रविवार, १७ मे, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - दत्तूमामा

लॉकडाऊनमध्ये कुणाच्या जीवाचे काय हाल होताहेत यावर किती लिहावे तितके कमी पडेल अशी आताची एकंदर स्थिती होतेय. हे वर्तमानच असे आहे की आगामी काळात मागे वळून पाहताना आपली मान शरमेने खाली जावी, भयंकराच्या दारात उभ्या असणाऱ्या अनेक जीवांना आपण अंधाऱ्या खोल दरी लोटून दिलेलं असावं आणि त्यांच्या आर्त किंकाळ्यांनी आपलं काळीज विदीर्ण व्हावं. यातल्याच काही निवडक घटनांना थोडासा मुलामा चढवून इथे पेश करतोय. आजची लॉकडाऊन स्टोरी आहे दत्तूमामा केंजळयांची.

शुक्रवार, ८ मे, २०२०

मुक्या जीवाचं लॉकडाऊन...

गावाकडचं लॉकडाऊन शिथिल होईल तेंव्हा खूप बरं होईल. वस्तीवरल्या गुरांच्या पाळीवर येणारा महादू वावरात यायचा बंद झाल्यापासून गायींनी वैरण खायची सोडून दिलीय आणि म्हशी काही केल्या धार देत नाहीत. मागल्या साली वासरू मेल्यावर चंद्रीच्या पुढ्यात तिचं वासरू पेंढा भरून त्याचं भोत करून ठेवलेलं. धारा काढायची वेळ झाली की पितळी चरवी घेऊन महादू हजर व्हायचा. एकेक करून सगळ्या दुभत्या जीवांच्या कासा हलक्या करायचा. सगळ्यात शेवटी चंद्रीपुढं जायचा. तिच्या जवळ येताच तिच्या पाठीवरून हात फिरवायचा, पेंढा भरून ठेवलेलं तिचं वासरू वस्तीतल्या कोठीतून बाहेर काढायचा, चंद्रीपासून दहाबारा फुटावर उभं करून ठेवायचा. वासराकडं बघताच चंद्रीचं आचळ तटतटून फुगून यायचं. आचळावरच्या लालनिळ्या धमन्यांचं जाळं गच्च दिसायचं, महादूने कासेला हात लावायचा अवकाश की पांढऱ्या शुभ्र धारा चरवीत पडू लागायच्या. चरवी गच्च भरायची. मखमली फेस दाटून यायचा. धारा काढून होताच महादू चंद्रीच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा. तिच्या मऊ पन्हाळीला कुरवाळायचा. वशिंडाला अलगद दाबायचा. पोटापाशी मालिश केल्यागत हात फिरवायचा. चंद्री खुश व्हायची. हंबरडा फोडायची. तिच्या डोळ्यात कधी तरी पाझर फुटलेला दिसे मात्र चंद्रीचं दूध आटेपर्यंत महादूच्या डोळ्याचं पाणीही आटलं नव्हतं. तिचं दूध काढून झालं की त्याच्या डोळयाच्या कडा पाणावलेल्या असत. खरं तर त्याला वाटायचं की आपण चंद्रीला फसवतोय, तिच्या मेलेल्या वासराला दाखवून आपण तिचं दूध काढून घेतॊय. पण चंद्रीचं दूध आटण्यासाठी तिची कास कोरडी होणं गरजेचं होतं हे त्यालाही ठाऊक होतंच !

रविवार, ३ मे, २०२०

लॉकडाऊनच्या काळातली ‘ती’ची देखभाल ...

जिला रक्ताच्या नात्यांनी झिडकारलेलं असतं, समजाने धुत्कारलेलं असतं, शासनदरबारी जिची कोणती किंमत नसते, जिचं अस्तित्वच मुळात कलंकीत ठरवलं गेलेलं असतं अशी ती म्हणजे वेश्या होय. लॉकडाऊनच्या या कठीण काळात तिचं कसं होणार या विषयीची पहिला आवाज मी 27 मार्च रोजी उठवला होता. त्यास प्रतिसाद देत विविध दिग्गजांनी मदतीचे आश्वासन दिले होते. काहींनी तर मलाच पैसे पाठवले होते, जे मी त्यांना तत्काळ परत केलेले. राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या कार्यालयातूनही याची दखल घेतली गेली. तसेच समाजकल्याण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीनेही मदतीचे आश्वासन मिळालं. खेरीज कालच सुप्रिया सुळे यांच्या वतीनेही विचारणा झाली. दरम्यानच्या काळात विविध ठिकाणी एनजीओजच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला होता.

मनाचे लॉकडाऊन...


कोरोना व्हायरसच्या जगभरातील थैमानाला आता दोन महिने पुरे झालेत. सर्वत्र हाहाकार उडालेला आहे आणि जो तो दिग्मूढ होऊन गेलेला आहे. यावर भाष्य करणारी एक कविता युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली गेलीय. किंबहुना तिथल्या बहुतांश देशातील प्रमुख वर्तमानपत्रात देखील तिची दखल घेतली गेलीय. ब्रिटीश राजकवी सायमन आर्मिटेज यांनी ही कविता लिहिली आहे. कवितेचे शीर्षक आहे 'लॉकडाऊन' ! ही कविता लोकांना भावण्याचं एक प्रमुख कारण आर्मिटेज यांच्या शब्दरचनेत आहे. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की या तर माझ्याच भावना आहेत. अगदी सहज सोप्या शब्दात प्रवाही चित्रमय लेखन शैलीत आर्मिटेज यांनी लॉकडाऊनच्या वेदनांना तरल स्वरूपात मांडलंय. बारकाईने वाचलं तर ही कविता एक पोट्रेट आहे, ज्यात एका मनाची तगमग आहे जे कित्येक दिवसापासून अज्ञाताच्या अंधारकोठडीत कैद आहे. देहाचंच नव्हे तर मनाचंही लॉकडाऊन झाल्यावर मनाला असंख्य इंगळ्या डसतात आणि त्यातून प्रसवणाऱ्या वेदना केवळ स्मृतीविलाप करणाऱ्या न उरता अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या ठरतात. आर्मिटेजनी कवितेत वापरलेल्या रूपकांचा पसारा इतका अफाट आहे की त्यांच्या अर्थाचा पट नभातून विस्तीर्ण व्हावा. महाकवी कालिदासाच्या मेघदूतपासून ते प्लेगबाधित ईयमच्या विजयापर्यंत अनेक बिंदू कवितेत लखलखत राहतात. त्यातून सुरु होतो स्वत्वाचा शोध जो वाचकास अंतर्मुख करून जातो.

रविवार, १२ एप्रिल, २०२०

कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..

सोबतचे चित्र - 1562 मधलं पीटर ब्रुगेल यांचं 'ट्रायंफ ऑफ डेथ'.
कोरोना व्हाया ‘अल कॉलरा’..
लेखक, कवी हे खऱ्या अर्थाने संवेदनशील असले तर ते कालानुगतिक सुखदुःखांच्या झुल्यावर शब्दांची मैफल सजवत जातात त्यावर कधी अश्रू झोका घेतात तर कधी हसू ! निर्मिकाचं कामच मुळात असं असतं. स्वमग्नतेच्या कोषात दंग होऊन निर्मिलेलं साहित्य तात्कालिक यश मिळवू शकतं मात्र काळाच्या कसोटीवर लिहिलेलं साहित्य दीर्घकालीन ठसा उमटवतं. भवतालच्या विश्वाचा आपल्याला जसा उमगेल तसा धांडोळा घेणं हे सच्च्या साहित्यिकाचं लक्षण मानलं जातं. त्या त्या कालखंडात येऊन गेलेल्या साथी, रोग, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुकांमुळे घडलेल्या घटना, युद्धे, गृहकलह, मानवी वर्तनातील विरोधाभास आणि मानव विरुद्ध इतर चराचर अशा अनेक बाबींचं प्रतिबिंब खऱ्या साहित्यात जोरकसपणे उमटतं. जगभरातील प्रतिभावंतांनी आपापल्या परीने ते शब्दबद्ध केलंय.

बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोनाचे संक्रमण - इतिहासाचं अनोखं स्मरण !


सोबतचा फोटो चार एप्रिलला युरोपमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे छायाचित्र म्हणजे मानवी इतिहासाला निसर्गाने दिलेली चपराक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे दृश्य ग्रीसमधलं आहे. यात दिसणारा पेरिक्लेसचा पुतळा अथेन्समधला आहे. पेरिक्लेसचा काळ अडीच हजार वर्षापूर्वीचा असला तरी आताच्या कोरोना व्हायरस आऊटब्रेकशी त्याचा एका अर्थाने संबंध आहे. आजघडीला कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर युरोप हादरून गेलंय, त्यात ग्रीस देखील सामील आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वव्यापी झाल्यावर अथेन्समधल्या सर्व प्रमुख इमारती, गर्दीचे चौक, रस्ते धुण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून पेरिक्लेसचा पुतळा सॅनिटाइझ केला गेला. नेमक्या त्याच क्षणी हा फोटो क्लिक केला गेला आणि अख्ख्या युरोपमध्ये तो व्हायरल झाला ! असं काय होतं या फोटोत ? हे जाणून घेण्यासाठी इतिहासात बरंच मागे जावं लागेल.

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...  
    
चीनमधल्या लॉकडाऊन  स्टोरीज आता एकेक करून समोर येताहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनी दैनिकात एक कथा प्रसिद्ध झालीय. आशियाई देशात ती खूप व्हायरल झाली. पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्या व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध करायचं ठरवलं जेणेकरून लोकांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी. ही दास्तान आहे फेंग ली या तरुणाची. सहा महिन्यापासून आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं त्याच्या मनात घाटत होतं. कामाचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. वुहानला जायची सवड काही केल्या मिळत नव्हती. अखेर योग जुळून आला. डिसेंबरच्या मध्यास त्यानं वुहानला आपल्या आईवडिलांकडे यायचं नियोजन पक्कं केलं. तो घरी येताच त्याच्या मातापित्यांना प्रचंड आनंद झाला. दरम्यान शहरात एकेक करून करोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. लीच्या घरीही याची दहशत जाणवत होती. मात्र पुढे जाऊन इतकं कठोर लॉकडाऊन होईल आणि आपलं आयुष्य त्यात गोठून जाईल याची त्याच्या कुटुंबातील कुणीच कल्पना केली नव्हती. जानेवारीत वुहानच्या सगळ्या सीमा सील करण्यात आल्या. लॉकडाऊन फारतर दोनेक आठवडे चालेल असा त्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. काळ जसजसा पुढं जात होता तसतसं लॉकडाऊनचा फास घट्ट आवळत होता. कसलीही दयामाया नव्हती की कुणाला त्यात सूट सवलतही नव्हती. पहिल्या दोन आठवड्यात भाजीपाला आणि जरुरी अन्नधान्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्यास अनुमती होती. सुपरमार्केटस त्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. सर्वांच्या घराच्या दरवाजांवर सील लावण्यात आलं.

सोमवार, ३० मार्च, २०२०

गोष्ट एका डॉक्टरांच्या फोटोची...



सोबतच्या छायाचित्राला एक गौरवशाली इतिहास आहे. नॅशनल जिओग्राफिकने 1987 चे सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून याची निवड केली होती. कारण या छायाचित्रामागची पार्श्वभूमी होतीच तशी. छायाचित्राच्या केंद्रस्थानी एक डॉक्टर दिसतात, त्यांची भावमुद्रा गंभीर आहे. रुग्णाच्या पॅरामीटर्सवर त्यांची नजर खिळलेली आहे. तसबिरीच्या मधोमध एका स्ट्रेचरवर निद्रिस्त अवस्थेतील वयस्कर रुग्ण दिसतो. सर्व बाबी निरखून पाहिल्या तर लक्षात येतं की हे छायाचित्र एका ऑपरेशन थियेटरमधलं आहे. ऑपरेशन झालेला रुग्ण कदाचित अजूनही शुद्धीवर आलेला नसावा आणि त्याच्या बाजूस बसलेले डॉक्टर त्याच्या वैद्यकीय मानकांवर कटाक्षाने लक्ष ठेवून आहेत. स्ट्रेचर भवती केबल्सचं जाळं आहे. विविध वैद्यकीय सामग्री नजरेस पडते. छायाचित्राच्या उजव्या कोपऱ्यात एक सर्जन बसल्या जागीच झोपी गेलेले दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा खूप काही सांगून जातो. एखादी मोठी जिकिरीची शस्त्रक्रिया पार पाडल्याची लक्षणं या छायाचित्रातून आपल्याशी बोलत राहतात. जगातील बोलक्या छायाचित्रात आजही याची गणना होते...

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

एक आर्त हाक वेश्यांची...



एक आर्त हाक मदतीची...

एफबीवर कमी होतो कारण एका जिव्हाळ्याच्या प्रश्नात गुंतून पडलो होतो.

अर्थातच देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठीचा सार्वधिक भयंकर काळ आहे तेंव्हा त्यांच्यासाठी शक्य ते करणं हे सर्वाधिक प्राधान्यतेचं काम झालं.

सध्या आपण सगळेजण रोज सकाळी बाहेर पडून आवश्यक ती खरेदी करू शकतो आणि वेळेत घरी परत येऊ शकतोय.

मात्र या बायकांकडे ना पैसे ना घर !

करोना व्हायरसची तीव्रता वाढली तसा यांना सर्वात अधिक फटका बसला, फेब्रुवारीएन्ड पासून यांची ओढाताण सुरु झाली आणि आता त्या कंगाल अवस्थेत आहेत.

रोजच्या कमाईवर जगणाऱ्या इतर अनेक घटकांप्रती समाजात सहानुभूती आहे मात्र यांचं असं नाही. बाकीच्या सर्व घटकांना समाजात थोडंफार स्थान आहे, मान आहे, आदर आहे यांच्या वाट्याला मात्र तिरस्कार आणि हेळसांड आहे.

रविवार, २२ मार्च, २०२०

पॅलेस्टाईनची द्रोहफुले - अरेबिक : खालेद अब्दुल्लाह


पॅलेस्टाईनची द्रोहफुले...

ताकद, दहशत आणि राक्षसी आकारमान याच्या जोरावर कुणी अमर आणि सर्वकालिक राहू शकत नाही. त्यास आव्हान देणारे, त्याच्याशी झगडून आपलं छोटंसं का होईना पण स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे निर्माण होतच राहतात. कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली वा कसलीही षडयंत्रे रचली तरीही अशा आव्हानांना नेस्तनाबूत करता येत नाही. मातीतून अंकुर उगवावा इतक्या सहजतेने ही विद्रोही रोपटी तग धरत नसली तरी चिकाटीने दगडमातीचं काळीज भेदून आपल्या परीने ती उगवत राहतात, जमेल तशी वाढत राहतात. अगदी जेत्यांच्या चिरेबंदी गढ्यांच्या परसदारात, अंगणातदेखील ही द्रोहफुले उगवतात. त्यांच्यातल्या प्रत्येकाला तरवारीचं पातं लाभलं नसलं तरी त्यांचा दरवळ अस्मान पेटवण्यास पुरेसा ठरतो. पॅलेस्टिनी कवी खालेद अब्दुल्लाह यांच्या 'सीड्स ईन फ्लाईट' या मूळच्या अरेबिक कवितेचा स्वैर मराठी अनुवाद याला साक्ष आहे. जीवनाच्या रसरशित जाणिवांनी आणि अर्थपूर्ण प्रतिमांनी ही कविता सजलेली आहे. पहिल्या पंक्तीपासून ती मनाचा ताबा घेते. कवितेच्या अखेरीस विद्रोहाचं बीज वाचकांच्या मनात अलगद पेरण्यात कवी यशस्वो होतो. उत्तुंग आशयाने आणि कवीच्या पार्श्वभूमीने ही कविता बोलकी झाली आहे. कवीच्या मातृभूमीची ओढ यात आस्ते कदम तरळत जाते आणि अखेरीस दृढ होत होते.