा आणि भूमिगत झालेल्या लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलमचा काही संबंध आहे का ? की केवळ काही राजकीय लोकांनी जयललितांच्या पश्चात उभं केलेलं हे एक बुजगावणे आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदी सरकार अभ्यासणार का ? त्यावर काही उत्तरे देणार की चार राज्यांच्या निवडणुकात मश्गुल राहणार ?

एका राज्यात इतकं काही घडतं आणि देशभरातील गृहखात्याला किंवा गुप्तचर खात्याला त्याचे गांभीर्य कळले आहे अशा अर्थाचे एकही पाऊल अजूनतरी केंद्र सरकारकडून उचलले गेले नाही हे निश्चितच स्वकोशमग्नतेचे दार्शनिक आहे. असं असूनही काल द्रमुकच्या सदस्यांनी एआयडीएमकेच्याविरुद्ध दडपशाहीचा आरोप लावत सभात्याग केला. पोलिसांच्या विरोधात तपास करण्यास सरकार घाबरत आहे, असा आरोप करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली हा तपास केला जावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. हे सर्व कशाचे द्योतक आहे ? तमिळनाडूच्या पोटात काय खदखदते आहे ? ही एका मोठ्या असंतोषाची नांदी आहे का ? हा तमिळ इलमचा भारतीय अवतार आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा प्रश्न कसा हाताळतात हेही येणारा काळच सांगेल ...

- समीर गायकवाड.

(सूचना - लेखातील माहिती व छायाचित्रे विविध तमिळ दैनिकांतून, नियतकालिकांतून घेतलेली आहेत. लेखावर मत व्यक्त करताना कोणत्याही स्वरुपाची वैयक्तिक, जातीय, धार्मिक, भाषिक, प्रांतीय, राजकीय चिखलफेक करून आपल्या अल्पमतीचे मोफत प्रदर्शन करू नये)