माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो.













































