तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...
बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"
अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.
वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !
- समीर गायकवाड