ज्याला त्याला कट्टर व्हायचे आहे पण समोरच्या धर्माच्या माणसाने कट्टर होऊ नये, त्याने मवाळ असावे सुधारणावादी असावे असे वाटते.
अशी अनेकांची धारणा बनत चालली आहे; आपल्या धार्मिक अभिव्यक्तीची हीच खरी शोकांतिका आहे.
हिंदुत्ववाद्यांना तस्लिमा नसरीन, हमीद दलवाई, सलमान रश्दी यांचे जाम आकर्षण असते तर महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकर व अलीकडच्या काळातली दाभोळकर आदी मंडळी त्यांना वर्ज्य असतात.
हीच बाब इस्लामी कट्टरवाद्यांना लागू पडते. त्यांना तस्लिमा, दलवाई, रश्दी नकोसे असतात तर फुले, शाहू, आंबेडकर त्यांना वंदनीय वाटतात !
कडवट हिंदुत्ववाद्याला वाटते की, मुसलमानांनी कट्टर असू नये, त्याने बुरसटलेला इस्लाम सोडावा आणि सुधारणावादी व्हावं. त्याचवेळी तो स्वतःच्या कट्टर सनातनी हिंदुत्वाला गोंजारत बसतो.
कडव्या धर्मवेड्या मुसलमानांनाही असेच वाटत असते, हिंदुत्ववाद्यांच्या कट्टरतेवरती ते नाराज असतात आणि स्वतः मात्र कर्मठ इस्लामी झालेले असतात.
आपल्या धर्माला घराच्या उंबरठयापर्यंत सीमित ठेवून, सर्वांचा आदर करायला शिकून, स्वधर्मासह अन्य धर्मातील अनिष्ट रूढी रिवाज परंपरा याविरुद्ध कोणताही भेदाभेद न करता आवाज उठवला जात नाही तोवर धर्मवाद हा सामाजिक एकात्मकतेसाठी धोक्याचा ठरतो.
कोणत्याही धर्मामधील धार्मिक कट्टरतावाद हा सामाजिक समरसतेची वीण उसवणाराच असतो. ज्या ज्या देशांनी कर्मठ धर्मवाद जोपासले त्यांचे पुढे काय झाले याची गगनभेदी ग्वाही इतिहासाने देऊन सुद्धा माणसं इतिहासातून काहीच शिकत नाहीत असं दुर्दैवाने म्हणावे लागते.
एक निरीक्षण नोंदवावे वाटते. हिंदू धर्मांत जितक्या मोठ्या प्रमाणात सुधारणावादी, मवाळ आणि आत्मनिरीक्षण करणारे व स्वधर्मावर परखड टीकाटिप्पणी करणारे लोक समोर आले, त्याच्या तुलनेत मुस्लिम मागे आहेत, अगदी काही मोजकी नावे समोर येतात.
धर्माचा पगडा, शिक्षणाचा अभाव, आर्थिक सामाजिक परिघातला निम्न स्तर आणि पराकोटीचे धार्मिक बाबींचे अनुसरण ह्यामुळे असे घडले असावे. त्याचबरोबर हे ही नमूद केले पाहिजे की, सुधारणावादी मुस्लिमांना अत्यंत कमी लोकांचे समर्थन मिळते, लोक मोठ्या प्रमाणात मौन राहतात आणि ह्या इसमामुळे आपला धर्म बुडाला आहे याला अद्दल घडवली पाहिजे असे वाटणाऱ्यांची संख्या मात्र बरीच मोठी दिसते. असो.
मुस्लीम सत्यशोधक समाजाचे संस्थापक व पुरोगामी विचाराचे धर्मसुधारक हमीद दलवाई यांचा आज जन्मदिवस.
दलवाईंविषयी एका लेखात नरहर कुरुंदकर लिहितात -
"अतिशय अजिंक्य आणि बलवान असणाऱ्या तटबंद्या कितीही बलवान असोत, त्या शेवटी कोसळत चाललेल्या मावळत्या शक्ती आहेत. या मावळत्या शक्तींचा विजय फार काळ टिकणारा नसतो.
मुस्लिम समाजही बदलतच जाणार आहे. तोंडाने 'नाही नाही' म्हणत गोषा सोडून बाहेर येणाऱ्या स्त्रियांची संख्या सारखी वाढतच आहे, तिथून वाढतच जाणार आहे. मुस्लिम समाजातही यापुढे नवे विचार वाढतच जाणार आहेत."
"थोडा उशीर लागेल हे मान्य केले तरी अंधश्रद्धा, जळमटलेली मने कायमची गुलाम राहणार नाही. सगळेच हमीद दलवाईंप्रमाणे बंडखोर नसतील;
पण कालमानानुसार 'मुस्लिम पर्सनल लॉ'मध्ये, मुस्लिम समाजात परिवर्तनाची भूक वाढवून दमादमाने बदल घडवून आणावा लागेल, असे म्हणणारे लोक त्याही समाजात तयार होत आहेत. परंपरावाद्यांचे बळ हे शेवटी मावळत्या शक्तींचे बळ असते. दलवाई हा नवा उगवता विचार आहे.
दलवाईंच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी दलवाईंचा विचार वेगाने पसरत कसा जाईल, याची काळजी घ्यावी. दलवाईंचे चाहते व अनुयायी तो विचार करतीलही, करीतही आहेत. पण उरलेल्यांनी हे लक्षात ठेवावे की पराजय दलवाईंचा होणार नसून परंपरावाद्यांचा होणार आहे. वर्षांची संख्या थोडी वाढेल;
पण भवितव्याच्या या दिशेत बदल होण्याची शक्यता अजिबात नाही.
ज्या शक्ती कदाचित दहा-वीस वर्षांत विजयी होणार नाहीत, ज्यांना विजयी व्हायला कदाचित शंभर वर्षे लागतील, त्या शक्तीचा पराभव झालेला आहे, असे समजत बसण्यात आपण आत्मवंचनेशिवाय दुसरे काही मिळवत नसतो."
माणसं शिकली म्हणजे कट्टरतावादापासून दूर असतात असेही नव्हे. हिंदू धर्मीयांच्या तुलनेत मुस्लिमांमध्ये आधुनिकतावाद, लिबरलिझम, पुरोगामी विचारवाद कमी रुजला आहे हे वास्तव आहे. हमीद दलवाई यांच्या निधनाला काही दशके उलटून गेली तरी त्यांच्यासारखी माणसं मुस्लिमांमध्ये खूप कमी आहेत, हे धर्माचा जबर पगडा असल्याचे लक्षण होय.
याची कारणे शोधून त्यावर काम होणं गरजेचे आहे. कर्मठता आणि कट्टरवाद माणसाच्या विवेकावर ताबा मिळवतात. भल्याबुऱ्याच्या त्याच्या व्याख्या बदलवण्यापासून ते त्याच्यातील संवेदनशीलता लोप पावण्यापर्यंत प्रभाव पडतो. आपला विवेक ऱ्हास पावू लागलाय का याची सोपी पडताळणी आपल्या कट्टरतावादातून येऊ शकते, सद्यकाळातील कोलाहलात आपण नेमके कुठे उभे आहोत हे एकदा तपासलेच पाहिजे.
अनिल अवचट यांनी हमीद दलवाई यांच्यावर लिहिलेली 'हमीद' ही पुस्तिका वाचनीय आहे. याचे वाचन केलं तरी अनेक कर्मठांचे विचार बदलतील इतकी ताकद यात आहे.
हमीद दलवाईंना अभिवादन.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा