सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

बंगाली साहित्यातील शिवरायांवरची साहित्यकृती - सदाशिव!



1960 च्या दशकात, शरदेंन्दू बंदोपाध्याय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यावर 'सदाशिव' नावाची बंगाली भाषेत किशोर कथामालिका लिहिली होती. पुढे जाऊन यावर कॉमिक बुक्सची निर्मिती झाली. दशकापूर्वी त्यावर व्हिडिओ फिल्म्स आणि डॉक्यूसिरिज देखील बनवल्या गेल्या.

ही कथा सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या ऐतीहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहे, जेव्हा मराठा साम्राज्य, मुघल आणि विजापूरची आदिलशाही यांच्यात संघर्ष टोकाला पोहोचला होता. कथेचा नायक 'सदाशिव', पूर्ण नाव -सदाशिव गणपतराव शिंदे, हा डोंगरपूर गावातील एक धाडसी, बुद्धिमान आणि निष्ठावान मराठा मुलगा असतो. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील होतो आणि आपल्या चातुर्याने व पराक्रमाने गुप्तहेर आणि सैनिक म्हणून अनेक कठीण मोहिमा फत्ते करतो. अशी कथा.

या सिरीजमध्ये एकूण पाच भागांचा अर्थात पंचकचा समावेश आहे, ज्यांना 'सदाशिव चरित्रम' किंवा 'सदाशिव समग्र' 
म्हटले जाते. 'सदाशिवेर आदिकांड' ह्या भागात सदाशिवची सुरुवातीची कथा आणि त्याचे शिवरायांच्या सैन्यात सामील होणे सामील आहे. 'सदाशिवेर अग्निकांड'मध्ये युद्ध आणि संघर्षाची रोमहर्षक कथा आहे.

'सदाशिवेर दौडो-दौडी कांड' ह्यामध्ये धाडसी मोहिमा आणि शत्रूला चकवण्याची कथा. सदाशिवेर होइ-होइ कांड हा या सदाशिव मालिकेतील अत्यंत लोकप्रिय झालेला चौथा खंड आहे. ह्यात त्याची साहसी मोहीम शब्दबद्ध झालीय. यापैकीच 'सदाशिवेर तीन कांड' या पुस्तकाला भारत सरकारचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

एका बंगाली लेखकाने महाराष्ट्राचा इतिहास, गडकिल्ले आणि 
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व इतक्या सुंदर आणि अचूक पद्धतीने मांडले आहे की, ही किशोर कथामालिका बंगाली साहित्यात मैलाचा दगड ठरली!

शिवाजी महाराज, जिजाऊ, शहाजी महाराज, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, यांच्या आयुष्यातील युद्धप्रसंग कथेत गुंफताना सदाशिव, विठ्ठल पाटील, सखाराम, कुमकुम ही काल्पनिक पात्रे सुरेख पद्धतीने त्यात चितारली आहेत. हेरगिरी करणारा रत्नाजी हा शिवाजी राजांचा बालमित्र अफलातून रंगवला आहे. मराठी मुलुखाचे आणि गडकिल्ल्याचे वर्णन जितके अफाट आहे तितकेच डिटेलिंग तत्कालीन मराठी रयतेचे आहे!

याची कॉमिक सिरीज तयार झाली तेव्हा बंगाली रसिक त्यावर तुटून पडले. 'संदेश' नावाच्या नियतकालिकात ती टप्प्याटप्प्यात प्रसिद्ध झाली. ह्या कथांचा इंग्रजीत अनुवाद झालाय. बँड ऑफ सोल्जर्स या नावाने हा अनुवाद प्रकाशित झालाय. ऐंशीच्या दशकात याचेही कॉमिक्स प्रकाशित झाले.

1970 मध्ये शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे आकस्मिक निधन झाले. 
त्यांच्या साहित्य सामग्रीचा धांडोळा घेतला गेला तेव्हा लक्षात आले की, ह्याच सदाशिव मालकेतील चार भाग अर्धवट लिहून तयार झाले होते. शरदेंन्दू आणखी काही वर्षे जगले असते तर कदाचित त्यांनी ते लेखन पूर्ण केले असते. ह्यात औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांचे उल्लेख होते. सदाशिव आणि त्याचे सवंगडी उत्तरेकडे हेरगिरी करतात असे सूत्र होते. दुर्दैवाने हे लेखन अधुरे राहिले.

कोलकाता आकाशबानीसह रेडिओ मिर्ची बांगलावरतीही याचे वाचन झालेय. विख्यात रंगरेषाकार बिमल दास आणि तरुण मुजुमदार यांनी याची कॉमिक सिरीज बनवून 'आनंदमेळा'द्वारे तिचे लोकार्पण केले. बंगाली लोकांनी हे सर्व फॉरमॅट डोक्यावर घेतेले होते.

1899 साली उत्तरप्रदेशच्या जौनुपर येथे जन्मलेल्या शरदेंन्दूच्या 
बालपणीचा काही काळ बिहारमधील मुंगेरमध्ये आणि बंगालमधील बडानगर येथे गेलाय. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी पहिली कथा लिहिली होती. 1928 मध्ये हिमांशू रॉय ह्यांनी त्यांना मुंबईचे आमंत्रण दिले. बॉम्बे टॉकीजसाठी पटकथा लिहिण्याचे काम होते!

शरदेंन्दूना ते काम आवडले मात्र क्षेत्र पसंत पडले नाही . दोन दशके त्यांनी सिनेउद्योगाशी संबंधित प्रांतात लेखणी चालवली. 1952 मध्ये ते पुण्यात आले आणि तेव्हा मराठी मुलुखात मुशाफिरी केली. शिवबांची त्यांना भुरळ पडली. शरदेंन्दूचा पिंड हेरगिरीच्या कथांचा, भूताखेतांच्या गोष्टींचा होता . थ्रिलर हॉरर हे त्यांचे आवडते जॉनर होते.

शिवाजी राजांची गोष्ट सांगायचीय मात्र ती आपल्या एका 
पात्राच्या माध्यमातून सांगायची हे त्यांनी ठरवले! त्यांचा नायकही ठरला. सदाशिव गणपतराव शिंदे, शिवाजी राजांचा हा मावळा हेरगिरी देखील करतो आणि युद्धातही भाग घेतो. अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी हे लिहिलं आहे. मराठी साहित्यात एखाद्या लेखकाने लिहिलेल्या शिवाजी राजांच्या किशोर कथांना इतक्या विविध फॉरमॅटमध्ये क्वचित आणले गेलेय हे इथे आवर्जून सांगावे वाटते.

ह्या लेखनात काही ऐतिहासिक तथ्यांची गल्लत झालेली आहे. अर्थात सत्तर वर्षांपूर्वी उपलब्ध असलेली ऐतिहासिक साधने त्यांनी हाताळली असतील, वाचली असतील त्यावरून आपले मत बनवून त्यांनी लिहिले असावे. ही एक त्रुटी वगळता ही संपूर्ण कॉमिक सिरीज आणि पुस्तकांचे खंड, सारेच रंजक आहे!

देशभरातील कोणकोणत्या भाषांत शिवाजी राजांवर काय काय 
लिहिले गेलेय, त्यातली माहिती किती निर्दोष आहे, त्यात किती ऐतिहासिक तथ्ये आहेत, त्यात कोणते बदल केले जाणे अपेक्षित आहे ह्याविषयी शिवाजी राजांचे कथित वारस काही बोलताना मी कधी पाहिले नाहीत.

कॉलर उडवणे, मिशीला पीळ देणे, फोटो सेशन करणे आदी गोष्टीत मश्गुल राहून सत्तेतली चिंधी खुर्चीवर शाबूत ठेवणे ह्यात मात्र ते व्यग्र दिसतात! त्यांनी जमल्यास यावर थोडेसे लक्ष द्यावे. चार चांगल्या गोष्टींची निदान दखल तरी घ्यावी आणि त्यात काही चुकले असेल तर त्यानुसार बदल करून घेतले पाहिजेत. ह्यासाठी लागणारी इच्छाशक्ती राजकीय महत्वाकांक्षेपायी गहाण टाकलेली असल्यास आपली काही हरकत नाही. असो.

शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे कौतुकच केले पाहिजे कारण त्यांनी 
तीन दशके महाराष्ट्रात राहून शिवाजी राजांवर अतिशय रसाळ आणि रम्य शैलीचे लेखन केले, ज्याला बंगाली, हिंदी आणि इंग्रजीत गौरविले गेले.

वास्तवात मराठी माणूस देखील त्यांना ओळखतो, मात्र ती ओळख केवळ व्योमकेश बक्षीपुरती आहे! होय, व्योमकेश बक्षीचे लेखन ह्याच शरदेंन्दू बंदोपाध्याय यांनी केले होते! पोस्ट जुनीच आहे, आज शरदेंन्दूचा स्मरणदिवस असल्याने पुन्हा डकवली आहे.

- समीर गायकवाड

अवांतर - व्योमकेश बक्षी कथामालिकेमधील 'चिडीयाखाना' ह्या कथेवर सत्यजित रे यांनी ह्याच नावाने सिनेमा बनवला होता, हॉररचे वेगळे अस्पेक्स्ट त्यांनी मांडले होते. बंगाली माणसाचे शिवाजीराजांचे प्रेम अनुभवायचे असेल तर खूप काही वाचण्यासारखे आहे, बेसिक स्टार्टसाठी 'सदाशिव'पासून सुरुवात करायला हरकत नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा