बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१९

रेड लाईट डायरीज - बुधवारातील हसीना


बुधवारपेठेतली हसीना
ओठ चिरेपर्यंत लालबुंद लिपस्टिक लावून
दारे उघडी टाकून, खिडकीच्या तुटक्या फळकुटाला टेकून
खोटेखोटे हसत मुद्दाम उघडी छाती वाकवून उभी असते
तेंव्हा सभ्यतेचे अनेक छर्रे टराटरा फडफडवणारा शुभ्रपांढरा कावळा
तिच्याकडे पाहत शहाजोग गांडूळासारखा आत शिरतो.
आत जाताच कावळ्यातला नर कन्व्हर्ट होतो चिंधाडलेल्या लिंगपिसाटात
फाटून गेलेल्या बेडशीट अन कापूस निघालेल्या गादीवर झेपावून,
भिंतीवर लावलेल्या इम्रान हाश्मीच्या पोस्टरकडे बघत
तो तिच्या अचेतन देहावर स्वार होतो गिधाडांसारखा !

तिचे मनसोक्त लचके तोडतो.
बाहेर सतत दार वाजवणाऱ्या तिच्या गाबडयाला
आईवरून कचकून शिव्या देतो,
मरतुकड्या पलंगाला वाजेपर्यंत करकचून तुडवत राहतो.
खाली सराईतपणे मुडदा होऊन पडलेली हसीना छताकडे नजर लावून असते,
रांडेच्या दुखण्याचे कसलेसे पांचट प्रेमगीत
तिच्या अनौरस पोराला बाहेर कुणीतरी ऐकवते,

लाळेने भरलेल्या गुटख्यात लडबडलेल्या त्याच्या ओठाला खच्चून चावावे
असे तिला राहून वाटत असते
तरीही ती निपचित पडून राहते.
त्याची नखे रुततात, अंग ओरखाडत राहते
घामटल्या तिच्या हाडांना तो शोषत राहतो.
भोसडीच्या म्हणेस्तोवर हलत नाही
नंतर तसाच भोंगळा पडून राहतो,
पैसे मागितल्यावर छद्मी हसतो
आचकट विचकट बोलत कपडे घालतो,
दात उमटतील असे
जोरात चावतो.
खिशात हात घालून चुरगळलेल्या
नोटा तिच्या हातात कोंबतो,
सावध बाहेर येतो
थुंकून लाल झालेल्या रस्त्यावर पचकतो
हॉटेलमध्ये जाऊन थंड कोक पितो
फोन करतो,
आलोच म्हणून
दगडूशेठसमोर येताच
तो षंढमर्द पुन्हा
शुभ्र कावळा
होतो...

हात जोडून सगळी सोंगे करून चेहऱ्यावर वत्सल भाव आणून भोंदू सभ्यतेचा दलाल होतो.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा