रविवार, ३० ऑगस्ट, २०२६
गोष्ट 'चित्रलेखा'ची, भगवतीचरण वर्मांची!
शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६
बाबा पद्मनजी - यमुना पर्यटन आणि धर्मप्रसार : एक चिकित्सा !
'यमुना पर्यटन' ही मराठी साहित्यातील पहिली सामाजिक कादंबरी मानली जाते, बाबा पद्मनजी हे तिचे लेखक. जन्माने हिंदू असणारे मात्र वयाच्या पंचविशीत ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे बाबा पद्मनजी यांचे मूळ नाव, बाबा पद्मनजी मुळ्ये. कर्नाटकातील बेळगाव येथे एका कोकणी मराठी त्वष्टा कासार कुटुंबातला त्यांचा जन्म. वडील पद्मनजी माणिकजी मुळे यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न, धार्मिक संस्कारांची वीण घट्ट असलेले आणि तत्कालीन ब्राह्मणी सांस्कृतिक प्रभावाच्या जवळचे होते. पदमनजींच्या बालपणीच्या जगात हिंदू धार्मिक आचार, कर्मकांड आणि परंपरा होत्या; पण त्याचबरोबर बदलत्या काळाची चाहूलही होती. त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी विलक्षण संघर्षमय आणि अभूतपूर्व लक्षणीय होत्या.
बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६
सोळावा लुई- एका राजेशाहीच्या अस्ताची कथा!
जॉन हार्डमन यांचे 'द लाइफ ऑफ लुई सोळावा' (The Life of Louis XVI) हे पुस्तक फ्रान्सचा
शेवटचा राजा लुई सोळावायाच्या आयुष्यावर आणि राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे एक
अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अधिकारयुक्त चरित्र मानले जाते. इतिहासकार जॉन
हार्डमन यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून या पुस्तकात लुई सोळाव्याची पारंपरिक
प्रतिमा मोडीत काढली आहे. सामान्यतः चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये लुई
सोळाव्याला एक 'कमकुवत, मूर्ख किंवा जुलमी शासक'
म्हणून दाखवले जाते. परंतु, हार्डमन यांनी
नवीन ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे हा दावा खोडून काढलाय.
पुस्तकातून समोर येते की, लुई सोळावा हा अत्यंत सुशिक्षित आणि फ्रान्सच्या सर्व राजांमध्ये सर्वाधिक वाचन असलेला राजा होता. त्याला इतिहास, भूगोल, नौदल आणि परराष्ट्र धोरणाची उत्तम समज होती. राजाकडे राजकीय दूरदृष्टी होती आणि त्याला भविष्यातील संकटांची जाणीवही होती. परंतु, त्याची खरी शोकांतिका ही होती की तो अत्यंत संकोची आणि अनपेक्षित प्रसंगी अनिर्णायक ठरला. इतिहासकारांनी बहुत करुन असे मानलेय की, लुईवर त्याची पत्नी मेरी अँटोइनेट हिचा पूर्ण प्रभाव होता. हार्डमन यांनी स्पष्ट केलेय की, राजवटीच्या पहिल्या बारा वर्षांत राजाने राणीला राजकीय निर्णयांपासून पूर्णपणे दूर ठेवले होते. परंतु, 1787 नंतर जेव्हा त्याची सुधारणा मोहीम अपयशी ठरली, तेव्हा खचलेल्या राजाने राणीवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली.
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६
फ्रेडरिक डग्लस : अक्षरांच्या प्रकाशातून स्वातंत्र्याच्या क्षितिजापर्यंत
बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६
गडचिरोलीचे खरे राजकीय अजेंडे कोणते?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई या दुर्गम आदिवासी भागातली ही अनुदानित निवासी आश्रम शाळा 'कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन' संस्थेची असून, ती काँग्रेसचे स्थानिक नेते व जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या ट्रस्टअंतर्गत चालवली जाते. आश्रमशाळेला शासनाकडून मागील 25 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अनुदान मिळतेय. म्हणजेच या शाळेची स्थापना 2000 सालाच्या पूर्वी किंवा त्या दरम्यान झालेली असावी. तीन दिवसांपूर्वी ह्या आश्रमशाळेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वसतिगृहात खाटा नसल्याने जमिनीवर झोपलेल्या सहा आदिवासी विद्यार्थिनींना मध्यरात्री मण्यार ह्या विषारी सापाने दंश केला. त्यात तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६
गोष्ट उषा मेहताची!
ही गोष्ट आहे स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वातली, जेव्हा ब्रिटिश महासत्ता एका बावीस वर्षांच्या तरुणीच्या आवाजाला घाबरली होती आणि तिचा आवाज दडपण्यासाठी जंग जंग पछाडले होते!
8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी 'करो या मरो'ची हाक देत ब्रिटिश राजवटीविरुद्ध 'चले जाव'ची घोषणा देत भारत छोडो चळवळीची सुरुवात केली. या लढ्यात जनतेने अभूतपूर्व स्फूर्तीने सहभाग घेत समग्र ब्रिटिशांना मोठे आव्हान दिले. तत्कालीन ब्रिटिश व्हाईसरॉयने या आंदोलनाचे वर्णन '1857 नंतरचा सर्वात गंभीर उठाव' असे केले होते.
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२६
संतू लोहार
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
तुलसीदासांचे श्रीराम..
गुरुवार, ३० जुलै, २०२६
इंगमार बर्गमनचा 'द सर्पंट्स एग'
माणसं जी दुष्कृत्ये करतात ती त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहतात; मात्र त्यांची सत्कृत्ये अनेकदा त्यांच्या अस्थींसोबतच गाडली जातात... म्हणूनच, त्याला सापाच्या अंड्यासारखे समजले पाहिजे; कारण ते अंडे उबल्यावर त्यातून बाहेर पडणारा जीव त्याच्या जातीप्रमाणेच अपायकारक ठरतो. हे यामागचे लॉजिक!
बुधवार, १५ जुलै, २०२६
नाळ तुटलेली नाती..
बुधवाराच्या मागच्या बाजूस असणाऱ्या हॉटेल शेरे पंजाब ग्रँडमध्ये भांडी घासणारी एक थोराड मावशी होती. चंद्राबाई नलावडे तिचे नाव. तिथल्या स्टाफचे लोक मात्र तिला 'हेलन' म्हणत! आमच्याकडे हेलन भांडी घासते, असं त्यांच्या बोलण्यातून ऐकलं तेव्हा साहजिकच कुतूहल जागं झालं! तिथली गडी माणसं लै हरामी होती. त्यांनी चंद्राबाईची पाळंमुळं खोदून काढली होती. ती आधी मोडनिंबच्या कलाकेंद्रात नाचगाणं करायची. त्यानंतर पुण्यात काही वर्षे तिने दलालीची कामं केली. पुढे जाऊन तिची उमर ढळली. ती देशोधडीला लागली. तिच्या एका इमानी आशिकमिजाज इसमाने तिला इथं चिकटवून दिलं. घरदार नसलेल्या पन्नाशीपार वयाच्या एकट्या बाईला राहायची खायची राहायची सोय झाली.
मंगळवार, १४ जुलै, २०२६
परिकथेमागचे दुःख - हॅन्स अँडरसनचा संघर्ष!
गुरुवार, २ जुलै, २०२६
एक नोंद पाकिस्तानच्या विख्यात गायिका फ़रीदा ख़ानम ह्यांच्याविषयीची. सोबतचा फोटो त्यांचाच आहे. त्याच त्या, - "आज जाने की जिद न करो..." फेमवाल्या, एक महान चितचोर नार !नव्वदच्या दशकात विख्यात शायर मुनीर नियाजी यांनी, 'हमेशा देर कर देता हूँ..' ही त्यांची बेमिसाल नज्म ऐकवली होती तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेल्या फ़रीदा ख़ानमना अश्रू अनावर झाले आणि नकळत त्या रडू लागल्या. त्यांना दिवंगत बहिणीची आठवण झाली होती!
त्यांची बहीण मुख्तार बेगम एकाएकी आजारी पडली आणि तिचा आजार बळावत गेला. विविध ठिकाणी म्युझिक टूरवर गेलेल्या फ़रीदा वेळेवर आपल्या आजारी बहिणीकडे पोहोचू शकल्या नाहीत. त्यांच्या बहिणीचा इंतकाल झाल्यावरच त्या पोहोचल्या. एकुलत्या बहिणीच्या शेवटच्या क्षणी आपण हजर राहू शकलो नाही ह्या गोष्टीची त्यांना कायमची खंत राहिली.
फ़रीदा ख़ानम ह्यांचा संसार सुखाचा होता. गायन हा त्यांचा प्राण! पतीच्या निधनानंतर त्यांनी गायन सोडलं होतं मात्र केवळ चाहत्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा माईकपुढे उभं केलं. 2015 साली पाकिस्तानस्थित कोक स्टुडिओमध्ये त्यांनी, 'आज जाने की जिद ना करो..' ही नज्म अशी काही गायली की, आताची पिढी देखील त्यांची आशिक झाली.
बुधवार, १ जुलै, २०२६
विजया मेहता – काही नोंदी.
अनिल बर्वे यांच्या ‘हमीदाबाई की कोठी‘ या नाटकाचे दिग्दर्शन करताना विजयाबाईंना हमीदाबाई या वृद्ध तवायफेच्या शरीर-भाव-चाल-बोली यांचा खरा आत्मा कसा असेल, याची कल्पना येत नव्हती. त्यांच्या सासूबाई दुर्गा खोटे यांनी सल्ला दिला: “एका खऱ्याखुऱ्या कोठीवालीकडे जा.” हा सल्ला मिळताच त्या तडक निघाल्या. त्या काळात ही गोष्ट किती धाडसी होती याची तुम्हाला कल्पना असेलच!
त्या काळात मुंबईत नेहल मंजिलमध्ये राहणारी एक वृद्ध तवायफ नीलम बाई यांच्याकडे विजयाबाई गेल्या. नीलम बाईंनी त्यांना आपले जीवन, सौंदर्य, वृद्धत्व, एकटेपण आणि त्या जगाचे सूक्ष्म बारकावे सांगितले.
हा अनुभव इतका संवेदनशील होता की, विजयाबाईंना हमीदाबाईची भूमिका आणि संपूर्ण नाटकाची दृष्टी मिळाली. ही भूमिका त्यांनी स्वतः केली होती, यावरून नाटकाकडे आणि नाटकातील पात्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी लक्षात यावी.
मंगळवार, ३० जून, २०२६
देशोदेशीचे विकृत कॅलिगुला!
त्याच्या राज्यात लैंगिक अत्याचार अशा काही टोकाला गेले होते की त्याविषयी बोलणाऱ्यास देखील शरम वाटावी! त्याने त्याच्या पत्नीवर देखील असेच विकारी अत्याचार केले होते. आपली बहीण, पत्नी आणि सहकाऱ्यांच्या बायका, राज्यातील स्त्रिया ह्यापैकी कुणावरही त्याचं मन मानेल तेव्हा तो जबरदस्ती करत असे आणि ती देखील सार्वजनिक रित्या!
सोमवार, १५ जून, २०२६
वेश्या व्यवसाय कायदेशीर की बेकायदेशीर?
मागील काही वर्षांपासून बुद्धदेव कर्माकर हा अट्टल गुन्हेगार तिच्याकडे यायचा. तिला जबरी भोगायचा, कधी पैसे दयायचा तर कधी तसाच निघून जायचा. कधी कधी मारहाण देखील करायचा. मात्र त्याच्यासोबत तिचे नाव जोडले गेल्याने तिला इतरांचा त्रास कमी झाला होता. तरीही त्याचे पाशवी वागणे तिला असह्य व्हायचे. त्याचा स्पर्शदेखील नकोसा वाटायचा. त्याच्या तोंडाला येणारा दारूचा वास आणि घामेजलेलं अंग ह्याची तिला तिडीक बसली होती. त्याला हाकलून दिले पाहिजे असे तिला राहून राहून वाटत असे.
रविवार, १४ जून, २०२६
जांभूळ आख्यान आणि व्हायरल दुष्काळ!
सध्या सोशल मीडियामध्ये जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे.
व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. 'जांभूळ आख्यान' या कथेच्या नावाचा आणि 'जांभूळ' या फळाचा थेट, अतिशय महत्त्वाचा संबंध आहे; कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटूसत्याभोवती फिरते. ह्या कथेमध्ये जांभूळ हे केवळ एक फळ नसून ते मानवी मनातील दडलेली रहस्ये आणि सत्य बाहेर आणण्याचे एक माध्यम ठरते.
बुधवार, १० जून, २०२६
आधार कार्ड आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध!
5 जुलै 2017 रोजी सकाळी रोहन, जवळच्या बागेत खेळायला गेला होता. त्याचे घर छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील खमतराई येथील डब्ल्यूआरएस कॉलनी पीएच रेल्वे स्टेशनजवळ असल्याने, चुकून ट्रेन पकडून झारसुगुडा येथे पोहोचला होता.
झारसुगुडा येथे पोहोचल्यावर, 6 जुलै 2017 रोजी चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला झारसुगुडाच्या तिकीट काउंटरजवळून वाचवले होते. तो कर्णबधिर आणि मुका आहे हे कळल्यावर, चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला ट्रेन/बसचे फोटो दाखवून तो झारसुगुडाला कसा पोहोचला याची चौकशी केली. त्याने होकारार्थी मान डोलावून ट्रेनने झारसुगुडाला पोहोचल्याचे खुणांनी सांगितले.
त्यांच्या घरात चार सदस्य होते. त्याचे वडील रोजंदारीवर काम करत, तर त्याची आई आणि एक मोठी बहीण मोलकरीण म्हणून काम करत असत. घटनेच्या वेळी आई वडील आणि बहीण घरी नव्हते, ते कामावर गेले होते.
मंगळवार, २ जून, २०२६
बजाजी नाईक निंबाळकर - एक चिकित्सा!
'शिवाजी कोण होता' ह्या मूळ पुस्तकाच्या आशयात बदल केल्याचे आणि त्यातील मजकुराशी छेडछाड केली असल्याचे काल स्पष्ट झाले.
मूळ पुस्तकातली अतिशय महत्वाची अशी, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची प्रस्तावना गाळली गेलीय. मूळ पुस्तकातील काही पाने वगळली गेलीत आणि काही पाने वा काही पंक्ती घुसडल्या गेल्यात. दादोजी कोंडदेव, शिवा काशीद यांच्या उल्लेखांची छेडछाड केली गेल्याचा आरोप पानसरे कुटुंबाने केलाय.
संबंधित प्रकाशकाकडून फक्त वीस रुपये किंमत ठेवून हे पुस्तक विकले गेलेय; इतक्या कमी मूल्यात दर्जेदार छपाई मूल्य असलेल्या पुस्तकाची निर्मितीच शक्य नसल्याने, इतके कमी मूल्य ठेवून विक्री करणे कोणत्याही प्रकाशकाला शक्य नाही, साहजिक कमी किंमत असल्याने हे पुस्तक अधिक विकले जाईल आणि मूळ मजकूर असलेले पुस्तक कमी विकले जाईल असा संबंधितांचा अंदाज होता का?
सोमवार, १ जून, २०२६
सुमन कल्याणपूर - सुमन सुगंध!
1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अजरामर देशभक्तीपर गीत सादर केले जाणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणे गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड केली होती व त्यांच्यासोबत या गाण्याचे तास न् तास सराव देखील पूर्ण झाले होते.
मात्र हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना अचानक सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी इतकी मोठी ऐतिहासिक संधी हातातून निसटल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला. ह्या घटनेची सल आणि संधी हिरावली गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आयुष्यभर कायम राहिले. त्यांच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर तिने लता मंगेशकरांना याचा दोष सहज दिला असता!
शनिवार, ३० मे, २०२६
एक शायर की मौत!
बशीर बद्र यांचे निधन झाले तेव्हा देशाच्या सर्व भागातला सोशल मीडिया त्यांच्या शायरीने भरभरून वाहिला, लोकांनी आपल्या आवडत्या शायरला प्रेमाने निरोप दिला; त्यांच्या रचनांची नव्याने उजळणी झाली इतके प्रेम लोकानी केले.
मात्र काल त्यांना अंतिम विदाई देण्यात आली तेव्हा मोजके लोक त्यांच्या जनाजाला खांदा देण्यासाठी जमा झाले होते. ही गोष्ट खटकली तरीही, 'कुछ तो मजबुरिया रही होंगी' ही पंक्ती आठवून आपण गप्प राहिलं पाहिजे!
त्यांच्या अंतिम यात्रेत अनेक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा होती, परंतु जनाजाच्या नमाजात म्हणजेच अंत्यविधीच्या प्रार्थनेत मात्र पाचशे लोक सहभागी झाले आणि त्यानंतर लोकांची संख्या आणखी कमी झाली.






.jpg)




.jpg)






