रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

गोष्ट 'चित्रलेखा'ची, भगवतीचरण वर्मांची!



भगवतीचरण वर्मा यांनी लिहिलेली ‘चित्रलेखा’ही कादंबरी चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील प्राचीन भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ह्यात विविध कथासूत्रे असली तरी, मुख्य कथा ऋषी रत्नांबर यांच्या श्वेतांक आणि विशालदेव ह्या दोन शिष्यांची आहे, ज्यांना ' पाप' काय आहे हे शोधायचे आहे. त्यावर ऋषी रत्नांबर म्हणतात की, त्यांच्यापाशीही याचे उत्तर नाही, कारण ते स्वतः या विषयावर निर्णय घेऊ शकलेले नाहीत. म्हणून शिष्यांनी बाह्यजगात जाऊन पाप काय आहे हे स्वतःच शोधून काढावे, असं ते सुचवतात. 

त्या दोघांना त्यांच्या एका माजी शिष्यासोबत जोडून देतात. एकाला बीजगुप्त ह्या सामंतासोबत जोडले जाते , जो ऐषआरामाचे जीवन जगत होता. दुसऱ्याला कुमारगिरी ह्या योग्यासोबत जोडले जाते, ज्याच्या मते खरा आनंद 'विराग' म्हणजे ऐहिक वस्तूंशी कोणताही संबंध नसण्यात आहे. दोघांना भिन्न ठिकाणी सोडल्यानंतर पुढल्या एका वर्षात ते काय अनुभवतात आणि त्यांच्यासोबत राहिलेल्या त्या दोन व्यक्तींचे आयुष्य एकमेकांशी कसे जोडले जाते, याभोवती कादंबरी फिरते. कादंबरीची नायिका, चित्रलेखा, कथा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पापी माणूस कसा ठरवायचा याबद्दल त्या दोघांच्या परस्पर विरोधी कल्पना शेवटी समोर येतात. 

एखादी गोष्ट योग्य-अयोग्य ठरवण्याचा आपला निर्णय हा आपण ज्या संदर्भात आणि परिस्थितीत असतो, त्यावरून घेतला जातो, हे दाखवणे हा यामागील उद्देश होता. तथापि, या कादंबरीत एक मोठी उणीव आहे. जर शेवटी वाचक योग्य उत्तराबाबत द्विधा मनःस्थितीत राहिला असता, तरच कादंबरीने आपला मुद्दा स्पष्ट केला असता. पण तसे घडत नाही. ज्या प्रकारे कथा पुढे सरकते, त्यावरून वाचक स्पष्टपणे एका पात्राच्या बाजूने आणि दुसऱ्याच्या विरोधात झुकलेला दिसतो. 

भगवतीचरण वर्मा यांची ‘चित्रलेखा’ ही कादंबरी एका उत्कट प्रेमाची कथा आहे. नायिका चित्रलेखा, स्वत:शी अतिशय प्रामाणिक आहे. स्वत:च्या जीवनावर तिची पकड आहे. ती एक खंबीर, सशक्त, समर्थ आणि आत्मनिर्भर स्त्री आहे. बीजगुप्तचे तिच्यावर अतिशय प्रेम असते. परंतु बीजगुप्तशी आपला विवाह होणे शक्य नाही हे चित्रलेखाला ठाऊक आहे. ती दूर निघून जाते. प्रेमाचा सर्वोच्च आदर्श त्याग हाच आहे, हे चित्रलेखा दाखवून देते.

‘..आणि पाप कशाला म्हणतात?’’ महाप्रभु रत्नांबरांना श्वेतांक या शिष्याने विचारलेल्या प्रश्नाने ते किंचित थबकले, म्हणाले, ‘‘पाप कशाला म्हणावे, पापाची व्याख्या कशी करावी याचा प्रयत्न मी खूपदा केला आहे. पण हा प्रश्न मला अद्याप सुटलेला नाही. पण तुला जाणून घ्यावयाचे असेल, तर ते शोधावे लागेल. तयार आहेस? आणि विशालदेव, तू पण आहेस तयार?’’ दोन्ही शिष्यांनी होकारार्थी मान हलवल्यावर प्रभु रत्नांबर म्हणाले, ‘‘त्यापूर्वी मी तुम्हाला दोन व्यक्तींचा परिचय करून देतो, एक आहे योगी आणि दुसरा भोगी. योगीचे नाव आहे कुमारगिरी आणि भोगीचे नाव आहे बीजगुप्त. तुम्ही त्यांच्याकडे जावे कारण उपासनेएवढेच अनुभवालाही महत्त्व असते.’’
भगवतीचरण वर्मा यांच्या ‘चित्रलेखा’ कादंबरीची ही सुरुवात आपल्यात पुढे वाचत जाण्याची उत्सुकता निर्माण करते. तरुण, उमदा, रत्नजडित पात्रातल्या मदिरेला सुख मानणारा बीजगुप्त ऐश्वर्यसंपन्न असतो. पाटलीपुत्र नगरीत त्याला मोठा मान असतो. चित्रलेखा ही बीजगुप्तची प्रेयसी. 

एकदा बीजगुप्त विचारतो, ‘‘जीवनाचे सुख कशात आहे, चित्रलेखा?’’ त्यावर ती उत्तरते, ‘‘मौजमजा, मस्ती!’’ चित्रलेखा वेश्या नसते, ती असते एक कुशल नर्तकी. वेश्यावृत्तीपासून दूर असणारी नर्तकी! यालाही पार्श्वभूमी असते. तिचा पूर्वेतिहास दुःखद आहे. ती ब्राह्मण विधवा होती. अठराव्या वर्षी वैधव्य आल्यावर ती विरक्त होते, संयमाने जगू लागते. पण तिला कृष्णादित्य भेटतो. त्याला पाहून तिचा संयम सुटतो. यौवन पुन्हा फुलून येते. जीवनाचा स्रोत बदलून जातो. पण ती गर्भवती होते. त्यांचे प्रेम जगजाहीर होते. 

त्या दोघांचेही वडील आपल्या संततीस घराबाहेर काढतात. चित्रलेखा आणि कृष्णादित्य ह्या दोघांचीही समाजात निर्भर्त्सना केली जाते. बदनामी आणि अपमान सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणत कृष्णादित्यला मृत्यू जवळ करावासा वाटतो. चित्रलेखाला एका नर्तकी आश्रय देते. नृत्य आणि संगीत कलेत ती पारंगत होते. तिथून बाहेर पडताना पुन्हा संयमित जीवन घालवायचा निश्चय करते. 

पण एकदा नृत्याच्या कार्यक्रमात, ती बीजगुप्तला पाहते आणि भान हरवून बसते. बीजगुप्त तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, सुरुवातीला ती  प्रतिसाद देत नाही. पण हळूहळू तिला कळून चुकते की, आता फक्त बीजगुप्तच तिच्या जीवनात येऊ शकतो. ती स्वत:ला बीजगुप्तच्या स्वाधीन करते.

दरम्यान ऋषी रत्नांबर हे आपला शिष्य श्वेतांक ह्याला बीजगुप्तकडे घेऊन येतात. बीजगुप्त स्वत:ची ओळख करून देतो. त्याच वेळी चित्रलेखाचीही ओळख करून देतो. श्वेतांकला पूर्णतः अज्ञात असलेल्या अनोख्या विश्वात पहिल्यांदा आल्याबद्दल त्याचे स्वागत करतो आणि डगमगत्या पायांनी तोल सावरत उभ्या असलेल्या चित्रलेखाला तिच्या महालात पोचवून देण्याची कामगिरी सोपवतो. 

बीजगुप्तच्या सहवासात चित्रलेखा जीवनाचा उन्मुक्त आनंद अनुभवत असली तरी ती विचार करणारी स्त्री आहे. तारुण्याचा उन्माद भोगत असतानाही स्वत:च्या जगण्याचा अर्थ तिला कळून घ्यायचा आहे. जीवन ही एक न विरणारी पिपासा आहे, ते सतत बदलत असते आणि सतत रंग बदलणाऱ्या जीवनात सुख आणि शांती मिळू शकत नाही याची तिला जाणीव आहे. 

तिच्या बुद्धिमत्तेने आणि तर्कशुद्ध बोलण्याने, बीजगुप्ताच्या राजसभेत आलेला योगी कुमारगिरीदेखील प्रभावित होतो. त्याला ती शांती आणि सुख यांचा अर्थ समजावून सांगताना म्हणते, ‘शांती अकर्मण्यता आहे आणि सुखाची एक निश्चित व्याख्या करता येणार नाही.’ कुमारगिरीच्या शून्यासंबंधीच्या विवेचनावर ती म्हणते, ‘तुमच्या या शून्य कल्पनेवर कोण विश्वास ठेवील? जे प्रत्यक्ष आहे, समोर दिसते, तेच सत्य आहे. शून्य हे कल्पित आहे. ज्ञान आणि अंध:कार, सुख आणि दु:ख, स्त्री आणि पुरुष, पाप आणि पुण्य यांच्यात तुम्ही करीत असलेला भेद मिथ्या आहे. तपस्या ही जीवनातली चूक आहे. तपस्या म्हणजे आत्म्याचे हनन.’ 

कुमारगिरीशी ती वाद घालते, पण त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने ती देखील मोहित होते. एके दिवशी त्याच्या कुटीत जाऊन ती त्याला दीक्षा देण्याची विनंती करते. तेव्हा तो नकार देतो. त्यावर ती म्हणते, ‘स्त्री अंधकारमय आहे आणि मायारूप आहे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर योगी तुम्ही चूक करताहात. स्त्री शक्ती आहे, स्त्री सृष्टी आहे. जो पुरुष स्त्रीला भितो तो दुर्बल, भित्रा आहे, अयोग्य आहे. मी अंध:कार असेल तर मला प्रकाशाची आस आहे. तुम्ही वासनेवर विजय मिळवला आहे. तुम्ही मला दीक्षा द्या.’

चित्रलेखा स्वत:शी अतिशय प्रामाणिक आहे. स्वत:च्या जीवनावर तिची पकड आहे. ती एक खंबीर, सशक्त, समर्थ आणि आत्मनिर्भर स्त्री आहे. मनाने स्वच्छ आहे. बीजगुप्तचे तिच्यावर अतिशय प्रेम आहे. तो तिला आपली पत्नी मानतो. आपल्या प्रेमावर फक्त तिचा अधिकार आहे, असे तो स्पष्ट सांगतो. परंतु बीजगुप्तशी आपला विवाह होणे शक्य नाही हे चित्रलेखाला ठाऊक आहे. 

पाटलीपुत्र नगरीतील सामंत मृत्युंजय याच्या मुलीशी, यशोधरेशी त्याने लग्न करावे यासाठी ती पुढाकार घेते. बीजगुप्तला सुखी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यासाठी मला त्याग करावा लागेल, त्याला सोडून जावे लागेल हे जाणून ती स्वत:च्या आभूषणांचा, मूल्यवान वस्त्रांचा आणि ऐश्वर्यसंपन्न महालाचा त्याग करून कुमारगिरीकडे निघून जाते. 

बीजगुप्तला पत्र पाठवून ती कळवते की मी तुमच्यावर अजूनही प्रेम करते, पण मी तुमचे जीवन निरर्थक केले आहे. मी तुमच्याजवळ असले तर तुम्ही विवाह करणार नाही, म्हणून मी दूर जाते आहे. मी कुमारगिरीकडून दीक्षा घेऊन संयमित जीवन व्यतीत करणार आहे. प्रेमाचा सर्वोच्च आदर्श त्याग हाच आहे हे चित्रलेखा दाखवून देते.

चित्रलेखाचे असाधारण व्यक्तित्व कुमारगिरीला प्रभावित करते. त्याला समजून चुकते की विराग मनुष्यासाठी अशक्यप्राय आहे, कारण जीवनाचे कार्य रचनात्मक आहे, विनाशात्मक नाही. त्याच वेळी चित्रलेखाच्या लक्षात येते की, आपल्याविषयीच्या शारीरिक आकर्षणाने, मोहाने योगी पथभ्रष्ट होतो आहे. त्याच्याकडे येऊन आपण स्वत:ला अध:पतित केले आणि त्यालाही याची जाणीव झाल्याने ती त्याला म्हणते, ‘मी तुमच्यावर आधिपत्य गाजवते आहे, तुम्ही निर्बळ झाला आहात. तुम्ही स्वत:वर पुन्हा विजय मिळवावा यासाठी मी येथून निघून गेले पाहिजे.’ 

पण कुमारगिरी वासनेने चळला आहे. तो तिला सांगतो, की तू बीजगुप्तकडे जाणार असशील तर ते शक्य नाही. त्याने यशोधरेशी विवाह केला आहे. हे ऐकून चित्रलेखा भावव्याकुळ होते, संतापते. तिच्या ह्या स्थितीचा कुमारगिरी फायदा घेतो आणि तिला स्वत:च्या पाशात ओढतो. 

दुसरे दिवशी सकाळी विशालदेवाकडून तिला कळते की बीजगुप्तने श्वेतांकला दत्तक घेतले, आपली सर्व संपत्ती त्याला दिली आणि त्याचे यशोधरेवर प्रेम असल्याने त्याचा यशोधरेशी विवाह करून दिला. कुमारगिरीने असत्य बोलून आपल्याला त्याच्या वासनेचे साधन बनवले हे कळल्यामुळे तिला कुमारगिरीचा आत्यंतिक तिरस्कार वाटतो. ती त्याची निर्भर्त्सना करते आणि निर्धन, एकाकी झालेल्या बीजगुप्तकडे परत जाते. कादंबरी संपते. 

‘चित्रलेखा’ ही कादंबरी एका उत्कट प्रेमाची कथा आहे. चित्रलेखा ही बीजगुप्तवरच खरे प्रेम करीत असते. कुमारगिरीवर विजय मिळविण्यासाठी ती त्याच्याकडे जाते. पण तिच्या बीजगुप्तवर असलेल्या प्रेमाचा आधार नाहीसा झाला असे भासवून कुमारगिरीने जरी तिला स्खलित केले असले तरी बीजगुप्तचे श्रेष्ठत्व, त्याचे औदार्य आणि त्याचे आपल्यावरचे अविचलित प्रेम याची खूण पटल्याने पुन्हा त्याच्याकडेच परत जाते.

कादंबरी संपते, तिथे वाचक थांबत नाही, त्याच्या मनात विचारचक्र सुरु होते. भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे नैतिकतेचे समग्र वजन बीजगुप्तच्या पारड्यात टाकले आहे, असे अनेकांना वाटते मात्र हा एक छद्म निष्कर्ष ठरू शकतो! कारण ह्या कादंबरीमध्ये सर्वाधिक नीतिमत्तेने वागणारे पात्र चित्रलेखाचे आहे! ते कसे, हे उमगले की पाप पुण्याच्या आपल्या जुनाट संकल्पना मोडीत निघतात! 

भगवती चरण वर्मा ह्यांना ह्या कादंबरीने नवी ओळख मिळाली. हिंदी साहित्यात ही कादंबरी मैलाचा दगड ठरली. विलक्षण लोकप्रिय ठरलेल्या कादंबऱ्यात हिचा समावेश अग्रक्रमाने होतो. ह्यावर सिनेमे आणि नाटकांची निर्मिती झाली. हिंदी रसिक वाचकांना तिची प्रचंड भुरळ पडली. अनेकांना भगवतीचरण वर्मा यांचा पत्ता ठाऊक नसे, मात्र केवळ 'चित्रलेखा के लेखक, भगवतीचरण वर्मा' ह्या पत्त्यावर हजारो पत्रे वितरित झाली! ही गोष्ट अतिरंजित अथवा दंतकथा वाटू शकते मात्र हे घडले होते ही हकीकत आहे. आजही ह्या कादंबरीची चर्चा होते. 

जर कुणी आपल्या किशोर वयात ही कादंबरी वाचली असेल अथवा ह्यावर निर्मिलेला सिनेमा पाहिला असेल तर कळत्या वयात ही कादंबरी पुन्हा वाचली पाहिजे; वाचन शक्य न झाल्यास, त्यावर आधारित सिनेमा पाहिला तर नक्की जाणवेल की, वयानुसार आपला दृष्टिकोन बदलला आहे! कुणाला दोषी मानायचे आणि कुणाला निर्दोष मानायचे याचे आडाखे अनेक गोष्टींच्या प्रभावानुसार बदलतात, आपल्या जगण्यातलं हे अतिशय महत्वाचे जीवनतत्व चित्रलेखा शिकवून जाते! माझ्या मते ह्या कादंबरीचे हे सर्वोच्च यश ठरावे. 

- समीर गायकवाड 

काही नोंदी - 
1. चित्रलेखा, पतन आणि चाणक्य ह्या कादंबऱ्या भगवतीचरण वर्मा यांनी लिहिल्या. कादंबरी लेखन पूर्ण होऊनही ते त्या पात्रांचा अधिभौतिक इतिहास कुरतडत राहिले. ते म्हणतात की, चित्रलेखा कल्पना आणि रोमान्स यांचा संगम होता. चाणक्यमध्ये ह्या भावनांना शून्य स्थान आहे, त्यात केवळ कटूसत्य आहे आणि कठोर नियम संकेत आहेत! संसारी व्यक्तीला त्याविषयी बोलायला आवडत नाही! चित्रलेखाचे विचारसत्व कठोर असूनही संवेदना आणि भावनांच्या तरल विश्वात, ते सहजतेने समोर येते हे चित्रलेखाच्या मांडणीचे यश.           

1943 मध्ये, बॉम्बे टॉकीजच्या देविका राणी यांनी भगवती बाबूंना आमंत्रित केले. त्यांच्या आमंत्रणावरून भगवती बाबू तिथे गेले आणि 1948 पर्यंत राहिले. या काळात त्यांनी केवळ चार चित्रपटांच्या पटकथाच नव्हे, तर त्यांचे संवादही लिहिले. भगवती बाबूंनी त्यावेळी एका चित्रपटाची निर्मितीही केली.

2. भगवती चरण वर्मा यांना एका मित्राकडून बॉम्बे टॉकीजमध्ये येण्याचे आमंत्रण आले. हे आमंत्रण असे होते की, तिथे नोकरीची हमी होती. प्रवासाचा खर्चही दिला जाणार होता. ते तिथे गेले. त्याच सुमारास, कोलकात्यात एक घटना घडली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. कोलकात्याला परतण्याऐवजी भगवती चरण वर्मा मुंबईचे रहिवासी झाले. भगवती चरण वर्मा यांनी प्रसार भारतीला दिलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केलाय. स्वतःला कोणत्याही परिस्थितिनुरूप घडवण्याचे कसब त्यांना अवगत होते!          

3. भगवती बाबू मुंबईत आले खरे, मात्र तिथे टिकून राहण्यासाठी त्यानं कामाची गरज होती. अखेर त्यांना नोकरी मिळाली आणि त्यांनी काम सुरू केले, जे यशस्वीही झाले. असे म्हटले जाते की, भगवती चरण वर्मा यांनीच अभिनेता युसूफ खानला, दिलीप कुमार हे नाव दिले होते. वर्मा यांचा पहिला चित्रपट 'ज्वार भाटा' होता, ज्याची पटकथा त्यांनीच लिहिली होती. दिलीप कुमार यांनी त्यात मुख्य भूमिका साकारली होती. 

विशेष म्हणजे, ते स्वतः चित्रपट लिहायचे, पण त्यांना चित्रपट पाहण्यात कधीच रस नव्हता. 1948 पर्यंत भगवती बाबूंचा चित्रपटसृष्टीबद्दल भ्रमनिरास झाला होता. एक प्रकारे, त्या झगमगत्या शहराबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांनी बॉम्बे टॉकीज सोडले आणि तिथूनच राजकारणात प्रवेश केला. 

4. भगवती बाबूंच्या कथा वाचताना, जणू त्या त्यांच्याच आयुष्यातील कथा आहेत असे वाटते. 'भूले बिसरे चित्र,' 'सिद्धी सच्ची बातें,' आणि 'प्रश्न और मिराज' या तिन्ही  रचना त्यांच्या लेखनाचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांत त्यांनी महात्मा गांधींच्या आधीचा काळ, गांधींच्या काळातील काळ, गांधींपासून नेहरूंपर्यंतचा काळ आणि त्यानंतरचा काळ चित्रित केला आहे. हिंदी साहित्यात असे प्रयोग करणारे खूप कमी साहित्यिक आहेत, त्यातही विशेष म्हणजे भगवतीचरण वर्मा केवळ ऐतिहासिक पटल शब्दबद्ध करुन थांबत नाहीत तर त्यावर सटीक भाष्य करतात, जे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करते! 

5. राजकारणात आल्यावर एक महत्वाचा नेता आणि जमल्यास मंत्री बनण्याचा त्यांचा मानस होता. पुढे जाऊन ते राज्यसभेचे मानद सदस्य झाले. मग मात्र त्यांच्या मनात मंत्री होण्याची आकांक्षा उरली नव्हती. असं का घडलं असावं ह्यावर ते स्वतःच उत्तर देतात, त्यांनी लिहिलंय -
"जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन 'शरणागतीचा' झाला आहे. मी खूप प्रयत्न केला, पण मला जीवनाची गती आणि जीवनाचा अर्थ समजू शकला नाही. माझ्या सभोवतालचे सर्व काही अनोळखी वाटते."
त्यांच्या मोहत्यागाच्या कहाण्या अशा रसरशीत आहेत आणि हेच सूत्र 'चित्रलेखा'च्या ठायी शिगोशिग भरलेय! हा योगायोग नसून ही लेखकाची जडणघडण आहे,  जी त्याच्या पात्रांमधून डोकावते!

6. भगवती बाबूंच्या कथा वाचताना, जणू त्या त्यांच्याच आयुष्यातील कथा आहेत असे वाटते. 'भूले बिसरे चित्र,' 'सीधी सच्ची बातें,' आणि 'प्रश्न और मिराज' या तिन्ही  रचना त्यांच्या लेखनाचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांत त्यांनी महात्मा गांधींच्या आधीचा काळ, गांधींच्या काळातील काळ, गांधींपासून नेहरूंपर्यंतचा काळ आणि त्यानंतरचा काळ चित्रित केला आहे. हिंदी साहित्यात असे प्रयोग करणारे खूप कमी साहित्यिक आहेत, त्यातही विशेष म्हणजे भगवतीचरण वर्मा केवळ ऐतिहासिक पटल शब्दबद्ध करुन थांबत नाहीत तर त्यावर सटीक भाष्य करतात, जे लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करते!

भगवतीचरण वर्मा यांची आज 123 वी जयंती. त्यांना अभिवादन! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा