त्याच्याकडून नेलेली अवजारे अजूनही अनेकांच्या शेतीवाडीत आणि घरात असतील. आमचा भाग दुष्काळी. ऊसाचं फॅड निघालं तेव्हा आज्ज्याला अनेकांनी वेड्यात काढलं होतं. पण आज्जा खमका होता त्यानं ऊस लावलाच! पहिल्याच वर्षी जोरदार उतारा पडला. भावदेखील रग्गड मिळाला, आणखीन बऱ्याच लोकांनी ऊस लावला. बऱ्याच शेतात ऊसाचे फड दिसू लागले. ज्यांचा ऊस कारखाना नेत नव्हता त्यांनी गुऱ्हाळ केलं. भल्या थोरल्या आकाराच्या जाडजूड लोखंडाच्या कायल्या (काहिली) गावा गावांत दिसू लागल्या. ऊसाचे चरक गावगन्ना नजरं पडू लागले.
ऊसाची ढेपाळी मागवण्याचा सवाल उठला तेव्हा सर्वांना संतूची आठवण झाली. एक किलोपासून दहा किलोपर्यंतच्या मापाची ढेपाळी त्याने बनवून दिली. त्याला खंडीभर ऑर्डरी मिळाल्या. जवळपास चारपाच वर्षे तो नुसत्या ढेपाळ्याच बनवत होता. त्याच्या घराम्होरं पत्र्याचा ह्यो म्हणून ढीग पडलेला दिसे. कटावणीने पत्रे कापून झाले की ऐरणीवर धरून त्याला गोलाकार देताना त्याची बायको, भाऊ हातात घण घेऊन ठोकताना दिसत! भाता हलवायला आलटून पालटून कुणाची ना कुणाची बारी असे.
त्याच्या घरासमोरून जाताना लोखंड तापल्याचा विशिष्ट गंध यायचा, त्याच्या अंगणात लोखंडाचे बारीक तुकडे पडलेले असत. पोरंठोरं तिथं येत आणि बारीक सारीक जिन्नस बनवून दे म्हणून त्याच्या मागं धोसरा लावत. त्याच्या गोळीबंद अंगातली मांजरपाटाची बंडी घामाने भिजलेली असे. लोहारकाम करताना त्याच्या दंडाच्या बेंडकुळया हालत तेव्हा त्याच्याकडे बघत राहावं वाटे, अशा वेगवान हालचाली तो करे. गावातल्या बायाबापड्यांची आपल्या नवऱ्याला नजर लागू नये म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या मनगटाला धागे गुंडाळलेले असत. दंडातल्या करदोड्यात पितळी पेटी करकचून बांधलेली असे. भात्यासमोर बसून त्याच्या अंगाचं घडीव पोलाद झालं होतं.
त्या पाचेक वर्षात त्याच्या घरासमोर सतत ठाकठोक सुरु होती. गोलाकार ढेपाळी बनवून झाली की त्याला दुई अंगानं मजबूत कड्या लावून झाल्या की त्याची थप्पी लावली जाई. शेतकरी त्यांच्या ऑर्डरनुसार ढेपाळी घेऊन जात. काहिलीतल्या ऊसाच्या रसाला हवा तसा लालसर पिवळा रंग प्राप्त झाला आणि त्यातला रस घट्ट होऊ लागला की तो ह्या ढेपाळ्यात ओतला जाई. ढेपाळी एकेक करून गच्च भरून बाजूला ठेवली जात, वाऱ्यावावदानाने ढेपाळ्यातला रस पूर्ण घट्ट होई. उकळता रस ओतल्याने तापलेलं ढेपाळं काही तासानं थंड व्हायचं. दरम्यान अंगणात मोठं चवाळं अंथरलं जायचं, थंड झालेलं ढेपाळं मग एकेक करून पालथं केलं जायचं. ढेपाळं पालथं केलं की त्यातून गुळाची ढेप पडायची!
संतूने बनवलेली ढेपाळी एकदम मजबूत होती. जाडजूड लोखंड वापरलेलं असल्यानं क्वचित कधीतरी गळती लागायची, लई खेचाखेची केली तर त्यांच्या कड्या निघून पडत! पण त्याच्या ढेपाळ्यांना कधी पोचा आला नाही! पुढे जाऊन गावागावातली गुऱ्हाळे एकेक करून बंद होत गेली. लोकांना साखर कारखान्याचा नाद लागला. अन् गाव बी नादर होत गेलं! आज्ज्यानं मात्र ऊस लावायचं बंद केलं. त्यानं पिकांची लागवडच बदलून टाकली.
लोकांना कमी कष्टाचं अन बारा नाद लावणारं पीक ऊसाच्या रुपानं गाव्हलं. सोसायट्या निघाल्या, गावात गट पडले, राजकारणाची मस्ती रुजली, गावाला ऊसाची नशा चढली. लोकांच्या हाती पैसा खेळू लागला. दरम्यान नव्या मशिनरी गावात आल्या. एकेक बलुती निकालात निघाली. सुतार लोहार कासार एकेक करून सगळ्यांचे चेहरेमोहरे बदलत गेले. गाव आता डिजिटल झालंय पण त्यात गावपण शिल्लक नाही, गावातला महारवाडा गावाबाहेरच आहे मात्र त्याचे नाव भीमनगर आहे.
वरवर सगळे एक असल्यागत गाव वागत असतं, मात्र आतून खुन्नस जशीच्या तशी जिवंत आहे. इर्षेची असोशी रसरसून आहे. गावातली म्हातारी माणसं एकेक करून अनंताच्या यात्रेला जाताहेत. संतू लोहाराची ह्या गावगाड्यातून सुटका झाली. त्याची नातवंडं पन्नाशीच्या वयाची आहेत, बाकी हिसाब नाही!
संतू लै भारी माणूस होता. ल्हानी पोरं त्याच्या दारात खेळायला गेली की काहीबाही नग हाती टेकवायचा. त्याचा खप्पड ओबडधोबड हात गालावरून फिरवायचा. कधी कधी गालगुच्चा घ्यायचा. त्याच्या तोंडाचा बिडीचा दर्प गालावर ओघळायचा! त्याची मिशी टोचायची तरी पोरं त्याच्यावर खुश असायची कारण तो मूडमध्ये असला की पोराठोरांना लोखंडी खेळणी द्यायचा!
माझ्या लहानपणी त्याने एक बारकालं ढेपाळं बनवून दिलं होतं! ते कधीतरी हरवून गेलंय. आता संतू देखील नाहीये. आठवणींच्या वहीत एक रेशमी पान आता जास्तीचे जोडले गेलेय; ज्याला भट्टीतल्या निखाऱ्यांचा, तापलेल्या पोलादाचा, निढळाच्या घामाचा गंध आहे!
- समीर गायकवाड
नोंद - त्याच्या हाताचा पंजा जर्मनच्या ताटलीएव्हढा मोठा होता. बोटाची पेरं लांबसडक होती. धा बोटापैकी चार बोटांची नखं गळून पडली होती. तळहातावर अतिशय टणक घट्टे होते. त्याच्या हातावरच्या रेषा पार विरून गेल्या होत्या, त्या रेखांचं भविष्य लिहिण्याआधीच सटवाई निघून गेली आणिक जाताना हातात घण देऊन गेली असं तो लाडाने सांगायचा! अंथरूणाला खिळून होता तेव्हा हा दांडगा दुंडगा गडी अंथरूणात ओळखू येत नव्हता. ज्या हाताने जाडजूड कांब वाकवली होती ते हात निष्प्राण झाले होते याचे त्याला सर्वाधिक शल्य होतं. देवाधर्मावर श्रद्धा असणारा तो साधाभोळा माणूस त्याचे हात शक्तिहीन झाल्यानंतर कधीच कुणापुढं लाचार झाला नव्हता. त्याच्या मनातलं देवगारुड मनाच्या भट्टीत वितळून गेलं होतं. त्या काळातली गावं चांगली होती असं सर्रास बोललं जातं मात्र त्या काळातही गावा गावात जहरी विषमता होती, छुपे शोषण होते, धनिकांचे धनकोंचे स्वतःचे नियम होते हे सांगितलं जात नाही! ग्रामीण भागाने बलुती जोपासली आणि त्याला वर्गवारीचा उत्पन्नाचा कामाचा रंग देताना भेदाभेद केला. जो मान सुताराला होता तो तराळाला बापजन्मात मिळत नसे! गावातली माणसं फार कपटी नसत, त्यांच्या फारशा अपेक्ष नसत, प्रत्येकाचं आपलं एक विश्व असे हे मात्र खरं होतं! माणुसकीची काही अस्सल उदाहरणे प्रत्येक गावात जिवंत होती हे गावाचं भूषण मानलं पाहिजे!
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा