शनिवार, १२ सप्टेंबर, २०२६

वांबाळ..


नुसत्या नावाच्या धवशीने गर्भ राहत नाही असं गावाकडे आजही बोललं जातं. शून्य पाऊसमान असलेलं उदासवाणं आभाळ दाटलेलं मळभ दिवसभर असलं की आज वांबाळ पडलंय असं वर्णन होतं.

वांबाळ पडलं की अवघ्या चराचराला आळस येतो! गुरं देखील जागेवर बसून राहतात. माना तुकवून उभ्या असलेल्या तमाम झाडांची पानं हलत नाहीत. खुरड्यातल्या कोंबड्या गंधं अंडं उबवत डालग्यात बसून राहतात.
कडब्याच्या गंजीवरची साळूंखी टक्क बसून असते.

एरव्ही चरायला जाणाऱ्या म्हसरांच्या पाठीवरचे किडे खाणारे बगळे लांबूनच म्हशींना न्याहाळत राहतात, जवळ यायची तसदी घेत नाहीत.

ओढ्याचं पाणी एका संथ लयीत वाहत राहतं. गावाबाहेरच्या पाझर तळ्यातलं हिरवं निळं पाणी निश्चल राहतं, त्यावर कुठले तरंगच उमटत नाहीत, तळ्याकाठच्या झाडाचं एखादं पान गळून पडलं तरच जलतरंग उठतात!
वेशीच्या तोंडावर असणाऱ्या मंदिरालगत असणाऱ्या वड पिंपळावरचे कोकीळ, पारवे विश्रांती फर्मावतात.
पाकोळ्यांचं थरथरत उडणंही दृष्टीस पडत नाही.

गाभाऱ्यात लावलेल्या उदबत्ती, धुपाचा दरवळ तिथेच साठून असतो तो दूरवर पसरत नाही. एखादा वाटसरू मात्र देवळाच्या पायऱ्यांवर हमखास दिसतो.

पारावरचा गप्पांचा फड इतका आळसावून जातो की सगळ्यांच्या पानाच्या चंच्या मोकळ्या होऊन जातात.
गप्पांचे विषय संपतात, मग माणसं पत्त्यांचा डाव मांडून बसतात.
त्यांच्या नजीक असणारा पिंपळ त्या पत्त्यांमध्ये आस्ते कदम डोकावत राहतो.

एरव्ही बेगीनं शेतशिवाराकडे जाणारी माणसं सुस्तावल्या देहबोलीत गाडीवाटांनी जाताना दिसतात.
घरोघरच्या बायाबापड्या सैपाक आवरून एखादं दुसरं मोठं काम काढतात. कुणी सारवण काढते तर कुणीएक जुनी धुणी धूत राहते!

पोरंठोरं गल्लीचा कोपरा घेऊन खेळ मांडून बसतात नाहीतर कुणाच्या तरी वस्तीवर जाऊन सूरपारंब्याचा बेत करतात!

अधूनमधून जाणारी एखादी मोटार सायकल नाहीतर खडखड आवाज करत जाणारं एखादं जीपडं गावाच्या शांततेचं भंग करतं. वाण्यांची दुकानं ओस पडतात. एरव्ही उन्हाळ्यात विहिरीत उड्या घेणारी पोर दिसेनाशी होतात, गच्च भरलेल्या विहिरी साय आलेल्या चहाच्या कपासारख्या वाटू लागतात!

गावाकडे येणाऱ्या पोटरस्त्याला जोडून असणाऱ्या हायवेवरून वेगाने येजा करणाऱ्या मोठाल्या वाहनांचे आवाज स्पष्ट कानी पडतात. झाडांच्या सालींवर रेंगाळणारे मुंगळे गायब होतात. बुंध्यापाशी साठलेल्या पानांच्या बेचक्यात काळया मुंग्यांची रांग शिस्तीत वाटचाल करत असते, कदाचित हा तेव्हढा एकच जीव असावा जो कार्यमग्न राहून वांबाळीला भीक घालत नसेल!

गल्लीच्या कोपऱ्यापाशी नाहीतर वेशीपाशी, बसस्टॉपपाशी, वारकाच्या दुकानापाशी, जालूमामाच्या कँटीनपाशी रिकामटेकड्यांच्या गप्पांना बहर येत राहतो. एक कंपू गेला की दुसरा येत राहतो. गॅसशेगडीवर चहाचं आधण चढत राहातं. चहाचे कप विसळत राहतात.

अंगठ्यांनी पानांचा देठ खुडून तर्जनीने लावलेला चुना पानाला रंगत आणतो. पानाच्या पिचकाऱ्या पडत राहतात.
गावात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडं लोक अकारण नजरा खिळवून आशाळभुतागत पाहत राहतात. दिवसभरात नवीन काही मॅटर घडला नाहीतर तो दिवस भलताच नीरस जातो!

एखाद्या घरात आजारी असलेलं म्हातारं आढ्याला नजर लावून मुकाट झोपून राहतं, तर डोईची चांदी नि तोंडाचं बोळकं झालेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका हनुवटीला पदर लावून बारीक आवाजात जुन्या आठवणींचं दळण टाकत राहतात.

रानात राबणारे हात देखील एखाद्या बांधावरचं लिंबाचं झाड बघून चवाळं अंथरून भाजी भाकरीसोबत तिखटजाळ येसूर लसूण कांद्याचं गणित जुळवून मस्त पंगत जमवतात!

वांबाळ माणसाला सुस्त करते, गावजीवन ठप्प करते!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा