शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

शेवाळं



त्याचा कोवळा किशोरवयीन मुलगा अकाली गेल्यापासून रोज सकाळी तो या डोहाजवळ यायचा. डोहातल्या माशांना प्रेमाने खाऊ घालायचा. घरून येतानाच कणकेच्या छोट्या गोळ्या घेऊन यायचा.

डोहाच्या काठावर बसून अगदी शांतपणे डोहातल्या हिरवट निळ्या पाण्यात माशांसाठी एकेक गोळी फेकायचा. त्याने कणकेची गोळी फेकताच माशांची झुंबड उडायची. खरे तर या डोहात पूर्वी एकही मासा नव्हता, हे सर्व मासे त्यानेच आणून सोडले होते.

इथे आलं की त्याला खूप शांती लाभायची. त्या डोहापाशी मनुष्यवस्ती नव्हती नि कसली वर्दळही नव्हती. तो डोह, गर्द वनराईत हिरव्या काळ्या सावल्यांच्या दाटीत दडून होता. रात्रीच नव्हे तर दिवसादेखील तिथे विलक्षण नीरव शांतता असे. एकट्याने थांबले तर मनात भीतीचे काहूर उठावे असा तिथला भवताल होता.

शिवाय त्या डोहाविषयी वदंताही खूप होत्या, लोक त्याविषयी नानाविध भयावह गोष्टी सांगत त्यामुळे तिथे कुणीच येत नसे. लोक म्हणत की, या डोहात कुणीच जिवंत राहत नाही, त्यामुळेच यात मासे नाहीत!