३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्व प्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढले. या थोर आद्य क्रांतीकारकाचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते...
मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशवाई बुडाल्यानंतर हिंदुस्थानावर इंग्रजांचा अंमल सुरु झाला तेव्हा उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध पहिले बंड पुकारले म्हणून ते आद्यक्रांतिवीर ठरतात. छत्रपती शिवाजीराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गनिमीकाव्याने लढत ब्रिटिशांशी झुंज दिली...
~~~~~~~~
ब्रिटिशांनी १८१७ मध्ये भारतात मद्रास लिटररी सोसायटीची स्थापना केली. याच संस्थेकडून मद्रास जर्नल ऑफ लिटरेचर अँड सायन्स नावाचे
नियतकालिक चालवले जात होते. त्याचे पाच शृंखलात ३८ अंक काढले गेले. १८३३ ते १८९४ या काळात ते प्रकाशित केले गेले. १७५० पासून ते १८९४ पर्यंतच्या विविध ठिकाणी विविध हुद्द्यावर कार्यरत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बहुपेडी माहितीचं हे संकलन स्वरूप होतं. यात पानाफुलांपासून ते किटकापर्यंत आणि तापमान - पर्जन्यमानापासून ते क्रांतीकारकापर्यंत व जात - वंश भेद इथपर्यंतचे मुद्दे, घटना, व्यक्ती विशेष चर्चिले गेलेत. हे सगळं तटस्थ वृत्तीने केल्याचे जाणवतं. याच उपक्रमा अंतर्गत 'ऍन अकाऊंट ऑफ द ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन ऑफ द ट्राईब ऑफ रामोसीज इनक्लुडिंग लाईफ ऑफ द चीफ उमैया(उमाजी) नाईक' या कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश लिखित पुस्तकात उमाजी नाईक आणि रामोशी समाज यांचा सविस्तर इतिहास मांडला आहे. अलेक्झांडर मॅकिंटॉश हे मद्रास आर्मीच्या २७ व्या रेजिमेंटमधील लष्करी सेवेत होते यामुळे या ऐतिहासिक दाव्यांना, तथ्यांना महत्व आहे. यात एके ठिकाणी उमाजी नाईक याने बंड केले असा उल्लेख आहे, विशेष म्हणजे बंड हा मराठी शब्द BUND असा लिहिलाय. उमाजी नाईक यांचे प्रेरणास्थान मराठा राज्याचे नायक शिवाजी होते असा महत्वाचा उल्लेख यात आढळतो.