रविवार, २७ सप्टेंबर, २०२६

याद पिया की आये - एका वेदनेचे संगीत!



आपल्यापैकी बऱ्याच जणांनी नाना पाटेकरांचा 'प्रहार' सिनेमा पाहिला असेल. त्यात त्यांनी मेजर चौहानचा रोल केलाय. ह्यातल्या एका सीनमध्ये संयम संपलेला मेजर चौहान अतिशय निर्मम पद्धतीने, गुंडांना एका पाठोपाठ एक ठोकून काढतो. मारहाणीची ही दृश्ये अंगावर येतात. भयंकर हिंसक आणि क्रूर पद्धतीने मेजर चौहान एकेका गुंडाला संपवतात. या संपूर्ण सीनच्या बॅकग्राउंडला शोभा गुर्टू यांच्या आवाजातली 'याद पिया की आये...' ह्या ठुमरीचे आलाप आहेत. मेजर चौहान आपल्या आईच्या अस्तित्वाच्या संदर्भात बदनाम गल्लीतून फिरताना बॅकग्राउंडला ह्या ठुमरीचे प्लेबॅक आहे. एकीकडे एक माणूस डझनावारी लोकांची चामडी सोलून काढतोय आणि दुसरीकडे विरहाची अतिशय आर्त अशी ठुमरी कानी पडत राहते. वरवर विरोधाभास वाटत असला तरी ह्यात एक तादात्म्य होते!
'याद पिया की आये.. ' ला वेदनेचा गहिरा गंध आहे! त्या वेदनेचा दरवळ स्वरांमधून आपल्या अंतःकरणात उतरतो. ह्या ठुमरीला लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते उस्ताद बडे गुलाम अली खान यांना! या रचनेचा इतिहास विरहाचा आहे. त्यासाठी खानसाहेबांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवावे लागते. 1932 मध्ये त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी मर्मभेदी ठुमरी गायली होती. हा एक प्रकारे त्यांच्या मनातील विलाप मानला जातो. काही अधिकृत संगीत-संग्रहांमध्ये तिचे श्रेय ‘पारंपरिक’ असे नोंदवलेले असले तरीही अनेक संगीतस्रोत, त्यांच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विरहातून ही रचना जन्मली आहे असे मानतात. 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे आधुनिक तानसेन म्हणून संबोधले गेलेल्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे आयुष्य एखाद्या चित्रपटासारखेच चढ-उतारांनी, संघर्षाने आणि विरहाच्या अथांग दुःखाने भरलेले होते. त्यांच्या सुरांमध्ये जी वेदना आणि ताकद जाणवायची, ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादळांतूनच तावूनसुलाखून निघाली होती. 2 एप्रिल 1902 रोजी ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाबमधील कसूर येथे एका संगीतकार घराण्यातला त्यांचा जन्म.

त्यांचे वडील अली बख्श खान आणि चुलते, काले खान हे पट्टीचे गायक होते. मात्र, घराण्यात गायनाची परंपरा असूनही त्यांचा सुरुवातीचा काळ प्रचंड संघर्षाचा होता. खान साहेबांना गायक व्हायचे होते, पण सुरुवातीला त्यांना मुख्य गायक म्हणून नव्हे तर 'सारंगी वादक' म्हणून इतर गायकांना संगत करावी लागली. 1923 मध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बनारसमध्ये सारंगीवर महिला गायिकांना साथ देत उपजीविका केली.

मुख्य गायक म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षे कठोर रियाझ आणि प्रतीक्षा करावी लागली. काही वर्षांनी कोलकात्यातल्या एका मोठ्या म्युझिक कन्सर्टमध्ये त्यांना गाण्याची संधी मिळाली. त्या रात्री त्यांच्या गायनाने उपस्थित श्रोत्यांना आणि दिग्गजांना मंत्रमुग्ध केले. ह्या गायनाने त्यांच्या कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाले. कालांतराने ते देशातील आघाडीचे गायक म्हणून नावारूपास आले.

खान साहेबांचे लग्न अली जिवाई यांच्याशी झाले होते. त्यांचे आपल्या पत्नीवर अतोनात प्रेम होते. 1930 साली त्यांच्या पोटी मुनव्वरचा जन्म झाला आणि त्यानंतर दोनच वर्षात 1932 मध्ये त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले. या धक्क्याने ते पूर्णपणे कोलमडून गेले. पत्नीच्या निधनानंतर विरहाच्या आणि दुःखाच्या अथांग डोहात बुडालेल्या खान साहेबांच्या गळ्यातून 'याद पिया की आये' ही अजरामर ठुमरी जन्माला आली. पत्नीच्या आठवणीत दग्ध झालेल्या मनाचा हा आक्रोश आजही श्रोत्यांना व्याकुळ करतो.

1947 मध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा, त्यांचे मूळ गाव 'कसूर' पाकिस्तानात गेले आणि व्यथित झालेले खान साहेबही पाकिस्तानात निघून गेले. अनेक कारणांनी तिथे त्यांचे मन अजिबात रमले नाही. संगीताशिवाय जगू न शकणाऱ्या या कलावंताची तिथे घुसमट होऊ लागली. अखेर मातृभूमीच्या आणि इथल्या रसिकांच्या ओढीने ते भारतात परतले.

1957 मध्ये त्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. भारत सरकारने त्यांचा यथोचित सन्मान करत मुंबईत त्यांच्या निवासस्थानाची तजवीज केली. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत सुखाचा आणि मानाचा काळ होता. भारतात परतल्यानंतर खान साहेबांना अथांग प्रेम लाभले, अतिव आदर मिळाला. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा संघर्षाने डोके वर काढले.

1961 मध्ये त्यांना अंशत: अर्धांगवायूचा झटका आला. ज्या आवाजाने संपूर्ण देशाला वेड लावले होते, तो आवाज आणि शरीर हतबल झाले. पक्षाघातानंतरही त्यांनी गायन पूर्णपणे सोडले नाही; मुलगा मुनव्वर अली खान यांच्या साथीत ते सार्वजनिक कार्यक्रमांत गात राहिले. प्रदीर्घ आजारपणाशी लढताना एप्रिल 1968 मध्ये हैदराबादच्या बशीरबाग पॅलेसमध्ये या महान संगीतसूर्याचा अस्त झाला.

त्यांच्या अनेक रचना आजही ऐकल्या जातात, ते अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. 'याद पिया की आये..' ऐकताना त्यांच्या मनस्थितीची जाणीव होते. 'प्रहार'मध्ये हे गाणे, ज्या सिच्युएशनला येते ती गाण्यासाठी ऑड मानली जाणारी गोष्ट आहे, मात्र दृश्यमानता आणि बॅकग्राऊंडमधले गायन यातला विरोधाभास अंगावर येतो कारण दोन्हींच्या तळाशी विरहाचे कारुण्य आहे.

चित्रपटाची कथा मेजर चव्हाणभोवती फिरते, जे भारतीय सैन्यातील अत्यंत कडक, शिस्तप्रिय असे कमांडो ट्रेनर आहेत. पीटर डिसूझा हा एक कोमल मनाचा मुलगा सैन्यात भरती होतो. मेजर चव्हाण त्याला अतिशय कठोर ट्रेनिंग देऊन एक सक्षम कमांडो बनवतात. एका बचाव मोहिमेदरम्यान अतिरेक्यांशी लढताना पीटर गंभीर जायबंदी होतो आणि त्याला सैन्यातून निवृत्ती घ्यावी लागते.

मेजर चव्हाण जेव्हा पीटरला भेटण्यासाठी मुंबईत येतात, तेव्हा त्यांना समजते की पीटरची स्थानिक गुंडांनी हत्या केली आहे. जो सैनिक सीमेवर देशाच्या शत्रूंशी लढला, तो आपल्याच देशातील अंतर्गत शत्रूंच्या गुंडगिरीतून, खंडणीखोर वृत्तीने मारला गेला, ह्या गोष्टीचा चव्हाण यांना जबर धक्का बसतो. ते पीटरच्या वडिलांची भेट घेतात. त्यांना मदतीचा हात देऊ करतात. तिथेच राहून त्यांना आधार द्यायची त्यांची मनीषा असते. तिथे, पीटरची प्रेयसी वाग्दत्त वधू शर्ली हिच्याशी त्यांची भेट होते. त्यांच्या मनातला आक्रोश अधिकच टोकदार होतो.

त्याच गल्लीत राहणाऱ्या किरण नावाच्या विधवेच्या घरी ते पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्या मोहल्ल्यातील गुंडगिरी करणाऱ्या लोकांचा ते बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करू लागतात मात्र सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे, पीटरच्या हत्येचा साक्षीदार असलेला संपूर्ण समाज, ज्यात त्याचे स्वतःचे वडील आणि शेजारी राहणारे लोक समाविष्ट आहेत, गुंडांच्या भीतीपोटी पोलिसात साक्ष देण्यास नकार देतो. लोक इतके भित्रे आणि लाचार होतात की अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याऐवजी ते डोळे झाकून घेतात!

दरम्यान मेजर चौहानला, किरणने तिच्या घरी आश्रय दिल्याने संतापलेले गुंड तिच्या घरावर हल्ला करतात. सुडाने पेटलेला मेजर चौहान त्या सर्व गुंडांचा खात्मा करतो. त्या फायटिंग सिक्वेन्सला 'याद पिया की आये..' ठुमरीचे आलाप कानी पडतात! किरणच्या मनात जागृत झालेल्या संवेदना, शर्लीच्या मनातला विरह आणि तिच्यावर बेहद्द प्रेम करणारा पीटर, त्याचे असहाय्य वडील, कित्येक दशके सैन्यात काढलेल्या एका जिंदादिल माणसाच्या मनातली कश्मकश, किरणविषयी आस्था आणि जवळीक वाढलेल्या एकल पुरुषाची तगमग, हे सारं काही यातून आकळत आस्ते कदम पाझरतं! आणि त्याही मागून येते ती बडे गुलाम अली खान यांची अजरामर वेदना!

शोभा गुर्टू यांनी ही ठुमरी अशी काही गायलीय की, डोळ्यात काळीज यावं! आवाजाचा कुठेही संकोच होऊ न देता विलक्षण खड्या आवाजात त्यांनी गायलंय, त्यांचा आवाज काही ठिकाणी पहाडी वाटतो तर काही लाजवाब हरकतींमध्ये तोच आवाज मखमली वाटतो! एकट्याने ऐकलं तरी मैफलीचा अनुभव देणारी विलक्षण गायनानुभूती! पंडित अजय चक्रवर्ती, राशीद खान, वडाळी ब्रदर्स, कौशिकी चक्रवर्ती आणि कुमार सत्यम यांच्या आवाजातही ही ठुमरी पसंत केली जाते.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद शहराच्या जुन्या भागात खास करून मुघलपुरा, लालबाग, पीरजादा ह्या इलाख्यात काही जुनी घरे आहेत; जिथे अजूनही गाणे बजावणे चालते. त्याचा बाज बदलला असला तरी रवायत तीच आहे, त्यातला अंदाज तोच आहे! तिथे काही वृद्धावस्थेकडे झुकलेल्या बायका आहेत, ज्यांचा गळा अजूनही गाता आहे! त्या कुणापुढेही गात नाहीत. त्यांच्या आवाजात ही ठुमरी ऐकताना स्वर्गीय आनंदाची अनुभूती मिळते. ह्या बायका म्हणजे, . ‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया..', याची जिती जागती सरणे होत!

ज्याच्या वाट्याला प्रेम आले नाही ती माणसं खऱ्या अर्थाने कमनशिबी होत. आज शोभा गुर्टूंचा स्मृतीदिवस. त्या जिथेही असतील तिथे, ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया..’, असा माहौल असेल! काही गाणी अमर असतात कारण त्यांच्याशी कनेक्ट असलेल्या स्मृतींचे इंद्रधनुष्य चिरंतन असते!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा