शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

गोष्ट उषा मेहताची!



ही गोष्ट आहे स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वातली, जेव्हा ब्रिटिश महासत्ता एका बावीस वर्षांच्या तरुणीच्या आवाजाला घाबरली होती आणि तिचा आवाज दडपण्यासाठी जंग जंग पछाडले होते!
8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 'करो या मरो'ची हाक देत ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव'ची घोषणा देत भारत छोडो चळवळीची सुरुवात केली. या लढ्यात जनतेने अभूतपूर्व स्फूर्तीने सहभाग घेत समग्र ब्रिटिशांना मोठे आव्हान दिले. तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉयने या आंदोलनाचे वर्णन '1857 नंतरचा सर्वात गंभीर उठाव' असे केले होते.

ह्या आंदोलनाने बिथरलेल्या इंग्रज सरकारने दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटीश सरकारने 'ऑपरेशन झिरो अवर' अंतर्गत देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अचानक अटक केली. सर्वोच्च नेते एका रात्रीत तुरुंगात गेल्यामुळे ही चळवळ पूर्णपणे नॉनलीडर पद्धतीची झाली, तरीही सामान्य जनतेने आणि भूमिगत कार्यकर्त्यांनी ती स्वतःच्या हातात घेऊन देशव्यापी केली.

अटकेपासून बचावलेल्या अरुणा आसफ अली, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि अच्युतराव पटवर्धन यांसारख्या तरुण नेत्यांनी भूमिगत राहून गुप्तपणे संदेश वहन यंत्रणा वापरुन देशवासीयांशी संपर्क साधला. देशातल्या प्रत्येक प्रांतात अशा भुमिगतांनी आंदोलनाचे नेटवर्क चालवले. छुप्या पद्धतीने संदेश पाठवण्याच्या आंदोलनाचाच एक मुख्य घटक होता 'काँग्रेस रेडिओ'! अशा आंदोलनांचे केंद्र साहजिकच मोठ्या शहरात असायचे कारण त्यासाठी लागणारी तांत्रिक सामग्री सहजतेने अन्यत्र उपलब्ध नसे.

त्यातलेच एक रेडिओ केंद्र मुंबईत कार्यान्वित होते. याचे नाव होते काँग्रेस रेडिओ! याद्वारे रोज अचूक बातम्या आणि देशभरातील आंदोलनाचे अपडेट्स प्रसारित करण्याचे धाडसी काम उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. त्यांनी सुरू केलेला 'काँग्रेस रेडिओ' हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धाडसी आणि रोमांचक अध्याय मानला जातो.

सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर, जनतेपर्यंत आंदोलनाची अचूक माहिती पोहोचवण्यासाठी या गुप्त रेडिओ केंद्राने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कारण नेत्यांच्या अटकेनंतर ब्रिटिश सरकारने वृत्तपत्रांवर कडक सेन्सॉरशिपसह अनेक बंधने लादली. आंदोलकांना, जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवणे अशक्य झाले होते. प्रमुख नेते अटकेत होते आणि आंदोलन तर जारी ठेवायचे होते, रोजचे अपडेट्स सामान्य भारतीय जनतेपर्यंत पोहोचले गेले तरच आंदोलनास धार चढणार होती, हे चित्र लख्ख स्पष्ट दिसत होते.

एकाच वेळेस लाखो भारतीयांना माहिती पोहोचवण्याच्या तत्कालीन दोन साधनांपैकी एक साधन वर्तमानपत्र होते आणि दुसरे साधन होते, रेडिओ! वर्तमानपत्रांची तर मुस्कटदाबी झाली होती, उरला होता रेडिओ! दुसऱ्या पर्यायाचा वापर करण्यासाठी कायद्याची विद्यार्थिनी असणारी बावीस वर्षीय उषा मेहता पुढे आली! उषा मेहतांनी त्यांच्या सहकाऱ्यांना साद घातली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी, बाबूभाई खाकर ह्यांना सोबत घेऊन उषा मेहतांनी गुप्त रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सर्व तांत्रिक जुळवाजुळव करण्यात पंधरा दिवस गेले. आपला हा प्रयोग यशस्वी ठरला झाला तर ह्या आंदोलनास संजीवनी मिळणार आहे, हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन आणि अधिकाधिक गुप्तता बाळगत त्यांनी हा प्रयोग अंमलात आणला, आणि त्याला यश मिळाले! 27 ऑगस्ट 1942 रोजी या गुप्त रेडिओवरून पहिले यशस्वी प्रसारण झाले. या केंद्राची सुरुवात "धीस इज काँग्रेस रेडिओ कॉलिंग फ्रॉम फोर्टी-टू पॉइंट थर्टी-फोर मीटर्स फ्रॉम समवेअर इन इंडिया" या घोषणेने झाली! आणि पुढे जाऊन ही उद्घोषणा हा शिरस्ताच होऊन गेला! लोक अधीर होऊन ह्या केन्द्रावरील माहिती ऐकायचे! चले जाव आंदोलनात कुठे काय घडतेय याची माहिती गावोगाव पोहोचू लागली!

रेडिओ केंद्र चालवणे ही साधी गोष्ट नव्हती. अस्सल पार्ट्स मिळायचे नाहीत. बऱ्याचदा ते नादुरुस्त होत. कधी कधी त्यांची दुरुस्ती शक्य असे तर कधी ते पार्ट बदलून नवे पार्ट टाकावे लागत. हा खर्च परवडणारा नव्हता. शिवाय ह्यात खूप मोठी रिस्क असे. ब्रिटिश काळात रेडिओ ट्रान्समीटर ठेवणे किंवा तयार करणे हा गंभीर गुन्हा होता. असे असूनही मुंबई स्थित 'शिकागो रेडिओ'चे मालक नानाक मोटवानी यांनी गुप्तपणे तंत्रज्ञ आणि सुटे भाग पुरवून हा ट्रान्समीटर तयार करण्यास व तो सुरळीतपणे चालू ठेवण्यास सर्वतोपरी मदत केली.

लोक ‘कॉँग्रेस रेडिओ‘ ऐकून सक्रिय होताहेत ह्याचा तीव्र संताप ब्रिटिशांच्या मस्तकात होता. काहीही करुन हे केंद्र बंद पाडले पाहिजे आणि संबंधितांना ताब्यात घेऊन कठोर शिक्षा केली पाहिजे ह्या विचाराने ब्रिटिश सरकारला पछाडले. त्यासाठी त्यांनी सर्व मार्ग अवलंबले. त्यांची गुप्तहेर यंत्रणा कामाला लावली. धाडी टाकल्या जाऊ लागल्या! रेडिओ लहरींचा माग काढून अचूक लोकेशन शोधण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले.

सरकार आपला शोध घेत असल्याची जाणीव उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झाली. कधी ना कधी ही वेळ येणार आहे हे त्यांना ज्ञात होतेच. त्यासाठीचे प्लॅनिंग त्यांच्याकडे होते. ब्रिटिश पोलिसांना चकवा देण्यासाठी ‘कॉँग्रेस रेडिओ‘ची टीम दर काही दिवसांनी आपले ठिकाण बदलत असे. त्यांनी मुंबईतील गिरगाव, भायखळा, काळबादेवी अशा अनेक भागांतील गुप्त घरांचा वापर केला.

सुरुवातीला केवळ अपडेट्स देणाऱ्या, ‘कॉँग्रेस रेडिओ‘वरून नंतर अन्य उपक्रमही सुरु झाले. महात्मा गांधींचे संदेश, देशभरातील आंदोलनांच्या बातम्या, ब्रिटिशांच्या दडपशाहीचे वास्तव आणि देशभक्तीपर गीते प्रसारित होऊ लागली. डॉ. राम मनोहर लोहियांसारखे भूमिगत नेते देखील ह्या रेडिओवरून भाषणे देऊ लागले, तेव्हा ब्रिटिशांचे पित्त अजूनच खवळले. हे गुप्त केंद्र ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिश पोलिसांनी सर्व शक्ती पणाला लावली.

शेवटी एक गद्दारच त्यांच्या कामाला आला! ‘कॉँग्रेस रेडिओ‘च्या एका अंतर्गत तंत्रज्ञाने संरक्षणाच्या, पैशांच्या आमिषाला बळी पडून पोलिसांना माहिती दिली. 12 नोव्हेंबर 1942 रोजी मुंबईतील 'बाबुलनाथ' जवळील एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांना हे केंद्र शोधण्यात यश आले. प्रसारण सुरू असतानाच पोलिसांनी उषा मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. हा रेडिओ केवळ अडीच महिने चालला, पण त्याने आंदोलन जिवंत ठेवण्याचे आणि लोकांच्या अंतःकरणातला वन्ही पेटता ठेवण्याचे महत्वाचे काम केले. त्यामुळेच ह्या रेडिओने ब्रिटिश सरकारला पुरते हादरवून सोडले होते.

उषा मेहता यांनी पोलिसांच्या अमानुष चौकशी दरम्यान एकाही सहकाऱ्याचे नाव सांगितले नाही. त्यांना चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. येरवडा तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने त्यांना 'पद्मविभूषण' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. उषा मेहतांच्या गुप्त काँग्रेस रेडिओची माहिती ब्रिटीश पोलिसांना देणाऱ्या त्या अंतर्गत तंत्रज्ञाचे नाव होते, नरिमन प्रिंटर!

स्वातंत्र्यलढ्यातील इतर सदस्यांप्रमाणे नरिमन प्रिंटर हा देशभक्तीच्या भावनेने प्रेरित नव्हता. कोर्टाच्या नोंदींनुसार, तो केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि पैशांच्या मोहाने या मोहिमेत तांत्रिक साहाय्यक, रेडिओ ऑपरेटर म्हणून सामील झाला होता. सुरुवातीपासूनच पैशांच्या बदल्यात तांत्रिक मदत करणे एवढाच त्याचा संबंध होता. त्यामुळेच तो फंदफितुरी करू शकला!

स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि ब्रिटीश सरकारच्या कायदेशीर कारवाईतून मान मोकळी करतानाच पैसे कामावण्यासाठी त्याने पोलिसांसोबत हातमिळवणी केली. 12 नोव्हेंबरच्या दिवशी होणाऱ्या प्रसारणाच्या गुप्त ठिकाणाची अचूक माहिती त्याने ब्रिटिशांना दिली. या फितुरीमुळेच पोलिसांनी थेट चालू प्रसारणादरम्यान छापा टाकून अटकसत्र राबवण्यात ब्रिटिश यशस्वी झाले.

आजदेखील अनेक वर्तमानपत्रे, मीडिया हाऊसेस सत्तेचे चरणचुंबक झाले आहेत. खरी माहिती समोर येऊ दिली जात नाही आणि खोट्या माहितीचा भडिमार आहे! आजही नरीमन प्रिंटर जिवंत आहे, मात्र त्याची नावे भिन्न आहेत! त्याचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे सत्ता, पैसा आणि सत्तेची अमर्याद लालसा! त्यासाठी तो इमानच नव्हे तर काहीही विकायला तयार आहे! प्रत्येक काळात गद्दार जन्माला येत असतात, काही काळ त्यांचा उदोउदो होतो मात्र बऱ्याच कालखंडानंतर इतिहास जेव्हा त्याचे मूल्यमापन करतो तेव्हा अतिशय कठोर शब्दांत त्यांची निर्भत्सना करतो, त्यांना कधीही माफी मिळत नाही! असो.

‘चले जाव‘ आंदोलनातील कॉँग्रेस रेडिओची ही माहिती अभूतपूर्व अशीच आहे. कारण अशा अनेक लहानमोठ्या व्यक्तींनी आपले योगदान दिल्यानेच आपल्याला स्वातंत्र्य लाभले! आपण सारेच जण त्यांचे ऋणी आहोत!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा