
पवित्र काय आणि अपवित्र काय याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, पण रेड लाईट एरियात त्या जितक्या तीक्ष्ण आणि कटू असतात तितक्या अन्यत्र असू शकत नाहीत....
जमुनाबाईचे ओठ सदा न कदा पान खाऊन लाल झालेले असत.
वरवर साधी वाटणारी पण एकदम फाटक्या तोंडाची, पक्की जहांबाज !
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की भल्याभल्यांना घाम फुटे.
आवाज एकदम मधाळ, ओठातून साखरपाक ओघळावा इतका.
तारसप्तकात चढला तरी त्यातही एक गोडवा वाटे.
हापूस आंब्यासारखी रसरसलेली काया अन मुखडयावर कत्लवाली नजाकत.
एका नजरंत पुरुषाचं पाणी जोखणारी, डोक्यात त्याची कुंडली बनवणारी.
कुणाला कुठवर घोळवायचं, कुणाला खेळवायचं अन कुणापुढं नांगी टाकायची हे तिला चांगले ठाऊक.
कुठल्याही विषयावर बोलताना बागेतून फिरवून आणून अखेरीस आपल्याला हवं तसं धोपटून काढण्यात तिचा हातखंडा.
बोलताना विषय पुरत नसत. तिचे पदराचे चाळे सुरु असत. अंगठा जमिनीवर मुडपून पाय हलवत खुर्चीत रेलून बसे आणि केसांचं विस्कटणं सुरु होई.
आपण काहीही बोललो नसलो तरी ती म्हणे, “हां तो क्या कह रहा था तू ?”
तिनं टाकलेला तो फास असे, सावज त्यात अलगद अडके. मग ती त्याला आपल्या साच्यात घुसळून काढे.
जमुनाचं रसायनच वेगळं होतं, ती या लाईनमध्ये फिटही होती आणि अनफिटही होती.
एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी चाईल्डसेक्सवर्कर्सची नवी रसद आल्याचे कळल्यामुळे खबरबात मिळवण्यासाठी तिच्याकडे गेल्यावर तिने आधी हजेरी घेतली.
कदाचित त्या दिवशी माझ्या आधी कुणी तरी तिचा भेजाफ्राय करून गेलं असावं.
नया बच्ची लोग का मालुमात हैं क्या असं म्हणायचा अवकाश तिने विचारलं, “तुला कशाला हवी रे ही जानकारी ?”
तिथेच मी चुकलो, चुकून बोलून गेलो – “ये ऐसाच ग्यान बटोरने के लिये !”
झालं. उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक दाटून आली.
“कसलं ग्यान ?” – हातभर पुढे सरकत जमुना बोलली.
माझी तंतरली होती, ऐन वेळेस काय बोलावं ते सुचलं नाही. गडबडीत बोलून गेलो - “तेच ज्ञान, आपलं कर्म आणि कर्माच फळ, त्या शिवाय का कुणी इथं येतं ?”
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..
















































