सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६
क्लाईव्ह लॉईड - क्रिकेटचा जननायक!
आशुतोष गोवारीकर, आमिर खान यांच्या 'लगान' सिनेमाची खरी बीजे वेस्टइंडिजच्या क्रिकेटवेडात दिसतात! विंडीजचा माजी कप्तान क्लाईव्ह लॉईड याच्या क्रिकेटची आणि क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची गोष्ट लाजवाब आहे!
क्लाइव्ह लॉइडचे जीवन केवळ धावा आणि अमर्याद विजयांपुरते मर्यादित नाही. ते कॅरिबियन समाजाच्या ऐतिहासिक वेदना, वसाहतवादी वारसा आणि नवस्वातंत्र्याच्या अभिमानाशी घट्टपणे जोडलेले आहे. त्याच्या नेतृत्वाच्या काळात क्रिकेट हा केवळ खेळ नव्हता; क्रिकेट हे सांस्कृतिक, राजकीय आणि मानसिक मुक्तीचे प्रतीक बनले होते. हे सर्व विलक्षण इंटरेस्टिंग आहे!
साठ आणि सत्तरच्या दशकात वेस्ट इंडिजची अनेक बेटे ब्रिटिश वसाहतवादातून मुक्त होत होती. गयाना 1966 मध्ये स्वतंत्र झाले, नेमके त्याचवेळी लॉइडने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेलं. जमैका, त्रिनिदाद, बार्बाडोस यांसारख्या बेटांनाही नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. पण आर्थिक अस्थिरता, गरिबी आणि वांशिक विषमता कायम होती.
क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ असला तरी, कॅरिबियन लोकांनी त्याला स्वतःचे हत्यार बनवले. मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे म्हणजे त्यांच्यासाठी वसाहतवादी जोखडाविरुद्धचा प्रतीकात्मक बदला होता. आशुतोष गोवारीकर आमिर खानच्या 'लगान' सिनेमाच्या थीमला साजेसे चित्र विंडीजच्या सर्व बेटांवर दिसायचे.
लॉइडच्या आधीच्या काळात वेस्ट इंडिज संघात बेटांमधील स्पर्धा तीव्र होती. बार्बेडियन, जमैकन, त्रिनिदादियन आणि गयानीज खेळाडू एकमेकांशी अधिक स्पर्धा करत, एकत्रित वेस्ट इंडियन ओळख कमकुवत होती. सर फ्रँक वॉरेल यांनी एकतेची पायाभरणी केली होती, पण लॉइडने ती पूर्णत्वास नेली. त्याने संघाचे स्वरूप 'बेटांचे प्रतिनिधी' असे न ठेवता 'एक कॅरिबियन शक्ती' असे बनवले. हे सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे होते, कारण त्यायोगे समग्र कॅरिबियन प्रदेशातील एकतेच्या आणि सामूहिक अभिमानाच्या भावनेला बळकटी मिळत होती. आयपीएलच्या मूळसूत्रात नेमके याच्या विरोधातले धोरण आहे हे इथे आवर्जून नमूद करावे वाटते. असो.
1970 च्या दशकात जगभरात ब्लॅक कॉन्शसनेस म्हणजेच कृष्णवर्णीय सचेतनेची चळवळ जोरात होती. अमेरिकेत नागरी हक्क चळवळ, आफ्रिकेत स्वातंत्र्यलढे आणि कॅरिबियनमध्येही सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू होते. अशा पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजचा संघ कृष्णवर्णीय वर्चस्वाचे प्रतीक बनला. लॉइडच्या नेतृत्वात रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर, मार्शल ह्या चार वेगवान गोलंदाजांची राक्षसी फळी श्वेत वर्चस्वाच्या क्रिकेट जगाचा थरकाप उडवत होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या पारंपरिक सत्तांना पराभूत करणे म्हणजे केवळ खेळातील विजय नव्हता; तो वांशिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठेचा विजय होता. लॉइडने “कॅलिप्सो क्रिकेटर्स” या उपहासात्मक आणि तुच्छता दर्शवणार्या लेबलला तीव्र विरोध केला. पूर्वी वेस्ट इंडियन खेळाडूंना आनंदफंदी, बेफिकीर आणि शिस्तहीन म्हणून दाखवले जात असे. त्याने संघाला शिस्त, व्यावसायिकता आणि अत्यंत ताकदवान आक्रमकता शिकवली. यामुळे क्रिकेटमधील वांशिक स्टिरिओटाइप तुटले आणि कॅरिबियन क्रिकेटला जागतिक आदराचे स्थान मिळाले.
त्या काळात कॅरिबियन समाजात, क्रिकेट हा गरिबीतून बाहेर पडण्याचा एक महत्त्वाचा मार्ग होता. लॉइड स्वतः वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी घेऊन हॉस्पिटलमध्ये काम करत होता. अनेक खेळाडू गरीब पार्श्वभूमीतून येत होते. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस कॅरी पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटने व्यावसायिक क्रिकेटची नवी वाट मोकळी केली. पैसा, करार आणि टीव्ही प्रसारण यांनी खेळाडूंना आर्थिक स्थैर्य दिले. लॉइडने या बदलांना स्वीकारले आणि संघाला आधुनिक व्यावसायिक युगात नेले.
क्लाइव्ह ह्युबर्ट लॉइड हे त्याचे पूर्ण नाव. गयानाच्या मातीत जन्मलेला ह्या उंच, शक्तिशाली फलंदाजाचे अस्तित्व केवळ क्रिकेट खेळाडू म्हणून कधीच नव्हते; तो वेस्ट इंडिजला जागतिक क्रिकेटचे अधिराज्य देणारा कप्तान होता. त्याच्या नेतृत्वात कॅरिबियन बेटांच्या संघाने सत्तर आणि ऐंशीच्या दशकात क्रिकेट विश्वात दरारा निर्माण केला. त्याचे आयुष्य म्हणजे संघर्ष, शिस्त, एकता आणि विजयाची महागाथा होय.
आजपासून 82 वर्षांपूर्वी 31 ऑगस्ट 1944 रोजी ब्रिटिश गयाना, आताच्या गयानामधील जॉर्जटाउन येथे क्लाइव्हचा जन्म झाला. त्याचे वडील स्थानिक डॉक्टरांचे वाहन चालक होते. सहा भावंडांपैकी तो दुसरा होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी लहान वयातच त्याच्या खांद्यावर आली. शाळा सोडून त्याने हॉस्पिटलमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले.
पण गल्लीबोळात आणि शाळेच्या मैदानावर क्रिकेटची बीजे खोलवर रुजली होती. त्याचा उंच बांधा, भक्कम शरीरयष्टी याच्या जोरावर जोरदार फटकेबाजी करणारा आणि वेगाने धावणारा क्षेत्ररक्षक म्हणून तो लवकरच ओळखला जाऊ लागला.1963 मध्ये गयानाकडून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 1966 मध्ये भारताविरुद्ध मुंबईत टेस्ट पदार्पण झाले. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये त्याने आपली छाप पाडली. 1971 मध्ये त्याला 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर' म्हणून गौरवण्यात आले.
1974 मध्ये रोहान कन्हाय यांच्यानंतर वेस्ट इंडिजचा कप्तान म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा विंडीजच्या संघात बेटांमधील स्पर्धा होती आणि शिस्तीचा अभाव होता. लॉइडने संघाला एकत्र आणले. त्याने क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच, चार वेगवान गोलंदाजांची रणनीती अमलात आणली. अतिशय वेगाने गोलंदाजी करणाऱ्या बॉलर्सनी विरोधकांची पाचावर धारण बसवली! ही रणनीती क्रिकेटच्या इतिहासात क्रांतिकारक ठरली.
1975 च्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकात लॉइडने स्वतः फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 102 धावा काढल्या. वेस्ट इंडिजने विजय मिळवला. 1979 मध्ये पुन्हा विश्वचषक जिंकला. 1983 मध्ये भारताकडून फायनलमध्ये पराभव झाला, पण ते अपवाद होते. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात संघाने 27 सामन्यांची अजिंक्य मालिका आणि 11 सलग विजय मिळवले. एकूण 74 टेस्ट सामन्यांमध्ये 36 विजय; ही कामगिरी अजूनही आदर्श मानली जाते. फलंदाज म्हणून त्याने 110 टेस्ट सामन्यांमध्ये 7515 धावा काढल्या, सरासरी सुमारे 46.67 आणि 19 शतके. त्याचा सर्वाधिक स्कोर 242 धावा होता. लॅन्कशर काउंटीसाठीही त्याने अनेक वर्षे खेळले आणि इंग्लिश क्रिकेटमध्येही तो लोकप्रिय झाला.
आजच्या काळात लॉइडकडे पाहताना आपल्याला जाणवते की, त्याचे नेतृत्व केवळ रणनीतीपुरते नव्हते. ते सामाजिक एकतेचे, वांशिक अभिमानाचे आणि उत्तर-वसाहतवादी आत्मविश्वासाचे प्रतीक होते. सध्या वेस्ट इंडिज क्रिकेट कमकुवत दिसतो, लॉइडच्या काळातील संघ अजूनही आदर्श मानला जातो. समाजाच्या वेदना, आशा आणि संघर्षांचे प्रतिबिंब खेळात दिसते याची आठवण लॅाइडचा संघ करून देतो!
आताचा वेस्ट इंडिज संघ कमकुवत का झाला आहे, ह्याचे सामाजिक आणि वैषयिक संदर्भ शोधायचा प्रयत्न केला तर सर्वात आधी समोर येते ती क्लाईव्ह लॉईडची रणनीती! त्याच्याकडे एक ध्येय होते, जे सामाजिक विषमतेचे सामर्थ्यास सुरूंग लावण्याचे साधन ठरले! तत्कालीन वेस्टइंडिज टीमपाशी आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा, विश्वविजेतेपद मिळवून आपल्याला कमी लेखणाऱ्यांचे दात घशात घालण्याचा जुनून होता! आता याचा अभाव आहे!
तिथे तुलनेने आता स्थिरता आहे. कॅरिबियन बेटांचे स्वतःचे अस्तित्व आता जगाच्या नकाशावर ठळक आहे. तिथल्या लोकांनी इतिहास निर्माण केला याची जाणीव जगाला आहे. एके काळी गोऱ्या साहेबांचा खेळ म्हणून टेंभा मिरवणाऱ्या क्रिकेटचे आपण दोन दशके अनभिषिक्त सम्राट होतो, ही भावना त्यांना सुखवते. आर्थिक प्राप्तीसाठीचा महत्वाचा मार्ग म्हणून क्रिकेटकडे पाहण्याचे प्रमाण कमालीचे घटलेय कारण तिथल्या सद्य सामाजिक स्थितीत त्यांना असंतोषाची बीजे जाणवत नाहीत.
ते स्थिरावले आहेत. आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर, स्वातंत्र्योत्तर कालखंडावर ते खुश आहेत. त्यांच्या आयुष्यात क्रिकेटला अजूनही स्थान आहे मात्र क्रिकेट हेच त्यांचे सर्वस्व असल्याची भावना हळूहळू लोप पावत गेलीय. किंबहुना आज त्यांच्यात जे शैथिल्य आहे ते दौर्बल्य नसून ती सामाजिक मानसिक समाधानाची स्थिती आहे, क्लाईव्ह लॉईड आणि त्याच्या टीममेट्सनी ह्याचसाठी तर क्रिकेटकडे समर्पित वृत्तीने पाहिले होते. त्यांचे उद्दिष्ट एका अर्थाने सफल झालेय! एका क्रिकेटरने घडवलेली ही क्रांती अद्भुतच म्हटली पाहिजे!
आजचा दिवस 'आफ्रिकी वंशाच्या लोकांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस' म्हणून साजरा केला जातो! आणि ह्याच दिवशी क्लाईव्ह लॉईडचा वाढदिवस असणे, हा योगायोगही भारीच म्हटला पाहिजे! वेस्ट इंडियन जनता लॉईडचा वाढदिवस जल्लोषात साजरा करते! लॉईडने केवळ क्रिकेटमध्येच त्यांच्या बेटांच्या समूहाची मान उंचावलीय असे कुणी म्हणत असेल तर ते त्याच्या कर्तृत्वावर अन्याय केल्यासारखे होईल! तो केवळ क्रिकेट टीमचा कप्तान नसून खऱ्या अर्थाने क्रिकेटचा जननायक आहे!
- समीर गायकवाड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा