ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..
भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.
उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.
झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.
ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......
पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात
ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि
याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे की
चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती.
पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.
वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....
~~~~~~~~~~~~~~~~