चित्रपटाची कथा 1935 च्या इंग्लंडमधील एका मोठ्या राजवाड्यात सुरू होते. टॅलिस कुटुंबाची तेरा वर्षांची मुलगी ब्रायोनी टॅलिस ही अत्यंत कल्पक आणि महत्त्वाकांक्षी कुमार वयीन लेखिका. तिच्या सभोवतालच्या गोष्टींना ती स्वतःच्या कल्पनेत रंगवून पाहत असते.
ब्रायोनीची मोठी बहीण सेसिलिया आणि त्यांच्या घरातील नोकराचा मुलगा रॉबी टर्नर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असतात. रॉबी हा अभ्यासात हुशार असतो आणि टॅलिस कुटुंबाचे प्रमुख त्याच्या शिक्षणाचा खर्च करत असतात.
एक दिवस ब्रायोनी खिडकीतून सेसिलिया आणि रॉबीला कारंज्याजवळ पाहते, जिथे एका वादादरम्यान सेसिलिया कपडे काढून पाण्यात उतरते.
ब्रायोनीला या गोष्टीचा अर्थ समजत नाही आणि या घटनेकडे ती चुकीच्या दृष्टीने पाहते. त्यानंतर, रॉबी सेसिलियासाठी एक प्रेमपत्र लिहितो, ज्यामध्ये काही अश्लील शब्दांचा वापर केलेला असतो. ते पत्र चुकून ब्रायोनीच्या हातात पडते, ज्यामुळे तिचा रॉबीबद्दलचा पूर्वग्रह अधिकच पक्का होतो. त्यानंतर ती लायब्ररीमध्ये त्या दोघांना अत्यंत जवळीक साधताना, शारीरिक संबंध ठेवताना पाहते, ज्यामुळे ती घाबरते आणि रॉबीला एक विकृत व्यक्ती समजते.
त्याच रात्री, त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी एक असलेल्या लोला ह्या अल्पवयीन मुलीवर अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीद्वारे बलात्कार होतो. आधीच रॉबीबद्दल मनात राग आणि गैरसमज बाळगून असलेली ब्रायोनी, पोलिसांसमोर खोटी साक्ष देते की, तिने स्वतः रॉबीला ते कृत्य करताना पाहिले आहे. वास्तविक पाहता, तो बलात्कार त्यांच्या घरी आलेला एक श्रीमंत उद्योगपती पॉल मार्शल याने केलेला असतो. परंतु, ब्रायोनीच्या साक्षीमुळे रॉबीला जेलमध्ये जावे लागते. सेसिलियाचा तिच्या बहिणीवर आणि कुटुंबावरचा विश्वास उडतो आणि ती घर सोडून निघून जाते.
1940 मध्ये, दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉबीला एका अटीवर जेलमधून सुटण्याची संधी मिळते, ती अट असते सैन्यात भरती होण्याची! रॉबी अट मान्य करतो आणि फ्रान्समध्ये लढायला जातो. तिथे 'डंकर्क'च्या जगप्रसिद्ध युद्धात तो गंभीर जखमी होतो. दुसरीकडे, सेसिलिया लंडनमध्ये एक नर्स म्हणून काम करत असते. रॉबी आणि सेसिलिया युद्धातून परत आल्यावर एकत्र राहण्याचे स्वप्न पाहत असतात.
दरम्यान, सज्ञान झालेल्या आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या ब्रायोनीला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. तिला समजते की, तिच्या बालिशपणामुळे आणि खोट्या साक्षीमुळे दोन लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ती कॉलेज सोडून सेसिलियाप्रमाणेच लंडनमध्ये नर्स बनते, जेणेकरून ती लोकांची सेवा करून स्वतःच्या पापांचे प्रायश्चित्त करू शकेल.
ब्रायोनी तिची बहिण सेसिलिया हिला भेटायला तिच्या लंडनमधील फ्लॅटवर जाते. तिथे तिला रॉबी आणि सेसिलिया एकत्र राहताना दिसतात. रॉबी तिच्यावर खूप रागवतो. ब्रायोनी त्यांची माफी मागते आणि कोर्टात जाऊन आपली साक्ष बदलण्याचे वचन देते, जेणेकरून रॉबीवरील कलंक पुसला जाईल.
चित्रपटाच्या शेवटी कथा तत्कालीन वर्तमानकाळात 1999 मध्ये येते. वृद्ध झालेली ब्रायोनी आता एक प्रसिद्ध लेखिका झाली आहे आणि तिला डिमेंशिया अर्थात स्मृतीभ्रंश हा आजार झाला आहे. तिच्या शेवटच्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत ती एक धक्कादायक खुलासा करते.
ती सांगते की, प्रत्यक्षात ती कधीच सेसिलिया आणि रॉबीला भेटायला गेली नव्हती आणि तिने कधीही आपली साक्ष बदलली नव्हती. कारण, जून १९४० मध्ये डंकर्क येथे रक्ताच्या संसर्गाने रॉबीचा मृत्यू झाला होता, आणि सेसिलियाचा त्याच वर्षी लंडनच्या अंडरग्राउंड स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. ते दोघे कधीच पुन्हा एकत्र येऊ शकले नाहीत.
वृद्ध ब्रायोनी रडत सांगते की, तिने आपल्या पुस्तकात त्या दोघांना एक सुखी शेवट बहाल केला, कारण प्रत्यक्ष आयुष्यात जे सुख ती त्यांच्याकडून हिरावून बसली होती, ते ती त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर या कादंबरीच्या माध्यमातून देऊ इच्छित होती. हेच तिचे 'प्रायश्चित्त' अर्थात Atonement होते.
'अटोन्मेंट' हा चित्रपट इयान मॅकइवान यांच्या याच नावाच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित एक उत्कृष्ट रोमँटिक वॉर-ड्रामा चित्रपट आहे. जो राइट ह्यांनी याचे दिग्दर्शन केले होते. ही कथा गैरसमज, गुन्हा, युद्ध आणि आयुष्यभराच्या पश्चात्ताप भावना आदी गोष्टींभोवती फिरते.
चित्रपटाची पटकथा अतिशय उत्कृष्ट आहे. पूर्वार्ध हा एका संथ, गूढ आणि सुंदर वातावरणात सुरू होतो, तर उत्तरार्ध युद्धाच्या भीषणतेत आणि वेदनेत नेऊन सोडतो. मानवी भावना, अहंकार, वैचारिक अपरिपक्वता आणि त्याचे संपूर्ण आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम चित्रपटात खूप प्रभावीपणे मांडले आहेत. शेवटचा ट्विस्ट प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जातो.
अभिनेत्री किरा नाइटली हिने सेसिलियाची भूमिका अत्यंत सुंदर आणि संयत पद्धतीने साकारलीय. तिचा पडद्यावरील वावर आणि रॉबीसोबतची तिची केमिस्ट्री थक्क करणारी आहे. जेम्स मॅकव्हॉयने रॉबीच्या पात्रातील प्रामाणिकपणा, प्रेम आणि नंतर युद्धामुळे आलेली हताशता अप्रतिमपणे दाखवलीय. डंकर्कच्या दृश्यांमध्ये त्याचा अभिनय डोळ्यात पाणी आणतो.
अवघ्या तेरा वर्षे वयाच्या साओर्श रोननने या चित्रपटात इतका परिपक्व अभिनय केलाय की तिला यासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. तिच्या डोळ्यांतील भाव संपूर्ण चित्रपटाला दिशा देतात. संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे. ब्रायोनीच्या टाईपरायटरचा आवाज संगीताचे बॅकग्राउंड इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरण्याची कल्पना जीनियस आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संगीताचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
ह्यातला डंकर्कचा 'सिंगल-टेक' सीन अभूतपूर्व आहे. युद्धभूमीवरील पाच मिनिटांचा एक सिंगल टेक सलग शॉट आहे, जो सिनेमॅटोग्राफीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्या शॉटमध्ये युद्धाची भीषणता आणि सैनिकांची वेदना हुबेहूब टिपलीय.
'अटोन्मेंट' हा केवळ एक प्रेमकथा असणारा चित्रपट नाही, तर तो गुन्हा, पश्चात्ताप आणि कलेच्या माध्यमातून मिळणाऱ्या मुक्तीचा एक प्रवास आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्याच काळासाठी मनावर एक उदासी आणि विचार करायला लावणारी शांतता मागे राहते. कसदार, भावनाप्रधान आणि कलात्मक चित्रपट आवडणाऱ्या कोणत्याही सिनेरसिकासाठी हा एक मस्ट-वॉच क्लासिक चित्रपट आहे. असो.
आता पुन्हा एकदा लेखाच्या सुरुवातीस लिहिलेल्या वाक्याकडे वळतो. कोणत्याही व्यक्तीला वाटत असते की, आपल्या हातून झालेल्या चुका जमेल त्या पद्धतीने दुरुस्त करता याव्यात. यासाठी माणूस जमेल त्या गोष्टी करतो, जीवाचा आटापिटा करतो. कधी त्यात यश येते तर कधी अपयश, मात्र खरे पाहता कोणतीही चूक कधीही जशीच्या तशी दुरुस्त करुन बिघडलेली गोष्ट पूर्ववत करता येत नाही, आयुष्याला लागेलेले वळण हवे तर बदलता येते, नव्या रस्त्याने आधीपेक्षा मोठी झेप घेता येते, मात्र एकदा एक वळण चुकले तर पुन्हा मागे जाऊन त्या रस्त्यावर नव्याने पहिल्यासारखा चालता येत नाही!
हे वास्तव स्वीकारून जो पुढे जातो त्याला काहीतरी समाधानकारक गवसते, बाकी लोकांच्या मस्तकी पश्चातापाची अश्वत्थामी जखम येते, जी आयुष्यभर भळभळत राहते! हाच तर अटोन्मेंटचा अर्थ आहे, सर्वांना आयुष्यात किमान एकदा तरी त्याची गरज पडतेच!
- समीर गायकवाड
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा