यातील गाण्यांची निवड अतिशय सुंदर आहे आणि लतादीदींनी ही सर्व गाणी अतिशय मन लावून गायली आहेत, ऐकणाऱ्याचा जीव हरखून जावा! त्या काळाच्या स्मृतीवनात नेण्याची क्षमता ह्या गीतांत नक्कीच आहे. ह्या सर्व सहगायकांविषयी लता दीदी आदराने बोलतात, त्यात त्यांनी त्यांच्या गायकीविषयी भाष्य देखील केलंय. हेमंतकुमार यांच्या विषयी लता दीदींनी जे भाष्य केलंय, ते विलक्षण आहे! हेमंतदांच्या गायकीचे त्याहून सरस वर्णन होऊ शकत नाही. हेमंतकुमार यांचा आवाज आपल्याला कसा वाटतो, याचे उत्तर व्यक्तिसापेक्ष भिन्न येईल. मात्र लतादीदींना तो कसा वाटतो हे महत्वपूर्ण आहे.
लता दीदी म्हणतात - "एखाद्या भव्य मंदिराच्या शांत गाभाऱ्यात एखाद्या साधूने धीरगंभीर आवाजात गायलं तर त्याचे हजारो इको ऐकू येतात, हेमंतदांचं गाणं अगदी तसं होतं! ऐकणारा तल्लीन व्हावा आणि त्याची समाधी लागावी!" किती सार्थ वर्णन आहे हे!
'ये नयन डरे डरे' (कोहरा), 'तुम पुकार लो' (खामोशी), 'तेरी दुनिया में जीने से' (हाऊस नं. 44); हेमंत कुमार यांनी गायलेली ही तीन गाणी लता दीदींनी त्यांच्या आवाजात गायली आहेत. हिंदी सिनेमाचा अमृतकुंभ ह्या काळात भरभरून वाहत होता! बंगाली संगीत जगतात हेमंतदांना 'किंग ऑफ रवींद्र संगीत' म्हटले जायचे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या रचना त्यांनी ज्या ताकदीने आणि गोडव्याने लोकांपर्यंत पोहोचवल्या, त्याला तोड नाही
आज हेमंत कुमार यांचा स्मरणदिवस! ह्या माणसाला जाऊन सदतीस वर्षे झालीत आणि आता ज्याचं वय सतरा अठरा आहे त्या जेनझीला देखील याची गाणी माहिती आहेत. अतिशय मोजकी गाणी गायलेले हेमंतदा माझे फेवरीट गायक आहेत आणि 'तुम पुकार लो..' हे माझं आवडतं गाणं! गाण्याच्या सुरुवातीला हेमंतदांच्या आवाजातलं अविस्मरणीय हमिंग (गुणगुणणं) आहे, एकदा ऐकलं तरी त्याची जादू कायम राहते!
हेमंत कुमार, एक महान गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून आजही ख्यातकीर्त आहेत, त्यांना भारतातील लोकप्रिय संगीतकारांपैकी एक मानले जाते. 1920 मध्ये हेमंत मुखोपाध्याय म्हणून जन्मलेले हेमंतदा त्यांच्या खास धीरगंभीर मुलायम आवाजासाठी प्रसिद्ध होते, ज्यामुळे त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला एक अनोखी जादू प्राप्त होत असे. प्रामुख्याने बंगाली आणि हिंदी संगीतात त्यांनी योगदान दिले. भारतीय चित्रपट आणि संगीतावर त्यांची स्वतःची एक अमिट छाप आहे. त्यांच्या बहुआयामी प्रतिभेत भावपूर्ण प्रेमगीतांपासून ते भक्तीगीते आणि देशभक्तीपर गीतांपर्यंत अनेक संगीत प्रकारांचा समावेश होता.
1954 मधील 'नागिन' चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवले. या चित्रपटातील 'मन डोले मेरा तन डोले' या गाण्यासाठी त्यांनी 'क्लाव्हीओलिन' आणि संवादिनीचा वापर करून नागिणीच्या पुंगीचा जो ऐतिहासिक आवाज तयार केला, त्याने संपूर्ण देशाला वेड लावले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाला.
1959 मधल्या 'दीप जोले है' ह्या सिनेमातलं त्यांनी गायलेलं 'ये रात तोमार आमार' हे गाणं बंगालमध्ये अतिशय फेमस आहे! अगदी नव्वदच्या दशकापर्यंत कोलकत्यातील काली घाटनजीकच्या बैठ्या घरात पन्नाशीत असलेल्या गाणं बजावणं करणाऱ्या वंगबाला हे गाणं अतिशय समरसून गायच्या! तेंव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलेत्या झालेल्या जाणवायच्या!
हेमंतदांनी गायलेली 'याद किया दिल ने कहाँ हो तुम' (पतिता), 'तुम्हे याद होगा कभी हम मिले थे' (सट्टा बाजार), 'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला' (प्यासा) गाणी आजही अनेकांची फेवरीट आहेत! कुठलेही ऑर्केस्ट्रेशन नसताना अगदी तन्मयतेने एकट्याने बसून ही गाणी गायली तर काळजातलं दुःख हलकं होतं! अतिशय भारदस्त आणि तितकाच मखमली आवाज ही हेमंतदांची खासियत! लता दीदींनी त्यांच्या गायनाचे वर्णन अतिशय नेमके केलेय, हे पुन्हा पुन्हा जाणवते!
हेमंतदांचा जन्म वाराणसीचा. नंतर त्यांचे कुटुंब कोलकात्यात स्थायिक झाले. वडिलांची इच्छा त्यांना इंजिनिअर बनवण्याची होती, पण संगीताच्या ओढीमुळे त्यांनी कॉलेज सोडले. 1945 मध्ये त्यांचा विवाह बंगाली गायिका बेला मुखर्जी यांच्याशी झाला. लग्नानंतर बेला यांनी स्वतःचे करिअर बाजूला ठेवून हेमंतदांच्या संसाराची धुरा सांभाळली. त्यांना जयंत हा मुलगा आणि रानू ही मुलगी अशी दोन मुले झाली. पुढे जाऊन त्यांचा मुलगा जयंत याचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्याशी झाला. हेमंतदांचे कौटुंबिक जीवन हे अत्यंत साधे, सुसंस्कृत आणि आनंदी होते.
प्रत्येक मोठ्या कलाकाराप्रमाणे हेमंतदांच्या आयुष्यातही अंधारे दिवस आले. 1970 च्या दशकानंतर संगीताचा ट्रेंड बदलू लागला होता आणि पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव वाढला होता. त्यांनी 'गीतांजली' नावाच्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत काही चित्रपट निर्मितीचे धाडस केले. दुर्दैवाने, त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आणि त्यांच्यावर तब्बल चौदा लाख रुपयांचे कर्ज झाले, त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. या आर्थिक संकटामुळे आणि अपयशामुळे ते खचले आणि त्यांनी मुंबई सोडून पुन्हा कोलकात्याचा रस्ता धरला.
1980 मध्ये हेमंत कुमार यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या आजारपणाचा त्यांच्या मखमली आवाजावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांचा तो पूर्वीचा भारदस्त खर्ज आणि आवाजातील ताकद काहीशी कमी झाली. तरीही संगीतावरील त्यांची निष्ठा कमी झाली नाही; ते शेवटपर्यंत गात राहिले! संगीत हाच त्यांचा श्वास होता.
26 सप्टेंबर 1989 रोजी बांगलादेशातून एक पुरस्कार स्वीकारून परतल्यानंतर कोलकाता येथे त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 69 व्या वर्षी हा 'भालोमाणूश' शांत झाला. हेमंतदा अत्यंत दयाळू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी बेला यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हेमंतदांनी त्यांच्या हयातीत कितीतरी गरीब कुटुंबांना आर्थिक मदत केली होती, ज्याची कल्पना स्वतः बेला यांनाही नव्हती. त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ एक रुग्णालयही सुरू केले होते.
हेमंतदांनी पुरस्कारांची कधीच हाव धरली नाही, म्हणूनच त्यांनी 1970 मध्ये 'पद्मश्री' आणि 1987 मध्ये 'पद्मभूषण' सारखे मोठे सरकारी पुरस्कार नम्रपणे नाकारले होते. त्यांच्या मते, रसिकांचे प्रेम हाच त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार होता. आज हेमंतदा आपल्यात नसले, तरी त्यांचा तो शांत, आश्वासक आणि मखमली आवाज रात्रीच्या शांततेत आजही आपल्या मनाला सुखावून जातो..
आय लव्ह देम! आय लव्ह दॅट म्युझिक अँड एज!
- समीर गायकवाड
नोंद - ही सर्व गाणी अतिशय श्रवणीय, विलक्षण कर्णमधुर होती आणि त्यांची एक खास बात म्हणजे ही डीजे किंवा डॉल्बीवर वाजवण्याजोगी नाहीत, त्यांचा एक आब आहे, त्यांचा एक लेहजा आहे आणि त्यांना ऐकण्याची एक पद्धत आहे! कुठेही कधीही ढयाण ढयाण करुन ही गाणी वाजवता वा ऐकता येत नाहीत!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा