आज तुम्ही जे म्हणताय, तेच आम्ही आमच्या तरुणपणी म्हणत होतो. आज आम्ही जे म्हणतोय तेच तुम्ही उद्या तुमच्या म्हातारपणी म्हणणार !
या चक्रातून सुटका आहे का ? निरुपयोगी म्हणून वृद्धांना फेकून देणं योग्य आहे का ?"
याचा शोध घेणारे एक प्रभावी नाटक मराठी रंगमंचावर आलं होतं.
अनेक पारितोषिके पटकाविणारं हे नाटक म्हणजे जयवंत दळवींचे 'रथचक्र'...
रथचक पात्र, संवाद, नेपथ्य आणि दृश्यपरिणामकारकता यांची रेलचेल असलेले नाटक होते तर वृद्ध दांपत्यावर बेतलेले 'संध्याछाया' हे इनमीन चारेक पात्रांचे एकाच सेटवरचे, उदास नेपथ्याचे अन दृश्य परिणामकारकतेचा अभाव असणारे नाटक होते,..
मुले आणि सुना नातवंडे यांच्या शिवाय आपला वृद्धापकाळ व्यतित करणारे एका घरातले दांपत्य ही त्या नाटकाची संहिता होती.
मात्र दळवींनी या संहितेत शब्दप्राण फुंकले अन हे नाटक मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड बनून राहिले.
'संध्याछाया' ही दळवींची अत्यंत लक्षणीय अशी मराठी नाट्यकृती आहे. नीरस व निरर्थक ठरणार्या जीवनाच्या जीवघेण्या तोच-तोपणाचे नाट्यात्म दर्शन घडवायचे व या दर्शनाची नाट्यात्मता दोन तास सतत टिकवायची या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. दळवींच्या नाट्यप्रतिभेने ह्या दोन्ही गोष्टी साधल्या हे तिचे अत्यंत उल्लेखनीय असे वैशिष्ट्य आहे. त्यातलं म्हातारं जोडपं पारंपरिक भावनांचं प्रतीक आहे. त्यांना घरगड्याजवळ बोलावंसं वाटतं. पण तो त्यांच्याशी बोलत नाही. यंत्रासारखं काम करून चालता होतो. पुढे येऊ घातलेल्या भावनाहीन पण कार्यक्षम यांत्रिक संस्कृतीचंच प्रतीक तो आहे.

















































