फोटोत डावीकडे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आणि उजवीकडे माय लाई नरसंहारातील बळी |
१९४६ मध्ये अमेरिकन युद्धकैद्यांची रोममधून खुली परेड काढून इटालियन वर्तमानपत्रात त्याची प्रसिद्धी करणाऱ्या जर्मन लेफ्टनंट जनरलने जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील युद्धकैदीविषयक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप अमेरिकन सैनिकी आयोगाने केला होता. मात्र व्हिएतनाममध्ये जेंव्हा युद्धबंदयांसोबत अमेरिकन सैन्याने केलेले दुर्व्यवहार समोर येऊ लागले तसतशी नैतिकतेचे ढोल पिटणारी अमेरिका बॅकफूटवर गेली होती. इथे एक उदाहरण व्हिएतनाममधील माय लाई नरसंहाराचे देतोय. व्हिएतनाममधील सोन मई खेड्यानजीक असलेल्या माय लाई आणि माय खे या दोन वस्त्यांवर अमेरिकन सैन्याच्या कंपनी सी मधील पहिली बटालियन, विसावी इन्फंट्री रेजिमेंट, २३ व्या इन्फंट्री डिव्हिजनमधील ११ वी ब्रिगेड यातील हजारहून अधिक शस्त्रसज्ज सैनिकांनी हल्ले केले. लोकांना ताब्यात घेऊन पाशवी नरसंहार केला. ३४७ ते ५०४ च्या दरम्यान मृतांची संख्या होती (अनेकांचे मृतदेह अखेरपर्यंत न मिळाल्याने ही संख्या नेमकी ठरवली गेली नाही) यावरून हा नरसंहार किती मोठा होता याची कल्पना यावी. या नरसंहाराचे फोटो अमेरिकन सैन्याने काढले जे नंतर प्रकाशित केले गेले. मारले गेलेल्यात बहुसंख्य बालके आणि स्त्रिया होती. नरसंहार घडवून आणणाऱ्या सैनिकांची संख्याही अफाट होती. काही स्त्रियांवर बलात्कार केले गेले होते, काहींना अमानवी मारहाण झाली होती, काहींचा पाशवी छळ केला गेला होता. काही मृतदेहांची विटंबना केली गेली होती. यातील काही सैनिकांवर जिनिव्हा कन्व्हेन्शनमधील तरतुदींचा भंग केल्याचा खटला चालवला गेला. इतक्या मोठ्या संख्येने हिंस्त्र नरसंहार करणाऱ्या सैनिकापैकी विल्यम केली हा एकच सैनिक दोषी सिद्ध झाला. प्रारंभी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली. नंतर ती बदलून दहा वर्षे कारावास अशी केली गेली. प्रत्यक्षात मात्र फक्त साडेतीन वर्षेच त्याला बंदिवास झाला तो ही त्याच्याच घरात नजरकैद करून ! या शिक्षेला कसलाच अर्थ नव्हता की कोणती नैतिक मुल्ये अमेरिकेने इथं जपली नव्हती ! शेवटी या घटनेचा जेंव्हा बभ्रा झाला जेंव्हा जगभरातून संतापाची लहर उमटली पण अमेरिकेच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. हा नरसंहार घडत असताना हयू थॉम्पसन, ग्लेन अँड्रीयोट आणि लॉरेन्स कोलबर्न या तीन अधिकाऱ्यांनी मानवतेच्या भूमिकेतून जखमींची मदत करण्याचा व त्यांच्यावरील अत्याचारापासून सैनिकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्यांना अमेरिकन संसदेची कठोर टीका सहन करावी लागली. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. घटनेनंतर ३० वर्षांनी अमेरिकन सरकारला उपरती झाली आणि या अधिकाऱ्यांना गौरवलं गेलं. यातून बोध मिळतो की जिनिव्हा कन्व्हेन्शन ही नामधारी गोष्ट आहे, जिचा वापर केवळ दबाव टीका यासाठी होतो त्यातून फारसं काही हाती पडत नाही. युद्धे वाईटच असतात त्यातून येणारा निष्कर्ष मानवतेला मागे नेणारा आणि विकासाला खीळ घालणारा येतो. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे पाकच्या तावडीत असलेले आपल्या वायूसेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान.