
1967 चे वर्ष होते. तरुण सावनकुमारला चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवायचं होतं, इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवायचं होतं. अभिनेता संजीवकुमारला नायकाच्या भूमिकेत ठेवून त्याने ‘नौनिहाल’ हा आगळा वेगळा सिनेमा निर्मिला मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल पडला. सावनकुमार दुःखी झाला. मात्र तो हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याने एक कथा लिहिली होती, त्यावर त्याला सिनेमा बनवायचा होता नि त्याचे दिग्दर्शनही स्वतःच करायचे होते. त्याच्या मित्राने कथा ऐकली नि त्याला सांगितले की या कथेसाठी नायिका म्हणून मीनाकुमारीच सर्वश्रेष्ठ ठरेल. दुसऱ्याच दिवशी सावनकुमारने मीनाकुमारीला फोन केला. मीनाच्या बहिणीने फोन उचलला. सावनने आपलं काम सांगितलं. त्याच दिवशी दुपारी मीनाने त्याला घरी बोलवलं. घरी जाताच त्याने आपली ओळख करून दिली आणि आपलं कामही सांगितलं. मीनाकुमारी थक्क झाली कारण तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारा आणि केवळ जुजबी अनुभव असणारा तरुण तिला कथा ऐकवत होता. कथा ऐकून आणि त्या तरुणाविषयीच्या अकस्मात भावना आकर्षणातून तिने होकार दिला. सिनेमाची तयारी पूर्ण झाली. चित्रिकरण सुरू झाले. या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये एक प्लेटोनिक नाते तयार झाले जे देह आणि लैंगिक जाणिवांच्या पुढचे होते. सिनेमाचे शुटींग सुरू झाले नि मीनाकुमारीची तब्येत वरचेवर बिघडू लागली. 2 डिसेंबर 1971 ला मीनाकुमारीवरतीच अखेरचा शॉट शूट झाला. त्यानंतर तिची प्रकृती इतकी खालावली की तिच्या मृत्यूच्या वावड्या उठू लागल्या. तिच्या आयुष्यातील अखेरच्या काळात याच सावनकुमारने तिची सेवा सुश्रूषा केली. तिच्या रक्ताच्या उलट्या तो हाताने साफ करायचा. सिनेमा पूर्ण होऊनदेखील रिलीज होण्यास आर्थिक अडथळे येत होते. मीनाकुमारीने तिच्या नावावर असलेला बंगला विकून त्याला पैसे दिले. 31 मार्च 1972 रोजी तिचे देहावसान झाले. सावनकुमार अतिव दुःखात बुडाला. मीना त्याची पत्नी नसली तरी त्याचे सर्वस्व होते, त्याच्यासाठी तीच देव होती; तीच मसिहा होती. मीनाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी 22 नोव्हेंबर 1972 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे नाव होते ‘गोमती के किनारे’! सिनेमा दणकून आपटला! सावनकुमारला याचे विलक्षण दुःख झाले. मीना आणि त्याच्या प्रेमभावनेविषयी त्याने कविता लिहिली. त्यातलंच एक गीत त्याला अजरामर करून गेलं! त्यासाठी आपल्याला आणखी एक दशक पुढे जावे लागेल!