गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६
विद्यानंद बापट – विवेकवाद्यांच्या सरशीची नांदी!
उत्सवाआडून होत असलेल्या अयोग्य गोष्टींवर आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात झालेली मारहाण ही आपली सद्यकालीन संस्कृती आहे; जिची बीजे सत्ताधाऱ्यानी हौसेने रोवली आणि अतिशय श्रद्धेने त्याचे पालनपोषण केलेय!
बापट यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करावा तितका कमी आहे!
सातत्याने सरकार आणि व्यवस्थेच्या चुकांवर बोलणाऱ्या संतोष पंडित यांना अर्ध्यारात्रीतून घरातून नेऊन अटक करणारे पुणे पोलीस आपली कथित मर्दुमकी इथे गाजवतील का, ह्याविषयी शंका घेण्यास वाव आहे!
सरकार विरोधात आणि सत्तापक्षाच्या विचारधारेविरोधात बोलाल तर, तुमची अवस्था अशी होऊ शकते हे यांना दाखवून द्यायचेय! मात्र ह्याने अपेक्षित प्रभाव पडण्याऐवजी उलटे परिणाम होण्याची शक्यताच अधिक असते!
मुद्दा क्रमांक एक – बापट यांचे विचार आणि त्यांची भाषाशुद्धता!-
विद्यानंद बापट यांच्या मराठीबद्दल इतकं काही पोस्ट झालं की कुतुहलापोटी त्यांचे इंटरव्ह्यू पाहिले...
तेव्हा हे लक्षात आलं की बापटांची भाषा अजिबात अगम्य वगैरे नाही आहे... (कदाचित आपल्यापैकी अनेकांना अस्खलित मराठीची सवय नसल्याने त्याचं अप्रुप वाटत असावं... आम्ही कॉलेजात असताना आशुतोष राणाच्या हिंदीने असेच प्रभावित झालो होतो)
मराठी सोबतच बापटांचा इंग्रजीचाही शब्दसंग्रह उत्तम आहे..
ये सुरत बदलनी चाहिये आदी उर्दू शायरीही ते नेमक्या जागी मांडतात.. तसंच त्यांना इतिहासाचीही जाण आहे..
पण या सर्वाहुन अधिक महत्वाची बाब ही की त्यांचा मुद्दा शंभर टक्के योग्य आहे... पण कोणताही राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देईल असं वाटतं नाही...
तेव्हा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी ह्या मुद्द्यावर त्यांना पाठिंबा दिला पाहिजे...
आणि हो... आपण कायमच 'योग्य मुद्द्याला' पाठिंबा देणं हेच धोरण बाळगावं..
मग तो मुद्दा विद्यानंद बापटांनी मांडलेला असो की अभिजीत दिपकेने मांडलेला असो.. की अगदी एखाद्या राजकीय नेत्याने मांडलेला असो.. जात धर्म पक्ष संघटना ह्या पलिकडे जाऊन आपण विवेकाने विचार करून सामाजिक मुद्द्यांना महत्व देऊ तेव्हा राजकीय नेत्यांनाही ह्या मुद्द्यांवर काम करावंच लागेल...
आणि ह्या व्यक्ती कधी चुकीचा मुद्दा मांडतील तेव्हा आपण त्यांचा विरोध करतानाही कचरता कामा नये...
आपली बांधिलकी सामाजिक असावी राजकीय नाही... व्यक्तीनिष्ठ तर नाहीच नाही....
मुंबईत एके काळी वरदाराजन मुदलियार हा मोठा डॉन होता (ज्याला गॉडफादरच्या स्टोरीत बसवून मणिरत्नम ने नायकन बनवला.. पुढे त्यावर फिरोजखान ने दयावान बनवला) माटुंग्याचा मसिहा अशी त्याची रॉबिनहूड इमेज होती..
जेव्हा IPS Officer Y C Pawar यांनी वरदाराजन ची दहशत संपवण्यास सुरूवात केली.. तेव्हा त्यांनी सर्वप्रथम माटुंग्यात वरदाराजन च्या भव्य गणेशोत्सवाचे रस्यावर ठोकलेले अवैध मंडप (पंडाल) उखाडले....
पोलिस कारवाईत गणपतीचे मंडप उखडून टाकले आणि वरदाराजन काही करू शकला नाही हे बघून त्या एरियातला त्याचा टेरर कमी व्हायला सुरूवात झाली...
हे सण उत्सव सोहळे.. सार्वजनिक उत्सव.. मंडप.. आरास.. गजबजाट.. कलकलाट.. हे शक्तीप्रदर्शनाचे मार्ग आहेत..
टेरर.. रुबाब.. वट.. दहशत.. वगैरेचे प्रतिक झालेले आहेत..
यावर कारवाई होणं गरजेचं आहे...
टेरर संपलाच पाहिजे
आणि हो.. इथे धर्माची बाब नाही... कारण उन्मादीपणात सारेच धर्म एकसे बढकर एक आहेत... कारवाई साऱ्यांवर झाली पाहिजे..
आणि जर होत नसेल तर सुजाण नागरिक म्हणून आपण या उन्मादात सहभागी होता नये...
आपण लोकशाहीचे मालक आहोत...
आणि आपल्या प्रतिनिधींना जर माज आला असेल तर तो उतरवणं हे आपलं कर्तव्य आहे...
मुद्दा क्रमांक दोन- उत्सवप्रेमी भारतीय समाजमनाची कमजोरी :
भारतीय समाजमनाला गर्दी आणि आवाज यांचे विलक्षण आकर्षण आहे. जिथे गर्दी जास्त असते, ती गोष्ट भारी असा आपला होरा असतो. भवतालाचे लक्ष वेधून घेऊन आपले अस्तित्व दाखवून द्यायचे असेल तर आवाज वाढवणे ह्याकडे भारतीय जनमानसाचा कल दिसतो!
एखाद्या उपाहारगृहाबाहेर पन्नास माणसे उभी असतील, तर आतले जेवण चांगले असावे असे आपल्याला वाटते. एखाद्या वस्तूला हजारो लोकांनी पसंती दिली असेल तर ती चांगली असावी असे वाटते. एखाद्या बाबाच्या दर्शनासाठी दहा हजार लोक रांगेत असतील तर त्या बाबामध्ये काहीतरी असणार, अशी मानसिक उडी आपण घेतो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ज्या ढाब्याबाहेर वाहनांच्या रांगा दिसतात ते ढाबावजा हॉटेल भारी असणारच असे आपण मानतो!
मानसशास्त्रीय आणि ग्राहक वर्तनाच्या अभ्यासांत याला सामाजिक पुरावा किंवा सोशल प्रूफ म्हणता येते. संशोधनात गर्दीला अनेकदा गुणवत्तेचा, लोकप्रियतेचा आणि प्रतिष्ठेचा संकेत म्हणून ग्रहण केले जाते. अगदी एखादे उपाहारगृह गर्दीने भरलेले दिसले तरी लोक त्याच्या अन्नाची गुणवत्ता अधिक असल्याचे अनुमान लावतात; उलट शांत उपाहारगृह कमी दर्जाचे असावे असे त्यांना वाटू शकते.
हा निष्कर्ष तर्कशुद्ध नसला तरी मानवी मेंदूला सोपा वाटतो.
भारतात गर्दी, सामूहिक उत्सव, मिरवणूक, वरात (हिन्दीमधले बारात), भजन, घोष, प्रवचन, आरती यांची अत्यंत प्रदीर्घ परंपरा आहे; पण त्याच भारतीय परंपरेत मौन, एकांत, वनवास, ध्यान, तप, अल्पभाषिता आणि अंतर्मुखता यांना सर्वोच्च आध्यात्मिक मूल्य दिले गेले आहे हेही एक वास्तव आहे.
भारतीय धार्मिक जीवन मूलतः केवळ वैयक्तिक साधनेचे नव्हते. तीर्थयात्रा, जत्रा, नदीस्नान, उत्सव, यात्रा, देवदर्शन, कथा, कीर्तन, भजन, संतांचे प्रवचन. या सर्वांत सामूहिक उपस्थितीला महत्त्व होते.
पूर्वीची गर्दी म्हणजे आजच्या अर्थाने लोकप्रियतेचे मानक नव्हते.
एखाद्या तीर्थक्षेत्री हजारो लोक जमले म्हणजे त्या ठिकाणची आध्यात्मिक गुणवत्ता सिद्ध झाली, असा सरळ सिद्धांत नव्हता. तीर्थाची पवित्रता, धार्मिक कालगणना, नदी-संगम, देवता, आख्यायिका आणि विधी यांना स्वतंत्र महत्त्व होते. गर्दी ही त्याची परिणती होती.
आज मात्र अनेकदा समीकरण उलटे झाले आहे : 'जिथे गर्दी आहे, तिथे काहीतरी मोठे आहे. तिथे जे काही आहे ते अलौकिक असून त्याचा आपल्याला काही फायदा होतो का ते पाहणे, हा पुढचा टप्पा होय.
भारतीय सामूहिक धार्मिकता प्राचीन आहे; पण आजच्या प्रमाणातील गर्दीला प्रतिष्ठेचे मोजमाप बनविण्याची प्रक्रिया मात्र अलीकडील दशकांची आहे!
भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत ध्वनीला फार मोठे महत्त्व आहे. मंत्रोच्चार, वेदपठण, शंख, घंटा, नगारा, मृदंग, पखवाज, ढोल, ताशा, कीर्तन, अजान, भजन, गवळणी, पोवाडे, प्रवचन ही प्रचंड समृद्ध श्राव्य परंपरा आहे.
पण ध्वनी आणि गोंगाट हे एकच नाहीत.
मंत्रोच्चार हा ध्वनी आहे. रागदारी संगीत हा ध्वनी आहे. पखवाजाची लय हा ध्वनी आहे. शंखनाद हा ध्वनी आहे. पण दुसऱ्याच्या कानावर आपली सत्ता गाजवण्यासाठी ध्वनीची तीव्रता वाढवत जाणे हा ध्वनीचा सामाजिक गैरवापर आहे.
आधुनिक भारताच्या शहरांमध्ये भिन्न धर्मीय धार्मिक कार्यक्रम, लग्नाच्या मिरवणुका, राजकीय सभा, जाहीर प्रवचने, अजान, भजने आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांनी एक मोठा श्राव्य सार्वजनिक अवकाश तयार केला आहे.
उत्तर भारताच्या ध्वनिसंस्कृतीवरच्या अभ्यासात रस्त्यांवरचे लाऊडस्पीकर, धार्मिक मिरवणुकांतील ढोल, लग्नातील बँड, राजकीय घोषणा आणि सार्वजनिक भाषणे हे आधुनिक सार्वजनिक जीवनाचे नियमित घटक झाले असल्याचे नोंदले आहे.
'जे ऐकू येते ते अस्तित्वात आहे; जे दूरवर ऐकू येते ते महत्त्वाचे आहे; आणि जे सर्वांच्या कानावर आदळते ते मोठे आहे.' हे विचित्र गृहीतक त्यातूनच रूढ झाले.
पूर्वी गावात कीर्तन असेल तर गावातील लोक तिथे जाऊन ऐकत. आता लाऊडस्पीकर गावाला कीर्तन ऐकायला भाग पाडू शकतो. हा फरक फार मोठा आहे.
स्पीकर नव्हते तेव्हा मस्जिदमधून दिली जाणारी अजान जवळच्या लोकांना ऐकू जात नसे, ज्यांना तिथे येऊन नमाज पढायची असेल ते घड्याळाकडे लक्ष देऊन हजर होत!
आता ज्यांची इच्छा नाही त्यांनाही ह्या सर्व गोष्टी अकारण ऐकाव्या लागतात! थोडक्यात सर्वांच्या कानावर आणि ध्वनी स्वातंत्र्यावर हे एक प्रकारचे आक्रमणच आहे!
ध्वनी हा आता कार्यक्रमाचा घटक राहिलेला नाही; तो सार्वजनिक जागेवर दावा करण्याचे साधन झालाय. “माझा कार्यक्रम इथे चालू आहे” एवढे सांगण्याऐवजी आवाज म्हणतो की, 'ही जागा आता आमची आहे.'
ही प्रक्रिया केवळ एका धर्माच्या कार्यक्रमांत घडतेय अशातला भाग नाही. विविध धर्माच्या मिरवणुका, चर्च, राजकीय सभा, लग्नसमारंभ, उत्सव, सणवार, जयंत्या, कीर्तन, भजन, प्रार्थना. उपदेश प्रबोधन इत्यादीसाठी सर्वच समुदायांनी सार्वजनिक ध्वनीचा वापर केला आहे.
एकोणिसाव्या शतकातील भारतातच धार्मिक मिरवणुका, सार्वजनिक विधी आणि ध्वनी यांचे राजकीय-सामाजिक महत्त्व वाढू लागले होते. उत्तर भारतातील शहरांत नव्या धार्मिक मिरवणुका आणि सार्वजनिक धार्मिक प्रदर्शनांची वाढ झाली; त्यातून सार्वजनिक जागेवर आपला अधिकार दाखविण्याची प्रक्रिया निर्माण झाली.
ब्रिटिश काळाने या प्रक्रियेला आणखी एक अर्थ दिला. एकोणिसाव्या शतकातील औपनिवेशिक शहरांमध्ये धर्म सार्वजनिक रस्त्यावर दिसणे, ऐकू येणे आणि आपली संख्या दाखवणे हे हळूहळू राजकीय अर्थ घेऊ लागले.
मिरवणूक म्हणजे फक्त उत्सव राहिला नाही. त्यातून संदेश दिला जाऊ लागला की, आम्ही इथे आहोत!
ध्वनी म्हणू लागला, लोकांनी आमचा आवाज ऐकला पाहिजे.” गर्दी म्हणू लागली, 'आमची संख्या तर पाहा!'
यामुळे धार्मिक मिरवणुका, ध्वनी, झेंडे, घोषवाक्ये आणि सार्वजनिक जागा यांचे परस्परसंबंध अधिक घट्ट झाले. उत्तर भारतातील वसाहतकालीन इतिहासावरच्या अभ्यासांत धार्मिक सार्वजनिक प्रदर्शनाच्या वाढीचा आणि हिंदू-मुस्लिम संबंधांतील तणावाचा परस्परसंबंध स्पष्ट दिसतो.
विशेषतः विसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही शहरांमध्ये धार्मिक मिरवणुका अधिक आक्रमक, घोषणाबाजीप्रधान आणि संख्यादर्शक होत गेल्या. हिंदू आणि मुस्लिम संघटनांमधील सार्वजनिक स्पर्धेने या प्रक्रियेला आणखी धार दिली.
ज्याची मिरवणूक अधिक मोठी, अधिक गर्दीची, अधिक आवाजाची तो मोठा, हा सद्यकाळातला अहंकार केवळ धार्मिक श्रद्धेतून आलेला नाही; त्यात सार्वजनिक सत्ता, अस्तित्वाची बळजबरी, संख्याबळ, सामाजिक ओळख आणि राजकीय दृश्यता यांचाही मोठा वाटा आहे. इथे मिरवणूक हा शब्द काढून अन्य कोणताही सामाजिक शब्द घालून त्याची व्यापकता तपासता येईल!
भारतीय जनमानसात गर्दी आणि आवाज यांचे परस्पर संबंध आहेत; 'आम्ही किती मोठ्या संख्येने आहोत आणि आमचे अस्तित्व किती मोठे आहे हे तुम्हाला दिसले ऐकले पाहिजे. अशी एक बळजोरीची असोशी ह्यामागे दिसते”
गर्दी दृश्य शक्ती निर्माण करते. आवाज श्राव्य शक्ती निर्माण करतो. गर्दी आणि आवाज ह्याद्वारे सामूहिक शक्तीचे प्रदर्शन केले जाते. म्हणूनच मोठी मिरवणूक, मोठे व्यासपीठ, मोठा आवाज, हजारो अनुयायी, लांब रांग, प्रचंड मंडप, मोठे पोस्टर, मोठे नाव; हे सारे एकाच मानसशास्त्रीय भाषेचे वेगवेगळे शब्द आहेत.
एखाद्या शांत आश्रमात पन्नास माणसे असतील तर लोक म्हणतात, ही किती छान जागा आहे!
पण एखाद्या बाबाच्या दर्शनासाठी पन्नास हजार माणसे असतील तर, हा फार मोठा बाबा आहे!' असं म्हटलं जातं! ही प्रतिक्रिया श्रद्धेपेक्षा संख्येचा पुरावा मानण्याची आहे. याला आधुनिक माध्यमांनी प्रचंड बळ दिले.
आजघडीला प्रसिद्धीची एकके काय आहेत? दृश्यसंख्या, अनुयायी, प्रेक्षक, दृश्यफितींची संख्या, ‘लाईक्स’, ‘व्ह्यूज’, ‘फॉलोअर्स’, ट्रेंडिंगमध्ये नाव असणं! म्हणजेच संख्या ही स्वतःच एक प्रकारचे प्रतिष्ठेचे चलन बनलीय.
वास्तवात, संख्येने गुणवत्ता सिद्ध होत नाही; पण संख्येने गुणवत्तेचा आभास निर्माण होतो. लोकप्रियतेचा सामाजिक संकेत लोकांच्या विश्वासावर परिणाम करतो, हे विविध अभ्यासांत दिसून आलेय.
जितका मोठा आवाज तितके मोठे नाव, हा आधुनिक बाजाराचा नियमही आहे! पूर्वी एखाद्या संताचे नाव पसरायचे ते शिष्य, यात्रेकरू, कीर्तनकार, ग्रंथ, आख्यायिका यांच्या माध्यमातून! आज नाव पसरवण्यासाठी ध्वनीव्यवस्था, जाहिरात, सामाजिक माध्यमे, दृश्यफिती आणि सततची सार्वजनिक उपस्थिती उपलब्ध आहे. त्यामुळे प्रसिद्धीची एक नवीन अर्थव्यवस्था निर्माण झाली; आवाज, लक्ष, गर्दी, प्रसिद्धी, आणखी आवाज आणि आणखी गर्दी असा एक स्वयंपूर्ण चक्रव्यूह जन्माला घातला गेलाय. आणि त्यात गुणवत्तेची गरज कधी कधी उरतच नाही.
रिकामी जागा = काही किंमत नाही, एकांतात असलेले शांत मंदिर = प्रसिद्ध नाही, कमी लोक = कमी महत्त्व, लहान कार्यक्रम = छोटा दर्जा, मोठी गर्दी = मोठेपणा, मोठा आवाज = प्रसिद्धी, हे आपण निर्माण केलेले सामाजिक संभ्रम आहेत ज्यांनी आता अराजकाची जागा घेण्यास सुरुवात केलीय!
अधिक लोक आपल्याकडे आकृष्ट व्हावेत म्हणून गर्दी वाढवणे आणि गर्दी अधिक प्रमाणात यावी म्हणून मोठ्याने आवाज करणे ह्या चक्रव्यूहात भारतीय जनमानस आणि उत्सव परंपरा पुरत्या गुरफटल्या आहेत! ह्यातून लवकर सुटका व्हायची असेल तर अधिकाधिक लोकांचे प्रबोधन होणे आणि समाजाची मानसिकता बदलणे ह्यावर भर देत राहिलो तरच हे चित्र बदलू शकते.
हे चित्र न बदलल्यास समाजविघातक शक्तींना बळ मिळत राहील आणि संबंधित धर्म परंपरांचे विद्रूपीकरण होत राहील!
- समीर गायकवाड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा