शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२६

कोकणातले दिवस - रवींद्र पिंगे!


'आम्ही बापलेक कोकणात वस्ती करुन होतो. सकाळी खरपूस पेजेची भरपेट न्याहारी असे. तोंडी लावायला गाडग्यातलं आंबट दही आणि तिखट पापड. दुपारला बाबा, लाल तांदळाच्या भाकऱ्या फक्कड भाजीत; तांबडी मिरची लावून रावसाचं नाहीतर मुडदुशाचं झणझणीत सांबार करीत.'

'त्याचा ठसका थेट मस्तकापर्यंत उसळे आणि हाताचा वास दोन-दोन तास घमघमे. नंतरचं गोड काम म्हणजे कलमी आंब्याच्या फोडींवर ताव मारणं. आंबे किती मटकावले त्याचा फालतू हिशेब कोण कशाला ठेवणार? ते स्वादिष्ट जेवण मनसोक्त रेटायचं, वर बावीचं गारगार पाणी घटाघटा प्यायचं, वाऱ्याच्या दिशेला सतरंजी टाकून नंतर घामानं निथळत झोपी जायचं हा दिवसभराचा उद्योग.'

'झोपून उठल्यावर संध्याकाळी फुलपात्र भरून गरमागरम चहा घेतला की, हातात काठी घेऊन घाटी पकडायची. वर रानात जीव रमवायचा नि आभाळ गोळा व्हायला लागलं की माघारी यायचं. रात्री तांबडा गरम भात, बडग्यांची आमटी, कधी कुळथाचं पिठलं. कधी गऱ्यांची फोडणीची भाजी. रातांब्यांचं तिखट सार किंवा सोलकढी आम्ही अंगतपंगत करून कंदिलाच्या उजेडात जेवायचे. जेवणे यथासांग आटोपली आणि भांडीकुंडी नीट जागेला लागली, की मोकळ्यावर अंगणात बसून दुस-यांच्या इस्टेटींच्या गप्पा मारायच्या..'

‘पडवीत झोपाळा होता. मी हमेशा झोपाळ्यावर असे. बाबा देहाने कुठेही असोत, त्यांचा जीव सदाचाच झाडामाडांत असे. कलमांचा विषय निघाला की त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागे म्हणत, ‘हे तुमच्यासाठी केलंय. तुम्ही ऐश्वर्य भोगा.’

दिवस असे एकमेकांना धरून असण्यातल्या आपुलकीजन्य सुखाचे होते. आमच्यापाशी दिडक्या नव्हत्या. शांत समाधान काठोकाठ होते. कलहाचं तर नावसुद्धा नव्हतं. आम्ही बापलेक फुलावनांसारखे एकजीव होतो..'

रवींद्र पिंगे यांच्या 'कोकणातले दिवस' ह्या लेखातील ही अवतरणे.

पिंगेंचा जन्म कोकणातील राजापूर तालुक्यातील उपळे गावचा. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीमध्ये नोकरीस होते.

पिंगे लहानाचे मोठे मुंबईतच झाले. त्यांचा पिंड अस्सल कोकणी माणसाचा असल्याने त्या काळातल्या भरपूर नि दीर्घ सुट्टीत ते आपल्या उपळे गावातील घरीच वास्तव्यास असत. तत्कालीन निरागस अनुभव अखेरपर्यंत त्यांच्या सोबतीस राहिले.

कोकणातल्या घाटांतून केलेले चढउतार, व्हाळांवरचे बांबूचे थरथरते साकव, तरीतील प्रवासाच्या असंख्य आठवणी, कोकणातल्या पाणंदी, बंदर, बांबूची बेटे, आमराया, गडगे, बावी, वटवाघळ, सापसरडे, देवळं रावळं, पुळण्या, भातखाचरं, कोकणातल्या खोपटय़ातल्या गावठी हॉटेलात मिळणारी कांदाभजी, शेंगदाण्याचे लाडू या सगळ्या घटकांनी त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले.

सुमारे सात दशकांपूर्वी, त्यांच्या गावात किमान उत्पन्नाचे साधन नसल्याने पैशाचं दर्शनही डोळ्यांना घडत नसे. शेती एके शेती, हा एकच चरितार्थ. तांबूस छटेचा जाडाभरडा तांदूळ हेच पोटपूजेचं एकमेव साधन. सोबत खाडीतल्या चंदेरी मासळीची रास! पिंगे गमतीने म्हणतही, ‘पिंग्यांचा वंश केवळ सांजसकाळ मासे खाण्यासाठी उपळे गावात जगला आणि शेकडो वर्षे सुखात नांदला.'

पिंग्यांनी गुरंढोरं सांभाळली नाहीत. परंतु, होडकूल वल्हवून गावकऱ्यांना पैलथडी नेणं, वाट हरवलेल्या गुरावासरांचा चुडीच्या प्रकाशात रात्री शोध घेणं, गावकऱ्यांना पंचांग सांगणे, गावभेटीला येणा-या सरकारी कर्मचाऱ्यांची सरबराई करणं आणि गावकऱ्यांच्या एकूण हितावर गस्त घालणं ही कामं उपळेकर पिंग्यांच्या पिढ्यांनी मनोभावे केली.

जगाच्या नकाशावर नावनिशाणी नसलेलं, नव्या जगाच्या स्पर्शापासून दूर असलेलं परमशांत, निवांत खेडं उपळे; ज्याला, रवींद्र पिंगे आपली जन्मभूमी आणि पुण्यभूमी मानतात त्याला निसर्गाचा वरदहस्त आहे, आणि गाव हेच उपळेकरांचं काळीज होतं.

सर्व वाड्यावस्त्या मिळून हजाराच्या आत लोकवस्ती असलेले उपळे हे टीचभर गाव. नुकतीच वीजबत्ती आलेली. वाहतुकीचे पक्के रस्ते नाहीत. एस.टी.ची सेवा अलीकडे सुरू झालेली. राजापूर ही पूर्वीची जवळची बाजारपेठ. सुमारे वीस मैलांवर असलेली. आता मात्र गावकऱ्यांना रोजच्या जीवनाला आवश्यक वस्तू गावातल्या दुकानांत मिळतात.

एकुलत्या एक जुन्या शाळेची इमारत विस्तारली तेव्हा त्याचं समाधान पिंगेंना मिळालं. ते म्हणतात, 'उपळं हे मुंबईत पोटापाण्यासाठी स्थायिक झालेल्या आम्हा ग्रामस्थांचा आधार. माझं वडिलोपार्जित घर, हक्काचं घर उपळ्यात आहे, हा विचार मन पुलकित करतो. उपळ्याला आम्ही विसरूच शकत नाही.'

उपळ्याच्या घराच्या पडवीत बसून पिंग्यांना सर्व ऋतू नीट न्याहाळता येत. गडग्याला बिलगून असलेला कोरडा ठाक वहाळ पावसाळ्यात तुडूंब भरून गर्जना करीत वाहताना ते डोळे भरून पाहत. आंब्याच्या दिवसात राघूंचे थवे नि उनाड माकडांच्या टोळ्या त्यांना भूल पाडत. चिवारीचं झुलणारं बन पाहणं हा त्यांचा अत्यंत आनंदाचा विषय असे.

गडग्याच्या बिळातील घोरपडी नि मुंगूस निमंत्रण दिल्यासारखी खरकटं खायला हजर होत. अलीकडे हा खेळ बंद झाल्याने पिंगे अस्वस्थ होत. या साऱ्या आठवणींबरोबर स्वत:च्या मालकीची पिढ्यान् पिढ्या मासे, लठ्ठ बेडूक, कासवं आणि पानसाप सांभाळणारी दोनशे वर्षाची गोड गोड पाण्याची चिऱ्यांची विहिर पिंगे कधीच विसरु शकले नाहीत. मालकी संपलेल्या जमिनीकडं पाहूनही पिंगेंना समाधान वाटायचं.

पिंगे म्हणत, ‘‘ज्याचे पाय उपळ्याला लागतील तो त्या भूमीच्या अद्भुत निसर्गसौंदर्याचा आजन्म बंदा होईल. उपळ्यात दृष्टीस पडत नाही अशी एकमेव वस्तू म्हणजे छापील पुस्तक! पण निसर्गाचं इतकं देखणं पुस्तक दृष्टीसमोर कायम असल्यानंतर छापील बुकाची आठवण कुणाला होणार? मी उपळ्यात सुखी असतो.’’

‘उपळ्यांत आमचं घर माती दगडाचं होतं. घरावर गवती शाकार होता. घरात खुंटीला लाकडी नांगर लटकत होता. इमानदारी प्रीत्यर्थ ब्रिटिशांनी बक्षीस दिलेली लखलखीत तलवार घरात होती. पुढं दुर्लक्ष झाल्यामुळे आणि माणसं पोटापाण्यासाठी पांगल्यामुळं घर कोसळलं. तलवार गेली. उरला फक्त घराचा चौथरा आणि ऐसपैस मोकळं परसंव. माझ्या डोळ्यांसमोर आज तीच भग्न वास्तू आहे.'

'तरीही अखेरपर्यंत गावची ओढ कमी झाली नाही. विजयदुर्गच्या खाडीकाठावरचं इटुकलं खेडं, एक रंगीत ठिपका म्हणजे उपळे! सगळ्या निसर्गसौदर्याचं अत्तर जर कुठे एकवटलं असेल, तर ते फक्त वाघोटण्याच्या खाडीकाठावरल्या उपळ्यातच काय ते आहे!" असेही पिंगे म्हणत.

ह्याच असीम ओढीने रवींद्र पिंगे कित्येक वर्षानंतर आपल्या गावी आलेले. पण सारेच अनोळखी झालेले.
भुकेने जीव कासावीस झाला म्हणून तरी वरच्या हॉटेलात शेंगदाण्याचे लाडू खाण्याची कल्पना सुचली.
पण हॉटेलच्या झोपडीत फक्त चहाचं काळं कढतवणी पाणी मिळालं.
शाळेत शुकशुकाट. तलाठी भाऊंच्या घरातही शुकशुकाट.
चौकशी केल्यावर एकाने सांगितले, ‘‘आज सुट्टीचा दिवस ना? हल्ली माणसं बदलीवर येतात. तुम्ही कोण?’

ह्या प्रसंगी भावुक होऊन पिंगे लिहितात, ‘‘माझ्या स्वत:च्या गावातच ‘‘तुम्ही कोण?’’ हा प्रश्न मला कधी काळी ऐकावा लागेल, हे स्वप्नातही खरं वाटलं नव्हतं. मी ओळखायचं ते ओळखलं.. फुटेस्तोवर भरलेल्या एसटीत स्वत:ला लिंपून घेऊन मी माझ्या शहराकडे भुर्रकन निघालो.’’

लेखनाच्या रुपाने ते आपल्या उपळ्याला सतत कवेत घेत राहिले. त्यांनी उपळं वाचकांपर्यंत पोहोचवलं. पिंगेंचं बंद घरही, अगदी करकरणा-या झोपाळ्यासहीत, अनेकांना आपल्याकडे ओढतं. वाचकांपेक्षा ‘आपल्या आई-वडिलांना आपलं लेखन आवडायचं ही या जन्मातली सर्वात मोठी कमाई' असे ते म्हणत.

गौतम बुद्धांचा उपदेश ते सांगत, ‘‘यशस्वी होऊ नका, कारण यश लाभलं तर मत्सरी माणसांचा तुम्हाला गराडा पडेल. अपयशीसुद्धा होऊ नका. कारण त्या दु:खाने तुम्ही खचून जाल. यश आणि अपयश यांच्या पलीकडे जी निर्वेध स्पेस आहे तिथं पोहोचा.' एक कृतार्थ लेखक, जो सच्चा माणूस असतो तोच असं लिहू शकतो! पिंगे तसेच होते!

कधीतरी त्या स्वच्छ धुपक्या कालखंडाची आठवण होऊन पिंगे अस्वस्थ होत. लगेच जवळचा मोका साधून गावाकडे उभ्या उभ्या चक्कर टाकून येत. वर्षानुवर्षे पिंगे कोकणात येत आणि त्या भूमीतील एक गवताची काडी की, व्हाळातला एक धोंडा बदलायला तयार नसल्याचे पाहून अगदी थक्क होत. मात्र जोडीने एक खंत ते व्यक्त करत -

‘शांत बसलेला माणूस पाहून समाधान वाटतं. कोकणात पूर्वी तसं वाटायचं. शांत बसलेल्या माणसाच्या डोळ्यात अश्रू डबडबताना दिसले तर खिन्न वाटतं. आजच्या कोकणात तसं खिन्न वाटतं!'.

मनाचा तळ ढवळून काढणारं असलं काही वाचनात आलं की, हात नकळत पुन्हा पुस्तकांकडे वळतात आणि पुस्तकाच्या पानांचा तो चिरपरिचित गंध मनाला भुलवू लागतो ..

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा