शंकर बाबाजी पाटील यांचा जन्म 8 ऑगस्ट 1926 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे झाला. तारदाळ, गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथे शिक्षण घेत त्यांनी बी.ए., बी.टी.पर्यंतचा अभ्यास केला आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत अध्यापन केले. पुढे 1957 मध्ये त्यांची आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नियुक्ती झाली. 1959 मध्ये एशिया फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामीण जीवनाचा अधिक जवळून अभ्यास केला; 1964 मध्ये प्रसिद्ध झालेली ‘टारफुला’ ही कादंबरी त्यातूनच आकाराला आली. राज्याच्या पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. शिक्षक, आकाशवाणीचा अधिकारी, साहित्यिक, पाठ्यपुस्तककार आणि ग्रामीण जीवनाचा बारकाईने अभ्यास करणारा लेखक असा त्यांचा जीवनप्रवास. त्यांच्या साहित्यिक सार्वजनिक आयुष्याची व्याप्ती मात्र मोठी होती. 1985 मध्ये नांदेड येथे झालेल्या 59 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
‘वळीव’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर ‘भेटीगाठी’, ‘आभाळ’, ‘धिंड’, ‘ऊन’, ‘वावरी शेंग’, ‘खुळ्याची चावडी’, ‘पाहुणी’, ‘फक्कड गोष्टी’, ‘खेळखंडोबा’, ‘ताजमहालमध्ये सरपंच’ असे संग्रह आले. ‘वळीव’पासून ‘ऊन’पर्यंतच्या त्यांच्या अनेक कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. हे केवळ लोकप्रियतेचे लक्षण नाही. त्या काळातील ग्रामीण जीवनाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नाची ही अधिकृत दखल होती. त्यांच्या कथांचे भारतीय आणि पाश्चात्त्य भाषांमध्ये अनुवादही झाले. शंकर पाटील यांच्या लेखनाचा एक विलक्षण विरोधाभास आहे, ज्यामुळे ते सर्वाधिक लोकप्रिय झाले, त्याच गोष्टीने काही प्रमाणात त्यांच्या साहित्यिक प्रतिमेला मर्यादाही घातली. त्यांचा विनोद लोकांच्या पसंतीस लगोलग उतरला! कथाकथनाच्या कार्यक्रमांत ते द. मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासोबत फिरले. त्यांच्या आवाजातील लय, ग्रामीण बोलीतील सहजता आणि प्रसंगातील विनोद यामुळे त्यांची कथा ऐकण्याचा अनुभव वेगळाच होता. पण या लोकप्रियतेमुळे ‘शंकर पाटील म्हणजे खुसखुशीत ग्रामीण विनोद’ अशी एक सोपी प्रतिमा तयार झाली. त्यांच्या ‘धिंड’, ‘भुजंग’, ‘वेणा’, ‘आभाळ’ यांसारख्या गंभीर आणि अस्वस्थ करणाऱ्या लेखनाकडे त्यामुळे तुलनेने कमी लक्ष गेले. अलीकडील समीक्षेत त्यांच्या विनोदी कथांपलीकडचा हा गंभीर लेखक पुन्हा दिसू लागलाय.
त्यांच्या चित्रपटप्रवासाची सुरुवात ‘वावटळ’पासून झाली. शांताराम गोविंद आठवले यांनी शंकर पाटील यांच्या कथेवर आधारित हा ग्रामीण चित्रपट केला. विशेष म्हणजे तो तमाशाप्रधान नव्हता. 1965 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि एकूण दहा पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला; मात्र आर्थिकदृष्ट्या तो यशस्वी ठरला नाही. ही बाब महत्त्वाची आहे, कारण त्या काळच्या मराठी सिनेमात ग्रामीण विषय म्हटला की तमाशा, लावणी, खलनायक पाटील आणि रंगतदार मनोरंजन अशी एक ठरलेली चौकट तयार होत होती. ‘वावटळ’ने त्या चौकटीबाहेर ग्रामीण वास्तवाकडे पाहण्याचा प्रयत्न केला. ‘वावटळ’कडे पाहताना त्याचे दुहेरी रूप लक्षात घ्यावे लागते. पुरस्कारांनी गौरवलेला पण पैसे कमावण्यात अयशस्वी झालेला ग्रामीण चित्रपट, अशी त्याची ओळख उरली. म्हणजे कलात्मक मूल्य आणि व्यावसायिक यश यांच्यातील ताण मराठी सिनेमात नवा नव्हता. आजच्या काळात स्वतंत्र किंवा आशयप्रधान चित्रपटांना भेडसावणारा प्रश्नच त्या वेळी दुसऱ्या स्वरूपात उपस्थित होता. प्रेक्षकाला परिचित मनोरंजन हवे असते; पण लेखकाला त्याच्या परिचयाच्या पलीकडे नेणारे जग दाखवायचे असते. ‘वावटळ’ या संघर्षाचे जुने उदाहरण आहे.
‘वावटळ’चे महत्त्व केवळ पुरस्कारांमध्ये नाही. ग्रामीण समाजातील जात, सत्ता, लैंगिक हिंसा आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली होणारा अन्याय यांना ते कथानकाच्या केंद्रात आणते. सीतासारख्या स्त्रीसमोर उभे राहणारे संकट हे केवळ वैयक्तिक नसते; त्यामागे पुरुषसत्ता, जमीनदारी वृत्ती आणि गावातील सामाजिक ताकदींची रचना असते. त्यामुळे पाटलांची ग्रामीण कथा नुसती ‘गावची गोष्ट’ राहत नाही. गाव हीच, सत्ता आणि नाते संबंधांची एक लहान सामाजिक प्रयोगशाळा बनते. ‘वावटळ’च्या कथानकात ही सामाजिक विषमता स्पष्टपणे दिसते. याच ठिकाणी शंकर पाटील यांच्या लेखनातील सामाजिक दृष्टिकोन लक्षात येतो. ते उपदेशक, प्रबोधनकार, लेखक नाहीत, ते गावातील अन्यायावर भाषण करत नाहीत. त्यांना माणूस जसा आहे तसा टिपण्यात अधिक रस आहे. एखादा पाटील वाईट आहे म्हणून तो गाव वाईट नाही; त्याच्या सत्तेची रचना, त्याची प्रतिष्ठा, त्याचा अहंकार, त्याच्या हातात असलेली सामाजिक ताकद आणि त्या ताकदीला गावाने दिलेली मान्यता या सगळ्यांतून त्याचे वर्तन तयार होते. म्हणून त्यांच्या कथेत खलनायकही सामाजिक परिस्थितीपासून वेगळा उभा राहत नाही. शंकर पाटील यांच्या चित्रपट लेखनाचा आवाका मात्र ‘वावटळ’पुरता मर्यादित नव्हता. ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘गणगौळण’, ‘भोळी भाबडी’, ‘चोरीचा मामला’ अशा चित्रपटांच्या पटकथा-संवादलेखनासाठी त्यांना शासकीय पुरस्कार मिळाले. ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पाहुणी’, ‘भुजंग’, ‘लक्ष्मी’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘डोंगरची मैना’, ‘छंद प्रीतीचा’ अशा चित्रपटांशीही त्यांचे लेखन जोडले गेले. या चित्रपटांसाठी त्यांची भूमिका कधी कथा, कधी पटकथा, तर कधी संवादलेखन अशी वेगवेगळी आहे. हा त्यांच्या चित्रपटलेखनाचा समृद्ध अक्षरपट होता!
याच दृष्टीने ‘टारफुला’ ही कादंबरी त्यांच्या साहित्याचा वेगळा आणि महत्त्वाचा टप्पा ठरते. यात एका गावातील पाटीलकीभोवती फिरणारे सत्ताकारण, बदलत्या सामाजिक परिस्थितीशी झगडणारे गाव आणि सत्तेच्या खुर्चीभोवती बदलणारी माणसे दिसतात. कादंबरीचा नायक एकच नाही. सत्ता बदलते त्यासरशी केंद्रस्थानी येणारी माणसंही बदलते. त्यामुळे ‘टारफुला’ला एका व्यक्तीची कथा म्हणण्यापेक्षा गावच्या सत्तासंबंधांची कथा म्हणणे अधिक योग्य ठरेल. ‘टारफुला’च्या निमित्ताने शंकर पाटील यांचा राजकीय दृष्टिकोन विशेष लक्षात घ्यावा लागतो. त्यांच्या राजकारणात मोठ्या सभागृहातील भाषणे नाहीत; ते ग्रामपातळीवरील राजकारण दाखवतात. पाटीलकी, प्रतिष्ठा, गुंडगिरी, जमिनीचे हितसंबंध, आपापसातील गटबाजी आणि माणसांना आपल्या बाजूला ओढण्याची धडपड या सगळ्यांतून सत्तेचे खरे स्वरूप दिसते. आजच्या काळात ग्रामपंचायत, स्थानिक निवडणुका, कंत्राटे, जातीय गटबाजी आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती यांचा विचार केला तर ‘टारफुला’मधील सत्ताकारण जुने असूनही पूर्णपणे कालबाह्य वाटत नाही. उलट, आजच्या ग्रामीण राजकारणाचे बीज त्या जगण्यात आधीच दिसते.
याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे व्ही. शांताराम यांची निर्मिती असलेला 1972 सालचा 'पिंजरा' चित्रपट! ह्या चित्रपटाची कथा अनंत माने यांची होती; पटकथा व्ही. शांताराम यांची आणि संवाद शंकर पाटील यांचे होते. श्रीराम लागू, संध्या आणि निळू फुले यांच्या मुख्य भूमिका होत्या. डॉ. श्रीराम लागू यांनी स्वतःच्या आठवणीत चित्रपटातील ग्रामीण बाज ‘शंकर पाटील थाटाची’ असल्याचे म्हटलेय हे विशेष. चित्रपटातील संवादांनी ग्रामीण समाजाची भाषा, नैतिकतेची ढोंगी चौकट, लैंगिक आकर्षण, शिक्षकाची मानसिक घसरण आणि तमाशाच्या जगाकडे पाहण्याची ग्रामीण दृष्टी पडद्यावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एका तत्त्वनिष्ठ शिक्षकाच्या नैतिक अधःपतनाची कथा म्हणून ‘पिंजरा’ प्रसिद्ध झाला; पण त्याच्या भाषिक आणि सामाजिक पोतामध्ये शंकर पाटील यांच्या लेखनाचा ठसा स्पष्ट जाणवतो. नैतिकता माणसाला वाचवते की माणूस आपल्या वासनांपासून आणि अहंकारापासून स्वतःला वाचवू शकत नाही, हा पिंजरा’चा मध्यवर्ती प्रश्न आहे. आदर्शवादी शिक्षक एका तमाशातील स्त्रीच्या आकर्षणात अडकतो आणि त्याच्या आदर्शवादाचा हळूहळू ऱ्हास होतो, ही केवळ लैंगिक आकर्षणाची कथा नाही. ‘मी इतरांपेक्षा अधिक नैतिक आहे’ या आत्मप्रतिमेच्या पतनाची ही कथा.
ह्यातील मास्तरची व्यक्तिरेखा म्हणूनच महत्त्वाची आहे. तो सुरुवातीला समाजसुधारक आहे. तो इतरांना नैतिकतेचे धडे देतो. पण स्वतःच्या विकार वासनांचे शमन करायची वेळ आल्यावर त्याची नैतिक चौकट तुटते. आजच्या काळातही ही व्यक्तिरेखा अनोळखी वाटत नाही. सोशल मीडियावर नैतिकतेचे भाषण देणाऱ्या आणि खासगी आयुष्यात त्याच्या उलट वागणाऱ्या व्यक्तींपर्यंत या व्यक्तिरेखेचा अर्थ वाढवता येतो. ‘पिंजरा’तील तमासगीर स्त्री हीसुद्धा केवळ मोहक स्त्री म्हणून पाहून चालत नाही. तिच्या व्यवसायाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी, तिच्या शरीरावर समाजाचा अधिकार समजण्याची वृत्ती आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाला नैतिकतेच्या एका चौकटीत बंद करण्याची पद्धत हा चित्रपट उघड करतो. मात्र आजच्या स्त्रीवादी दृष्टीकोनातून या चित्रपटाकडे पाहताना आणखी प्रश्न विचारावे लागतात. तमाशातील स्त्रीला स्वतःची इच्छा आणि स्वायत्तता कितपत दिली आहे? तिच्याकडे पुरुषाच्या नैतिक पतनाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘मोहिनी’पेक्षा अधिक म्हणून पाहिले जाते का? अशा प्रश्नांमुळे ‘पिंजरा’ची आजची चिकित्सा अधिक गंभीर होते.
'वावटळ'नंतरचा शंकर पाटील यांच्या चित्रपटलेखनातील आणखी एक टप्पा म्हणजे ‘केला इशारा जाता जाता’ हा सिनेमा. 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत माने यांनी केले आणि कथा, पटकथा व संवाद शंकर पाटील यांचे होते. अरुण सरनाईक आणि उषा चव्हाण या जोडीने साकारलेल्या चित्रपटाला अनंत माने यांच्या तमाशाप्रधान चित्रपटीय शैलीची जोड मिळाली. या चित्रपटाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणे सोपे आहे; पण त्यामध्ये शंकर पाटील यांच्या लेखनाची एक महत्त्वाची पद्धत दिसते. ग्रामीण जीवनातील ताण, नात्यांमधील संशय, प्रेम, लैंगिक आकर्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा यांना ते मोठ्या नैतिक भाषणात, उपदेशात परिवर्तित करत नाहीत. ते प्रसंगातून व्यक्त होऊ देतात. पात्र संवाद साधतात आणि त्यांच्या बोलण्यातून भवताल उलगडतो! म्हणूनच त्यांचे संवाद कथेला पुढे नेतानाच, पात्रांची सामाजिक ओळख निर्माण करतात.
‘चोरीचा मामला’ हा त्यांच्या चित्रपटलेखनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा. 1976 मध्ये त्यांना या चित्रपटासाठी महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट कथेसाठी पुरस्कार मिळाला, तसेच पटकथा संवादलेखनासाठीही त्यांचे नाव नोंदले गेले आहे. पाटलांचे ह्या सिनेमातील योगदान केवळ संवादातल्या विनोदापुरते नव्हते; कथानिर्मिती आणि पटकथा बांधणीमध्येही त्यांची स्वतंत्र ताकद होती. या काळातील शंकर पाटील यांचे महत्त्व असे की ते ग्रामीण जीवनाला सिनेमाच्या कॅनव्हासवर रेखाटण्यासाठी त्याचा स्थायीभाव बदलत नाहीत. त्यांच्या पात्रांना शहरातल्या प्रमाणभाषेत वदवून त्यांची ओळख पुसली जात नाही. भाषा ही त्यांच्यासाठी सजावट नव्हती! ‘युगे युगे मी वाट पाहिली’ हा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. 1965 च्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सी. विश्वनाथ यांनी केले; जयश्री गडकर, चंद्रकांत मांढरे, गजानन जागीरदार आदी कलाकार त्यात होते. सी. विश्वनाथ आणि शंकर पाटील यांनी एकत्रित रित्या याचे लेखने केले होते. या चित्रपटाच्या उत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाबद्दल शंकर पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर मिळाला.
‘भोळीभाबडी’ हा शंकर पाटील यांच्या चित्रपटलेखनातील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. 1973 च्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले. घर आणि जागा मिळवण्याच्या आकर्षक जाहिरातींना भुलून सामान्य लोकांनी आयुष्यभराची कमाई गमावल्याच्या घटनांमधून चित्रपटाचा धागा घेतला गेला. विशेष म्हणजे नायक पारंपरिक अर्थाने सद्गुणी नाही; तो स्वार्थी आहे आणि पत्नीशीही स्वार्थीपणे वागतो. चित्रपटाने त्यामुळे प्रचारकी सामाजिक संदेश देण्याऐवजी दोषपूर्ण माणसाला केंद्रस्थानी ठेवले. ही गोष्ट शंकर पाटील यांच्या मानसिक दृष्टिकोनासाठी महत्त्वाची आहे. त्यांनी माणूस चांगला किंवा वाईट अशा दोन चौकटींत बंद केला नाही. स्वार्थी माणूसही प्रेम करू शकतो. चांगला माणूसही कुणाचा तरी गैरफायदा घेऊ शकतो. आदर्शवादी माणूस परिस्थितीत बदलू शकतो. ग्रामीण समाजातली माणसे असोत किंवा नागरी समाजातील, त्यांच्या मनाचे पदर उलगडण्यात पाटील यांची ताकद होती. त्यांच्या कुटुंबव्यवस्थेत माणसे केवळ प्रेमाने जोडलेली नसतात; आर्थिक गरज, प्रतिष्ठा, जमीन, लैंगिक आकर्षण, संशय, अधिकार आणि सामाजिक दबाव यांच्या अनेक धाग्यांनी ती एकमेकांना बांधलेली असतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबचित्रण गोड, आदर्श आणि सुरक्षित घराचे चित्रण नसते. घराच्या चार भिंतींच्या आतही समाजातील सत्ता चालू असते.आजच्या काळात ‘भोळीभाबडी’कडे पाहताना त्यातील घर-जागेच्या फसवणुकीचा संदर्भ अधिक व्यापक करता येतो. त्या काळात घराच्या जाहिराती आणि विकासाच्या आश्वासनांनी लोकांना भुरळ घातली; आज रिअल इस्टेट, ऑनलाइन गुंतवणूक, बनावट योजना, कर्ज आणि डिजिटल फसवणूक यांच्या माध्यमातून तोच मोह वेगळ्या रूपात दिसतो. माणसाच्या ‘आपले घर असावे’ या स्वप्नाचा फायदा घेणारी बाजारव्यवस्था बदलली आहे; स्वप्न मात्र तेच आहे.
शंकर पाटील यांच्या चित्रपट लेखनाचा सर्वाधिक गाजलेला अध्याय म्हणजे ‘एक गाव बारा भानगडी!' 1968 मध्ये आलेला हा चित्रपट अनंत माने यांनी दिग्दर्शित केला होता. शंकर पाटील यांची कथा आणि पटकथा होती. अमृत गोरे यांचेही लेखनात योगदान होते. जयश्री गडकर, अरुण सरनाईक, निळू फुले आणि इतर कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. ह्या चित्रपटाचे शीर्षकच त्याच्या परिघाचे प्रतिबिंब आहे. एक गाव आणि त्यातल्या बारा भानगडी. पण या भानगडी फक्त विनोदी नाहीत. गाव ही एक छोटी राजकीय व्यवस्था आहे. तिथे गट आहेत, हितसंबंध आहेत, प्रतिष्ठा आहे, अफवा आहेत, मतभेद आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये स्वतःचा फायदा पाहणारी माणसे आहेत. ग्रामपंचायत हा केवळ प्रशासकीय संस्थेचा भाग नसून गावच्या सत्तेचा केंद्रबिंदू बनतो. चित्रपटात ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा संदर्भही आहे. ‘एक गाव बारा भानगडी’चे सर्वात मोठे यश म्हणजे राजकारणाला गंभीर चेहरा देण्याऐवजी त्याला गावच्या व्यवहारात मिसळून दाखवणे. गावातील राजकारण सभागृहात होत नाही; ते चहाच्या टपरीजवळ, पारावर, घराच्या ओसरीवर, लग्नसमारंभात आणि एकमेकांच्या कानात होते. कोण कोणाच्या बाजूने आहे, कोण कोणाला भिडवू शकतो, कोणाचा फायदा कोणाला होतो, हेच गावचे राजकारण.
ह्यातला, निळू फुले यांनी साकारलेला 'झेलेअण्णा' कायम स्मरणात कायम राहतो. फुले यांनी नंतर सांगितलेल्या आठवणीत, झेलेअण्णा हा गावात भांडणे लावणारा, लोकांना परस्परांशी झुंजवत ठेवणारा आणि कानडी वळणाची भाषा बोलणारा पात्र म्हणून वर्णिला आहे. शंकर पाटील यांनी कानडी लेहजासह ती बोली त्यांना शिकवली होती. इथे लेखक आणि अभिनेता यांचा संबंध किती महत्त्वाचा आहे हे दिसते. ग्रामीण बोली ही केवळ उच्चारांची गोष्ट नाही. बोली बदलली की पात्राचे सामाजिक स्थान बदलते. झेलेअण्णाचा आवाज, त्याची संवादफेक त्याच्या व्यक्तिरेखेचा जीव आहे. म्हणूनच शंकर पाटील यांची भाषा सिनेमात केवळ संवाद म्हणून अस्तित्वात न राहता ती व्यक्तिरेखेची ओळख बनते. आज ‘एक गाव बारा भानगडी’ पुन्हा पाहिला तर काही गोष्टी कालबाह्य वाटतील. आजघडीला राजकारणाची साधने बदलली आहेत. ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोबाईल आला आहे, सोशल मीडिया आला आहे, पक्षीय राजकारण अधिक संघटित झाले आहे. पण माणसांना एकमेकांविरुद्ध उभे करून स्वतःचा फायदा करून घेणारा झेलेअण्णा हा स्वभाव आजही अनोळखी नाही. फरक एवढाच की आजच्या झेलेअण्णाच्या हातात कदाचित मोबाईल आहे! यामुळेच शंकर पाटील यांचे ग्रामीण राजकारण आजच्या राजकीय सिनेमाशी जोडता येते. पुढे ‘सामना’, ‘सिंहासन’सारख्या चित्रपटांनी महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वास्तवाकडे अधिक थेट आणि गंभीरपणे पाहिले; पण स्थानिक सत्तासंबंध, गावातील गटबाजी आणि राजकीय स्वार्थ यांचे विनोदी रूप ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये आधीच दिसले होते. 1960 नंतरच्या मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण समस्यांना आणि स्थानिक सामाजिक वास्तवाला वाढती जागा मिळाली होती.
‘पाहुणी’ हा शंकर पाटील यांच्या चित्रपटसंबंधातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘पाहुणी’चा उल्लेख आहे आणि शंकर पाटील यांच्या कथा-पटकथा-संवादलेखनाच्या चित्रपटांमध्येही त्याचा समावेश केला जातो. स्त्रीच्या नात्याची विविध रूपे त्यांनी यात शब्दबद्ध केली होती. ग्रामीण समाजात पाहुणा म्हणजे केवळ घरात आलेला माणूस नसतो. तो घराची प्रतिष्ठा, आर्थिक क्षमता, आपलेपणा आणि सामाजिक संबंध तपासणारा प्रसंग असतो. कोणाला किती मान द्यायचा, कोणासाठी काय खर्च करायचा, कोण आपला आणि कोण परका, या छोट्या व्यवहारांमधून कुटुंब आणि समाजाचे स्वरूप उलगडते. पाटलांच्या लेखनात अशा छोट्या प्रसंगांना सामाजिक छटा आहेत!
‘भुजंग’चा विचार करताना मात्र एक वेगळेच शंकर पाटील समोर येतात. ‘भुजंग’ ही त्यांच्या गंभीर कथांपैकी एक म्हणून साहित्यिक अभ्यासात उद्धृत केली जाते. लोकजीवन, लोकविश्वास आणि ग्रामीण मानसिकता यांच्या संदर्भातही तिचा अभ्यास झाला आहे. ‘भुजंग’च्या कथेकडे साहित्यिक दृष्टीने पाहणे अधिक उचित ठरते. पाटलांच्या कथांमध्ये लोकविश्वास म्हणजे अंधश्रद्धेची साधी नोंद नसते. तो माणसाच्या मानसिकतेचा भाग असतो. जे समजत नाही त्याला अर्थ देण्यासाठी माणूस कथा तयार करतो. निसर्ग, साप, मृत्यू, रोग, अपशकुन, देवधर्म, या सगळ्या घटकांमध्ये ग्रामीण मन स्वतःची सुरक्षितता शोधते. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळातही अफवा, अंधविश्वास आणि भीतीचे सामाजिक राजकारण संपलेले नाही. माध्यमे बदलली आहेत; मनुष्याच्या भीतीची रचना तितकी बदललेली नाही. शंकर पाटील यांनी ह्या गोष्टी तेव्हाही अधोरेखित केल्या होत्या.
शंकर पाटील यांच्या लेखनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे भूगोल. त्यांच्या गावाला पत्ता नसला तरी प्रदेश असतो. त्यांचे गाव म्हणजे हिरवी शेते, बैलगाड्या आणि झाडांनी भरलेला सुंदर ग्रामीण प्रदेश नाही. मातीचा रंग, पाण्याची कमतरता, शेताचा आकार, जनावरांचे व्यवहार, गावचा पार, पाणवठा, शेताच्या वाटा, जत्रा, देव, पाटीलकी, बाजार, बैलगाड्या, घरांच्या रचना आणि बोलीतील शब्द यांमधून तो प्रदेश उभा राहतो. त्या भूगोलाला सत्ता आहे. त्यात पाणवठा आहे, जमीन आहे, देवळाभोवतीचा सामाजिक व्यवहार आहे, पाटील आहे, शेतकरी आहे, मजूर आहे, स्त्री आहे, गावातील प्रतिष्ठा आहे. मराठी विद्यापीठीय अभ्याससामग्रीतही त्यांच्या ग्रामीण लेखनात निसर्ग, माणसे, रूढी, परंपरा, संस्कृती, समाजकारण आणि राजकारण यांचे वास्तव चित्रण असल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या लेखनातील ग्रामीण परिसर, ग्रामीण वातावरण, ग्रामीण माणसे आणि त्यांची भाषा यांना त्यांच्या ग्राम्य प्रतिकांचे प्रमुख आधार मानले गेलेय. हीच गोष्ट त्यांच्या सिनेमाला वेगळेपण देते. त्यांच्या कथांचे पडद्यावर रूपांतर करताना केवळ कथा घेतली तरी चालत नाही; त्या कथेचा भूगोल घ्यावा लागतो. गाव बदलले तर माणूसही बदलतो. शहरातील माणसाचा संकोच, गावातील माणसाची सामाजिक नजर, शेतकऱ्याच्या जगण्यातील ऋतू, स्त्रीच्या हालचालींवर असलेली गावाची नजर, या सगळ्याशिवाय शंकर पाटील समजत नाहीत. म्हणून त्यांच्या साहित्याचे खरे सिनेमॅटीक रूपांतर हे केवळ कथानकाचे रूपांतर नसून एका संपूर्ण सामाजिक वातावरणाचे रूपांतर असते. त्यांचे चित्रपट म्हणजे, शेतीमातीच्या आणि गावाकडल्या माणूसपणाच्या सिनेमॅटीक गोष्टी आहेत! त्यांच्या लेखनातील भूगोल हा या सगळ्याचा पाया आहे. म्हणूनच त्यांच्या कथेत भूगोल ही नाममात्र पार्श्वभूमी नसते; तो पात्रांच्या वर्तनाचा भाग असतो. शहरात राहणारा माणूस आणि गावात राहणारा माणूस वेगळा का वागतो? कारण त्यांच्यावरची सामाजिक नजर वेगळी असते. गावात प्रत्येकाच्या आयुष्यावर अनेक डोळे असतात. कोणाच्या घरात कोण आले, कोणाशी कोण बोलले, कोणाचा मुलगा कुठे गेला, कोणाच्या शेतात किती पिकले, ह्या सर्व गोष्टी सार्वजनिक असतात. या सार्वजनिक नजरेमुळेच खासगी जीवनाची सीमा संकुचित होते. शंकर पाटील यांच्या कथांतील कौटुंबिक संघर्ष समजून घेण्यासाठी हा सामाजिक भूगोल फार महत्त्वाचा आहे.
शंकर पाटील यांच्या सिनेमाशी संबंधित असलेल्या साहित्याची आज चिकित्सा करताना ‘ग्रामीण साहित्य’ ही संज्ञाही नव्याने तपासावी लागते. पूर्वी ग्रामीण साहित्य म्हणजे शहराबाहेरचे जीवन असे सहज मानले जात असे. आज मात्र ग्रामीण समाज हा जात, जमीन, बाजार, स्थलांतर, मोबाईल, राजकारण, सरकारी योजना, शिक्षण आणि माध्यमे यांच्या गुंत्यात जगतो. अशा वेळी पाटील यांच्या सिनेमातल्या कथा आपल्याला आधुनिक ग्रामीण जीवनाचे थेट चित्र देत नसल्या तरी ग्रामीण समाजाच्या मूलभूत रचनेची मुळे दाखवतात. सत्ता कशी तयार होते, प्रतिष्ठा कशी टिकवली जाते, स्त्रीवर नियंत्रण कसे ठेवले जाते, गरीब माणूस विनोदाने आपले दुःख कसे झाकतो आणि गावातील सामूहिक मत व्यक्तीच्या आयुष्यावर कसे राज्य करते, हे त्यांच्या कथांमधून आजही समजते.
इथे त्यांची तुलना व्यंकटेश माडगूळकरांशी करणे अपरिहार्य आहे. माडगूळकरांच्या लेखनात माणदेशाचे जग अधिक शांत, निरीक्षणशील आणि अनेकदा करुण भासते. शंकर पाटील यांच्याकडे त्याच ग्रामीण जगण्याची दुसरी बाजू आहे—विसंगती, बोलण्याची ढब, सामाजिक खेळ आणि विनोद. द. मा. मिरासदारांच्या तुलनेतही फरक जाणवतो. मिरासदारांचा विनोद अनेकदा प्रसंगाच्या गंमतीतून उफाळतो; शंकर पाटील यांच्या विनोदामागे अनेकदा सामाजिक विसंगती असते. हसू येते आणि त्याच वेळी त्या हसण्यामागे कुणाचे तरी दुःख आहे हे लक्षात येते.
आजच्या मराठी सिनेमाच्या संदर्भात शंकर पाटील यांच्याकडे पाहताना आणखी एक गोष्ट जाणवते. त्यांच्या काळात ग्रामीण सिनेमा म्हणजे बहुधा तमाशा, लावणी, विनोद किंवा कुटुंबकहाणी यांच्याभोवती फिरणारा सिनेमा अशी चौकट होती. 1970 च्या दशकानंतर ‘सामना’, ‘सिंहासन’ यांसारख्या चित्रपटांनी सामाजिक-राजकीय प्रश्नांशी थेट सामना करण्यास सुरुवात केली. पुढे ‘श्वास’, ‘नटरंग’, ‘जोगवा’, ‘दिठी’ अशा चित्रपटांनी साहित्य, समाज आणि वास्तव यांचा संबंध नव्या पद्धतीने मांडला. या नव्या चित्रपटांच्या परिप्रेक्ष्यात शंकर पाटील यांच्या लेखनाकडे पाहिल्यास ते अधिक महत्त्वाचे वाटते. त्यांनी आधुनिक चित्रपटाच्या भाषेत सिस्टम, आयडेंटिटी, जेंडर, पॉलिटिक्स, अशी शब्दावली वापरली नाही; पण त्या प्रश्नांचे जीवन त्यांच्या कथांमध्ये आधीपासून होते. आजचा सिनेमा जेव्हा ग्रामीण राजकारण, जात, स्त्रीची असुरक्षितता किंवा आर्थिक विषमता थेट मांडतो, तेव्हा शंकर पाटील यांची कथा आपल्याला त्या प्रश्नांच्या आधीच्या सामाजिक अवस्थेकडे घेऊन जाते.
त्यांच्या कथांमधील स्त्री म्हणजे केवळ पुरुषाच्या कथेला पुढे नेणारे पात्र अशा तकलादू स्वरूपात कधीच साकारलेले नाही. ग्रामीण समाजातील स्त्रीचे जग त्यांनी तिच्या शरीराशी, तिच्या प्रतिष्ठेशी, तिच्या कामाशी आणि तिच्या मनाशी जोडून पाहिले. ‘वावटळ’मधील सीता असो किंवा त्यांच्या अनेक कथांतील घरात अडकलेल्या स्त्रिया असोत, त्यांच्या लेखनात स्त्रीवर सामाजिक नियंत्रण कसे काम करते याची जाणीव दिसते. त्यांच्या अनेक कथांमध्ये स्त्री ही घर, प्रतिष्ठा, लैंगिकता आणि सामाजिक संबंधांच्या केंद्रस्थानी असते. पण आजच्या स्त्रीवादी साहित्याच्या तुलनेत त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखांमध्ये मर्यादा दिसतात. अनेकदा स्त्रीची कथा पुरुषांच्या सामाजिक वर्तनाशी जोडलेली राहते. तिच्या अंतर्मनाचा स्वतंत्र आवाज सर्वत्र समान ताकदीने उमटत नाही. ही मर्यादा नोंदवणे आवश्यक आहे; कारण साहित्यिक पुनर्मूल्यांकन म्हणजे केवळ गौरव करणे नव्हे. मात्र आजच्या स्त्रीवादी वाचनातून त्यांच्या लेखनाकडे पाहताना एक प्रश्नही विचारावा लागतो, स्त्रीला त्यांनी स्वतःचा आवाज किती दिला आणि किती वेळा तिच्याकडे पुरुषप्रधान ग्रामीण समाजाच्या नजरेतून पाहिले? ही चिकित्सा त्यांच्या साहित्याला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर आजच्या काळात त्याचे मूल्यमापन करण्यासाठी उचित आहे.
मात्र आजच्या निकषांवर त्यांच्या चित्रपटीय लेखनातील काही दोष तटस्थतेने अभ्यासावे लागतात. त्यांच्या ग्रामीण कथाविश्वात जातिव्यवस्थेची खोल रचना कथानकाच्या विनोदात मोठ्या प्रमाणात विरघळून जाते. स्त्रीच्या अनुभवाकडे पाहण्याची दृष्टीही आजच्या स्त्रीवादी लेखनाइतकी स्वतंत्र नाही. ग्रामीण जीवनाचे चित्रण अस्सल असले तरी त्या अस्सलतेतून उपेक्षितांच्या राजकीय आवाजाला नेहमीच मध्यवर्ती स्थान मिळते असे नाही. त्याचप्रमाणे जातव्यवस्थेकडे पाहण्याची त्यांची दृष्टीही आजच्या दलित साहित्याच्या प्रकाशात तपासावी लागते. दलित साहित्याने ग्रामीण समाजातील जात-अन्यायाचे जे उघडे, अस्वस्थ करणारे चित्र पुढे आणले, त्याच्या तुलनेत शंकर पाटील यांचे ग्रामीण जग काही वेळा अधिक सर्वसमावेशक दिसते; पण त्या सर्वसमावेशकतेत विषमतेची धार बोथट होण्याचा धोका असतो. ग्रामीण समाजाचे वास्तव चित्रण करताना जातीय संबंध अपरिहार्य आहेत. पण पाटलांच्या कथेत ते नेहमीच दलित लेखकांच्या आत्मानुभवाइतक्या तीव्रतेने पुढे येत नाहीत. त्यांच्या ग्रामीण जगात जात आहे; पण तिचे राजकीय उघडेपण नंतरच्या दलित साहित्याइतके केंद्रस्थानी नाही. त्यामुळे शंकर पाटील आणि अण्णाभाऊ साठे, बाबुराव बागुल, शरणकुमार लिंबाळे यांसारख्या वेगळ्या सामाजिक अनुभवातून लिहिणाऱ्या लेखकांची तुलना करताना फरक अधिक स्पष्ट होतो. याचा अर्थ शंकर पाटील, टोकदार सामाजिक मांडणी करणारे लेखक नव्हते असा नाही. उलट, ते ग्रामीण समाजाच्या दैनंदिन राजकारणाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करतात. पण त्यांचा दृष्टिकोन अनेकदा निरीक्षकाचा आहे; आतून जळणाऱ्या दाहक अनुभवाचा नाही. ही त्यांची ताकदही आहे आणि मर्यादाही. त्यांच्या लेखनाच्या सद्यकालीन मांडणीतली ही एक महत्त्वाची चिकित्सा आहे.
त्याच वेळी त्यांच्या चित्रपटीय लेखनाला केवळ ‘जुन्या ग्रामीण महाराष्ट्राची आठवण’ म्हणून चौकटबद्ध ठेवणे हा त्याहून मोठा अन्याय ठरेल. कारण त्यांच्या कथेतला माणूस अजूनही आपल्या आसपास आहे. सत्ता बदलली आहे; तिची साधने बदलली आहेत. बैलगाडीच्या जागी ट्रॅक्टर आले, पारावरच्या चर्चेच्या जागी मोबाईलच्या गप्पा आल्या, ग्रामपंचायतीच्या राजकारणाला सोशल मीडियाचा रंग आला; पण प्रतिष्ठेची हाव, जमिनीचा प्रश्न, घरातील सत्ता, स्त्रीवरचा सामाजिक दबाव आणि आपल्या माणसांमध्ये आपलेपण शोधण्याची धडपड अजून तिथेच आहे. शंकर पाटील यांचे मोठेपण या ठिकाणी दिसून येते. त्यांनी ग्रामीण जीवनाला केवळ एका रंगात रंगवले नाही. त्यांचे चित्रण केवळ विनोदी अथवा केवळ करुण देखील नव्हते, निव्वळ रम्य वाटावे असेही गुणलक्षण त्यात नव्हते! त्यांनी तत्कालीन ग्रामीण जीवनावर विनोदी कटाक्ष टाकतानाच त्या आडच्या खोल जखमाही उघड्या केल्या! त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गावातली माणसे चांगली किंवा वाईट अशा दोन कप्प्यांत कधीच विभागली नाहीत. परिस्थिती त्यांना कधी विनोदी बनवते, कधी क्रूर, कधी लाचार, कधी धाडसी. म्हणूनच त्यांच्या कथांचा खरा विषय गाव नसून गावाच्या रूपाने दिसणारा माणूस आहे. चित्रपटांच्या बाबतीतही त्यांचे योगदान याच कारणाने महत्त्वाचे ठरते. त्यांनी साहित्य आणि सिनेमा यांच्यामधली दरी कमी केली. ग्रामीण बोली पडद्यावर आणली, संवादांना स्थानिक लय दिली, पात्रांच्या संवादातून त्यांच्या सामाजिक वर्गाची जाणीव ठळक केली आणि ग्रामीण कथानकाला सिनेमाच्या गतीशी जुळवून घेतले. ‘वावटळ’पासून ‘चोरीचा मामला’, ‘भोळी भाबडी’, ‘पाहुणी’, ‘एक गाव बारा भानगडी’ आणि ‘पिंजरा’पर्यंतचा त्यांचा चित्रपटसंबंध पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते, ते फक्त चौकटबद्ध टाईपचे कथालेखक नव्हते; दृश्यमान होणारी चित्रलिपीची भाषा लिहिणारे लेखक, असा सार्थ उल्लेख केला जातो.
आज त्यांच्या साहित्याकडे पुन्हा वळण्याची गरज आहे, ती नॉस्टॅल्जियासाठी नव्हे. ग्रामीण महाराष्ट्र बदलून गेला आहे की नाही, यापेक्षा त्या बदलामागची माणसे किती बदलली आहेत, हा प्रश्न त्यांच्या कथा विचारतात. ‘टारफुला’तील सत्ता, ‘वळीव’मधील माणुसकी, ‘धिंड’मधील अस्वस्थता, ‘भुजंग’सारख्या कथांतील काळोख आणि ‘ताजमहालमध्ये सरपंच’मधील विनोद हे एकाच लेखकाच्या लेखणीतून आले आहेत, हे लक्षात घेतले की शंकर पाटील यांची खरी व्याप्ती समोर येते. त्यांच्या लेखनाचे एकाच रंगात केलेले वर्गीकरण मग टिकत नाही. शंकर पाटील यांच्या जन्माला 2026 मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत असताना त्याचे मूल्यमापन विशेष अर्थपूर्ण ठरते. अलीकडील लेखनातही त्यांच्या ‘गारवेल’सारख्या संग्रहातील विनोदी, गंभीर आणि अस्वस्थ करणाऱ्या कथांचे अनेक पदर पुन्हा अधोरेखित केले गेले आहेत. शंभर वर्षांनंतर एखाद्या लेखकाची खरी कसोटी ही त्याचे नाव किती वेळा घेतले जाते यावर नसते; त्याच्या मांडणीकडे आपण आणखी किती दृष्टीकोनातून पाहू शकतो यावर अवलंबून असते. त्या कसोटीवर शंकर पाटील आजही जिवंत आहेत!
आजच्या मराठी सिनेमाच्या परिप्रेक्ष्यात शंकर पाटील यांना कुठे ठेवायचे, या प्रश्नाचे उत्तर, ग्रामीण सिनेमाचे जुन्या पिढीतील नावाजलेले लेखक, एवढे सोपे नाही. आजचा मराठी सिनेमा ग्रामीण महाराष्ट्राकडे अधिक कठोर नजरेने पाहतो. जात, शेतकरी, स्थलांतर, दारिद्र्य, स्त्री, पाणी, राजकारण, बेरोजगारी, शिक्षण, बाजारव्यवस्था अशा विषयांवर चित्रपट येतात. पण या आधुनिक विषयांच्या मुळाशी गेले तर शंकर पाटील यांच्या लेखनात त्या समाजाची जुनी मानसिक रचना सापडते. फरक एवढाच की आजचा ग्रामीण सिनेमा अनेकदा व्यक्तीच्या दुःखातून व्यवस्था दाखवतो; शंकर पाटील व्यक्तीच्या वर्तनातून व्यवस्था दाखवतात. व्यवस्था माणसाला कशी वाकवते, हे आजचा लेखक दाखवतो. शंकर पाटील दाखवून देतात की, व्यवस्था अशीच आहे, पण त्या व्यवस्थेतही माणूस स्वतःचा फायदा शोधतो! हा फरक महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याची सद्यकालीन मानके वापरून समीक्षा करताना ‘वास्तववाद’ या शब्दाचा अर्थ बदलावा लागतो. त्यांच्या कथांमध्ये, आजच्या ग्रामीण जीवनाचे तंतोतंत प्रतिबिंब नसले तरी ग्रामीण समाजाच्या स्वभावाचे जुने नकाशे त्यात कोरलेले आहेत. त्या नकाशावरून आजचा भूगोल तंतोतंत सापडणार नाही; पण कुठे नदी होती, कुठे गावची वाट होती, कुठे सत्ता होती आणि कुठे भीती होती याचा अंदाज येतो.
त्यांच्या कथा वाचताना नजरेसमोर गाव तरळते; चित्रपट पाहताना ते गाव आपल्या मनात साद घालू लागते! त्यातल्याच एखाद्या पात्राचा संवाद ऐकताना त्यामागोमाग त्याची जात, घर, जमीन, प्रतिष्ठा, भूक आणि भीती दिसू लागते. आणि कथा संपल्यानंतर, हसू ओसरल्यावर लक्षात येते की, आपण ज्या माणसावर हसलो, तो माणूस आपल्यापासून फार दूर नाही. शंकर पाटील यांचा खरा सिनेमा पडद्यावर संपत नाही, पुढे जाऊन तो माणसाच्या मनात चालू राहतो. म्हणूनच त्यांच्या चित्रपटांकडे आज पुन्हा पाहताना, आपण केवळ जुन्या मराठी सिनेमाची पाने उलटत नाहीत तर आपल्या समाजाचा जुना आरसा जणू आपण हाती घेतो. त्या आरशावर काळाची धूळ आहे, काही प्रतिमा आता बदलल्या आहेत, काही चेहरे ओळखू येत नाहीत; पण आरशातला माणूस अजूनही आपल्याच परिघातला आहे. आणि कदाचित शंकर पाटील यांच्या साहित्याची हीच सर्वात मोठी जमेची बाजू आहे, त्यांनी गाव लिहिले, पण त्यांचा विषय माणूस होता; त्यांनी विनोद लिहिला, पण त्याच्या तळाशी विसंगती होती; त्यांनी चित्रपटासाठी संवाद लिहिले, पण त्या संवादांच्या मागे संपूर्ण समाजाचा आवाज ध्वनित होता. त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला केवळ मराठी साहित्यात आणले नाही; त्यांनी त्या माणसाला आपल्या स्वतःच्या विसंगतींसह आपल्यासमोर उभे केले. म्हणूनच त्यांना पुन्हा वाचणे म्हणजे जुन्या गावात परत जाणे नव्हे; तर आपल्या वर्तमानाकडे थोडे अधिक बारकाईने पाहणे होय. त्यांचे सिनेमे नव्याने पाहणे म्हणजे, शेतीमातीची आणि माणूसपणाची सिनेमॅटीक जुनी गोष्ट पुन्हा पुन्हा अनुभवणे! हा अमृतानुभव आवडणार नाही असा मराठी सिनेरसिक दुर्मीळ होय!
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा