रविवार, १६ जून, २०१९

मोळीवाला - एक आठवण वडीलांची...



'फादर्स डे'निमित्त सकाळी सोशल मीडियावर माझ्या वडीलांचा फोटो पोस्ट करताना विख्यात शायर, कवी निदा फाजली यांच्या 'मैं तुम्हारे कब्र पर फातेहा पढने नही आता' या कवितेचा अनुवाद दिला होता. त्या पोस्टवर व्यक्त होण्याऐवजी इनबॉक्समध्ये येऊन एका ज्येष्ठ स्नेहींनी वडीलांची विचारपूस केली, त्यांची माहिती ऐकून ते चकित झाले. त्या अनुषंगाने पोस्टमध्ये आणखी थोडं तरी वडीलांबद्दल लिहायला हवं होतं असं मत त्यांनी नोंदवलं. आईबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो, वडीलांबद्दल लिहिताना, बोलताना आपण नेहमीच हात आखडता घेतो हे सत्य स्वीकारत वडीलांची एक आठवण इथे लिहावीशी वाटतेय.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे आमचं गाव असलं तरी ते काही आमचं पिढीजात गाव नाही. वडीलांचे आजोबा नारायणराव हे पोटापाण्यासाठी विस्थापित होऊन इथं आले आणि इथलेच झाले. माझे आजोबा बलभीमराव गायकवाड यांनी गावात पहिलं किराण्याचं दुकान उघडलं. अतिशय सचोटीने आणि कष्टाने त्यांनी व्यापार केला. त्यांची विश्वसनियता इतकी होती की पंचक्रोशीतली माणसं दीर्घकाळासाठी कुठं परगावी वा तीर्थयात्रेस वगैरे निघाली की आजोबांकडं पैसाअडका ठेवून जात. परतल्यानंतर त्यांचा ऐवज त्यांना सुखरूप परत मिळे. गावात वीज नव्हती, मेंटलची गॅसबत्ती वापरून ते दुकानदारी करत. आजोबांच्या व्यवसायात आजी चंद्रभागाबाईंनी मदत केली. मुळात गावात दुकानदारी करण्याची कल्पना नारायणरावांच्या पत्नीची आणि विशेष बाब म्हणजे ज्या काळी खेड्यापाड्यात गोषा पाळला जायचा त्या काळात आजीने, पणजीने दुकानदारी केली. यामुळं झालं असं की आमच्या घराण्याचा उल्लेख वाणी असाच होऊ लागला. आमच्या तीन पिढ्यांना 'वाण्याची पोरं' हा शब्द परिचयाचा झाला होता. त्या काळात लग्न लवकर होई. विविध साथींचे आजार आणि रोगराईमुळे भरपूर अपत्ये होऊ देण्याकडे कल असे. जेणेकरून रोगांच्या प्रादुर्भावामुळे निम्मी अपत्यं वारली तरी अंगणात किलबिलाट राही. आजोबांना नऊ मुले आणि दोन मुली होत्या. त्यातलं एक मुल आणि एक मुलगी अकाली निवर्तली. आठ मुलं आणि एक मुलगी मागे ठेवून २५ मार्च १९७५ मध्ये बलभीमरावांचे निधन झालं. त्यांच्या आठ मुलांत माझ्या वडीलांचा म्हणजे रावसाहेब यांचा क्रम दुसऱ्या नंबरचा होता. चंद्रभागा आईचा पाळणा सातत्याने हलता राहिल्याने तिच्या जीवाचे काहीसे हाल झाले पण त्या बद्दल तिनं कधी कुणापाशी चकार शब्द काढला नाही.

बलभीमराव म्हणजे एकदम परोपकारी माणूस ! १९७२ च्या दुष्काळात त्यांनी शेतातलं उभं पीक जाळून गावाला पाणी दिलेलं. वारकरी संप्रदायाचा ध्वजा घरावर त्यांनी कायम फडकता ठेवलेला. व्यापार उदीम करताना काहींनी त्यांना छळण्याचा प्रयत्न केला पण ते कधी कुणाला उलटून बोलले नाहीत. सुरुवातीच्या काळात त्यांची सांपत्तिक स्थिती मात्र यथातथाच होती. त्याचा फटका अन्य भावंडांसह माझ्या वडीलांनाही बऱ्यापैकी बसला.  त्यांच्या इतर समवयीन भावंडांचा शिक्षणाकडे फारसा कल नव्हता तुलनेने वडीलांची शिक्षणाची उर्मी अधिक होती. अन्य भावंडांनी शेती उत्तम प्रकारे केली, वडीलांचा व्यापार पुढे नेला. त्या ओढीत त्यांची शिक्षणाची गोडी आटत गेली. शिवाय गावात प्राथमिक शाळेच्या पुढे शिक्षण नव्हते. सोलापुरात जाऊन शिक्षण घ्यावं तर तितकी फी भरावी इतका धनसंचय नव्हता. कारण एकापाठोपाठ झालेल्या मुलांच्या पालनपोषणातच बरीचशी रक्कम खर्ची पडे, खेरिज आजोबांचा स्वभाव दात्या हातांचा असल्याने घरात पैसाअडका हाती राखून ठेवण्याकडे कुणाचा कल नव्हता. 

यावर वडीलांनीच मार्ग काढला. त्यांनी शेतातली, इकडची तिकडची लाकडं फोडण्याचं काम सुरू केलं. भल्या सकाळी उठून लाकडं तोडायची, त्यांची मोळी सायकलला बांधून ते १३ किलोमीटर अंतरावरील सोलापुरास जाऊ लागले. त्यांचं वय तेंव्हा बारा तेरा वर्षांचे असावे. कमीत कमी चार पाच मण लाकूड सायकलवर लादून १३ किमीची तंगडतोड करत ते त्या काळी रोज सोलापूरला येत. शहरात आल्यानंतर सळई मारुती मंदिराच्यापुढे असलेल्या कोमल नावाच्या लाकडाच्या वखारीत ते लाकूड विकत. ते पैसे घेऊन ते कल्पना टॉकीज जवळील बर्फ कारखान्यात जात. लाकडं विकून आलेल्या निम्म्या पैशांचा बर्फ घेत, तो बर्फ सायकलवर बांधून पुन्हा गावाकडे कूच करत. एव्हाना त्यांना गावात यायला भरदुपारचा प्रहर उजाडलेला असे. गावात आल्याबरोबर पोटात दोन घास ढकलून ते पुन्हा घराबाहेर पडत. गावातल्या सगळ्या गल्ल्यातून ते बर्फ विकत फिरत. बर्फगोळा विकून आलेले पैसे आणि लाकडं विकून आलेले पैसे ही त्यांची स्वतःची मेहनतीची कमाई होती. त्यातून त्यांनी त्यांचं शिक्षण पुरं केलं. सोलापूरमधल्या हायर प्रायमरी शाळेत त्यांचं उर्वरित शिक्षण पुरं झालं. 

वडीलांनी घेतलेल्या कष्टास तोड नव्हती, त्यांच्या जिद्दीस सीमा नव्हत्या. दांडगी इच्छाशक्ती आणि मेहनती स्वभाव याच्या जोरावर त्यांनी पुढचं शिक्षण पुरं केलं. जिल्हा परिषदेत अवैद्यकीय पर्यवेक्षक पदाची नोकरी त्यांना मिळाली. या नोकरीत अनेक ठिकाणी त्यांच्या बदल्या झाल्या, विविध गावं ते फिरले. (माझा जन्म कोल्हापूरचा, तेंव्हा त्यांचं नोकरीचं ठिकाण होतं ते)  कुष्टरोग्यांची त्यांनी सेवा केली. त्यांच्या शिक्षणाचा वसा आम्ही भावंडांनी पुढे नेला. माझे दोन भाऊ केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. आज ते अत्यंत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. मी आईवडीलांपाशीच राहिलो. शिकलो सवरलो, घडलो बिघडलो. त्यांच्या इतक्या दीर्घ आणि निकट सहवासात राहिलो की उच्च शिक्षण होऊनही नोकरीचा हट्ट करू शकलो नाही. विषम परिस्थितीवर मात करत सचोटीने वागत समाजसेवेचे व्रत अंगीकारत समृद्ध जीवन जगण्याचा वडीलांचा मंत्र आज उपयोगास येतोय.

आजही कुणी बर्फगोळा विकणारा किशोरवयीन मुलगा दिसला की मन भरून येतं. त्याला मदत करताना हायसं वाटतं. लाकडाची मोळी घेऊन जाणारी माणसं आता दुर्मिळ झालीत. पण काही दिवसापूर्वी याच वखारीजवळ एका पन्नाशीच्या वयातल्या व्यक्तीला पाहिलं, तेंव्हा डोळे भरून आले. लाकडं नेण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते. काही अंतरावर उभं राहून मी त्यांचं संभाषण ऐकत होतो. शेवटी राहवलं नाही. जवळ गेलो. खिशात हात कधी गेला काही कळलंच नाही. मला पाहून वखारमालक वरमले. वहीत मांडून ठेवतो, पुढच्या टायमाला पैसे द्या असं सांगत त्यांनी त्यांची बोळवण केली. त्या घाईत खिशात नोट सरकवलेली त्या व्यक्तीस कळलंच नाही. त्यांनी सायकलला मोळी बांधली आणि खेचल्यागत  माझ्याजवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर जाळीनं अकाली वीणकाम केलेलं. रापलेला, थकलेला चेहरा खूप काही सांगून जात होता. सदगदीत होऊन त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि पाठ थोपटून निघून गेले देखील. माझे डोळे भरून आलेले. त्या दिवशी माझ्या खिशात तेव्हढेच पैसे का होते याचा  पश्चाताप आजही होतो.

आज आमच्या कुटुंबातील सकल पुढची पिढी शिक्षणासाठी आसुसलेली आहे, शिक्षणाची किंमत सर्वाना कळली आहे. कुटुंबातली थोरली भावंडे आता उरली नाहीत पण हयात असलेल्या चुलत्यांनी घराण्याच्या कर्तृत्वाचा वसा पुढे नेलाय. कुटुंब प्रगती पथावर आहे, खेरीज सगळ्यांच्या मनात कुटुंबाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटलेल्या दीपस्तंभाप्रति कृतज्ञताही आहे ही बाब सुखावह आहे. कुटुंबातील ज्येष्ठ पिढी आता समाधानी आहे. बहरलेल्या वटवृक्षाच्या विराट सावलीचं श्रेय त्यांना निश्चितच आहे.  कुटुंबात एकमेकाप्रति असणारी आस्था, आदर आणि स्नेह वेगळ्या सुखाची अनुभूती देतात.  हे दृश्य दुर्मिळ होत चाललेय.  

आम्हा भावंडासाठी आपली ख़ुशी, हौस, मौज यांचं बलिदान देऊन आमचं जीवन सुलभ सफल करणाऱ्या वडीलांच्या खिशात तर खूप कमी पैसे असत. पण त्यांनी दिलेला त्यांच्या खिशातला रुपया देखील जगातल्या कोणत्याही बँक बॅलन्सपेक्षा अधिक मूल्याचा होता. तो अखेरचा रुपया देतानाची त्यांची तृप्ती आजही माझं जगणं अर्थपूर्ण करून जाते.            

आजही असा कुणी मोळीवाला दिसला की जीव कासावीस होतो आणि वडीलांचे कठोर परिश्रम आठवतात. मग डोळ्यात वळवाचा पाऊस कधी येतो कळत नाही. हा पाऊस हवाहवासा असतो ज्यात चिंब न्हाऊन निघताना वडीलांची गळाभेट झाल्याचं समाधान मिळतं.. . 

- समीर गायकवाड 

1 टिप्पणी: