शनिवार, २१ मार्च, २०२०

करोना व्हायरसवर मात करणारं प्रेम - टफर दॅन द रेस्ट


काल रात्री रशिया टुडे (RT) वाहिनी पाहत असताना करोना व्हायरसच्या जागतिक विध्वंसाच्या बातम्यांची मालिका सुरु होती. मात्र त्यात आपल्याकडील 'टॉप फिफ्टी बातम्या सुपरफास्ट' असा भडक मामला नव्हता. एका बातमीपाशी वृत्तनिवेदिकेने आवंढा गिळल्याचे स्पष्ट जाणवले. बातमी इटलीच्या करोनाबाधितांच्या मृत्यूची होती. ब्रिटिश, स्पॅनिश सरकारांनी देखील इटलीप्रमाणेच मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची त्यांच्या नातलगांशी अखेरची भेट स्काईपद्वारेच करून दिली जावी, त्यांना इस्पितळात येण्यास सक्त मनाई करावी असा नियम जारी केल्याची ती बातमी होती.

शनिवार, ७ मार्च, २०२०

लाहोरच्या हिरा मंडीची समृद्धी

एकविसाव्या शतकात आपल्या देशभरात मुजरानृत्य क्षेत्रातल्या मुली डान्सबार कल्चरमध्ये गेल्या. डान्सबार बंद झाल्यानंतर त्यांचे शोषणच झाले. मुंबईच्या ग्रांट रोडवरील केनेडी ब्रिजजवळील जुन्या काँग्रेस हाऊसमध्ये अनेकांनी आपला बाजार मांडला. आजघडीला आपल्या देशात फक्त आग्रा शहरातच मुजरा शिकवला जातो. मात्र इस २००० पर्यंत आताच्या बंगालमध्ये बनारसी तवायफ आपलं अस्तित्व टिकवून होत्या. आता चोबीस परगणा, बार्दवान, बांकुरा, वीरभूम या जिल्ह्यात पेरिफेरल भागात काही कोठे अजूनही अस्तित्वात आहेत. इतरत्र सांगायचे झाल्यास बनारसच्या शिवदासपूरमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. अन्यत्र त्यांची संख्या नगण्य आहे. अलीकडे हिंदी सिनेमातही मुजरानृत्ये घटत चालली आहेत. कदाचित लोकांना त्यात पूर्वीसारखी रुची राहिली नसावी. डिजिटल युगात करमणुकीच्या व्याख्या वेगाने बदलत चालल्याचा हा परिणाम असू शकतो. एका अर्थाने हे बरे आहे कारण यातून स्त्रियांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि शारीरिक शोषणही व्हायचे, तसेच याच्या आहारी गेलेल्या अनेकांचे संसारही उद्धवस्त झाले. ज्या मुजरा नार्तिकांकडे अन्य काही कौशल्य नव्हते त्यांच्यावर मात्र या मरगळीपायी कुऱ्हाड कोसळली. पैकी उपजीविकेचे साधन नसल्याने त्यातल्या अनेकींनी देहविक्रयाचा मार्ग नाईलाजाने निवडला. अलीकडील काळात इंटरनेटसह अन्य अनेक कारणामुळे व मनोरंजनाच्या बदलत्या व्याख्यांमुळे आपल्याकडे तमाशा कलावंतांची जशी उपासमार होऊ लागलीय आणि त्यांच्याकडे छुप्या देहविक्रयाच्या वासनेने पाहिले जाऊ लागलेय तसेच काहीसे मुजरा कलावंतांच्या अखेरीस घडले होते.

सोमवार, २ मार्च, २०२०

मुजरानर्तिका ते तवायफ...



लखनौ आणि बनारस ही मुजरा कलावंतांची दोन प्रमुख केंद्रे होती. पैकी बनारसमधल्या अदाकारा गंगेकाठची एकेक नगरे पार करत कोलकत्यात जाऊन वसल्या. या बायकांकडे जाणं म्हणजे खूप मोठं लांच्छन समजले जाई. त्यामुळे मोठमोठे आमीरजादे इच्छा असूनही त्यांच्या दारी जात नसत पण छुप्या पद्धतीने त्यांच्या मैफली आपल्या इलाख्यात भरवत, त्याचा आनंद घेत. बऱ्याचदा एखाद्या धनिकास पसंत पडलेल्या कोठेवालीस तो अंगवस्त्र समजून ठेवून घेई, तिची उमर ढळेपर्यंत तिची देखभाल करे. पण सर्वच ठिकाणी असे होत नसे, अनेकदा त्यांना वापरून टाकून दिले जाई. मात्र गायकीवर, नृत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीसौंदर्याच्या रसिकांनी यांना भरभरून प्रेम दिले. अनेक दशके हीच परिस्थिती होती. लखनौच्या नवाबपदी आलेल्या शुजाउद्दौलाने हे चित्र पालटले. हा शुजाउद्दौला मराठ्यांच्या इतिहासातही आढळतो. अहमदशहा अब्दालीच्या खांद्याला खांदा लावून त्याने पानिपतमध्ये मराठ्यांचा दुर्दैवी पराभव केला होता. याच शुजाचा इंग्रजांनी बक्सरच्या लढाईत १७६४ मध्ये दारूण पराभव केला होता. या लढाईने इंग्रजांचा पाया बळकट झाला होता. हा शुजाउद्दौला एका वेगळ्या कारणाने लखनवी इतिहासात प्रसिद्ध झाला, तो इतिहास म्हणजे त्याचा बायकांचा शौक ! हा माणूस कमालीचा शौकीन होता, त्याचा हा शौक कित्येकदा पिसाटासारखा असे. हा पहिला नवाब होता ज्याने महालात मजा घेण्याऐवजी कोठेवाल्या बायकांच्या कोठ्यावर जाऊन बसून मैफली लुटल्या आणि शीलही लुटले, पण बदल्यात अफाट दौलतजादा केली !

मणिकर्णिकेच्या घाटावरच्या स्मृती...


गंगेच्या काठी असलेल्या मणिकर्णिकेच्या घाटावरती मृतदेहांवर अंतिम संस्कार करताना त्यांच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मानेवर ठोकतात. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मस्तिष्कात कोणत्याही आठवणी राहू नयेत. त्याचे माइंड ब्लॅन्क राहिलं की त्याचा अंतिम प्रवास कमी यातनादायी होईल असं त्यांना सुचवायचं असतं. तर काहींना भीती वाटते की मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा भटकू नये, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये याकरिता त्याच्या स्मृती पुसलेल्या बऱ्या ! खरं तर देह अचेतन झाला की सगळं संपून जातं.

रविवार, १ मार्च, २०२०

कवितेचे मर्म - शमसूर रहमान : बांगलादेश, उर्दू कविता


कवितेचे मर्म  - शमसूर रहमान : बांगलादेश, उर्दू कविता - poecy पोएसी 

एके दिवशी मी वृक्षाकडे गेलो आणि त्याला विचारलं,
“प्रिय वृक्षराज, तुम्ही मला कविता करून द्याल का ?”
वृक्ष उत्तरला,
“जर तू चिरफाळ्या उडवल्यास माझ्या सालीच्या
अन् खोडाशी एकरूप होऊन गेलास,
तर तुला नक्की कविता गवसेल. !”
ढासळण्याच्या बेतात आलेल्या भिंतीच्या कानी पुटपुटलो
"मला कविता देशील का ?"
घोगऱ्या स्वरात जुनाट भिंत वदली,
"माझ्या विटांत, आजोऱ्यात कविता दिसेल तुला !"
मग एका थकलेल्या वृद्धापाशी जाऊन गुडघ्यावर बसून तोच प्रश्न विचारला.
नि:शब्दतेची सतार वाजवत तो उत्तरला,
माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तुझ्या वदनी कोरून घे
मग पाहा, तुला कविता गवसेलच !....

फक्त कवितेच्या काही पंक्तींसाठी या
झाडापाशी, भिंतीपाशी आणि वृद्धापाशी बसून राहावं ?
आणखी किती काळ मी गुडघे दुमडून घ्यावेत ?
-------------------------

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

रेड लाईट डायरीज - तस्नीम आणि चुकलेल्या वाटा

#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा

एक दशक होतं जेंव्हा डान्स बारमुळे अख्ख्या महाराष्ट्राची तरुण पिढी भयंकराच्या वाटेवर उभी होती. प्रारंभीच्या काळात हे खूळ फक्त महानगरात होतं, त्या नंतर मोठया शहरात ते फ़ैलावलं. यातून मिळणारा अमाप पैसा अनेकांना खुणावू लागला आणि राज्यातील जवळपास सर्व मुख्य शहरात याने पाय रोवले. पाहता पाहता तालुक्यांची ठिकाणे देखील व्यापली गेली आणि शहरांच्या बाहेर असणारे हमरस्ते डान्सबारसाठी कुख्यात झाले. 
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
खेड्यापाड्यातली तरुण मुले देखील याच्या नादी लागली. पुणे मुंबई सारख्या अक्राळ विक्राळ शहरातील काही गटांचे उत्पन्न ही तसे अफाट तगडे होते की ज्यांना कितीही दौलतजादा केली तरी फरक पडत नव्हता.

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

सदीचे गुलाब - मार्सेलिनी डेसबोर्डेस : फ्रेंच कविता

सदीचे गुलाब.

आज तुझ्यासाठी मला गुलाब आणायचे होते.
खरं तर त्यांनी माझी पोतडी इतकी ठासून भरली होती की,
तिच्या गाठी आवळून बांधाव्या लागल्या होत्या.

गाठी सुटल्या, गुलाब वाऱ्यावर उधळले गेले.
बेभान झालेल्या वाऱ्याने त्यांना समुद्राकडं उडवलं.
पाण्याने त्यांना पुढे नेलं पुन्हा कधी न परतण्यासाठी.
लाटांना लालिमा चढला, जणू दग्ध लाव्हाच !
अजूनही आजच्या रात्रीस माझे कपडे सुगंधित वाटताहेत,
त्या गंधभारीत स्मृतींत जणू श्वासच जारी आहेत !

मार्सेलिनी डेसबोर्डेस- व्ह्ल्मो या प्रतिभाशाली फ्रेंच कवयित्रीच्या 'लेस रोजेस दे सदी' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतरच्या काळात मार्सेलिनीचा जन्म झाला. तिच्या बाल्यावस्थेत असतानाच तिच्या वडीलांचा व्यवसाय मोडीत निघाला. त्यांना परागंदा व्हावं लागलं. दरम्यान तिचा बालविवाह झाला. आर्थिक गरजा भागवण्यासाठी लहानगी मार्सेलिनी आईसोबत तिच्या एका नातलगाकडे निघाली. पण काही दिवसातच प्रवासात असताना तिची आई पिवळ्या तापाच्या साथीत मरण पावली. सोळाव्या वर्षी ती जन्मगावी परतली. दिसायला सुंदर असणाऱ्या अन जन्मतःच गोड गळ्याची देणगी लाभलेल्या मार्सेलिनीने स्वतःला सावरलं आणि रंगमंचाचा आधार शोधला.

शनिवार, २५ जानेवारी, २०२०

वासनेच्या काजळडोहात डोकावताना....



रामन राघववर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी त्याला त्याच्या कामवासनेविषयी विचारलं तेंव्हा त्याने निर्विकारपणे उत्तर दिलेलं की, "सेक्स हे रेशनसारखं असतं. गाडीला जसं पेट्रोल लागतं तसं परिपक्व शरीराला सेक्स लागतं."
रामनचं त्याच्या आईवर प्रेम नव्हतं, त्यानं सांगितलेलं की आईचंच त्याच्यावर प्रेम नव्हतं.
रामनला त्याचे वडील आवडायचे, वडीलांनी चोऱ्यामाऱ्या शिकवल्या हे उपकारच होय असं त्यांचं म्हणणं.
रामनच्या मात्यापित्यांचा लवकर मृत्यू झाला.

ऋतूचक्र...



आपल्याकडे हेमंत आणि शिशिर या दोन ऋतूमध्ये हिवाळा विभागलाय.
गुलाबी थंडीचं हवामान ज्याला म्हटलं जातं तो हेमंत
आणि कडाक्याच्या थंडीत जीवसृष्टी गोठून जाते, पानगळीने झाडं मोकळी होऊन जातात तो शिशिर !
इथं काही कवी मंडळी याची गल्लत करताना दिसतात म्हणून हे ज्ञानकण !

विशेष म्हणजे दिवाळसणाच्या आधी असणारा अश्विन मास शरद ऋतूत येतो, 
शरदाचं चांदणं खुल्या आभाळाखाली अनुभवल्यानंतर हेमंतातील रजईमधलं गुलाबी चांदणं अनुभवावंसं वाटणं ही या ऋतूची खासियत !

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

नागरिकत्वाबद्दलची अनास्था...



संसदेत एका महत्वाच्या विधेयकावर चर्चा सुरु आहे. सिटीझनशिप अमेंडमेंट बिल. (CAB)
हे विधेयक म्हणजे दाखवायचे दात आहेत आणि खायचे दात म्हणजे एनआरसी आहे( नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप - नागरिकत्वाची राष्ट्रीय नोंद)
हे कसे ते पाहुयात -
आपल्या देशाचे नागरीकत्व कुणाला द्यायचे याच्या मसुद्यात सुधारणा करणारं विधेयक असं या CAB बद्दल ढोबळमानाने म्हणता येईल.

देशाचे नागरीकत्व मिळवण्यासाठी काही अटी आहेत जसे की त्या व्यक्तीचा भारतात जन्म झालेला असावा वा त्याच्या जन्मदात्यापैकी एकाचा जन्म भारतात झालेला असावा किंवा ज्याचा सामान्यतः अकरा वर्षांचा रहिवास पूर्ण असावा. या खेरीज फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात विस्थापित झालेल्या लोकांसाठी काही उपकलमे आहेत.
आता या महत्वाच्या विधेयकात दुरुस्ती केली जातेय.
काय आहे ही दुरुस्ती -
या दुरुस्तीनुसार देशात त्या हिंदू, शीख, पारशी, बुद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांना नागरिकत्व मिळेल जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेले असतील. या खेरीज ११ वर्षे रहिवासाची अट शिथिल करून ६ वर्षे करण्याची शिफारस यात आहे.
आता यात केवळ मुस्लिमांना सरकारने वगळले आहे.